सतीश बर्वे
मित्रासोबत त्याच्या वडिलांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यासाठी मुंबईमधील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये नंबर येण्याची वाट बघत होतो. अचानक पलिकडे दोन-तीन ओळी सोडून एका आरामदायी खुर्चीवर ती बसलेली दिसली… माझ्या मित्राने खांद्यावर हात ठेवून विचारले, “काय बघतोयस एवढा निरखून?” मी समोर हात करून त्याला खूण केली आणि आमच्या दोघांच्या तोंडून एकच नाव बाहेर पडले… “केतकी!”
आम्ही दोघांनीही एकमेकांकडे दचकून बघितलं… कारण रुमाल बांधून तिचं डोकं झाकलं होतं. क्षण दोन क्षण असेच गेले… तेवढ्यात कशी काय कोण जाणे, पण तिची अन् आमची नजरानजर झाली. तिने खुणेनेच आम्हाला बोलावलं. स्तंभित होऊन आम्ही तिच्याजवळ गेलो. तिने खुणेनेच आम्हाला शेजारच्या खुर्चीवर बसायला सांगितले. आम्ही काही बोलायच्या आत तिनेच बोलायला सुरुवात केली…
“कॉलेज संपल्यानंतर जवळपास 40 वर्षांनी भेटतोय आपण… दोघेही आहात तसेच आहात चेहऱ्याने! पण मला मात्र बदलायला लागलं… नियतीने फार मोठा आघात केला आहे माझ्यावर, ज्यामुळे मला असं डोकं झाकून बसायला लागतं. मला कॅन्सर झाला आहे, दुसऱ्या स्टेजचा आहे! दोन वर्षांपूर्वी अचानक हे कटू सत्य समोर आले आणि आमचं कुटुंब हादरून गेलं… माझे मिस्टर पायलट आहेत. मला दोन मुले आहेत. एकाचं लग्न झालंय. एक नोकरी सांभाळून पीएचडी करतोय. त्याच्यासाठी स्थळं बघतोय आम्ही! घरचं सगळं छान आणि सुरळीतपणे सुरू असताना अचानक हा हादरा बसला आमच्या कुटुंबाला…”
“मला या धक्क्यातून सावरायला खूप वेळ गेला. पण नंतर मी सावरले स्वतःच… कारण, नाहीतर घराची घडी विस्कटून गेली असती. कटू सत्य स्वीकारून उरलेले आयुष्य जमेल तेवढं आनंदाने जगायचं, असं मी मनाशी पक्कं केलं आहे आता! ऑपरेशननंतर अधूनमधून इथे केमोथेरपीसाठी यावं लागतं… आज धाकटा मुलगा घेऊन आला आहे. तो आमचा नंबर कितवा आहे, ते बघायला गेला आहे वरच्या मजल्यावर… आला की देते ओळख करून.”
“फुलपाखरू बनून कॉलजची सगळी वर्षे मनापासून बागडले मी… अभ्यासासोबत खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमात आणि स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपल्या कॉलेजसाठी कितीतरी बक्षिसे आणि ट्रॉफी मिळवून दिल्या… तुम्ही मुलांनी माझं ठेवलेलं फुलपाखरू नाव मी खरंच सर्वार्थाने सार्थक केले होते… खरंच किती रंगीबेरंगी दिवस होते ते!”
“पण आज मात्र माझ्या आयुष्याचे दिवसागणिक कोमेजत चाललेलं ‘फूल’ नियतीच्या निर्दयी आकाशात वास्तवाचे शक्तीहीन पंख फडफडत एक जखमी ‘पाखरू’ बनून उडण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे… पडण्याची भीती असून देखील! जगण्याचे सगळे हिशोब चुकत चालले आहेत. खुपदा प्रयत्न करते, मी हल्ली घरी बसल्या बसल्या हिशोब नव्याने लिहायचा… पण काही केल्या तो जुळत नाही! धाकट्याच्या लग्नात उसनं अवसान आणून मिरवायला तरी मिळू दे, अशी प्रार्थना देवाकडे करत असते मी रोज. तुम्ही देखील प्लीज माझ्यासाठी प्रार्थना करा…”
हेही वाचा – WITHOUT U…
केतकीला किती बोलू आणि किती नको, असं झालं होतं खरं म्हणजे. पण इतकं बोलूनच ती थकली होती.
“तू आता जरा शांत बस बघू, तुझा मुलगा येईस्तोवर…” एव्हाना आम्ही दोघेही केतकीच्या धक्क्यातून बऱ्यापैकी सावरलो होतो. एवढ्यात एक तरुण व्हीलचेअर घेऊन तिथे आला… “मी ओळख करून देते, हा माझा धाकटा मुलगा रोहन…” असं म्हणून केतकीने आमची रोहनशी ओळख करून दिली. रोहनने आम्हा दोघांबरोबर हस्तांदोलन केले आणि तो काय करतो ते थोडक्यात सांगितले. त्याने व्हिजिटिंग कार्ड दिले. ते हातात घेऊन मी म्हणालो, “पण आम्ही दोघे मात्र नुकतेच निवृत्त झालो आहोत.”
“आम्हाला निघायला हवं आता. आईचा नंबर येईलच दहा मिनिटांत… तुम्ही अचानक भेटून आईला किती आनंद झाला आहे हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. थोडा वेळ का होईना, पण तुम्ही तिचं मन त्याच त्याच विचारांपासून दूर नेलंत.. त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद…” रोहन हात जोडून विनम्रपणे म्हणाला आणि त्याने केतकीला हाताने आधार देत व्हीलचेअरमध्ये बसवले आणि ते दोघे लिफ्टच्या दिशेने जायला लागले…
हेही वाचा – बाप्पा… जगण्यासाठी पुरेसा!
आमचे दोघांचेही डोळे पाणावले होते. मी मित्राला म्हणालो, “लहानपणीची आवडती कविता आठवली बघ अचानक! पण आता यापुढे कधीच ती गुणगुणावीशी वाटणार नाही…”
“कुठची एवढी कविता आठवली तुला अचानक…” मित्राने विचारले.
त्याच्या खांद्यावर हात ठेवून मी म्हणालो,
“छान किती दिसते फुलपाखरू
या वेलींवर, फुलांबरोबर गोड किती हसते…”
मित्राने न बोलता मला थोपटले आणि आम्ही आमच्या जागेवर जायला वळलो…


