माधवी जोशी माहुलकर
भाग – 1
खरंतर, जीवन आणि मृत्यू या दोन घटनांवरच मनुष्य आपल्या आयुष्यातील आराखडे तयार करतो. भूतकाळ आणि भविष्यकाळाचा विचार करून वर्तमानातील सुखाचा विचार कधीच करत नाही, त्यामुळेच भौतिक गोष्टींच्या मागे लागून आपण जगण्यातला आनंद गमावतो. एखाद्याचे जगणे लक्षात राहते नाहीतर, मरणे लक्षात राहते! परंतु यामध्ये एखादी घटना जर अचंबित करणारी असेल तर, ती मात्र कायमची लक्षात राहते. त्यावरच आधारीत ही गोष्ट आहे.
एक गाव होते. त्या गावातील चार-पाच सधन घर सोडली तर, इतर लोक साधारण परिस्थितीतील किंवा शेतकरी कुटुंबातील होते. त्या गावामध्ये अठरापगड जातीची लोक राहात होती. त्यामुळे गावाचा भांडणतंट्याचा निवाडा तिथल्या पंचायतीच्या सहाय्याने होत असे. पंचांनी दिलेला निर्णय हा सर्वानुमते मान्य व्हायचा. गावामध्ये शांतता आणि सुव्यवस्था, एकी राहण्याचे श्रेय त्या गावातील सरपंचाला दिले जायचे… कारण तोच गावचा ‘मुखिया’ असायचा.
त्या गावातील गुराखी दिनू नेहमीप्रमाणे आपल्या गाई-म्हशींना गोळा करून गावाबाहेर असलेल्या रानमाळाकडे सकाळी रवाना होत असे. गाई-म्हशींना चरण्यासाठी दिनू नदीच्या पलीकडच्या रानात घेऊन जात असे. दिनूसोबत त्याचा आवडता कुत्रा ‘काल्या’ असायचा. त्याच्या भरवशावर रानामधे गाई-म्हशी सोडल्या की, दिनू एखाद्या डेरेदार वृक्षाखाली आपली न्याहारी करून निवांतपणे आराम करत असे. हा त्याचा रोजचा दिनक्रम ठरलेला होता. गाईम्हशींना देखील ते माळरान आणि ती पायवाट परिचयाची झाली होती. त्यामुळे दिनूने आपली पथारी टाकली की, त्या रानात चरायला मोकळ्या असायच्या. संध्याकाळी चरून झाल्यावर चौफेर विखुरलेल्या गाई दिनूच्या हाकेसरशी त्याच्यापाशी गोळा होऊन मुकाट्याने त्याच्यासोबत गावाकडची वाट धरायच्या. उरल्यासुरल्या मागे रेंगाळलेल्या गाईंना आणि वासरांना काल्या त्यांच्यामागे धावुन कळपात सामील करून घेत असे. घराकडे परत जाताना परत एकदा नदीचे पाणी पिऊन त्या तृप्त व्हायच्या आणि सगळा कळप नंतर आपापल्या मालकाकडे रवाना होत असे.
हेही वाचा – …अन् सुलोचना ताईला मोक्ष मिळाला!
झालं काय की, एक दिवस संध्याकाळी दिनूने आपल्या गाई-म्हशींचा कळप गोळा करून गावाकडची वाट धरली. संध्याकाळच्या नीरव शांततेत पाणवठ्यावरील पक्षांचा किलबिलाट आणि सोबतीला दिनूच्या गाई-म्हशींच्या गळ्यातील घुंगरांचा आणि घंट्याचा आवाज भर घालत होता. एखाद दुसरी बैलगाडी शेतातून परतत होती. आपल्याच नादात दिनू तोंडाने शीळ घालत नदीजवळ कधी येऊन ठेपला ते त्याच त्यालाच कळलं नाही. नदी ओलांडून जायची असल्यामुळे गाई-म्हशी अलगदपणे पाण्यात उतरल्या. आपली दिवसभराची तहान भागविण्यासाठी नदीचे पाणी पिऊन त्या तृप्त होत थोडावेळ मनसोक्तपणे पाण्यात डुंबायला लागल्या. त्यांना बाहेर काढण्यासाठी दिनू आणि काल्या कुत्रादेखील पाण्यात शिरले. संध्याकाळचा अंधार दाटायला सुरुवात झाल्याने दिनूला आता गावाकडे लवकर परतायची घाई लागली होती. तो गाई-म्हशींना काल्याच्या मदतीने नदीच्या किनार्याकडे हाकलायला लागला. संध्याकाळच्या संधीप्रकाशात सगळा नदीकिनारा अंधाराची वाट पहात होता. दिनूच्या गाईम्हशी एकामागून एक किनार्यावर यायला लागल्या तशा दिनूने पण नदीच्या त्या वाहत्या पाण्यात हातपाय धुऊन घेतले आणि तो किनार्यावर येऊन एका उंच टेकाडावर उभा राहिला. दूरवर नजर टाकत, त्याने सगळी ढोर पाण्याबाहेर आली की, नाही ते पाहिले… तोच त्याची नजर नदीकाठी असलेल्या बाभळीच्या झाडाकडे गेली. त्या झाडावर त्याला अंधारात काहीतरी लटक्यासारखे दिसले, परंतु अंधार दाटत आल्यामुळे त्याला अंदाज बांधता येईना. म्हणून त्याने काय लटकले आहे, हे पाहण्यासाठी त्या झाडाकडे आपली पावलं वळवली. त्याला त्या झाडाकडे जाताना पाहून काल्या कुत्रापण त्याच्या मागोमाग चालायला लागला. गाईम्हशींनी घराची वाट धरली. दिनूच्या मागे काल्या तुरूतुरू चालत होता.
हेही वाचा – पोतराज… मुख्य प्रवाहात येण्याची गरज!
चालता चालता काल्या अचानक थांबला आणि दिनूच्या पायजमाला धरून त्याला मागे ओढू लागला. दिनूला तो असं का करतोय, ते कळेना म्हणून त्याने काल्याच्या अंगावर काठी उगारली… तरी तो ऐकेना! तो दिनूला त्या झाडाजवळ जाऊ न देण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता… परंतू दिनूला त्या झाडाला काय लटकले आहे, ते पाहण्याची उत्सुकता होती. झाडाझुडूपातून वाट काढत दिनू त्या झाडापाशी पोहोचला आणि समोरचे दृश्य पाहून त्याची भीतीने बोबडीच वळली. त्याचे हातपाय गारठले आणि त्याचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली… कारण त्या झाडावर एका माणसाने गळफास घेतला होता. त्याची जीभ बाहेर आली होती आणि डोळे बटबटीतपणे बाहेर आले होते. ते पाहून दिनूला दरदरून घाम फुटला होता. त्याच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. कसंबसं स्वतःला सावरत काट्याकुट्यातून धावत त्याने गावाकडे धूम ठोकली आणि त्याच्या पाठीमागून त्याचा कुत्रा काल्यापण तोंडाने विचित्र आवाज काढत धावत सुटला.
क्रमशः


