पराग गोडबोले
‘यशस्वी लघु उद्योजिकते’चा प्रथम पुरस्कार जाहीर झाल्यानंतर टाळ्यांच्या कडकडाटात, लटपटती पावलं आणि घशाला पडलेली कोरड सावरत, ती व्यासपीठावर पोहोचली. सन्मानचिन्ह आणि झळाळता चषक स्वीकारताना एक मंद स्मित तिच्या चेहेऱ्यावर झळकलं… आणि काही क्षणांपूर्वीच्या गोंधळलेल्या अवस्थेतून ती अलगद बाहेर पडली.
आयोजकांनी तिला गृहिणी ते उद्योजिका, या प्रवासाबद्दल थोडक्यात सांगायची विनंती केली आणि नेहमीचाच आत्मविश्वास परतला तिच्या वावरण्यात. एवढ्या लोकांसमोर बोलायची, मनोगत व्यक्त करायची ती पहिलीच वेळ… पण साडी सावरत, ठाम पावलं टाकत, ती बोलायला उभी राहिली. समोर नवरा, लेक आणि सासू-सासरे बसले होते. त्यांच्यावर आणि इतर अनेक अनोळखी लोकांवर नजर फिरवत तिने घसा खाकरला…
गणपतीबाप्पा, आयोजक आणि जमलेले हितचिंतक यांचे आभार मानून तिने सुरुवात केली बोलायला आणि मग उत्स्फूर्तपणे शब्द सुचत गेले –
“मला व्यवसाय सुरू करून आज जवळपास वीस वर्ष झाली. दवाखाने आणि कंपन्यांमध्ये लागणारे कापडी मास्क पुरवणं आणि त्यांचं उत्पादन, यापासून सुरू झालेला हा व्यवसाय मग वेगवेगळी वळणं घेत आज या टप्प्यावर आलाय आणि मला अभिमान आहे त्याचा खूप… आज आम्ही वेगवेगळी सुरक्षा उपकरणं बनवतो आणि परदेशी सुरक्षा उपकरणांची विक्री आणि विक्री पश्चात सेवा सुद्धा देतो!”
“मी अगदी अचानकच हा व्यवसाय सुरू केला. तसं तर शिवण, टिपण लहानपणापासूनच खूप आवडायचं मला, पण तेच माझं कार्यक्षेत्र ठरेल आणि ते मला थोडंसं यश देईल… हे जर कुणी सांगितलं असतं मला, तर माझाही विश्वास बसला नसता… ते सगळं ठीक, पण मला असं काहीतरी करण्याची प्रेरणा कुठून मिळाली ते सांगते, म्हणजे सगळा उलगडा होईल…”
“तर त्याचं झालं असं… मी आपली गावात वाढलेली, दहावी, बारावी आणि मग बीए करून लग्न करायचं… हेच ध्येय असायचं आम्हा मुलींचं! अगदी हृतिक किंवा अक्षयकुमार मिळावा अशी अपेक्षा नव्हती, पण जरा बऱ्यापैकी दिसणारा, चांगली नोकरी असणारा मिळावा, एवढंच वाटायचं… बीएच्या दुसऱ्या वर्षाला असतानाच ह्यांचं स्थळ आलं…” ती त्यांच्याकडे हात दाखवत म्हणाली.
इंजिनीअर, चांगल्या कंपनीत नोकरी आणि होते तसे बरे दिसायला तेव्हा… म्हणून मग मला आवडले. बोलणी झाली आणि लगेच दोन महिन्यांमध्येच बार उडवला गेला. ‘शिक्षणाच्या आयचा घो’ म्हणत, मी बुलढाण्याजवळच्या गावातून थेट ठाण्यात पोहोचले… शहराच्या कोपऱ्यात, तेव्हा एकाकी भागात असलेल्या कंपनीच्या क्वार्टर्समध्ये आमचा राजाराणीचा टुकीचा संसार सुरू झाला. बरीच वर्षे घराबाहेर राहिलेल्या आणि बाहेरच्या जेवणाखाण्याला कंटाळलेल्या नवऱ्याला घरचा खुराक मिळू लागला! यांना शिळ्या कढीला ऊत आणलेला नाही चालायचा, सकाळ संध्याकाळ ताजं अन्न लागायचं आणि मी ते रोज करायची, नेमाने. उरलं अन्न, तर मी खायची, ते ही नेमाने…”
“नाहीतरी मला दुसरा उद्योग काय होता? मी गावंढळ, म्हणून आमच्या कॉलनीत राहणाऱ्या शिष्ट बायका मला घ्यायच्या नाहीत त्यांच्यात. मलाही जरा चार हात लांबच राहायलाच आवडायचं त्यांच्यापासून! आमची कॉलनी तेव्हा तशी गावाबाहेर होती. जवळपास दुकानं, गिरणी अशा सोयीसुद्धा नव्हत्या. कंपनीची बस असायची आठवड्यातून दोनदा, बाजारात जायला आणि तेव्हाच सगळा बाजारहाट व्हायचा…”
“एकदा घरातलं तेल, कांदे, बटाटे आणि कणिक संपली होती. संध्याकाळच्या स्वयंपाकापुरतेच जिन्नस होते घरात. काय करावं सुचत नव्हतं, पण मग एक युक्ती सुचली. तेव्हा मोबाइल वगैरे काही नव्हते आणि यांनी त्यांच्या मोठ्या साहेबांचा फोन नंबर देऊन ठेवला होता मला. महत्त्वाचं काम असेल तरच फोन कर, असंही बजावलं होतं… मी खाली गेले आणि फोन लावला साहेबांच्या नंबरवर. त्यांनी फोन उचलला आणि मी माझी ओळख सांगून, भराभर निरोप देऊन मोकळी झाले. ‘सगळं नक्की आणायला सांगा हं,’ हे पण अगदी आवर्जून सांगितलं शेवटी!”
हेही वाचा – छोटी सी बात!
“संध्याकाळी हे आले. पिशव्या होत्या हातात, पण चेहरा साफ पडलेला. मला कळेच ना, काय झालंय ते! घरात आले आणि त्यांचा तोफखाना सुरू झाला. मोठ्या साहेबांना, इतक्या छोट्या गोष्टीसाठी फोन केला म्हणून त्यांचं हसं झालं होतं, अपमान झाला होता म्हणे कंपनीत!! माझं शिक्षण, माझा गावंढळपणा, बावळटपणा… या सगळ्याचा उद्धार झाला आणि मला रडू कोसळलं. थोड्या वेळाने निवळला त्यांचा संताप, पण त्यांचे बोल माझ्या जिव्हारी लागले होते!”
“माझा गांवढळपणा अधोरेखित करणाऱ्या काही गोष्टी या आधीही घडल्या होत्या, पण ही घटना म्हणजे माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी उंटावरची काडी, किंवा आजच्या भाषेत ‘Game changer’ ठरली. तेव्हाच ठरवलं, झालं ते खूप झालं… काहीतरी करून दाखवायचं. सिद्ध करायचं स्वतःला!”
“ठाण्यात होत्या दोन-तीन मैत्रिणी. त्यांच्याशी संपर्क साधला आणि अर्धवेळ कॉलेजमध्ये जाऊन, उरलेली वर्ष पूर्ण करून पदवीधर झाले. ते करतानाच माझा आत्मविश्वास परतला आणि आपणही काहीतरी करू शकतो हा विश्वास वाटायला लागला, मनोमन…”
नोकरी शोधायला लागले, दोन महिने केली सुद्धा, पण मन रमेना. तेवढ्यात एका डॉक्टर मैत्रिणीची भेट झाली. बोलता बोलता ती म्हणाली की, ‘तिला तिच्या दवाखान्यासाठी पाचशे कापडी मास्क हवे आहेत…’ ते मास्क बघताच मी तिला म्हणाले, हे तर मी पण शिवू शकते. चालेल मी दिले तर? ती चालेल म्हणाली आणि तिथूनच छोटीशी सुरुवात झाली…”
हेही वाचा – पावसाची रिपरिप अन् रिक्षावाला…
“मास्क आवडले तिला आणि तेही कमी किमतीत मिळाले! तिने आणखी चार डॉक्टरांकडे माझी शिफारस केली आणि हळूहळू व्यवसाय वाढू लागला. डॉक्टरांना द्यायचे, म्हणून विशेष काळजी घ्यावी लागायची… मी सुरुवातीला शिवणासाठी दोन बायका ठेवल्या आणि पुरवठा करायला लागले. मुंबईच्याही ऑर्डर्स मिळाल्या आणि मागणी वाढायला लागली. नवऱ्याच्या ओळखीतून काही औषध कंपन्यांच्या ऑर्डर्स मिळाल्या आणि मग मी मागे वळून बघितलंच नाही…”वागळे इस्टेटमध्ये एक छोटासा गाळा घेतला. तिथे आज वीस बायका आणि मुली काम करतायत…”
कोविड काळात, इतर व्यवसायांना घरघर लागत असताना, माझा व्यवसाय मात्र दुप्पट, तिप्पट झाला. एवढा की, त्याची वाढ पाहून नवरा नोकरी सोडून या व्यवसायात उतरला, पूर्ण वेळ! आज आम्ही दोघे मिळून व्यवसाय सांभाळतोय. बरीच नवी उत्पादनं आता आम्ही तयार करतोय… काही भारतीय आणि काही परदेशी कंपन्यांच्या agencies घेतल्या आम्ही… आणि तो एक वेगळाच व्यवसाय सुरू झाला! अर्थात, गावाहून आलेले सासू-सासरे होतेच मदतीला, त्यामुळे मुलांची काळजी नाही करावी लागली मला. त्यांच्या संपूर्ण आणि विनाशर्त पाठिंब्यामुळेच मी आज इथवर पोहोचलेय!”
“माझ्यासारख्या सुरवंटात हा बदल घडवून आणण्याचं संपूर्ण श्रेय, मी त्या एका छोट्याश्या प्रसंगाला आणि मला बोल लावणाऱ्या, समोर बसलेल्या माझ्या नवऱ्याला देते! नवऱ्याविषयी माझ्या मनात तेव्हाही कुठली कटूता नव्हती आणि आज तर नाहीच! कारण माझ्या अजाणतेपणी, माझ्यामुळे ऑफिसमध्ये झालेल्या त्यांच्या अपमानाची ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती…”
“पण तो छोटासा डंख मी कुरवाळला, नाही विसरले त्याचा दाह… आणि तो शमवण्यासाठी, ही अशी उभारी घेतली…” इतकं बोलून ती थांबली. नवऱ्याला आणि सासू-सासऱ्यांना व्यासपीठावर बोलावलं आणि तो चषक त्यांच्या हाती सोपवला! परत एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला आणि डोळ्यांत अश्रू घेऊन ती व्यासपीठावरून खाली उतरली, परत एकदा नव्या आव्हानांना सामोरी जायला!


