माधवी जोशी माहुलकर
सुलोचना ताईंना जाऊन दोन दिवस झाले होते. त्या गेल्या आणि पस्तीस वर्षांचा सहवास अचानक संपल्याने राजाभाऊ एकदम एकाकी पडले. संभ्रमित अवस्थेत त्यांना काय करावे आणि काय नाही, तेच समजत नव्हते; कारण आजपर्यंत सुलोचना ताईंनी घरातील प्रत्येक अडचणींवर स्वतः मात केली होती आणि राजाभाऊंच्या संसारात बिनतक्रार स्वतःला सामावून घेतले होते. कधीतरी बोलून दाखवलेल्या त्यांच्या इच्छा आज राजाभाऊंना आठवत होत्या… ज्याकडे राजाभाऊंनी कानाडोळा केला होता, काहीवेळा हसण्यावारी नेलं होतं…
राजाभाऊ नेहमी जसे हवे तसे निर्णय घेऊन जगले होते आणि प्रत्येकवेळी सुलोचना ताईंनी त्यांच्या कुठल्याही निर्णयाला हसून सहमती दिली होती. सुलोचना ताईंना माहीत होतं की, त्यांनी आपलं मत प्रदर्शित केलं तर ते राजाभाऊंना आवडणार नाही… “तुला काही समजत नाही,” असं म्हणून सरळ धुडकावून लावतील… वाद टाळण्यासाठी त्या राजाभाऊंच्या कुठल्याही निर्णयाला मान हलवून संमती द्यायच्या. कधी-कधी त्यांना राजाभाऊंचे वागणे पटायचे नाही, पण त्या काही बोलायच्या नाही. राजाभाऊंच्या पुढे एखादी छोटीशी इच्छा बोलायला मागेपुढे पाहायच्या, कारण राजाभाऊंच्या एककल्ली स्वभावामुळे आणि आपलेच निर्णय योग्य समजत असल्यामुळे सुलोचना ताईंचे बोलणे त्यांना गौण वाटायचे. संसाराचा गाडा सुलोचना ताईंनी असाच मन मारून रेटला होता अन् जातानासुद्धा राजाभाऊंशी काही न बोलता अचानक गेल्या होत्या… आता राजाभाऊंना तीच खंत लागून राहिली होती, पण वेळ निघून गेली होती. कितीही पश्चाताप केला तरी, सुलोचना ताई आता परत येणार नव्हत्या!
“दादा, आईला जाऊन उद्या तीन दिवस होतील, काय करायचं? पुढचे सगळे विधी चार दिवसांत आटोपायचे की, तेरा दिवसात करायचे? सुट्टी मिळायला प्रॉब्लेम येतोय… तेरा दिवस सलग सुट्टी नाही मिळणार कोणाला? तुम्ही म्हणाल तसं करू, पण तेरव्यापर्यंत नाही थांबता येणार. जॉइन होऊन आठ दिवसांनी परत येतो. चार दिवसांत सगळे कार्य आटोपले तर, आत्ता थांबता येईल…” दादांच्या खांद्यावर हात ठेवून सुमीत बोलत होता.
राजाभाऊंच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. आईच्या तेराव्यापर्यंत थांबायची मुलांची तयारी नव्हती… कसं होईल आपलं? आजपर्यंत सुलोचना होती तर, मला काळजीच नव्हती, तिनं कधी तशी वेळही येऊ दिली नाही! राजाभाऊ आपल्याच मनात विचार करत होते….
“दादा, मी काय म्हणतोय…,” सुमीतने त्यांना परत हटकलं.
“जे योग्य वाटेल ते सर्वांनी ठरवून करा, पण कमीत कमी तिचे तेरा दिवस तरी पूर्ण करावे, असं मला वाटतं… तिच्या काही इच्छा राहिल्या असतील तर…” राजाभाऊंचं बोलणे ऐकून तिथे जवळच बसलेली सुलोचना ताईंची बहीण प्रतिभा, राजाभाऊंना ऐकू येईल अशा आवाजात म्हणाली, “ती जिवंत असेपर्यंत कधी तिला तिच्या इच्छेबद्दल विचारले नाही आणि आता ती गेल्यावर त्या इच्छा पूर्ण करून काय ती परत येणार आहे का?” सगळ्यांच्या नजरा आपल्याकडे रोखल्या गेल्याचे लक्षात येताच प्रतिभा ताई परत बोलल्या, “खरं तेच बोलते आहे मी… कितीतरी वेळा सुलूताई माझ्याजवळ ही खंत व्यक्त करायची. भावजींच्या एककल्ली स्वभावामुळे तिने आपल्या इच्छांना, हौसेला मुरडच घातली होती, कारण हे कोणाचे ऐकायचेच नाहीत, नेहमी हे म्हणतील ती पूर्व दिशा! शेवटी सुलूताई काही न बोलताच गेली. मुलंही तशीच बापासारखी निर्विकार! आईला जाऊन दोन दिवस झाले नाहीत तर, यांची परतण्याची घाई सुरू झाली.”
“प्रतिभा चूप बस… वेळ काय, प्रसंग काय अन् तू बोलतेस काय? हे सर्व बोलायची आत्ता गरज नाही,” प्रतिभा ताईंच्या नवऱ्याने त्यांना कसेबसे चूप केले. सुलोचना ताईंच्या भावाने प्रतिभा ताईंना तिथून उठून आतमध्ये बसायला सांगितलं. सुमीत आणि अमितकडे एक जळजळीत कटाक्ष टाकून प्रतिभा ताई तिथून गेल्या. पाच मिनिटं तिथे शांतता पसरली. मावशीचे कडवे बोल ऐकून अमीत आणि सुमीतने तेरावे करायचा निर्णय घेतला.
राजाभाऊ मात्र उद्विग्न मनाने आतापर्यंत घडून गेलेल्या घटनांचा विचार करत होते. खरंच आपण सुलोचनाला कधी लक्षातच घेतलं नाही… तिलाही काही आपल्या मनाप्रमाणे व्हावे, असे वाटत असेल, पण कधी त्या गोष्टीचा विचारच केला नाही! आपण नेहमी आपल्याच विश्वात गुंग राहिलो. मित्र, नातेवाईकांनी आपल्याला मोठेपणा दिला, त्यातच धन्यता मानत गेलो… असे एक ना अनेक विचार राजाभाऊंच्या मनात यायला लागले. आता सुलोचना नसताना आपलं कसं होईल, या काळजीने त्यांना पोखरून टाकले होते… इथेही ते स्वतःचाच विचार जास्त करत होते. त्यांच्या अशा वागण्यामुळे मुलंपण हळूहळू त्यांच्यापासून दुरावली होती…
राजाभाऊंना माहीत होतं की, सुलोचना आपली रोजनिशी लिहायच्या… कधीतरी एखादी सुरेख कविता करायच्या… कथा लिहायच्या… पण राजाभाऊंनी कधी ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही; कारण मुळात त्यांना असल्या गोष्टी फालतू वाटायच्या. एक मात्र होतं की, या गोष्टींसाठी राजाभाऊंनी कधी सुलोचना ताईंची खिल्ली नव्हती उडवली. काय लिहायचंय ते लिही, पण मला मात्र वाचायला देऊ नको, असा त्यांचं म्हणणं असायचं. आज अचानक त्यांना त्या डायरीची आठवण आली न जाणो सुलोचनाने त्यात काही महत्त्वाचं लिहून ठेवलं असेल…! म्हणून ते डायरी शोधू लागले, पण ती डायरी काही त्यांना सापडली नाही.
“दादा, आई गेल्याचं सुनिधीला कळवलं आहे का?” अमित राजाभाऊंना विचारत होता.
“नाव काढू नको तिचं! इतक्या वर्षांत कधी संबंध ठेवले नाहीत तिने… आता ती इथे आल्यावर सुलोचना काय परत येणार आहे का?” राजाभाऊ अमितवरच कडाडले.
हेही वाचा – तोडली बंधने अन् सुटले भोग…
“पण तिला कळवायलाच हवं ना? तिचीही आईच होती नं ती?” सुमीतचाही तोच सूर.
तेवढ्यात प्रतिभा ताई मधे बोलल्या, “मला वाटलंच होतं की, तुम्ही कोणी तिला कळवणार नाही, म्हणून मीच तिला तुमच्याआधी कळवलं… येईल हो ती उद्या, मग बोला तिच्याशी’, क्षणभर थांबून प्रतिभा ताई म्हणाल्या, “काय एवढं वाईट केलं हो तिने? फक्त तुम्ही ठरवलेल्या मुलाशी लग्न केलं नाही, इतकंच ना? आयुष्यभर तिला जवळ केलं नाही आणि सुलू ताईला पण तिच्याशी संबंध ठेवू दिले नाहीत! अहो, आई होती तिची… किती अंतःकरणी दुखावली गेली असेल ती!” प्रतिभा ताई इतके बोलून स्फुंदून स्फुंदून रडू लागल्या. त्यांच्याकडे राजाभाऊ, अमीत आणि सुमीत अवाक् होऊन पाहात राहिले… पण एका अर्थी मावशीने आपले काम सोपे केले म्हणून अमीत आणि सुमीत मनोमन सुखावले होते.
सुनिधी त्या घरची एकुलती एक मुलगी… राजाभाऊंच्या शब्दापलीकडे कधीच गेली नाही. लग्नाचाच एकतर्फी निर्णय काय तो तिने त्यांच्या आज्ञेबाहेर जाऊन घेतला होता. त्यातही शेखरचे स्थळ राजाभाऊंनीच सुनिधीसाठी पसंत केले होतं. शेखर आणि सुनिधी देखील पहिल्याच क्षणात एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दोघांच्याही घरून पसंती होती. अगदी लग्नाची बोलणीसुद्धा होणार होती, पण तेवढ्यात सुनिधीसाठी शेखरपेक्षाही मातब्बर स्थळ चालून आले आणि त्यांचा सगळा रुबाब आणि तामझाम पाहून राजाभाऊंनी एक रात्रीत सुनिधीचे शेखरशी ठरलेले लग्न मोडण्याचा निश्चय केला. पण सुनिधीने माघार घेतली नाही, ती शेखरशी लग्न करण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम होती. घरातल्या बाकीच्या लोकांचाही तिला पाठींबा होता.
राजाभाऊंच्या विक्षिप्तपणाचे सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. पण राजाभाऊंना मात्र तो आपला अपमान वाटला, त्यांनी घेतलेल्या निर्णयाला पहिल्यांदा सुलोचना ताईंसकट सगळयांनी धुडकावून लावले होते. सुलोचनाताईंनी त्यांना नाना प्रकारे समजावून सांगितलं, पण ते आपल्याच मताशी ठाम होते. सुनिधीच्या लग्नातही त्रयस्थासारखे वागत होते, ही बाब शेखरच्या घरच्या लोकांच्याही लक्षात आली होती, पण हा निर्णय सुनिधी आणि शेखरचा असल्यामुळे सगळे गप्प होते.
त्यानंतर मात्र राजाभाऊंनी सुनिधीला माहेरी यायला मनाई केली. सुलोचना ताईंना या सगळ्या गोष्टींचा खूपच मनस्ताप झाला होता. एकीकडे त्यांचं मन सारखं सुनिधीकडे धावायचं आणि दुसरीकडे राजाभाऊ तिला भेटण्यास सगळयांना नकार देत होते. हे सगळं मनातले कढ सुलोचना ताई आपल्या बहिणीजवळ व्यक्त करायच्या…
तिसऱ्या दिवशी सगळी बंधन तोडून सुनिधी आपल्या आईच्या क्रिया-कर्माकरिता पोहोचली. सोबत शेखरही होता. सुनिधी आली तेव्हा सगळे तिला पाहून गलबलून गेले होते. ती आपल्या वडिलांजवळ न जाता आपल्या मावशीच्या कुशीत शिरली. आईची आणि आपली भेट होऊ शकली नाही, ही खंत ती वारंवार अमीत आणि सुमीतला बिलगून व्यक्त करू लागली.
या सर्व प्रकारात राजाभाऊंची परिस्थिती अत्यंत केविलवाणी झाली होती, पण तटस्थपणा मात्र तसाच होता! ‘मोडेन पण वाकणार नाही’ अशीच त्यांची वृत्ती होती. ते कायम स्वतःला योग्यच समजायचे. कोणाच्या सल्ल्याची त्यांना कधीच गरज भासली नव्हती. बायको म्हणून सुलोचना ताईंनी हे सगळं सहन केलं होतं, पण त्यांचा हा अगोचरपणा दिवसेंदिवस जसा वाढत गेला, तसे ते एकाकी पडले होते… हल्ली सुलोचना ताईंनी त्यांच्याशी बोलणं कमी केलं होतं, पण त्यांनी या गोष्टी कधीच लक्षात घेतल्या नाहीत. आताही सुनिधी इतक्या वर्षांनी घरी आल्यावरही त्यांना स्वतःहून तिला जवळ घ्यावेसे वाटले नाही की, तिची विचारपूसही करावीशी वाटली नाही. शेखर लग्नानंतर पहिल्यांदा सुनिधीच्या माहेरी आला होता, त्याला जावई म्हणून अपमानजनक वाटायला नको म्हणून शेवटी प्रतिभा ताईंचे मिस्टर पुढे आले आणि त्यांनीच त्याला अगत्याने घरात नेलं… शेखरलाही काही त्याची गरज वाटली नव्हती, पण तो त्या विचित्र परिस्थितीने भांबावला होता.
थोडंस वातावरण निवळल्यावर प्रतिभा ताईंनी सुनिधीला आईची काही एखादी राहिलेली इच्छा तुला ठाऊक आहे का, ते विचारले. तशी सुनिधी, “तसं काही कधी आई बोलल्याचं आठवत नाही,” म्हणाली. “पण तिची एक डायरी तिने मला दिली होती, ती मी सोबत आणली आहे,” असं प्रतिभा ताईंना तिनं सांगितलं. डायरी सुनिधीजवळ आहे हे अजूनपर्यंत राजाभाऊंना माहीत नव्हतं… ते आपले सुलोचनाची शेवटची काही इच्छा राहिली असेल का, म्हणून घरातच डायरी शोधत होते.
सुलोचनाताईंना जाऊन एव्हाना चार दिवस झाले होते. त्यांचे त्या तेरा दिवसातले विधी सुरू झाले होते, पण त्यातल्या एक दिवशी चमत्कार झाला… घाटावर पिंडदानाचे विधी सुरू असताना काही केल्या पिंडाला कावळा शिवेना! पिंडाच्या वर उडायचा, पण खाली येऊन पिंडाला स्पर्श करत नव्हता. गुरुजींसकट सगळे हैराण झाले. राजाभाऊंना सुलोचना ताईंची काही अंतिम इच्छा राहिली का, ते विचारण्यात आलं. पण, तसलं काही त्यांना आठवत नव्हतं. शेवटी दर्भाचा कावळा करुन पिंडदान करायचं ठरलं…
त्याआधी सुमीत राजाभाऊंना म्हणाला, “दादा, सुनिधीला काही माहीत असेल का? तिला विचारलं तर बरं होईल.” राजाभाऊंना आणि इतरही उपस्थिती लोकांना ते पटलं, सुमीत घरी जाऊन सुनिधीला घाटावर घेऊन आला. घरून येताना सुमीतने सुनिधीला घाटावर काय घडले ते सांगितलं… तिथे गेल्यावर गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सुनिधीने पिंडाला नमस्कार करून मनात म्हटलं की, “आई, आपली शेवटची भेट झाली नाही, पण मला माहिती आहे की, तुझी अंतिम इच्छा काय असणार आहे… तू मला दिलेली तुझी डायरी मी वाचली आहे. दादांबद्दल आम्ही कोणीही मनामधे राग ठेवणार नाही, त्यांना कधीच अंतर देणार नाही… मी, अमीत आणि सुमीत आम्ही तिघेही आमच्या कर्तव्याला चुकणार नाही…”
हे ती डोळे बंद करून मनात म्हणत असतानाच कोणीतरी ओरडलं, “अरे, शिवला… पिंडाला कावळा शिवला…”
सुनिधीने डोळे उघडून पाहिलं तर खरंच पिंडाला कावळा शिवला होता… सगळयांनी निःश्वास सोडला आणि त्यांच्या नजरा उत्सुकतेने सुनिधीकडे वळल्या… अगदी राजाभाऊ सुद्धा डोळ्यांत पाणी येऊन तिच्याकडे पाहात होते. घरी गेल्यावर सगळं सांगते म्हणून सुनिधी तिथून निघून गेली.
हेही वाचा – नागपूरची प्रसिद्ध काळी पिवळी मारबत!
त्या दिवशी दुपारी सुनिधीने सगळे बसले असताना सुलोचना ताईंची डायरी आणली आणि राजाभाऊंकडे पाहात म्हणाली, “दादा, तुम्ही जरी मला घरी यायला मनाई केली होती तरी, आई आणि मी तुम्हाला नकळत महिन्यातून दोनदा बाजाराच्या निमित्ताने गणपती मंदिरात भेटायचो. तिची घालमेल तुम्हाला कधीच समजली नाही… आईची ही डायरी तुम्ही घरात शोधत होता म्हणे? पण माझ्या आणि तिच्या शेवटच्या भेटीत तिने मला ही डायरी देऊन सांगितलं होतं, ही डायरी वेळ मिळाला तर, कधीतरी वाचशील म्हणून. मला वाटलं तिच्या कथा, कविता असतील म्हणून मी ती ठेवून दिली होती बाजूला… पण जेव्हा आई गेल्याचा निरोप आला आणि काल मावशीने मला तिच्या शेवटच्या इच्छेबद्दल विचारलं तेव्हा मी ही डायरी उघडून पाहिली आणि त्याच्या शेवटच्या पानावर आईने तुमच्याबद्दल तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या, त्या नजरेस पडल्या…”
“कदाचित, तिला काहीतरी जाणीव झाली असावी. ऐका दादा तिचं शेवटचं म्हणणं काय होतं… तिनं लिहिलं आहे की, ‘तुमचे दादा जरा विक्षिप्त आहेत, एककल्ली आहेत. त्यांच्था वागण्याचा कधीकधी सगळयांनाच त्रास होतो, पण याचा अर्थ असा नाही की, ते मनाने वाईट आहेत. ते जीवन त्यांचं होतं, त्यांना पाहिजे तसं जगले! पण कोणाला त्यांनी आपल्या निर्णयात सामील करून घेतलं नाही. ते स्वतःला नेहमी योग्यच समजायचे. त्यांच्या या एककल्ली स्वभावामुळे सगळे तुम्ही दुरावले गेले… पण ते असं का वागले असावे, याचा मी विचार केला तर, त्याला कारण त्यांचं बालपण असावं, जे त्यांनी आपल्या काका-काकूंकडे घालवलं. आई-वडिलांची मायाच त्यांना मिळाली नसावी… नेहमी दुसऱ्यांचं ऐकणं, हेच त्यांना माहीत असावं. म्हणून जाणते-सवरते झाल्यावर ते सगळे निर्णय स्वतःच कोणाला न विचारता घेत गेले आणि त्या वेळेस त्यांनी जे निर्णय घेतले, ते योग्यच ठरले. स्वतःच्या शिकून-सवरुन नोकरीत मोठ्या पदावर पोहोचले… मोठेपणा, मानमरातब त्यांनी स्वकतृत्वावर मिळवला… त्यामुळे त्यांचे सगळ्या नातेवाईकांमध्ये, मित्र परिवारात वजन वाढले होते. या सगळ्या परिस्थितीमुळे ते एककल्ली होत गेले असावे. हळूहळू तो त्यांचा स्वभाव बनला आणि पुढे तो त्यांनी तसाच ठेवला. आज जरी तुम्ही त्यांच्यापासून दुरावले आहात तरी, मी सांगून ठेवते, पुढेमागे त्यांच्याआधी माझे जर का बरेवाईट झालं तर, तुमच्यापैकी कोणीही त्यांना अंतर देणार नाही. ते मनाने खूप चांगले आहेत. एका स्वभावदोषामुळे तुम्ही कोणीही त्यांच्याशी गैरव्यवहार करणार नाहीत, अशी मला खात्री आहे. माझे संस्कार वाया जायचे नाहीत…”
एवढं वाचून सुनिधी थांबली… तिचे डोळे पाण्याने डबडबले होते… राजाभाऊ उठून तिच्यापाशी आले अन् तिला जवळ घेऊन ओक्साबोक्शी रडू लागले, “पोरी मला माफ कर, तुझी आई खुप मोठ्या मनाची होती. आयुष्यभर मी तिला किंमत दिली नाही, कधी तिच्या आवडी-निवडी जोपासल्या नाहीत, पण ती मात्र न बोलता मला साथ देत राहिली… माझ्या मनाचा सतत विचार करत होती… जातानासुद्धा मला आपल्या ऋणात बांधून गेली. मला माफ कर… माझ्या एका निर्णयाने आज किती मोठा घात झाला, आयुष्यभर या मायलेकींना मी जवळ येऊ दिलं नाही, स्वतःचा अहंकार मला नडला… कपाळकरंटा आहे मी….!”
राजाभाऊ रडत होते, तिथे असलेल्या सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी होते… सुलोचना ताईंची शेवटची इच्छा पूर्ण झाली होती. पोरांनी दादासाहेबांना घट्ट मिठी मारली होती… सुनिधीला तिचं माहेर परत मिळालं होतं आणि फोटोतून सुलोचना ताईंच्या चेहऱ्यावर स्मित पसरले होते.
प्रतिभा ताई फोटोवरचा हार सरळ करताना म्हणाल्या, “हेच चित्र जर सुलू ताईला जिवंत असताना पाहायला मिळालं असतं तर तिला किती आनंद झाला असता!” ते ऐकून राजाभाऊ स्वतःला सावरत बोलले, “आता मी मात्र तिच्या इच्छेप्रमाणे करणार… मी तुला वचन देतो सुलोचना मी स्वतःमध्ये बदल घडवणार… मी मुलांना कधीच अंतर देणार नाही, काहीही झालं तरी!” राजाभाऊंचं हे वाक्य पूर्ण होते न होते तोच थंड वाऱ्याची एक झुळूक सगळ्यांनाच जाणवली, प्रतिभाताईंनी फोटोवरचा सरळ केलेला हार परत खाली सरकला. त्यासरशी तिथे बसलेले कोणीतरी म्हणाले, “आज तिची इच्छा पूर्ण झाली, तिला खऱ्या अर्थाने मोक्ष मिळाला.”
टचकन पाणी आले डोळ्यात सुलोचना बाई ना सद्गति मिळाली,त्यांची इच्छा पूर्ण झाली
अतिशय सुरेख लेखन आहे आणि कथाही अतिशय सुरेख आहे स्त्रियांच्या मनाच्या जवळची कथा आहे.