पराग गोडबोले
अगदी मागच्याच आठवड्यातली गोष्ट. ठाणे स्थानक ते ऑफिसचा प्रवास, नेहमीचाच… शिस्तीत पुढे सरकणाऱ्या रांगेचा मी एक भाग… पाऊस जास्त नव्हता, तरी सगळं ओलं-चिप्पं वातावरण. आजूबाजूला विविधरंगी छत्र्या आणि रेनकोटसचा कोलाहल… जवळजवळ दहा मिनिटांनी रिक्षा मिळाली. गांधी टोपी घातलेला पोरगेलेसा मराठी चालक होता. खूप बरं वाटलं. मीटर टाकून झोकात निघालो आम्ही ऑफिसच्या दिशेने, रस्त्यावरची पाण्याची थारोळी आणि खड्ड्यांची मालिका चुकवत…
थोडं पुढे गेल्यावर चालकाचा फोन वाजला. त्याने रिक्षा रस्त्याच्या कडेला घेतली आणि फोन उचलून बोलू लागला… “आत्ता कसे पैसे पाठवू? पहिलंच भाडं मारतोय आजचं!… थोडा धंदा झाला की पाठवतो…”
समोरची व्यक्ती बहुदा काकुळतीला आली असावी, असं एकंदर संभाषणावरून जाणवत होतं. फोन ठेवला आणि आणि रिक्षा परत मार्गाला लागली. दोन मिनिटं गेली आणि परत एकदा फोन वाजला. काहीतरी बाचाबाची झाली आणि वैतागून त्याने फोन ठेवला.
“गावाहून आईचा फोन होता… औषधं आणायची आहेत वडिलांसाठी, लगेच हजार रुपये पाठव म्हणत होती… आता एवढ्या सकाळी कुठून आणू पैसे? हजार रुपये काय कमी आहेत का, साहेब? तुम्हीच सांगा…,” तो सांगत होता.
मी थोडी सहानुभूती दाखवली, पण तेव्हा नाही कळलं की, ती आपल्याच अंगाशी येईल म्हणून!
परत एकदा फोन वाजला, पण त्याने घेतलाच नाही तो. ‘बंदच करून टाकतो,’ म्हणत फोन silent केला. तगमग होत होती त्याच्या जीवाची, पण इलाजच नव्हता बहुदा त्याच्याकडे दुसरा!
खड्डे चुकवत, सिग्नल पार करत आम्ही एकदाचे पोहोचलो माझ्या ऑफिसजवळ. G-pay वगैरे पर्याय त्याच्याकडे नसतीलच, असा माझा होरा होता, पण तो चुकीचा ठरला. “माझ्याकडे G-pay आहे,” म्हणाला. मला QR code देण्यासाठी त्याने फोन काढला आणि म्हणाला, “बघा दहा missed calls आहेत आईचे!” मी code scan केला, पैसे दिले आणि उतरलो.
हेही वाचा – परोपकार
मी निघालो, इतक्यात त्याची हाक ऐकू आली… “साहेब…”
मी थांबलो… तो म्हणाला, “साहेब एक हजार रुपयांची सोय होऊ शकेल का? विचारणार नव्हतो, पण खरंच नड आहे हो. संध्याकाळी परत करतो काहीही करून!”
हे असे पैसे मागणारे धर्मसंकटात टाकतात. परिचित लोकांना दिलेले आपलेच पैसे परत मागताना, आपणच अपराध करतो आहोत की काय, असं वाटत राहतं. बऱ्याचदा, उसन्या दिलेल्या रकमेवर तुळशीपत्र ठेवावं लागतं. इथे तर पूर्णपणे अपरिचित मनुष्य पैसे मागतोय!
मी झटक्यात, ‘नाही’ म्हणून निघणार होतो, पण कर्णच अवतरला होता जणू माझ्यात… हजार रुपयेच मागत होता कवचकुंडलं नव्हता मागत, म्हणून मन द्रवलं आणि मी हजार रुपये G-pay केले त्याला. त्याचा चेहेरा खुलला आणि ‘पैसे नक्की परत करतो,’ म्हणत तो निघून गेला. जाताना माझा नंबर घेऊन, त्याचा देऊन गेला.
मी मग कामात व्यग्र झालो आणि तो हजार रुपयांचा विषयच बाद झाला डोक्यातून. दुपारी चहा घेताना एकदा आठवण झाली, पण ती तेवढ्यापुरतीच… निघायची वेळ झाली आणि मला परतीची रिक्षा पकडताना सकाळचा प्रसंग आणि संध्याकाळचा वायदा उगाचच आठवून गेला… हजार रुपये अक्कलखाती जमा होणार होते बहुतेक! पैसे नव्हतेच आले परत. बऱ्याच अनुभवांमध्ये, बऱ्याच तुळशीपत्रांमध्ये हे आणखी एक, असं म्हणत मी तो विचारच झटकून टाकला, जळमटासारखा.
रात्री जेवण झाल्यावर, बायकोला तो प्रसंग सांगितला आणि ‘जित्याची खोड’ एवढे दोनच शब्द उच्चारून, मला शालजोडीतला देऊन, ती मोकळी झाली.
साधारण रात्री दहाच्या सुमारास फोन वाजला. अपरिचित नंबर… घेऊ का न घेऊ… हा विचार करत असतानाच बंद झाला. दोन मिनिटांनी पुन्हा वाजला आणि मी काहीशा अनिच्छेनेच फोन उचलला…
“साहेब मी बोलतोय, सकाळी तुमच्याकडून हजार रुपये घेतले होते मी. संध्याकाळचा वायदा होता, नाही देऊ शकलो म्हणून माफी मागायला फोन केला. जबान होती माझी साहेब!”
मी म्हणालो, “असू दे रे, तुला जमेल तेव्हा कर परत.”
“नाही केलेस तरी हरकत नाही हो, लागले तर परत माग. आमचे सदाशिव देतील तुला…” बायकोचं पार्श्वसंगीत!
“उद्याला नक्की देतो, काळजी नका करू साहेब…,” तो म्हणाला. नशिबाने, हजार रुपये नाही मिळाले तर, काळजी करण्याइतकी काही माझी परिस्थिति वाईट नव्हती, पण त्याचा प्रामाणिक स्वर भिडला मनाला आणि मी फोन ठेवला. आता उत्सुकता होती मला, दुसऱ्या दिवशी काय होईल याची!
हेही वाचा – मी, लेक, बायको आणि कुकर!
दुसरा दिवस संपत आला आणि त्याबरोबर पैशांची आशा सुद्धा. अगदी निघताना फोन वाजला… त्याचाच होता. ‘असेल परत नवा वायदा,’ म्हणत मी फोन घेतला.
“साहेब, तुमच्या ऑफिसच्या बाहेर उभा आहे रिक्षा घेऊन. तुम्ही येईपर्यंत थांबतोय, या तुम्ही तुमची वेळ झाली की…”
मी निघालो आणि तो दिसला. मला बघताच झटकन् रिक्षा सुरू करून समोर आला आणि म्हणाला, “बसा साहेब!”
स्टेशनच्या दिशेने आम्ही निघालो आणि गावदेवी मंदिरापाशी पोहोचल्यावर, रिक्षा कडेला घेऊन पाचशेच्या दोन नोटा समोर धरून म्हणाला, “घ्या साहेब… तुम्हाला उशीर होणार नसेल तर कटिंग आणतो…” म्हणत, परवानगीची वाट न बघता धावला तो आणि दोन कटिंग चहाचे ग्लास सावरत आला.
चहा झाला आणि मी मीटरकडे बघितलं. सत्तर रुपये दाखवत होते. मी फोन काढला, तेवढ्यात तो म्हणाला, “आजची सवारी माझ्याकडे. मी आजचे पैसे नाही घेणार तुमच्याकडून!”
काय बोलावं हेच सुचेना मला. हे अगदीच अनपेक्षित होतं. सुखमय…
“माझा नंबर आहे तुमच्याकडे… गरज लागली तर फोन करा, गाडीवर असलो तर नक्की येईन तुम्हाला घ्यायला,” असं म्हणत, नमस्कार करत, हसतमुखाने निघून गेला.
‘माणसं अशीही असतात,’ असा दिलासादायक विचार करत मी गाडी पकडायला पळालो.
अनेक तुळशीपत्रांमधलं एक तुळशीपत्र आपसूक कमी झालं झालं होतं, जगण्याकडे बघायचा एक नवा दृष्टीकोन देऊन!!