वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय चौथा
स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः । भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम् ॥3॥
तोचि हा आजि आतां । तुजप्रती कुंतीसुता । सांगितला आम्हीं तत्त्वता । भ्रांति न करीं ॥27॥ हें जीवींचे निज गुज । परी केवीं राखों तुज । जे पढियेसी तूं मज । म्हणऊनियां ॥28॥ तूं प्रेमाचा पुतळा । भक्तीचा जिव्हाळा । मैत्रियेची चित्कळा । धनुर्धरा ॥29॥ तूं अनुसंगाचा ठावो । आतां तुज काय वंचूं जावों । जरी संग्रामारूढ आहों । जाहलों आम्ही ॥30॥ तरी नावेक हें सहावें । गाजाबज्यही न धरावें । परी तुझें अज्ञानत्व हरावें । लागे आधीं ॥31॥
अर्जुन उवाच : अपरं भवतो जन्मं परं जन्म विवस्वतः । कथमेतद् विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति ॥4॥
तंव अर्जुन म्हणे हरी । माय आपुलेयाचा स्नेहो करी । एथ विस्मयो काय अवधारीं । कृपानिधी ॥32॥ तूं संसारश्रांतांची साउली । अनाथा जीवांची माउली । आमुतें कीर प्रसवली । तुझीच कृपा ॥33॥ देवा पांगुळ एकादें विईजे । तरी जन्मोनि जोजारू साहिजे । हें बोलों काय तुझें । तुजचि पुढां ॥34॥ आतां पुसेन जें मी कांहीं । तेथ निकें चित्त देईं । तेवींचि देवें कोपावें ना कांही । बोला एका ॥35॥ तरी मागील जे वार्ता । तुवां सांगितली होती अनंता । ते नावेक मज चित्ता । मानेचिना ॥36॥ जे तो विवस्वतु म्हणजे कायी । ऐसें हें वडिलां ठाउवें नाहीं । तरी तुवांचि केवीं पाहीं । उपदेशिला ॥37॥ तो तरी आइकिजे बहुतां काळांचा । आणि तूं तंव कृष्ण सांपेचा । म्हणोनि गा इये मातुचा । विसंवादु ॥38॥ तेवींचि देवा चरित्र तुझें । आपण कांही काय जाणिजे । हें लटिकें केवीं म्हणिजे । एकिहेळां ॥39॥ परी हेचि मातु आघवी । मी परियेसें तैशी सांगावी । जे तुवांचि तया रवीं केवीं । उपदेशु केला ॥40॥
हेही वाचा – Dnyaneshwari : आधींचि विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी कृष्ण जगजेठी…
अर्थ
तू माझा भक्त आणि सखा आहेस, म्हणून तोच हा पुरातन योग, मी आज तुला सांगितला आहे. कारण हे (सर्व रहस्यातील) उत्तम रहस्य आहे. ॥3॥
तोच हा योग अर्जुना, आम्ही तुला आज खरोखर सांगितला, याविषयी संशय ठेऊ नकोस. ॥27॥ हा योग (म्हणजे) माझ्या जीवाची अगदी गुप्त गोष्ट आहे. पण ती तुझ्यापासून कशी लपवून ठेऊ? कारण तू माझा अगदी लाडका आहेस. ॥28॥ अर्जुना तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा आणि सख्याची जीवनकला आहेस. ॥29॥ अर्जुना, तुझा आणि माझा संबंध अगदी निकटचा आहे. यावेळी तुझी फसवणूक कशी करावी? जरी आम्ही युद्धाला सज्ज झालो आहो ॥30॥ तरी क्षणभर ते बाजूला ठेऊन या गडबडीचाही विचार मनात न आणता, प्रथम तुझे अज्ञान घालवून टाकले पाहिजे. ॥31॥
अर्जुन म्हणाला, तुझा जन्म अलीकडचा, आणि सूर्याचा जन्म तुझ्या फार पूर्वीचा आहे. (असे असताना) तू सुरुवातीला हा योग त्याला सांगितलास, हे मी कसे जाणावे? ॥4॥
तेव्हा अर्जुन म्हणाला, कृपानिधे श्रीहरी, पाहा बरे, आई (आपल्या) मुलांवर ममता करते, यात नवल ते काय? ॥32॥ संसारतापाने थकलेल्यांची तू सावली आहेस. अनाथ जीवांची आई आहेस. आम्हाला तर केवळ तुझ्या कृपेनेच जन्मास घातले आहे. ॥33॥ देवा (आईने) एखाद्या पांगळ्या मुलाला जन्म दिला तर, जन्मापासून त्याचा त्रास तिला काढावा लागतो. या तुझ्या गोष्टी तुझ्यासमोर काय बोलाव्यात ? ॥34॥ आता मी जे काही विचारीन त्याकडे चांगले चित्त दे. त्याचप्रमाणे देवा, माझ्या या एका बोलाचा (प्रश्नाचा) मुळीच राग धरू नकोस. ॥35॥ अनंता, पूर्वीची गोष्ट म्हणून जी तू मला सांगितलीस, ती क्षणभर माझ्या मनाला पटतच नाही. ॥36॥ पाहा, तो विवस्वत म्हणजे कोण हे वाडवडिलांना सुद्धा ठाउक नाही, तर तू त्याला उपदेश केलास, हे कसे शक्य आहे? ॥37॥ तो तर फार पूर्वीच्या काळचा, असे ऐकतो आणि तू श्रीकृष्ण तर आजच्या काळाचा, म्हणून हे देवा, हे तुझे बोलणे विसंगत आहे. ॥38॥ तसेच देवा, तुझे चरित्र मला कसे काय समजणार? तेव्हा हे एकदम खोटे तरी कसे म्हणावे? ॥39॥ तेव्हा तूच त्या सूर्याला उपदेश कसा केलास? हीच सगळी हकीकत मला पटेल अशी सांग. ॥40॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : मग आणिकही या योगातें, राजर्षि जाहले जाणते…


