पराग गोडबोले
आम्ही नेहमी भांडतो, वाद घालतो, परत एक होतो आणि मग संसाराचा गाडा सुरळीतपणे सुरू राहतो. कधी ती एक पाऊल पुढे येते, तर कधी मी एक पाऊल मागे घेतो. गेली कित्येक वर्षं हे चक्र असं अव्याहतपणे सुरू आहे…
परवा असंच झालं. तिला पुण्याला माहेरी जायचे वेध लागले. माहेरी जायचं म्हटल्यावर सगळ्याच बायकांच्या अंगात येतं की, काय कोणास ठाऊक? पण आमच्याकडे मात्र येतं! यावेळी पण आलं. चार दिवसांसाठीच जायचं होतं, पण भली मोठी बॅग फडताळातून बाहेर पडली आणि भरली जाऊ लागली, प्रस्थानाच्या चार दिवस आधीपासूनच!!
हे न्यायचंय… ते हवंय… म्हणता म्हणता बॅग टम्म फुगली. अगदी ओसंडून वाहू लागली. जायच्या आदल्या दिवशीपर्यंत कोंबाकोंबी सुरूच होती. बॅग उचलून बघितल्यावर तिच्या लक्षात आलं की, हे एवढं ओझं एकटीने बसपर्यंत नेणं म्हणजे अशक्यप्राय गोष्ट! बसपर्यंत जाऊ द्या, लिफ्टने ते खाली उतरवून रिक्षापर्यंत नेणं, ही सुद्धा अवघड गोष्ट होती तिच्यासाठी.
आता यावर काय तोडगा काढायचा, या पेचात पडली ती. बरं, बस होती बारा वाजताची, त्यामुळे नेहमी उपलब्ध असणारा हक्काचा हमाल म्हणजे मी, यावेळी उपलब्ध नसणार! चिंतातूर झाली होती अगदी… मी विचारलं, “एक तोडगा आहे माझ्याकडे, सांगू?“
हेही वाचा – पावसाची रिपरिप अन् रिक्षावाला…
“तुझा तोडगा म्हणजे नक्कीच काहीतरी द्राविडी प्राणायाम असेल. ठेव तुझ्याकडेच. मी बघते काय करायचं ते!”
बराच वेळ घालमेल सुरू होती तिची. शेवटी मला म्हणाली, “बरं, सांग काय तोडगा आहे तुझ्याकडे?”
“आता का? तू बघ तुझं काय करायचं ते…” मला पण तिला चिडवायची हुक्की आली आणि मी अडून बसलो.
असाच काही वेळ गेला, मग मी तिला म्हणालो, “बघ पटतंय का, साधा सोपा तोडगा आहे…”
तिने प्रश्नार्थक चेहेरा केला.
“अगं, सकाळी ऑफिसला जाताना मी तुझी बॅग वॉचमनच्या केबिनमध्ये ठेवतो. तू निघालीस की, त्याला बॅग रिक्षात ठेवायला सांग. सुटला प्रश्न! छोटी सी बात!! बस स्टॉपवर, तो नीता ट्रॅव्हल कंपनीचा माणूस असतोच की, बॅग उचलून सामान कक्षात ठेवायला. बघ पटतंय का?”
हेही वाचा – मनाची घालमेल अन् देवभूमीची यात्रा…
विचारात पडली थोडी, पण नंतर म्हणाली, “बरा वाटतोय हा तोडगा. कधीकधी हे असं लॉजिकल काहीतरी सुचवतोस तू. चालेल मला.”
मग जायच्या दिवशी सकाळी, मी तिची बॅग घेऊन निघायच्या तयारीत असताना, तिने पण चपला चढवल्या पायात.
“तू कुठे निघालीस आता?”
“नाही, येते तुझ्याबरोबर नीट ठेवतोयस का नाही ते बघायला. नाहीतर तंद्रीत ठेवशील कुठेतरी आणि माझी पंचाईत करशील…”
किती तो विश्वास ना, नवऱ्यावर?
‘गाड्या बरोबर नाळ्याची यात्रा’ निघाली वॉचमनच्या केबिनपर्यंत. तिथे ती बॅग ठेवल्यावर तिचा जीव शांत झाला आणि मी ऑफिसला निघालो…
दुपारी बस सुटल्यावर फोन आला… “तू सुचवलेला तोडगा छान होता रे, त्यामुळे खूप त्रास वाचला माझा. Thank You…”
होती छोटीशीच गोष्ट, पण किती हलका झाला ताण तिचा या साध्याश्या तोडग्यामुळे! आणि तिच्या मनापासून आलेल्या धन्यवादामुळे माझ्याही अंगावर मूठभर मांस चढलं.
असंच असतं. एखादी छोटीशी सूचना किंवा छोटीशी मदत, मन जिंकून जाते समोरच्या व्यक्तीचं आयुष्यभरासाठी आणि इथे तर साक्षात अर्धांगिनी! तिला जिंकलं, तिचा भार हलका झाला, म्हणजे त्यात जग जिंकल्याचंच समाधान! वाद, बखेडे आणि तंटे तर सुरूच राहतील, पण संसारात या अशा अवचित फुलणाऱ्या ताटव्यांमुळे, बिकट वाट सुद्धा वहिवाट होऊन जाते, असा माझा नेहमीचाच अनुभव.
पुण्यात तिचे बंधुराज आले होते उतरवून घ्यायला, त्यामुळे चांदणी चौक ते वारजे हा शेवटचा टप्पा पण सुखकर झाला आणि ती अलगद आईच्या कुशीत पोहोचली. अर्थात, काही जणांच्या म्हणण्यानुसार, वारजे म्हणजे पुणं नव्हे हे मान्य, पण डोंबिवलीकर जसा मुंबईकर म्हणून ओळखला जातो, तसं आम्ही वारजे पण पुण्याचाच भाग समजतो. खरं खोटं, राम जाणे!
“सुखरूप पोहोचले रे,” म्हणून मेसेज प्राप्त झाला आणि एकदाचं गंगेत घोडं न्हालं. साठा उत्तराची कहाणी अशा रीतीने सुफळ संपन्न जाहली.


