ॲड. कृष्णा पाटील
साधारणपणे दोन-तीन वर्षांपूर्वीची गोष्ट. त्याचा फोन आला… “सर, प्रवीण बोलतोय. मी आता सुरतला आहे. माझे वडील तुमच्याकडे येणार आहेत. त्यांना कधी भेटाल सांगू?”
मी म्हणालो, “उद्या सकाळी नऊ वाजता…”
प्रवीणचे वडील आले. बरोबर प्रवीणचे मामा होते, ते सांगू लागले. “काल हे शेतातून घरी येत होते. सायकलवर होते. अचानक समोरून जीप आली. सायकलवर धडकली. हे खाली पडले. गुडघ्याला लागलं. ती पोरं पसार झाली. गावतलीच होती, देसायांची… रात्री आठ वाजता जेवणं झाली. घराबाहेर गलका ऐकायला आला. 10-15 जण आले होते. त्यांनी दारावर लाथा मारल्या. यांना खाली पाडून मारलं. पत्नीलाही मारलं. देसायांच्या घराण्याला धडा शिकवायचा. काय बी होऊ द्या. त्यांना अडकवा.”
मी म्हणलं, “थांबा थोडा वेळ.”
त्यांच्याकडून पूर्ण हकीकत ऐकून घेतली. तक्रार तयार केली आणि त्यांना सांगितलं, “ही पोलीस स्टेशनला द्या. उद्याच्या उद्या प्रवीणला बोलवून घ्या.”
दोन दिवसांनी प्रवीण ऑफिसला आला. “पोलिसांनी तक्रार घेतली. पण कारवाई काहीच केली नाही. पुढं काय करायचं?” तो विचारू लागला.
मी म्हटलं, “प्रवीण, कोर्टात खटला दाखल करावा लागेल. धक्काबुक्की, शिवीगाळ अशा गुन्ह्याबाबत अटक करण्याचा पोलिसांना अधिकार नसतो. तुमच्यावर खूप अन्याय झालाय. पण यात गावातील राजकारणही दिसतंय. असो, कोर्टात गेल्याशिवाय पर्याय नाही.”
“ठीक आहे सर. मी परत कधी येऊ?”
मी म्हटलं, “कधीही ये.”
पुन्हा दोन दिवसांनी तो आला. म्हणाला, “त्यांना शिक्षा तरी होईल का? झाली तर किती होईल? आमचं घरदार टेन्शनमध्ये आहे, सर. त्या त्रासाबद्दल काही मिळणार का? नुकसान भरपाई? कोर्टात मानसिक त्रासाबद्दल केस घालूया. कितीही पैसे जाऊद्या, पण त्यांना सोडायचं नाही. कारण सर, यात आमचा काहीच दोष नाही. आम्ही कुणाच्या वाळलेल्या काटकीवर सुद्धा पाय ठेवत नाही. कुणाच्या अध्यात नाही, मध्यात नाही. आपलं काम भलं आणि आपण भलं. मग हे आमच्याच वाट्याला का? देसायांची पोर धनिकांची आहेत म्हणून? आम्ही गरीब आहोत म्हणून? तीन दिवस घरात कुणी जेवलं नाही सर. रात्रभर तळमळली माणसं. मानसिक धक्क्यातून अजून बाहेर आलेली नाहीत.”
हेही वाचा – मायाळू आणि उबदार… आज्जी!
तो काकुळतीला आला. मानसिक त्रासाबद्दल तो आग्रही होता. धक्काबुक्कीच्या केसमध्ये शिक्षा होऊ दे अगर न होऊ दे. पण मानसिक त्रासाबद्दल त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे, असा त्याचा आग्रह होता.
मी म्हटलं, “प्रवीण, शांत हो… डोकं थंड कर… भावना आवर… मी तुमच्यावरचा अन्याय समजू शकतो. कुणावरही असा आघात झाला तर काय होईल? याची कल्पना आहे मला. पण, भारतीय दंडविधान किंवा कोणत्याच कायद्यामध्ये मानसिक त्रासाबद्दल शिक्षा नाही. शरीरावर आघात (offence against body) झाला तर शिक्षेच्या तरतुदी आहेत. पण मनावर झालेल्या आघातावर (offence against mind) कोणत्याही तरतुदी नाहीत. एवढेच काय, अन्यायग्रस्त व्यक्तीला कायद्यात कोणतेच स्थान नाही. अपघाताच्या केसमध्ये नुकसान भरपाई मिळाली तरच! नाहीतर खून, बलात्कार, मारामारी यामध्ये ज्यांच्यावर अन्याय होतो त्याला काहीच मिळत नाही.”
“गुन्हेगाराला शिक्षा झाली तरी, ज्याच्यावर आघात झाला त्याच्या नुकसानाला कोण जबाबदार? कधीच भरून न येणाऱ्या जखमा… 10-15 वर्षे पाठीमागे गेलेला प्रपंच… मानसिक आघाताने खचलेलं आयुष्य… हताश झालेली मनं… हे घेऊनच अन्यायग्रस्ताला पुढचं जीणं जगावं लागतं. पुन्हा काही वर्षांनी आरोपी बाहेर येतो. ताठ मानेने जगू लागतो… अशी ही व्यवस्था आहे,” मी उद्वेगाने म्हणालो.
हेही वाचा – दुसरा दु:खी, आपण सुखी!
गुन्हा शाबीत झाल्यावर आरोपीची प्रॉपर्टी लिलाव करून फिर्यादीस नुकसान भरपाई द्यायला हवी. पण कायद्यात अशी तरतूद नाही, त्यासाठी बदल गरजेचा आहे. कायदेमंडळातले राज्यकर्ते हे देशप्रेमी असावे लागतील. कायद्याची माहीती असणारे असावे लागतील…
प्रवीण शांतपणे ऐकत होता… काहीच न बोलता तो हताशपणे बसून राहिला…!


