चंद्रकांत पाटील
मी रिटायर झाल्यानंतर माझ्यासमोर एकच टार्गेट होते… ते म्हणजे दोन नंबरच्या चिरंजीवांचं लग्न करणे, पहिल्याला काही कारणाने विलंब झाला होता म्हणून याचे लवकर बघायला सुरवात केली, मुली बघायच्या चालू होत्या…
हा आयटी कंपनीत होता, चांगला पगार होता… पण नोकरी करता करता त्याने कधी काळी ऑस्ट्रिलियन व्हिजासाठी अर्ज केला होता आणि तो सहा महिन्यांपूर्वी त्याला मिळाला होता. पण घरात लग्नाची चर्चा सुरू आहे म्हणून तो बोलला नव्हता. पण त्याची जशी जशी मुदत संपत आली, तसे तो तिकडे जाण्याची घाई करू लागला. आम्ही दोघे नवरा-बायको म्हणालो, “अगोदर लग्न कर बाबा अन् मग जा! तसा तो थांबलाही चार महिने, पण लग्न जुळले नाही. शेवटी नोकरी नाही अन् छोकरीपण नाही, असे व्हायला नको म्हणून तो परदेशी गेला आणि सगळे थांबले.
पुन्हा काही दिवसांनी कर्तव्य तर पार पाडले पाहिजे म्हणून स्थळ शोधायला सुरुवात केली… एका वेबसाइटवरून स्थळे शोधायची, फोन करायचे, मुली, पत्रिका, नातेसंबंध बघायचे, चार-पाच स्थळांची जुळणी झाली की, मुलाला बोलवयाचे, असे चालले होते… अशा तऱ्हेने बऱ्याच व्हिजिट झाल्या, पैसा खर्ची पडला अन् अखेरीस लास्ट व्हिजिटमध्ये लग्न ठरले आणि पुढे आठ दिवसांत ‘यादी पे शादी’ टाईप लग्न झाले. लग्नानंतर नोकरीच्या घाईने मुलगा पुढे गेला, त्याच्या पाठीमागून चार महिन्यांनी सून पण व्हिजा मिळाल्यावर गेली. त्यांचा संसार सुरू झाला.
आता आम्ही टेंशन-फ्री झालो होतो, वर्षभरात खूप त्रास झाला होता; म्हणून आम्ही दोघांनी सत्संग जॉइन करायचं ठरवलं. त्यानुसार दररोज सकाळी बागेत जाऊ लागलो. सगळं व्यवस्थित चाललं होतं. सौ ही खूप रिलॅक्स झाली होती आणि अचानक एके दिवशी मेडिटेशन करताना सौ ला चक्कर आली. मग दवाखाना, तपासण्या झाल्या. उपचारांती चक्कर थोडी कमी झाल्यासारखे होतंय नाही, तोवर दुसराच प्रॉब्लेम सुरू झाला… हिला डोक्यापासून पायापर्यंत मुंग्या यायला लागल्या. त्यामुळे ती खूप अस्वस्थ व्हायची… जेवायची नाही की, खायची नाही. आवाक्याबाहेर गेले की, रडायला सुरवात. हे सगळं बघून मलाच काही तरी होतंय की, काय असे वाटायचे. बरेच स्पेशालिस्ट झाले, होमिओपॅथी, आयुर्वेदिक झाले… पण गुण येत नव्हता. गूगल सर्च करून या आजारावर काय उपचार आहेत का, तेही बघितले, पण उत्तर काही मिळत नव्हते. डोकं बधीर झाले होते… प्रत्येक डॉक्टरच्या म्हणण्यानुसार हा कुठला आजार नसून मानसिक (state of preoccupied mind) अवस्था आहे, असे अनुमान निघायचे. मला मानसिक म्हणजे खुळ्याचा आजार एवढेच माहीत होते. म्हणून माझे धाडस होत नव्हते. पण म्हणतात ना, ‘अडला नारायण…’! (समाज या आधुनिक युगात सुद्धा न पटणारे उपचार का करून घेतो, याचे उत्तर आपल्यावर जेव्हा प्रसंग येतो तेव्हा समजते.)
हेही वाचा – सुरेखाच्या दुसर्या लग्नाची गोष्ट!
शेवटी नाईलाजाने आम्ही एका मानसोपचार तज्ज्ञाकडे गेलो. बऱ्याच प्रतीक्षेनंतर जरा दबकतच डॉक्टरच्या केबिनमध्ये प्रवेश केला. डॉक्टरच्या टेबलावर केसपेपर सरकवला आणि आसनस्थ झालो. डॉक्टरांनी एकदा केसपेपरकडे आणि एकदा सौ.कडे पाहिले आणि म्हणाले, “काय होतय वहिनी…?”
आमच्या सौ.ना ‘टू दी पॉइंट’ बोलायची सवय नाही, तिने कथाकथना सारखी सुरुवात केली…
“दोन महिन्यांपूर्वी आम्ही एका ठिकाणी सत्संगला गेलो होतो. कार्यक्रम बागेत होता, थंडी खूप होती. गर्दीमुळे प्रसाद घ्यायला वेळ झाला. तेव्हापासून हा त्रास होतोय… डॉक्टर माझ्या कानांत थंडी शिरली, असे वाटते…”
डॉक्टरांनी मधेच ब्रेक देत विचारले, “तुमचे वय किती?”
“63!” सौ.ने (कधी नव्हे ते खरे) सांगितले.
डॉ म्हणाले, “ठीक आहे, आलंय माझ्या लक्षात! आता मला सांगा, तुम्हाला मुले किती आणि काय करतात? तुम्ही जेवता किती वेळा? तुम्हाला काही आर्थिक प्रॉब्लेम आहे काय? तुमच्या जीवनाचे टार्गेट काय?”
कथाकथानाचे रीपिटेशन टाळण्यासाठी संभाषण सूत्रे माझ्याकडे घेतली आणि मी म्हणालो…
“डॉक्टरसाहेब दोन मुले आहेत, ती दूर, परदेशात असतात. दोन वेळा जेवतो. आर्थिक स्थिती ठीक आहे (बिल वाढवून सांगतो की, काय असे वाटून गेले!) आणि टार्गेट वगैरे म्हणाल तर तसे काही नाही.”
हेही वाचा – भाऊबंदकी… सरांच्या जीवावर आलेली!
“इथेच चुकताय मिस्टर पाटील तुम्ही…” डॉक्टर कडाडले, “आहे, या वयात तुमच्या जीवनाचे निश्चित टार्गेट आहे… मृत्यू कसा लांबविता येईल, हेच तुमचे टार्गेट! बाकी तुमच्याकडून समाजाची, नातेवाईकांची काहीही अपेक्षा नाही… भेटणारा प्रत्येक माणूस तुम्हाला काय विचारतो, ‘तुमची तब्येत कशी आहे?’ त्या तब्येतीसाठीच आधी पोटोबा मग विठोबा! भरपूर खा, हिंडा फिरा, मस्त मजेत रहा. अन् मृत्यूची वेळ कशी लांबेल हे पाहा. सारखे हे दुखतंय अन् ते होतंय… त्याकडे लक्ष देऊ नका.”
ते बोलतच होते… “मला सांगा आषाढीवारीला 2-3 लाख लोक आळंदीहून पंढरपुरास जातात. त्यांचे वय काय असते हो? 50 ते 70 वर्षे वयाचे लोक असतात ती… तुम्ही सांगा त्यांचे गुडघे दुखत नसतील का चालताना? पायात गोळे येत नसतील का? पण आनंदाने नाचत, बागडत जातात की नाही! कारण ती एक ओढ असते, नशा असते… म्हणून माणसाने नशेत राहावे! अन्य कोणती नव्हे तर, ती कामाची असेल, फिरण्याची असेल किंवा संवादाची असेल… जर तुमच्याकडे अशी नशा नसेल तर, तुम्ही अडचणीत आला म्हणून समजा! आणि मग तुमचे शरीराकडे लक्ष जाणार… कुठे मुंग्या येतात, कुठे दुखतंय का? अन् एकदा का तुम्ही लक्ष द्यायला सुरू केले की, तुमच्या मागे तपासण्या आल्या… त्यापाठोपाठ औषध आली… हे vicious circle (दुष्टचक्र) आहे, त्यात सापडू नका. म्हणून मृत्यू लांबविण्याचे टार्गेट घ्या…”
मग यासाठी काय करायचे ते त्यांनी सांगितलं. “उद्यापासून सकाळी उठल्या उठल्या 10 वेळा म्हणा – ‘मी 100 वर्षे जगणार!’ दोघांपैकी कोण आजारी पडले तर त्याला म्हणा, ‘तुला अजून 40 वर्षे काही होणार नाही!’ सकाळ, संध्याकाळ हा विचार डोक्यात घुमू द्या. तुम्हाला सांगतो मनाची ताकद फार मोठी असते, ती तुम्हाला तुमचे टार्गेट पूर्ण करायला निश्चित उपयोगी पडते… आता मुलांना तरी काय पहिजे? ते म्हणतात, ‘अहो आई-बाबा तुम्हाला किती पैसे पाहिजेत ते मागत जा… पण दवाखान्यात न्यायला सांगू नका, आम्हाला वेळ नाही… ”
“वहिनी, तुम्हाला काहीही झालेलं नाही. एक गोळी देतो, ती रात्री घ्या आणि आता जे सांगितले, ते लक्षात ठेवा. तुम्ही आठ दिवसांत बऱ्या व्हाल… या तुम्ही!”
मनात मी म्हणालो, ‘हा माणूस डॉक्टर आहे की ह. भ. प. कीर्तनकार? खरंच, असं असेल? बायकोला नक्कीच पटलेल नसणार…’ मी तिला म्हणालो, “चल, आपण दुसऱ्या एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे जाऊ.”
त्यावर ती म्हणाली, “माझ्या मुंग्या थांबल्या. मी आता 100 वर्षे जगायचं टार्गेट घेतलेलं आहे.” अन् अखेरीस सगळ्या मुंग्या वारुळाकडे मार्गस्थ झाल्या…!
मोबाइल – 9881307856


