स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत याच महिला काही नवनवीन क्लृप्त्या वापरतात… याच आहेत. किचन टीप्स. जाणून घेऊयात काही टीप्स –
- अर्धा किलो चिंच अर्धा लीटर पाण्यात दोन तास भिजवून तिचा कोळ (गर) काढावा. पीठ चाळावयाच्या प्लॅस्टिकच्या किंवा स्टेनलेस स्टीलच्या चाळणीतून गर छानून घ्यावा. त्यात दोन मोठे चमचे मीठ आणि अर्धा कप व्हिनिगर घालून उकळावे. दाट झाल्यावर गार करून छोट्या बाटल्यांत भरून फ्रीजमध्ये ठेवावे. जरुरीच्या वेळी आवश्यक तेवढे चटकन वापरता येते. रोजच्या जेवणात चिंचेचा उपयोग करताना रोज गोळा भिजवून कोळ काढायचा त्रास वाचतो.
याच मिश्रणात गूळ, तिखट, चार-पाच लवंगा, सात-आठ मिरीचे दाणे आणि दालचिनीचे दोन तुकडे घालून शिजवल्यास तयार झालेले चिंचेचे सॉस मांसाहारी पदार्थांबरोबर चविष्ट लागते. थोडे पातळ करून भेळ करतानाही वापरता येते.
हेही वाचा – Kitchen Tips : कढीपत्त्याची चटणी, कोकम सार…
- पोळ्यांची कणीक भिजवताना त्यात प्रेशर कुकरमध्ये उकडलेल्या लाल भोपळ्याच्या सात-आठ फोडी चुरडून मिसळाव्यात आणि चवीला मीठ घालावे. नेहमीप्रमाणे कणीक मळून पोळ्या कराव्यात. पोळ्यांना छान रंग येतो आणि मऊ होतात. शिवाय, त्या चविष्ट तसेच पौष्टिक होतात.
- कोथिंबीर निवडल्यावर कोथिंबिरीच्या कोवळ्या काड्या जर लसूण आणि मिरच्यांबरोबर मिक्सरमधून काढून या काड्यांची पेस्ट रस्साभाजीस वापरली, तर रस्साभाजीची लज्जत हमखास वाढेल. हे कोथिंबिरीच्या काड्यांचे वाटण पदार्थांची रुची वाढविणारे आहे. यासाठीच कोथिंबिरीच्या काड्या टाकून न देता असलेल्या जुडीचा पुरेपूर उपयोग करून भाज्यांची लज्जत वाढवावी.
- आपल्याला खूप वेळा कणीक उरल्यास ती फ्रीजमध्ये ठेवावी लागते. त्या कणकेची पोळी ही ताज्या कणकेच्या पोळीसारखी होत नाही. फ्रीजमध्ये ठेवलेल्या कणकेचा रंगही किंचित काळपट झालेला असतो. अशा वेळी पोळी करण्याआधी दहा मिनिटे ही कणीक फ्रीजबाहेर काढून त्यात गार पाणी घालून ठेवावे. नंतर पाणी काढून टाकून साधारणपणे दोन ते तीन चमचे दूध घालावे. सैलपणा जाण्यासाठी पुन्हा थोडी कणीक घालून मळून ठेवावी. अशी कणीक ताज्या कणकेप्रमाणे दिसू लागते आणि तिची पोळीही अतिशय मऊसूत, सुरेख तसेच चांगली होते.
हेही वाचा – Recipe : बटाट्याची खमंग शाही करी
- ओल्या नारळाचा किस तेल अथवा तूप न घालता खमंग तपकिरी रंगावर भाजून घ्यावा आणि कोरड्या पाट्यावर पाणी न घालता बारीक वाटावा. या वाटणाला तेल सुटते. नंतर हे वाटण बरणीत भरून ठेवावे. गरम मसाल्याचा शाकाहारी किंवा बिनशाकाहारी पदार्थ करताना लागणारे खोबरे भाजले नाही तरी चालते. वरील वाटण पदार्थाच्या गरजेप्रमाणे घालावे. पदार्थ चविष्ट आणि खमंग होतो. तसेच, वाटणही बरेच दिवस टिकते.


