सतीश बर्वे
महेशने माझ्या हातात एक पत्र ठेवले… आज ना उद्या ते होणारच होते, याची मला जितकी खात्री होती, त्याच्या दसपटीनं अधिक खात्री महेशला होती. अपेक्षेप्रमाणे बॅंकेने महेशला निर्दोष ठरवून सन्मानपूर्वक परत कामावर रुजू व्हायला सांगितले होते! उद्यापासून महेश नसण्याची सवय मला आणि माझ्या हॉस्पिटलच्या स्टाफला करून घ्यायची होती.
मला आठवला तो दिवस…
रोज तो दिसायचा सोसायटीच्या मुख्य दरवाजाच्या आत लावलेल्या बाकड्यावर… शून्यात नजर लावून बसललेला… आज शेवटी संध्याकाळी घरी परत येताना त्याला याबाबतीत विचारायचं असं ठरवूनच सकाळी मी हॉस्पिटलला जायला म्हणून घराबाहेर पडलो होतो… संध्याकाळी सुदैवाने तो तिथेच होता बसलेला. मी त्या बाकड्यापाशी थांबून त्याच्या खांद्यावर हात ठेवला अन् त्याला विचारले, “तू रोज कसल्या एवढ्या गहन विचारात असतोस? काही अडचणीत आहेस का तू?”
त्याने एकदम दचकून मागे वळून पाहिले आणि लांब उसासा टाकत तो म्हणाला, “गेल्या एक वर्षात तुम्हीच पहिले आहात जे माझ्याशी खऱ्या अर्थाने बोलले…” असं म्हणून तो ढसाढसा रडायला लागला. मग शांत होऊन, डोळे पुसत तो म्हणाला, “आज तुम्ही मला परत माणसांत आणलं आहे. गेले वर्षभर मी दगडासारखा गतप्राण अवस्थेत जगत होतो. घरच्यांनी बोलणं टाकलं आहे. फक्त दोन वेळेला दोन घास जेवायला मिळतात नशिबाने.”
“चल आपण बाहेर मोकळ्या हवेत जाऊन गप्पा मारू…”
तो खरंतर तयार नव्हता, पण मीच बळेबळे त्याला आमच्या सोसायटीपासून जवळच असलेल्या सार्वजनिक बागेत घेऊन गेलो.
जाताना जवळच्या लोकप्रिय असलेल्या वडापावच्या गाडीवरून वडापाव आणि मिक्स भजी मी घेतली. खाता खाता तो बऱ्यापैकी सावरला आणि त्याच्या मनांचा बांध अखेर फुटला. तो जे बोलला, ते खरंच धक्कादायक होते!
हेही वाचा – फुलपाखरू… 40 वर्षांपूर्वीच्या आठवणी
महेश जात्या हुषार मुलगा… पदवी परीक्षेत प्रथम वर्ग… नंतर नामांकित महाविद्यालयातून एमबीएची पदवी उच्च श्रेणीत उत्तीर्ण… नामांकित खासगी बँकेत नोकरी… सध्या सगळीकडे संगणकावर काम करतात. खालच्या श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे काम उच्च श्रेणीतील अधिकारीवर्गाने तपासल्यानंतर विशिष्ट आर्थिक मर्यादांच्या वरील आर्थिक व्यवहार ग्राहकांच्या खात्यात नोंदला जातो. महेशने केलेले आर्थिक काम त्याच्या वरच्या श्रेणीतील दोन अधिकाऱ्यांनी तपासल्यानंतरच ते ग्राहकांच्या खात्यात नोंदले गेलेले असताना देखील काही त्यातील परस्पर केलेल्या आर्थिक नोंदीविषयी संबंधित ग्राहकांच्या लेखी तक्रार आल्यावर बॅंकेने महेशला आणि त्याच्या वरच्या अधिकाऱ्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केले होते. तक्रारीत नमूद केलेली रक्कम काही लाखांच्या घरात जात होती.
सुरवातीला रजा सुरू आहे, या सबबी खाली घरी थांबलेल्या महेशच्या आईवडिलांना बाहेरून खरी बातमी कळली आणि त्यांना धक्काच बसला. सोसायटीत, समाजात आणि नातेवाईकांना काय सांगायचे या भीतीने आणि तणावाखाली आपल्या मुलाची बाजू ऐकून न घेता दोघांनी तसेच महेशच्या मोठ्या भावाने तर त्याच्याबरोबरचा संवाद तोडला होता. घरात बसून कंटाळा आल्यावर तो सोसायटीच्या आवारात येऊन बसायचा. घडलेलं धक्कादायक होते आणि मला त्याच्या घरच्यांचं वागणं बुचकळ्यात टाकणारं वाटलं.
“तू उद्यापासून माझ्यासोबत माझ्या हॉस्पिटलमध्ये ये. तुला आवडेल ते काम कर. मला काही करून महेशला या तणावातून बाहेर काढायचे होते. एकदा का तो नैराश्याच्या गर्तेत सापडला की, मग त्यातून बाहेर पडणे त्याचं त्यालाच अवघड होऊन बसणार होतं…
सुरुवातीला नुसतं बसणाऱ्या महेशने हळूहळू पेशंटला धीर देण्याचे काम सुरू केल्याचे बघून मला बरं वाटलं. इतरांना धीर देताना तो स्वतः देखील नकळत मनातून कणखर होत चालला होता. एव्हाना, महेश त्याच्या स्वभावामुळे सगळ्यांचा छान मित्रही झाला होता आणि जास्ती करून छोट्या मुलांचा तो लाडका ‘दादा’ झाला होता.
हेही वाचा – नात्याची पावनखिंड…
महेशच्या बॅंकेने दिलेले पत्र वाचून मी त्याला जवळ घेऊन त्याचे अभिनंदन केले. पाणावलेल्या डोळ्यांनी महेश माझे हात हातात घेऊन म्हणाला, “तुमचे उपकार कसे मानू, माझं मलाच कळत नाहीये. अचानक नैराश्य आलेल्या माझ्या आयुष्याच्या काळ्या दगडातून विश्वासाच्या आणि आधाराच्या छिन्नी हातोड्याने तुम्ही माणुसकीचे अवर्णनीय आणि अजोड शिल्प कोरलेत, हे मी कधीच विसरू शकत नाही. घरच्यांनी संबंध तोडले असताना तुम्ही देवासारखे धावून आलात आणि मला माणूस म्हणून जगण्याची परत संधी दिली. तुमच्या हॉस्पिटलने आणि सर्व स्टाफने मला पडत्या काळात सांभाळून घेतले यासाठी मी सर्वांचाच ऋणी आहे…”
सगळ्यांचा निरोप घेऊन महेश निघाला आणि मनात विचार आला की, असे कितीतरी दुर्दैवी महेश नशिबाच्या तडाख्यात नाहक अडकून खितपत पडत असतील. तेव्हा घरच्यांनीच तर त्यांना शारीरिक आणि मानसिक आधार देऊन जगवायला हवं… तरच ते महेश आलेल्या संकटाला निर्धाराने आणि जिद्दीने तोंड देऊन त्यातून सुखरूपपणे आणि सहलीसलामात बाहेर पडण्याचा आटोकाट प्रयत्न करतील! नाहीतर, आयुष्यात निर्जीव पुतळ्यागत ठाण मांडून बसण्यापलीकडे त्यांच्या हाती काहीच उरणार नाही.
खरंच आपल्यापैकी प्रत्येकाने मनापासून विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे. तुम्हाला काय वाटतं?


