Monday, October 27, 2025

banner 468x60

Homeललितमृत्यूपत्र… शंतनूचा निर्णय ऐकून मोहनराव झाले अवाक्

मृत्यूपत्र… शंतनूचा निर्णय ऐकून मोहनराव झाले अवाक्

प्रदीप केळुस्कर

भाग – 4

आपला दोन नंबरचा मुलगा वसंता याचे आपल्यामागे कसे होईल, याची केशवराव यांना काळजी वाटे. मोठा मोहन अभ्यासात हुशार होता. सीए झाला आणि मोठा सरकारी ऑफिसर बनला. केशवराव गेल्यावर तेराव्या दिवशी नाडकर्णी वकिलांनी मोहन आणि वसंताला मृत्यूपत्र वाचून दाखवलं. त्यानुसार राहते घर मोहन आणि वसंत यांच्या नावावर तर, गावातील 32 गुंठे जमीन आणि त्यावरील 26 आंब्याची कलमे, 20 काजूची झाडे तसेच 10 गुंठे भातशेती जमीन फक्त वसंत याच्या नावावर ठेवली होती. त्यावरून मोहन आणि त्याची पत्नी आशा यांनी वसंता याच्यावर तोंडसुख घेतले. त्यावेळी त्यांची बहीण यशोदाने वसंताची पाठराखण केली.

मोहन आणि आशा यांनी कणकवलीच्या भोसले वकील यांच्यामार्फत भाऊ आणि आईला कोर्टात खेचण्याची तयारी केली. भोसले वकील कोल्हापुरच्या प्रमोद नाईक यांचीही अशीच केस लढत होते. मोहनरावांनी त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून माहिती घेतली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी मोहनराव आणि आशा मुंबईस निघाली. मोहनरावांच्या सूचनेनुसार भोसले वकिलांनी सर्व कागदपत्रे तयार केली आणि त्याच्या नोटिसा मोहनरावांची आई, भाऊ वसंता, बहीण यशोदा यांना पाठवल्या. आपल्या मुलाकडून कोर्टातर्फे अशी नोटीस आल्याने सुमतीबाईंना फार वाईट वाटले. राहून राहून अश्रू जमा होऊ लागले. आपल्या नवर्‍याने कोणत्या हेतूने मृत्यूपत्र केले आणि त्याचा परिणाम कुटुंब फुटण्यात होईल, याची त्यांना कल्पना नव्हती. उलट, मोहन सर्व समजून घेईल असे त्यांना वाटत होते. पण झाले उलटेच.

हेही वाचा – मृत्यूपत्र

वसंताला नोटीस मिळताक्षणी तो खिन्न झाला. काही झालं तरी आपण कोर्टात जाणार नाही किंवा वकिलपत्र देणार नाही, असा त्याने निर्णय घेतला. पण बहीण यशोदा तिला आपल्या मोठ्या भावाचा राग आला. वडिलांच्या मृत्यूपत्राला तो आव्हान देतो आहे, हे पाहून भावाविरुद्ध उभे रहायचा तिने निर्णय घेतला. तिने आणि तिच्या नवर्‍याने कणकवलीतील एक तरुण पण हुशार वकील पाहिला आणि कोर्टात उभा केला. मृत्यूपत्राला आव्हान देणारी केस कोर्टात उभी राहिली; पण अपुरी कागदपत्रे, अपुरा पत्ता या कारणाने पुढच्या तारखा मिळत गेल्या. भोसले वकील प्रत्येक तारखेचे मोहनरावांकडून पैसे उकळत होता. मोहनराव आणि आशा यांना वाटले होते, दोन-तीन महिन्यांत केसचा निकाला लागेल. पण केस लांबत गेली.

…आणि अचानक कोल्हापूरच्या प्रमोद नाईकांचा मोहनरावांना फोन आला. नाईक कणकवलीत होते आणि कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला होता. वडिलांच्या प्रॉपर्टीत त्यांचा हिस्सा मान्य केला होता. प्रमोदरावांच्या या फोनने मोहनराव खूश झाले. मोहनरावांना खात्री झाली की, आपल्यालाही असाच निर्णय मिळणार! कारण दोघांचे वकील एकच होते. मोहनरावांनी मोठ्या आनंदाने ही बातमी आशाला सांगितली. आता सासूच, नणंद आणि दीराचे नाक कापायला उशीर नाही, याची आशाला खात्री वाटू लागली. तिने तातडीने ही बातमी वडिलांना कळविली. या निमित्त मोहनराव, आशा, तिचा भाऊ उमेश आणि त्याची पत्नी सर्वजण मोठ्या हॉटेलात जेवायला गेले.

हॉटेलमधून मोहनराव आणि आशा रात्री 11च्या सुमारास घरी पोहोचले. मोहनराव कपडे बदलत असताना त्यांचा फोन वाजला. कणकवलीहून भोसले वकिलांचा फोन होता. भोसले वकिलांनी एक भयानक बातमी मोहनरावांना कळविली… “संध्याकाळी सात वाजता कणकवलीहून कोल्हापूरला निघालेले प्रमोदराव नाईक यांच्या गाडीला बावडा घाटात खासगी बसने धडक दिली आणि त्यात नवरा बायको ठार झाले!”

ही बातमी ऐकताच मोहनराव थरथरले, त्यांच्या घशाला कोरड पडली. चारच्या सुमारास प्रमोदरावांनी फोन करून केस जिंकल्याची बातमी सांगितली, आपण त्यांचे अभिनंदन केले आणि आता सहा तासात दुसरी बातमी, अपघातात नाईक नवरा बायको ठार झाल्याची! त्यांनी आशाला कशीबशी ही बातमी सांगितली. आशाही घाबरली. मोहनरावांनी कपडे बदलले आणि ते कॉटवर पडले. त्यांना एकसारखे भोसले वकिलांनी फोनवर सांगितलेली घटना ऐकू येत होती. मोहनराव मनात म्हणत होते… ‘आपणही वडिलांच्या मृत्यूपत्राला कोर्टात आव्हान दिले आहे. केस सुरू आहे. आपण आपली जन्मदाती आई, पाठचा भाऊ आणि एकुलती एक बहीण यांना नोटीस पाठविली… आपली सख्खी माणसे त्यांना नोटीस पाठविली…’ सारखे हे विचार मोहनरावांच्या डोक्यात घोंगावू लागले. मोहनरावांना दरदरून घाम सुटला. पाठीत डाव्या बाजूला ठणकू लागले… छातीत दुखू लागले… आणि मोहनराव बेशुद्ध झाले.

फ्रेश होऊन बाथरुममधून बाहेर आलेल्या आशाने नवर्‍याकडे पाहिले, तिच्या लक्षात आले, नवर्‍याची तब्येत ठीक नाही. तिने धावत जाऊन पाणी आणून मोहनरावांच्या तोंडावर मारले. पण शुद्ध येईना. तिने भाऊ उमेशला फोन केला आणि येताना अ‍ॅम्ब्युलन्स आणायला सांगितली. उमेशने सांगितल्याप्रमाणे आशाने कपाटात शोधून सॉर्बिट्रेटची गोळी मोहनरावांच्या जिभेखाली ठेवली. दोन मिनिटानंतर मोहनराव श्वास घेऊ लागले. पंधरा मिनिटांत उमेश अ‍ॅम्ब्युलन्स घेऊन आला आणि मोहनरावांना हिंदूजा हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले.

हेही वाचा – मृत्यूपत्र… म्हणून जमीन धाकट्याच्या नावावर!

हॉस्पिटलमध्ये सर्व तातडीच्या तपासण्या झाल्या… भराभर इंजेक्शने दिली… दोन दिवसांनी मोहनरावांची एन्जिओग्राफी केली गेली आणि त्यांना बायपास करण्याची शिफारस केली. दोन दिवसांनी मोहनरावांची बायपास झाली. आशा विचार करत होती… गेल्या दहा दिवसांत किती धावपळ झाली! कणकवलीतील त्या भोसले वकिलांनी कोल्हापूरच्या नाईकच्या अपघाताची बातमी सांगितली आणि आपला नवरा हादरला. केवळ नशीब म्हणून तो वाचला.

बायपास नंतर मोहनरावांना आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये आणले. पण मोहनराव खिन्न होते. आपण किरकोळ जमिनीसाठी आईवर, भावंडांवर केस केली. त्यांना नोटिसा पाठविल्या ही फार मोठी चूक केली, असे त्यांना वाटत होते. त्यांच्या डोळ्यासमोर वडील येत होते. गावातील महाजनांच्या बागेत अळी काढणे, कोळम्याने पाणी काढणे, झाडावर चढून आंबे, रतांबे काढणे अशी कामे करुन त्या मजुरीतून घरात साखर, मीठ आणायचे. बागेतली नारळ, सुपारी घेऊन दहा मैलावरील कणकवलीच्या बाजारात चालत जायचे आणि येताना मुलांना खाऊ, शाळेची पुस्तके-वह्या आणायचे. आपण हुशार म्हणून आपल्याला कणकवलीला अभ्यासाला ठेवले. तेव्हा त्यांची आणि आईच्या जीवाची किती घालमेल झालेली. पण बापाने आपल्याला गावात अडकवले नाही. उलट शिक्षण घेऊ दिले.

आपण कणकवलीला शिकत होतो तेव्हा वसंता एवढासा होता. मी गावी गेलो की, मागे मागे असायचा. अजूनही आपण गावी गेलो की, माझ्यासाठी काय चांगले मिळेल ते आणतो. यशोदा तर सर्वांचीच लाडकी. नेहमी दादा दादा करत मागे मागे… सर्व माझीच माणसे. रक्ताची माणसे. एका आईच्या पोटातून सर्वांनी जन्म घेतला. पण गावच्या किरकोळ गुंठ्यातील जमिनीसाठी आपण कोर्टात गेलो. वडिलांचे पण काही चुकले नाहीच. एवढ्याशा जमिनीत दोन भाग पाडले तर प्रत्येकाला काय येणार? वसंताला काय राहणार? त्याची तीन माणसे आणि आई जगणार कसे? आपण आई-वडिलांना कधी पैसे धाडले नाहीत की बहिणीला काही पाठविले नाही! आपण आशा, मुलगा आणि सासुरवाडीच्या माणसांचा विचार करत राहिलो. आपली बुद्धी भ्रष्ट झाली होती…

छे छे… आपले चुकलेच! आता बरे वाटले की, गावी जायचे. आईच्या पायावर डोके ठेवायचे. वसंताच्या पाठीवर थाप द्यायची. बहिणीच्या घरी जाऊन तिची खुशाली घ्यायची आणि कोर्टातली केस मागे घ्यायची. त्याशिवाय आपल्याला चैन नाही की, सुख नाही.

आशा समोर येऊन बसली. म्हणाली, “कसाला विचार करताय?”

“मी फार मोठी चूक केली. तुझ्या आणि तुझ्या माहेरच्या माणसांच्या बुद्धीवर चाललो. माझ्या सख्ख्या रक्ताच्या माणसांना विसरलो. वडिलांना त्यांच्या आजारपणात हाक मारली नाही, मदत केली नाही. खरंतर त्यांच्या शेवटच्या आजारपणात त्यांना मुंबईत आणून मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार केले असते तर, कदाचित ते अजून जगले असते. पण मला तशी बुद्धी झाली नाही. त्यांचे सर्व वसंता आणि नलिनीने केले. म्हणून मी त्यांचे आभार मानायला हवे होते. त्याऐवजी मी वाट्टेल तसे बोललो. मी ही केस मागे घेणार आहे. मला नको जमीन, हिस्सा नको. मला माझी माणसे हवीत! आता मला कोणी अडवायचे नाही. नाईकांचा अपघातात मृत्यू झाला, पण त्यामुळे माझे डोळे उघडले. आता जर मी तुम्हाला जिवंत हवा असेन तर माझ्या मनाप्रमाणे वागायचं. वडिलांच्या अखेरच्या इच्छेचा मान ठेवायचा.”

हेही वाचा – मृत्यूपत्र… भाऊ आणि आईला कोर्टात खेचण्याची तयारी

आशा गप्प होती. आपला नवरा पुरता खचला आहे… त्याला परत चालता फिरता करायचा असेल तर, त्याच्या मनाविरुद्ध वागायचे नाही, हे तिने ओळखले.

वसंताचा मुलगा शंतनू बारावी पास करुन कणकवलीत लॉ कॉलेजला जाऊ लागला होता. लॉ च्या दोन्ही वर्षात तो कॉलेजमध्ये पहिला आला. सुरुवातीला तो गावाहून ये-जा करत होता. पण आता अभ्यास वाढला होता आणि नाडकर्णी वकिलांकडे अनुभवासाठी काम करत होता म्हणून तो कणकवलीतच हॉस्टेलमध्ये राहू लागला.

मोहनरावांना आईला, वसंताला, बहिणीला भेटायचं होतं. कोर्टात जाऊन केस मागे घ्यायची होती. जवळ जवळ तीन वर्षांनी मोहनराव आणि आशा घरी आली. काका घरी येणार आहेत हे कळताच शंतनूपण गावी आला. यशोदापण माहेरी आली. मोहनराव घरी आले ते आईच्या खोलीत गेले. आईच्या पाया पडले. वसंतापण तेथेच त्यांच्या मागोमाग आला. वसंताच्या पाठीवरून हात फिरवला. आशाने बॅगेतून सासूबाईंसाठी साडी, वसंतासाठी पॅन्ट-शर्ट आणि नलिनीसाठी साडी बाहेर काढली. शंतनूसाठी मोबाइल आणला होता. बहिणीसाठी साडी आणि बहिणीच्या मुलीला मोबाईल… हे सर्व टेबलावर ठेवून मोहनराव बोलू लागला-

“आई, वसंता, यशोदे माझा चुकलाच. मी तुमका नको नकोता बोल्लयं, यशोदा मागच्यावेळी बोलली ता खरा आसा. खरंतर, मी घरातलो मोठो मुलगो. मी घरातली जबाबदारी घेवक होई होती. आईबाबांनी माका मोठो केलो, शिकवलो. पण तेची जाण ठेवलंय नाय मी. मी मुंबईक गेलंय आणि सगळ्यांका विसारलंय. लग्नानंतर माका सासुरवाडीची लोका मोठी वाटाक लागली आणि गावची बावळट. मी सासुरवाडच्यासाठी खूप केलंय, पण माझ्या आईवडिलांका, भावाक, बहिणीक विसारलंय. माझी चूक माका कळली. माझ्या वडिलांनी मृत्यूपत्र करुन माका जमीन देवक नाय म्हणून मी रागानं बेभान झालंय. त्यामागचो वडिलांचो हेतू माझ्या लक्षात ईलो नाय. वडिलांका या जमिनीचो तुकडो पाडूचो नाय व्हतो. माझी एकुलती एक बहीण यशोदा, तिच्या घराकडे कधी गेलंय नाय. तिची कधी विचारपूस केली नाय. तिच्या चेडवाक कधी जवळ घेतलंय नाय. माझी चूक माका कळली. मी पैशाच्या धुंदीत होतय. पण एक फटको बसलो. मरणातून वाचलंय. कारण आईबाबांचे आशीर्वाद पाठीशी होते. हॉस्पिटलमध्ये एक महिनो बिछान्यावर पडलंय आणि सगळा डोळ्यांसमोर इला. आई, वसंता, यशोदे माझा चुकला, मोठ्या मनान सगळा इसरा.”

मोहनराव गदगदून रडत रडत बोलत होता. बाजूला आशापण गप्प राहून ऐकत होती. आईचेपण डोळे ओले झाले होते. वसंता, नलिनी, यशोदापण भावूक झाली होती. एवढ्यात वीस-एकवीस वर्षाचा शंतनू बोलू लागला.

“मोहनकाका, तुम्ही म्हणालात सगळा विसरा, पण आम्ही कसे विसरतलंव, आजोबा वारले तेव्हा मी बारावीत होतंय. मृत्यूपत्रात तुमच्या नावावर जमीन ठेवक नाय म्हणून तुम्ही आजी, बाबा, यशोदे आते हेंका काय काय बोल्लात. माझ्या आईबाबांनी मुद्दाम तसा मृत्यूपत्र आजोबांका करूक सांगल्यानी, असो आरोप केलात. यशोदा आतेन जाब विचारल्यान तेव्हा तिचा थोबाड फोडूक निघालात. मी लहान होतंय म्हणून गप्प रवलंय आणि माझी आई माका काही बोलूक देईना. ही आशा काकी म्हणाली, आंब्याच्या बागेचे लाखो रुपये घेतास – सव्वीस कलमांचे लाखो रुपये येतत? कलमाआधी एक वर्षाआड येतत. तेंका मोठा करुन काय करुचा लागता त्या शेतकर्‍याक माहीत. बागेची साफसफाई, खत, कीटकनाशका किती महाग झाली याची तुमका कल्पना नसतली… आणि हल्ली माकडांचो त्रास किती सुरू आसा. बागवाल्याक कसला उत्पन्न मिळतला? माझे आजोबा आणि बाबा वर्षभर तेच्या मागे रवत म्हणून थोडे आंबे मिळतत…” शंतनू बोलतच होता,

“गावात आळशी माणसा रवतत अशी ही काकी म्हणाली, असू दे आम्ही आळशी. आता या पुढे या घरातलो मोठो मुलगो म्हणून ह्या घर, आंब्याची झाडा, शेती, सण, देवपूजा सगळा तुम्ही सांभाळा. मी, आईबाबांका आणि आजीक घेवन कणकवलीक जातंय. ती तिकडे भाड्याची जागा बघलंय. माझे बाबा गवंडी आसत तेंका थय काम मिळतला. आम्ही बिर्‍हाड केला तर, माझ्या आईक थोडी विश्रांती गावात. या घरात लग्न होऊन इल्यापासून तिका विश्रांती कसली ती माहिती नाही. आजीकपण मी घेवन जातंय. कारण तिका वारंवार कणकवलीचो डॉक्टर लागता. आमची गुरा आसत तेंका मी माझ्या मामाकडे पाठवलंय. कारण तुमच्याकडून तेंची देखभाल होवची नाय. माझे बाबाही अशी कामा करत करत पन्नासाव्या वर्षी म्हातारे झाले, आई पंचेचाळीसाव्या वर्षी म्हातारी झाली. तेनी आयुष्यात कधी विश्रांती घेवक नाय. या दोघांचा आयुष्य वाढवचा आसात तर, या घर सोडूक व्हया आणि आम्ही कणकवलीक बिर्‍हाड करुक व्हया. तेवा तुम्ही आणि काकी ह्या घर सांभाळा. तसे तुमी आता रिटायर्ड आसात, तुमचो मुलगो अमेरिकेत गेलो हा. तुम्ही मुंबईक रवलास काय आणि हय रवलास काय फरक पडना नाय. आजच संध्याकाळी मी आई बाबा आणि आजीक घेवन जातंय. आता एकदम गणपतीक येव. तुम्ही कसे तिसर्‍या दिवशी गणपतीक येवास! आजपासून ह्या घर तुमचाच, शेती फक्त तुमचीच, आंब्याची झाडा, काजूची झाडा फक्त तुमचीच…’’ एवढे भडाभडा बोलून शंतनू थांबला.

मोहनराव आणि आशा आ वासून ऐकत राहिली. एवढासा शंतनू मोठा केव्हा झाला, हे कळलेच नाही. तो खरंच घर सोडून आईवडिलांना, आजीला घेऊन कणकवलीला जाईल, असे त्यांना वाटत नव्हते. मोहनरावांना वाटत होते. आपल्याला आणि आशाला हे घर सांभाळणे जमायचे नाही. नलिनी दिवसभर राब राब राबत असते. आशाला थोडेच जमणार? आशाला आता शहरात राहून सुखाची सवय झाली आहे. पण करणार काय? मागच्या वेळी आपण आणि आपली बायको काय काय बोलून गेलो. आता आपणाला हे सर्व ऐकून घ्यावेच लागेल.

वसंता आणि नलिनी सुद्धा आपल्या मुलाकडे पाहात राहिली. या शंतनूला आपण अजून लहान लहान म्हणत होतो, पण खरंच जे आम्ही बोलू शकणार नव्हतो, ते हा मुलगा बोलला. वसंताला वाटले आयुष्यभर मी या घरासाठी झटलो, एक दिवस विश्रांती नाही. शहरातल्या लोकांसारखे ना नाटक, ना सिनेमा. पण किंमत कोणाला आहे? खरंच, शंतनू म्हणतोय तर जाऊया कणकवलीला. मी गवंडी काम करेन. नलिनीला विश्रांती मिळेल, वसंताच्या मनात विचारचक्र सुरू झालं.

नलिनीही मनात विचार करत होती… ‘कमाल आहे या मुलाची. मोठ्या काकांना मनातले बोलला. मला असे कधी बोलायला जमले नसते. घर सोडून कणकवलीला बिर्‍हाड करायचं म्हणतोय सोपं आहे का ते? एवढी वर्षे या घरात राहिले. पण चला, आता बिर्‍हाड करुया. तो म्हणतोय तर जाऊ कणकवलीला!’

खरेच नलिनी कपड्यांच्या पिशव्या भरत होती. वसंता तिला मदत करत होता. मधेच नलिनीने दोघांचे जेवण आणून ठेवले आणि रात्रीसाठी तुम्हा दोघांसाठी जेवण ठेवले आहे, असे सांगून गेली. नलिनी आणि वसंताने भरलेल्या पिशव्या पाहून आशा बोलू लागली, “वसंत भावोजी, आमचं चुकलंच, आम्ही रागाच्या भरात बोलून गेलो. मी तुम्हाला आळशी म्हणाले, ऐतखाऊ म्हणाले, आंब्याचे एवढे पैसे खाता म्हणाली, चूकच झाली. आम्ही तुमच्या सगळ्यांवर दावा दाखल केला. त्याची शिक्षा आम्हाला मिळाली. माझा नवरा मरणाच्या दारातून परत आला. पण आता तुम्ही हे घर सोडून जाऊ नका. मी शहरात राहिलेली. मला हे गावातील घर सांभाळता येणार नाही. गावातले सण, रीतिरीवाज मला जमणार नाहीत. मी सासूबाईंना उलट-सुलट बोलले. सासूबाई मला क्षमा करा…”

आशा, मोहनराव बोलत होते… हात जोडत होते… डोळे पुसत होते. पण वसंता, नलिनी, यशोदेने तिकडे लक्ष दिले नाही. थोड्या वेळाने त्यांनी बाहेर जायचे कपडे घातले एवढ्यात शंतनू टेम्पो घेऊन आला. शंतनू आणि वसंताने मिळून त्यात सर्व सामान भरले. एक रिक्षा आली. सर्वांनी देवाला नमस्कार केला. रिक्षात शंतनूची आजी, आईबाबा आणि आते बसली. टेम्पोबरोबर शंतनू बसला. घराकडे एकदा डोळेभरुन पाहिले. रिक्षा आणि टेम्पो कणकवलीच्या दिशेने निघाली.

मोहनराव आणि आशा डोक्याला हात लावून हे सर्व पाहत होते आणि त्यांच्या समोरील टेबलावर त्यांनी मुंबईहून आणलेल्या साड्या, शर्ट-पॅन्ट पीस, मोबाइल्स त्यांचेकडे पाहत होते…

समाप्त


मोबाइल – 9307521152 / 9422381299

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!