Monday, October 27, 2025

banner 468x60

Homeललितदेवदत्त यांना माहीत होती चंदन नगरची सत्यकथा!

देवदत्त यांना माहीत होती चंदन नगरची सत्यकथा!

प्रणाली वैद्य

भाग – 8

डॉक्टर देवदत्त पुढे सांगू लागले… “विश्वासच्या तोंडून चंदन नगरचं नाव ऐकलं आणि या मोहरेबाबत समजलं… माझ्या संपूर्ण अभ्यासात त्या नगरातून असं पुराणकालीन वस्तू घेऊन कोणीही जिवंत परतलेलं नाही… तुमच्याबाबत नक्कीच काहीतरी विशेष घडलंय, हे तेव्हाच माझ्या ध्यानात आलं आणि पुन्हा या विषयावर काम करायला मनाने भाग पाडलं… मला माझ्या या कामात आता तुमचे सहकार्य लागेल अन् तुम्हाला ते द्यावेच लागेल… कारण, ही मोहोर तुम्ही आणली आहे आणि ती तुम्हाला असं शांत बसूही देणार नाही… याची प्रचिती तुम्हाला येतच आहे!”

डॉक्टर देवदत्त यांचं बोलणं ऐकून मुलं हैराण होऊन एकमेकांकडे पाहात होती… “घाबरू नका, तुम्हाला यात काहीच होणार नाही, याची पूर्ण जबाबदारी माझी… पण मी सांगेन तसंच तुम्हाला वागावं लागेल, अन्यथा जीवावरही बेतू शकेल! तर काय म्हणता? काय विचार आहे तुमचा?”

खरंतर, तिघांच्याही चेहऱ्यावर बारा वाजले होते… ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी अवस्था होती त्यांची! त्यांचे चेहरे पाहून विश्वासराव बोलले… “मुलांनो, मला वाटतंय तुम्ही डॉक्टर देवदत्त यांना साथ द्यावी ट्रेसमुक्त होण्याकरिता तोच योग्य मार्ग आहे… आणि देवदत्त तुम्हाला काही होणार नाही, याची हमी देत आहेत.  तुम्ही त्यांच्या वागण्या-बोलण्यानुसार चालाल तर, तुम्हाला काहीही होणार नाही, याची हमी मी देतो… शाल्मली बेटा, करा त्यांना मदत…”

विश्वासरावांच्या बोलण्याने मुलांना धीर आला, त्याप्रमाणे ते तयार झाले मदतीला…

“मुलांनो, जमलंच तर तुमच्या मदतीने मी या चंदन नगरचं रहस्य जगासमोर आणू शकतो, अशी मला खात्री वाटते… मुलांनीही आपली तयारी दर्शवली…” डॉक्टर देवदत्त सांगू लागले, “10 वर्षांपूर्वी मला या चंदन नगरबाबत समजलं होतं… तुमच्यासारखीच मी आणि माझी टीम या चंदन नगरच्या भेटीला गेलो. तिथली भू-रचना खरंच विलक्षण वाटली… वाळवंटातील ते भग्नावशेष कसली तरी साक्ष देत होते… खूप काही पाहिलं, पण हाती काही लागलं नाही!”

हेही वाचा – हजारो वर्षांपूर्वीची मोहोर श्लोकला मिळाली कशी?

“कर्म-धर्म संयोगाने तो दिवस पौर्णिमेचा होता… आम्ही गावातच आमचा कॅम्प बनवला होता… माझे इतर सहकारी होतेच… त्यांचं म्हणणं होतं की, त्या भग्नावशेषांजवळ खोदकाम करायला हरकत नाही… पुरातन अस्तित्व आहे म्हणजे ऐतिहासिक ऐवज नक्कीच मिळेल… मला या सगळ्यात काहीच रस नव्हता, त्यामुळे फक्त अभ्यासक म्हणून मी तिथे सर्व पाहात होतो… मात्र माझ्या सोबतच्या काही सहकाऱ्यांना वेगवेगळे भास होऊ लागले… हवेत एक सुगंध पसरला होता… ज्या मित्राला तिथल्या गुप्तधनाबाबत खात्री होती… तो असंबद्ध बडबडू लागला. मी त्याला कंट्रोल करायचा खूप प्रयत्न केला, पण का कोणास ठाऊक, मला तो झेपेनासा झाला! काही विचित्र ताकद जणू त्याच्यात संचारली होती. मला सारखं खुणावत होता, ‘ती बघ… ती बोलावतेय मला…’ खरंतर मला कुठेच काही दिसत नव्हतं… तर तो माझ्यावरच चिडला, “अरे, ती बघ ना… ती तिथे समोर आहे… नखशिखान्त हिरेमाणकांनी सजलेली कोणी देवता किंवा कोणी राणी…” पुढच्याच क्षणी तो जीव घेऊन त्या दिशेने धावत सुटला… आम्ही पाठी गेलो, पण त्याचा कुठेच थांगपत्ता लागला नाही… जणू त्या काळोखाने त्याला गिळून टाकलं असावं… ना तो परत आला, ना सापडला…”

“समोरच घडलेल्या या घटनेने मी पुरता हादरून गेलो… मनात ठाम निश्चय करून या घटनेच्या गाभ्यापर्यंत जाण्याचा निश्चय केला… पुरातत्व खात्याशी संलग्न असल्याने या भागासंदर्भात अभ्यास करणं सोपं गेलं… पुरातन ग्रंथ, त्या काळची भौगोलिक रचना या सगळ्याचाच अभ्यास केला… त्यानंतर एका वेगळ्याच निष्कर्षाप्रत मी पोहचलो…”

“चंदन नगर आज जसं आहे, तसंच पूर्वापार नव्हतं! हजार वर्षांपूर्वी तेथील सगळाच भाग सुजलाम सुफलाम होता… सुबत्ता होती… मुख्य म्हणजे, तिथं एक छोटं संस्थान होतं आणि चंदन नगर हे त्या संस्थानच्या राजधानीचं ठिकाण!”

डॉक्टरांचं बोलणं ऐकून श्लोक तर अक्षरशः ओरडलाच… “काय? म्हणजे तिथे वाळवंट नव्हतं? तो वाळवंटाचा भाग सामान्यच होता?”

“हो, वाळवंट पूर्वी नव्हतंच… ते नंतर झालं आणि त्यापाठी एक सत्यकथा आहे…”

वास्तवात, देवदत्त यांच्याबरोबरच्या भेटीची वेळ तर संपली होता… पण मुलांची उत्सुकता कमी झालेली नव्हती…

डॉक्टर देवदत्त यांना तितक्यात कोणाचा तरी कॉल आला म्हणून ते जरा लांब जाऊन बोलत होते… पण बोलता बोलता ही त्यांची नजर श्लोक, शौनक आणि शाल्मली यांना न्याहाळत होती. फोनवर बोलताना ते खूपच गंभीर झाल्याचे विश्वासरावांना जाणवलं… बराच वेळ चाललेल्या त्या कॉलमुळे त्यांचं बोलणंही अर्धवट राहीलं होतं. चौघेही डॉक्टर परतण्याची वाट पहात होते… उशीर होत होता… कदाचित पुढे बोलणं होणार नाही, असं विश्वासरावांना वाटून गेलं…

कॉल संपला अन् देवदत्त पुन्हा या चौघांसमोर येऊन बसले. “आपल्याला या प्रोजेक्टवर लवकरच काम सुरू करावे लागणार असं दिसतंय… हा आलेला कॉल माझ्या एका मित्राचा होता आणि तो सांगत होता, काही दिवस झाले चंदन नगरला सतत भूकंपाचे हादरे बसत आहेत… रात्रीच्या वेळी काही विचित्र आवाजही ऐकू येऊ लागलेत… If I am not wrong, हे बदल तुम्ही जाऊन आल्यानंतरच होऊ लागले आहेत. सगळे गावकरी माझ्या त्या मित्राला भेटायला गेले होते… यात कोणाची मदत होईल का म्हणून जाणून घ्यायला…” डॉक्टर जर चिंताग्रस्तच वाटले…

हेही वाचा – देवदत्त यांचे ऐकून शौनक, शाल्मली अन् श्लोक स्तंभितच झाले…

अचानक काही विचार करून डॉक्टर देवदत्त यांनी विश्वासरावांकडे पाहिलं आणि म्हणाले, “शाल्मलीची जन्मतारीख, जन्म वेळ सर्व सांगू शकशील?”

“हो, का नाही?” असं सांगत विश्वासरावांनी डॉक्टरना हव्या त्या डिटेल्स दिल्या.

डॉक्टर देवदत्त यांच्या डोक्यात विचारांचं चक्र वेगाने फिरत होतं आणि त्याचंच प्रतिबिंब त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं… एकूण परिस्थिती ध्यानी घेऊन विश्वासरावांनी डॉक्टरांचा निरोप घ्यायचं ठरवलं… तसं त्यांनी मुलांना बोलूनही दाखवलं… किंचित नाराजीने मुलं तयार झाली..

‘लवकरच भेटूया’ या अश्वासनावर सगळ्यांनी डॉक्टर देवदत्त यांचा निरोप घेतला…

क्रमशः

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!