प्रदीप केळुस्कर
भाग – 3
आपला दोन नंबरचा मुलगा वसंता याचे आपल्यामागे कसे होईल, याची केशवराव यांना काळजी वाटे. मोठा मोहन अभ्यासात हुशार होता. सीए झाला आणि मोठा सरकारी ऑफिसर बनला. केशवराव गेल्यावर तेराव्या दिवशी नाडकर्णी वकिलांनी मोहन आणि वसंताला मृत्यूपत्र वाचून दाखवलं. त्यानुसार राहते घर मोहन आणि वसंत यांच्या नावावर तर, गावातील 32 गुंठे जमीन आणि त्यावरील 26 आंब्याची कलमे, 20 काजूची झाडे तसेच 10 गुंठे भातशेती जमीन फक्त वसंत याच्या नावावर ठेवली होती. त्यावरून मोहन आणि त्याची पत्नी आशा यांनी वसंता याच्यावर तोंडसुख घेतले. त्यावेळी त्यांची बहीण यशोदाने वसंताची पाठराखण केली.
घरातून रागात बाहेर पडलेले मोहन आणि आशा कणकवलीला पोहोचली. लॉजवर गेल्यानंतर आशाने मामांना फोन लावला. तिचे मामा पुण्यातील मोठे वकील. त्यांना सर्व कहाणी सांगितली आणि आमचा हिस्सा कसा मिळेल, याची विचारणा केली. आशाच्या मामांनी कणकवलीतील त्यांचे मित्र भोसले वकील यांची भेट घ्यायला सांगितले. आपण भोसलेंशी बोलतो असे सांगितले. दुसर्या दिवशी भोसले वकिलांच्या ऑफिसमध्ये मोहनराव आणि आशा पोहोचले.
“नमस्ते, वकील साहेब! मी मोहन मुंज आणि ही माझी पत्नी आशा…”
“या या मोहनराव. पुण्याहून साळुंखे साहेबांचा फोन आला होता. ते म्हणाले मला, ‘आपले जावई तुम्हाला भेटणार’ म्हणून. बोला, काय झालं?”
‘‘माझ्या वडिलांनी मृत्यूपत्र करून वडिलोपार्जित जमीन माझा लहान भाऊ वसंता याचे नावे केली. मी मोठा मुलगा असताना सुद्धा त्यांनी मला पूर्णपणे डावललं. माझ्यावर पूर्णपणे अन्याय झाला. मला त्या प्रॉपर्टीत माझा हिस्सा हवा, तो मला मिळवून द्या.”
“‘ठीक आहे, तुम्ही बाहेर बसलेल्या माझ्या असिस्टंट मुलीकडे तुमचे नाव, पत्ता, मोबाइल वगैरे द्या… आणि मला सांगा तुम्ही किती भावंडे?”
“तीन. एक लग्न झालेली बहीण आहे आणि आईपण आहे.”
हेही वाचा – मृत्यूपत्र
“म्हणजे, या प्रॉपर्टीत चार वारस आहेत, बरोबर? तुम्हाला बाकी तिघांना नोटीस पाठवावी लागणार. त्यांची नावे, पत्ते द्या. बाकी प्रॉपर्टीचे सातबार, आठ-अ ही कागदपत्रंही लागतील.”
“पण या मृत्यूपत्राला चॅलेंज देऊ शकतो का आपण?”
“हो, का नाही? पैसे खर्च करण्याची तयारी ठेवा.”
मधेच आशा म्हणाली, “खर्च होऊ दे… पण या वसंताला, यशोदेला आणि त्यांच्या आईला धडा शिकवायचा आहे मला.”
“मग ठीक आहे, सुरुवातीला पन्नास हजार जमा करा…”
“पण मिळेल का मला हिस्सा?” मोहनचा प्रश्न.
“हो मिळणारच! कारण, ही इस्टेट आहे, ती वडिलांनी मिळवलेली नाही की विकत घेतलेली नाही. ती तुमच्या आजोबांकडून वारसाने वडिलांकडे आली आहे. म्हणजेच, वंशपरंपरेने आलेली आहे. त्यामुळे मृत्यूपत्र करून ती कुणाला देताच येणार नाही, असा युक्तिवाद करू आपण… तुम्ही आपल्या आजोबांचे वारस म्हणून त्या इस्टेटीत हक्क सांगताय, असा युक्तिवाद करायचा.”
“पण यात यश मिळेल ना?” मोहनरावांचा तोच प्रश्न.
‘‘प्रयत्न करायचाच. ही अशीच एक केस मी लढतो आहे. कसालचे एक गृहस्थ आहेत. तुम्हाला नाव सांगतो… प्रमोद नाईक! हे कोल्हापूरला राहतात. त्यांच्या वडिलांनी वंशपंरपरेने आलेली इस्टेट आपल्या मुलीच्या नावावर केली. कारण म्हातारपणी त्या मुलीनेच त्या दोघांना सांभाळलं. प्रमोदरावांच्या वतीने मी चॅलेंज केलंय. तुम्हाला या प्रमोद नाईकांचा नंबर देतो. त्यांना विचारा…” वकिलांच्या सेक्रेटरीने त्यांना प्रमोद नाईक यांचा कोल्हापूरचा पत्ता आणि फोन नंबर दिला.
“बर मी करतो फोन यांना… मग आम्ही निघू?”
“हो. सर्व भावंडांचे पत्ते द्या, बहिणीचा पण द्या…”
“पण हां, गावातील सातबारा वगैरे कागदपत्रे मिळवायला मला वेळ नाही. मला मुंबईला तातडीने जायचंय.”
“ठीक आहे. मग अजून पाच हजार द्या. म्हणजे एकूण पंचावन्न हजार! मग माझा माणूस सर्व कागदपत्रे गोळा करेल.”
मोहनरावाने पंचावन्न हजारांचा चेक वकिलांच्या सेक्रेटरीकडे दिला. सेक्रेटरीने आवश्यक त्या सह्या घेतल्या. सेक्रेटरी म्हणाली, “ठीक आहे साहेब, सर्व कागदपत्रे तयार झाली की, तुम्हाला स्वतः येऊन कोर्टात दावा दाखल करायला लागेल. तेव्हा एकदा या.”
हेही वाचा – मृत्यूपत्र… म्हणून जमीन धाकट्याच्या नावावर!
वकिलांच्या ऑफिसमधून बाहेर पडून लॉजवर आल्यानंतर मोहनरावाने प्रमोद नाईकांना फोन लावला.
“हॅलो… प्रमोद नाईक बोलतात का?”
“होय, मी प्रमोद नाईक, तुम्ही कोण?”
“मी मोहन मुंज. मूळ गाव आंबेरी, सध्या मुंबईत राहतो.”
“बोला काय काम होतं, आणि माझा नंबर कोणी दिला?”
“कणकवलीतील भोसले वकिलांनी तुमचा नंबर दिला. तुम्ही तुमच्या वडिलांच्या मृत्यूपत्राला चॅलेंज केलंय ना कोर्टात? त्या संबंधी बोलायचं होतं.”
“तुमचा काय संबंध?”
“माझ्या वडिलांनी पण असंच केलंय. मृत्यूपत्रातून वडिलोपार्जित जमीन माझ्या एकट्या भावाच्या नावाने केली. मला एक गुंठाही ठेवला नाही. मी भोसले वकिलांमार्फत कोर्टात दावा ठोकायचा विचार करतोय. भोसले वकील म्हणाले, असाच एक दावा सध्या त्यांचेकडे आहे. त्यांनी तुमचे नाव आणि नंबर दिला.”
“होय, होय… मी त्या मृत्यूपत्राला चॅलेंज केलंय. आता दावा कोर्टात आहे. भोसले वकील म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत तुमच्या बाजूने निकाल येईल. फक्त पैसे सोडायला लागतील.”
“मला पण तसेच सांगितले, पण खरोखर तसे होईल काय?”
“निश्चित होईल. भोसले वकील सर्व फिक्स करण्यात हुशार आहे. तो कशी मांडवली करतो बघा. तुम्ही निश्चिंत रहा. माझी केस चालू आहे, त्याच्या निकालाने तुम्हाला अंदाज येईलच.”
“मग आपण संपर्कात राहू. केस कशी चालते आहे हे मला कळवत रहा.”
“निश्चित कसलीच काळजी करू नका.”
मोहनरावांनी फोन ठेवला आणि विजयी मुद्रेने पत्नीकडे पाहिले. आशापण खूश झाली. तिला सासुबाईंना, दीराला, जावेला, नणंदेला धडा शिकवायचा होता.
क्रमश:
मोबाइल – 9307521152 / 9422381299
अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मराठीकथा, मृत्यूपत्र, जमिनीची वाटणी, भावकी, भावांचा वाद, कोकणातील वाद, Will, land distribution, brotherhood, brothers’ dispute, dispute in Konkan, court notice


