यश:श्री
हत्ती या अजस्त्र प्राण्याबद्दल अबालवृद्धांच्या मनात कुतूहल असते. विविध भाषिक चित्रपटांमध्येही ते पाहायला मिळाले आहेत. या प्राण्याला माणसावळतात आणि त्याचा वापर मोठमोठे ओंडके वाहून नेणे किंवा मिरवणुकीसाठी केला जातो. काही काळापूर्वी तो सर्कशीमध्येही दिसायचा, मात्र प्राणीमित्रांच्या पुढाकाराने सर्कशीत प्राण्यांचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली. वस्तुत: भारतीय संस्कृतीत हत्ती हे भरभराटीचे, ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळेच पूर्वी राजे-महाराजांचा राज्यातील फेरफटका हत्तीवरील अंबारीत बसून असायचा. या हत्तीला सजवण्यातही येत असे. त्याच्या पाठीवरील झुली देखील नक्षीदार आणि आकर्षक रंगाच्या होत्या.
एखाद्या धार्मिक उत्सवाच्या वेळी हत्तीची जेव्हा मिरवणूक काढण्यात येते, तेव्हा त्याला सजविण्यात येते. त्यामध्ये त्याच्या पाठीवरील अंबारीचाही समावेश असतो. हत्तीच्या पाठीवर जरीची वस्त्रे, तक्के, शामियान्यासारखी छोटेखानी अंबारी तसेच घंटा, गोंडे आणि साखळ्या आदींनी सजविण्यात येते. तसेच, चेहऱ्यावर करण्यात येणारी रंगरांगोटीही चित्रपटातील एखाद्या नायिकेप्रमाणे असते. त्याच्या कपाळापासून सोंडेच्या टोकापर्यंत लाल किनारीचे नक्षीकाम केले जाते.
प्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत यांनी हत्तीविषयी लेखांची एक मालिकाच दिली आहे. त्यानुसार हत्तीच्या पाठीवरील वेगवेगळ्या प्रकारच्या झुली सम्राट अकबराच्या कारकीर्दीत वापरण्यात आल्या. बखरकार अब्दुल फझल यांच्या ‘ऐन – ई- अकबरी’ मध्ये 31 प्रकारच्या झुलींव्यतिरिक्त अकबराच्या आमदनीतील हत्तींसंदर्भात खूप माहिती दिली आहे. अकबराच्या कारकीर्दीत वापरण्यात येणाऱ्या हत्तींवरील ज्या झुलींचा उल्लेख अब्दुल फझल यांनी केला आहे, त्या आपल्याला विविध मुगल तसेच राजस्थानी चित्रांमध्ये पाहायला मिळतात. त्यापैकी अनेक नक्षीदार झुलींचा वापर अलीकडच्या काळातही करण्यात आला आहे.
हेही वाचा – हत्ती आणि युद्ध…
हत्तीवरील बैठकीबाबत दुर्गाबाईंनी एक रंजक माहिती सांगितली आहे. त्य म्हणतात, सध्या वापरण्यात येणारी ‘बोदाह’ ही हत्तीच्या पाठीवरील बैठक (अंबारी) शहाजहान बादशहाच्या आमदनीपूर्वीच्या शिल्पकलेत दिसत नाही. अर्थात, ही ‘बोदाह’ बैठक प्रारंभीच्या काळात अत्यंत साधी असणार, यात शंका नाही. नंतर नंतर ही बैठक बारीक कलाकुसरीने तयार करण्यात येऊ लागली.
कोल्हापूर येथे एक तांब्याचे शिल्प सापडले. हे शिल्प सातवाहन काळातील अत्यंत दुर्मीळ असे शिल्प आहे. त्यावर असे दाखविण्यात आले आहे की, एका बसलेल्या हत्तीवर चार जण स्वार झाले आहेत. त्यापैकी डोक्याच्या मागे बसलेला हा सरदार असून त्याने आपल्या हातातील अंकुश हत्तीच्या डोक्यावर धरला आहे. त्याच्या मागे एक स्त्री आहे आणि त्याच्या मागे अनुक्रमे एक सेविका तसेच हुजऱ्या आहे. ही मूर्ती केवळ दोन इंच उंचीची आहे. हत्तीच्या सोंडेवरील सुरकुत्या, त्याच्या पाठीवरील झूल तसेच वास्तवपणा आणण्यासाठी कोरलेले बारकावे पाहून ही मूर्ती घडविणाऱ्याची कुशलता तसेच निरीक्षणशक्तीचा आपल्याला अंदाज येतो. याशिवाय, अशा प्रकारे बारकाव्यांसह तयार केलेले ‘मिनीएचर’ कार्ला येथील चैत्य गुंफेत आहेत, असे दुर्गाबाईंनी म्हटले आहे.
दुसऱ्या एका हत्तीचे आपल्याला चित्र आढळते, तो म्हणजे ‘चंचल’ हत्ती! विजापूरच्या जगद्गुरु इब्राहिम आदिल शाह द्वितीय यांचा तो हत्ती होता. ‘चंचल’ हत्तीचे चित्र बनारस येथील सीताराम शहा यांच्या संग्रही होते. जहांगीर याने आपले वडील अकबर यांच्याच पावलावर पाऊल ठेवून उत्तम हत्ती आपल्याकडे बाळगले. त्यापैकी काही त्याला भेट मिळाले होते, असे जहांगीरच्या आत्मचरित्रात म्हटले आहे. त्याला भेट मिळालेल्या हत्तींपैकी ‘अलाम – गुमान’ या हत्तीचे आपल्या पिलांसमवेतचे चित्र भारताच्या राष्ट्रीय संग्रहालयात आहे. उदयपूर येथील राणा अमरसिंग याचा आवडता असलेला ‘अलाम – गुमान’ हत्तीसह 17 अन्य हत्ती शहाजहानने राणाकडून घेतले. 1614 मध्ये नवीन वर्षाच्या उत्सवानिमित्त तो हत्ती जहांगीरसमोर सादर केला. नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी जहांगीर स्वतः त्या हत्तीवर स्वार झाला आणि त्याने भरपूर पैसे उधळल्याचा उल्लेख या लेखात आहे.
क्रमश:


