ॲड. कृष्णा पाटील
माझा मित्र नंदूने नवीन बांधलेल्या घराचा ‘गृहप्रवेश’ कार्यक्रम होता. खूप वर्षांनी खपून त्याने दोन मजली घर बांधलं होतं. समोर अंगण ठेवून चहूबाजूंनी लाल चिऱ्याचे दगडी कंपाऊंड केलं होतं. कष्टाने मिळवलेली बरीच रक्कम या संपूर्ण कामासाठी खर्ची पडली होती. आयुष्यातली खूप वर्षे ती कमाई करण्यासाठी घालवली होती. कारण, सर्व सोयीसुविधा असलेलं घर बांधायचं… हे नंदूचं फार दिवसांपासूनचं स्वप्नं होतं. ते स्वप्न आज पूर्ण झालं होतं. म्हणूनच गृहप्रवेश करताना त्याला अतीव आनंद होणं, स्वाभाविक होतं.
तर, त्या दिवशी नंदू खूप आनंदी होता. कार्यक्रम दुपारचा होता. खूप उत्साहाने आणि आग्रहाने गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला नातेवाइक अन् मित्रांना बोलावलं होतं. त्यांच्या स्वागतासाठी हार, फुले, गुच्छ आणून ठेवले होते. जेवणाची उत्तम सोय केली होती. त्याच्या पाहुण्यांनी, निमंत्रित मित्रांनी घर पाहावं ही नंदूची इच्छा होती… त्यांनी घराचं कौतुक करावं, असं त्याला मनोमन वाटत होतं. इतरांना त्याचं महत्त्व काय समजणार? इतरांना आपले कष्ट तरी कसे समजणार? आप्तांना आणि मित्रांनाच आपले कष्ट समजणार ना! अशी त्याची भावना होती. यासाठीच, ज्यांना आपल्या कष्टाची कदर आहे, असेच पाहुणे आणि मित्रांना नंदूने बोलावले होते.
हळूहळू पाहुणे जमू लागले… येणाऱ्या प्रत्येकाचा नंदू आदर-सत्कार करीत होता, प्रत्येकाला जेवणाचा आग्रह करीत होता. जेवण झालं की, सर्व घर दाखवत होता. किचन, हॉल, बेडरूम… सर्व फर्निचर, वरचा मजला… त्यांना घराबद्दल काय वाटतंय, याचा अंदाज घेत होता… त्यांचा चेहरा निरखत होता… त्यांच्या प्रतिक्रियांची वाट पाहत होता…
असाच एक जुना मित्र आला… नंदूच्या खूप जवळचा! पहिल्यापासून नंदूचा जिवलग होता, पण कित्येक वर्षांत गाठभेट नव्हती. त्याला बघितल्यावर नंदूला खूप आनंद झाला. पै-पाहुण्यांपेक्षा जवळच्या मित्राने आपल्या कामाचं कौतुक केलं तर, गोष्टच न्यारी! नंदूने बाहेर पुढे जाऊन त्याचे रस्त्यावरच स्वागत केले. त्याला झेंडूच्या ताज्या फुलांचा हार घातला, टवटवीत गुलाबांचा गुच्छ दिला. त्याच्या हाताला धरून त्याला घरी आणलं. हॉलमधल्या नक्षीदार सागवानी कोचवर बसायला सांगितले. तोपर्यंत नंदूच्या पत्नीने पाणी आणून दिले.
बुके आणि छोटे गिफ्ट त्याने नंदू आणि त्याच्या पत्नीला दिले. त्याचवेळी फोटो निघाले. त्याने कॅमेऱ्याकडे पाहून स्मितहास्य केले. नंदूनेही त्याच्यासारखाच हसरा चेहरा केला. फटाफट कॅमेऱ्यावर क्लिक झाले… नंदू त्याला नंतर जेवणासाठी घेऊन गेला. तिथे त्याची जेवणाला बसण्याची स्पेशल व्यवस्था केली. जेवताना नंदूने खूप आग्रह केला. मित्रानेही दोन म्हणता चार पुऱ्या खाल्ल्या… बासुंदी तर तीन वेळा घेतली… ‘मी भात खात नसतो,’ असे म्हणत म्हणत दोन वेळा भातही घेतला. पाहुणा किंवा मित्र आपल्या घरी पोटभर जेवला की, किती आनंद वाटतो… नंदूला समाधान वाटले. मित्रालाही खूप आनंद वाटला.
जेवण झाल्यावर तृप्तीचा ढेकर देऊन मित्राने हात धुतले, तिथेच टॉवेलला हात पुसले. नंदूने लगेच त्याला बसायला दुसरी खुर्ची दिली. पानाचा विडा दिला. थोडावेळ तो खुर्चीवर बसला. नंतर नंदूच म्हणाला, “चल, तुला घर दाखवतो.”
आत जाता जाता नंदूला वाटले तो जेवणाबद्दल काहीतरी बोलेल… खूप पाहुणे येणार, जवळचे मित्र येणार म्हणून गेले पंधरा दिवस नंदू मेन्यूवर विचार करत होता. नंदूच्या घरातील सर्वांनी मिळून अत्यंत सुंदर असा मेन्यू ठरवला होता. जेवलेल्या जवळपास सगळ्याच पाहुण्यांना मेन्यू आवडला होता. पण मित्र काहीच बोलत नसल्याने नंदूनेच त्याला विचारले, “जेवण कसं झालंय?”
हेही वाचा – दादू… घराचेच वासे फिरले!
मित्र म्हणाला, “खरं सांगू का अशा जेवणाने ॲसिडिटी होते. भाताऐवजी पुलाव करायला हवा होता. पुऱ्या तर नकोच होत्या. हल्ली पुऱ्या कोण खातो? पुऱ्यांऐवजी चपाती ठेवायला पाहिजे होती. आणखी एक म्हणजे, बासुंदी इतकी गोड नको होती.”
नंदूने मनातल्या मनात विचार केला… ‘शेवटी ज्याची त्याची निवड वेगळी. प्रत्येकाला कोणता पदार्थ आवडेल सांगता येत नाही. हा आपल्या जवळचा म्हणून स्पष्ट बोलतोय एवढंच. बाकीचे न बोलता किंवा खाल्लेल्या अन्नाला नावं कशी ठेवायची म्हणून बोलत नसावेत!’
नंदू आणि तो मित्र घर बघायला लागले. नंदूने त्याला हॉल दाखवला… किचन, बेडरूम दाखवले. खालचा मजला, मुलांची अभ्यास रुम, गेस्ट रूम, प्रत्येक रुममध्ये पीओपी, फर्निचर सर्व दाखवलं… खालच्या मजल्यावरच पंधरा-वीस मिनिटे गेली. नंदू त्या मित्राचा चेहरा निरखत होता. पण तो मख्ख होता. त्याला आनंद झालाय की दुःख झालंय, हेच समजत नव्हतं. तो नुसताच कोरड्या नजरेने पाहात होता.
नंदू आणि तो मित्र वरच्या मजल्यावर गेले. दुसरा मजलाही नंदूने त्याला फिरून दाखवला. पण गड्याचा चेहरा तसाच! वाळलेल्या लाकडासारखा निर्जीव… त्याला काय वाटलंय, याचा नंदूला अंदाज येईना. सगळं फिरून झाल्यावर मात्र त्याने नंदूशी हस्तांदोलन केलं अन् म्हणाला, “कोण होता इंजिनीअर? कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं की आपण मटेरियल दिलं होतं?”
हेही वाचा – दादू… लेकीच्या उदारपणाने गाव गहिवरला
नंदू म्हणाला, “इंजिनीअर माझे जवळचे पाहुणेच आहेत. त्यांना सर्व कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी काम केलंय. एवढं काम करायला दीड वर्ष गेलं. आज सकाळपासून येणारा प्रत्येकजण त्यांच्या कामाचं कौतुक करतोय. एक जण तर म्हणाला, ‘इंजिनीयर जवळचे पाहुणे होते म्हणूनच कमी बजेटमध्ये इतके सुपर बांधकाम केलंय…’ नाहीतर हे शक्यच नव्हतं.’
नंतर त्या मित्राने पुन्हा एकदा इमारतीकडे खाली-वर पाहिले… थोडा गंभीर झाला आणि नंदूला म्हणाला, “जिना थोडा उत्तरेला हवा होता. दक्षिण बाजूस जिना असणे, ही अशुभ असणारी बाब आहे. पलीकडच्या दोन गॅलरी विनाकारण काढल्या आहेत, त्याचा तुम्हाला काहीच उपयोग होणार नाही… एक काम कर, तू आमचं घर बघायला एकदा ये. घर कसं बांधायचं असतं याचा उत्तम नमुना तुला पाहायला मिळेल.”
त्याचं ऐकून नंदूला धक्काच बसला. आश्चर्याने नंदूने विचारले, “तू वास्तूशास्त्रज्ञ केव्हापासून झालास?”
मित्र म्हणाला, “वास्तुशास्त्रज्ञ नाही रे. मला आपलं असंच वाटलं, म्हणून बोललो. तू माझ्या जवळचा आहेस. तळमळ वाटली म्हणून बोललो. कारण, आता घर बांधण्यामध्ये टेक्निक खूप पुढे गेलं आहे. तू हे सगळं विनाकारण जुनाट पद्धतीने केलं आहेस!”
एवढं बोलून झाल्यावर मात्र त्या मित्राचा चेहरा थोडा उजळला. तो आल्यापासून गंभीर असणारा चेहरा थोडा हसतमुख झाला. निरोप घेताना तो वारंवार नंदूला, ‘बाकी काय विशेष?’… ‘आणखी काय विशेष?’… ‘सगळं ठीक आहे ना?’ असे विचारत राहिला. नंतर म्हणाला, “बाकी कसं ही असू दे… परंतू तू स्वतःचं घर बांधलंस, खूप चांगलं झालं.”
थोड्या वेळाने निरोप घेऊन तो मित्र निघून गेला.
नंदू मात्र त्यानेच स्वकष्टाने बांधलेल्या इमारतीकडे खालपासून वरपर्यंत निरखून पाहू लागला…!
मोबाइल – 9372241368


