प्रदीप केळूस्कर
भाग 2
वाचकांना मी या कथेचा शेवट काय असावा.. याबद्दल आपली मते कळवायला सांगितले होते. त्याचा उद्देश म्हणजे, वाचकांनीपण कथा लिहिण्याच्या प्रक्रियेत सहभाग घ्यावा… मला आनंद होतो की, या कथेचा शेवट करण्यासाठी चांगली चर्चा झाली. आपण मंडळी काय लिहिणार याचा थोडाफार अंदाज होताच.. तसेच झाले.
एकंदरीत सध्याची तरुण पिढी परदेशात गेली किंवा त्यांनी आपले संसार थाटले की, आपल्या पालकांना विसरतात, याचे सर्वांना दुःख आहे. त्यामुळे ‘कंडक्टर आणि त्याच्या बायकोने मुलांच्या मदतीला मुळीच जाऊ नये…,’ असे म्हणणारे अनेक आहेत. तर, ‘मुले अशी वागली तरी, त्याना त्यांच्या चुकांची जाणीव करून द्यावी; पण नातवाच्या किंवा नातीच्या जन्मावेळी आणि मुलांना गरज आहे म्हणून जावे…’ असे मतही काहींनी मांडले, पण ही संख्या थोडी आहे. हे दोन्ही विचार विचारात घेऊन मी या कथेचा पुढील भाग लिहित आहे.
वसंत यांनतर एक शब्दही बोलला नाही…. तो रागाने धुमसत होता. त्याच्या पत्नीने घरातील आवरले, भांडी घासली आणि न जेवता तिने चटई घातली.
“काय जेवणास नाय?”
वसुधा न बोलता हुंदके देऊ लागली…
“तू कशाक रडतंस? तुका जावचा आसा काय? तर जा…”
“तसा नाय… पण आपली मुला चुकली, म्हणून तेंका इतकी शिक्षा करतत?”
“मग काय करू? ओवाळू तेंका?”
“तुमी झिलाक फोन लावा आणि विचारा, सातव्या महिन्यात आमका कळवतास! आधी कळवूक काय झाल्ला? आमी कसे येतलव? तुझी आई एकटी कशी येत? तेका विचारा… पण गप्प रवान चलाचा नाय.. जास्त दिवस नाय आसत…”
हेही वाचा – कंडक्टरचं गणित…!
वसंत उठून बाहेर गेला आणि अंगणात फेऱ्या मारू लागला. त्याचा राग अनावर होत होता. पण आपल्या मुलाला आणि सुनेला यावेळी आपली गरज आहे, हे पण त्याला पटत होते. अंगणात फिरता फिरता त्याचा मोबाइल वाजला… त्याने पाहिले त्याच्या मुलाच्या म्हणजे अजितच्या सासूचा फोन होता. एकदा त्याच्या मनात आले, हिचा फोन घेऊ नये… पण तरी त्याने तो घेतला…
“हॅल्लो.. अजितचे बाबा काय?”
“होय.. मीच.”
“हां… तुम्हाला अजितचा फोन आला असेलच?”
“मग? माजो झील तो… माका फोन करतालोच…”
“तसं नव्हे बाबा… तुमचा मुलगा तुम्हाला फोन करणारच, पण यावेळचा मुद्दाम फोन…”
“मुद्दाम फोन? हा… हा… तेची आई म्हणा होती.. अमेरिकेत मोलकरणी खूप महाग, म्हणून तो आईक बोलवता… अमेरिकेतील मोलकरणीच्या निम्मे पैसे देन म्हणता… पण काय आसा, आमी गरीब आसवं… म्हणजे मी कंडक्टर! माजो पगार आसन असान किती आसतलो? पण माझ्या पगारात आमचा भागता… म्हणजे माझ्या झिलाचा शिक्षण पण मी या पगारातून केलंय… मग हेच पैसे होये कोणाक?”
“तसं नाय बाबा, अहो तुम्ही अजितचे बाबा… अजित आपल्या आईला ये म्हणतोय… हे मोलकरणीचं कसं आलं तुमच्या डोक्यात?”
“काय आसा सुवर्णाचे आई, माज्या सुनेची आई तू… मी जरी दहावी नापास कंडक्टर आसलंय तरी या नोकरीत पस्तीस वर्षा काढलंय… माजा गणित पक्का झाला… जर तेका बायकोच्या बाळंतपनाक आई होई होती तर, तेना दुसऱ्या नायतर तिसऱ्या महिन्यांत कळवला आसता… पण तेना कळवला सातव्या महिन्यात! आणि ता कित्या… तुमी लेकीच्या बाळंतपनाक जाऊ शकणा नाय म्हणून!! नायतर आमका आमच्या नातवंडाचे पेढेच पाठवले असते…”
“काय म्हणता? तुम्हाला सुवर्णाने किंवा अजितने कळवले नाही? पण आम्हाला केव्हाच…”
“तुमका केव्हाच माहीत होता, बरोबर? माझ्या झिलान, सुनेनं आमका कळवक नाय… कारण आमी तेचे दुष्मन…!”
“नाही, नाही… आई वडील दुष्मन कसे होतील? हे चुकले आहे अजितचे आणि सुवर्णाचे!”
सुवर्णाच्या आईने घाईने फोन ठेवला.
वसंतला बरे वाटले, सुवर्णच्या आईला थोडे सुनावले… आपल्या मुलाला आपल्यापासून लांब करायला हीच बाई कारणीभूत आहे! अशाच आया आपल्या मुलीच्या घरी भांडणे लावतात…
हेही वाचा – एका संपाची कहाणी
वसंतचा अंदाज खरा ठरला… एका तासात त्यांच्या सुनेचा, सुवर्णाचा फोन आला…
“बाबा, अजितने आईंना फोन केलेला.. तुम्हाला कळले असेल… तुम्ही आजोबा होणार!”
“होय कळले.. पण हे पाच महिन्यांपूर्वी कळले असते तर जास्त आनंद झाला असता…”
“चुकले आमचे… राग मानू नका…”
“राग मानू नको, मग काय करू? माजा नातवंड येतला या जगात आणि माका सातव्या महिन्यात समजता… मग तुज्या आईक दुसऱ्या महिन्यांत कसा कळला? सावंतवाडीचे फोन बंद झाले की काय? आता आई येउव शकणार नाय… म्हणून तुका सासू होई झाली? कोणीतरी कामाक होया… अमेरिकेत मोलकरीण महाग म्हणून सावंतवाडीसून मोलकरीण मागवल्यानं माझ्या झिलान! पण तेका सांग, त्या सावंतवाडीच्या मोलकरणीचो घोव आसा गरीब कंडक्टर… पण स्वाभिमानी आसा.. तो तसो मोलकरीक धाडूचो नाय!”
“बाबा, काय हे? कोण मोलकरीण? अहो माझी सासू ना ती… अजितची आई?”
“होय काय? मग तेका सातव्या महिन्यात कळवलात आणि तुज्या आईक दुसऱ्या महिन्यात… कारण तुका तुज्या बाळंतपणाक आईक अमेरिकेक बोलवचा होता, सासूक न्हय.. पण आता पंचाईत झाली… तुज्या आईचा ऑपरेशन मधी इला. डॉक्टरनी सहा महिने खय जायचा नाय म्हणून सांगितलं… मग बाळंतपनाक सोबत कोण? मग सासूक मागवा, ती हक्काची… तिका नातवंडाचा प्रेम… म्हणून ती धावत येतली… बरोबर?”
सुवर्णा रडू लागली…
‘बाबा, चुकले माझे… मीच अजितला सांगितले, ‘माझ्या आईची अमेरिकेला यायची इच्छा आहे. त्यामुळे एवढ्यात तुझ्या आईबाबांना कळवू नकोस… मग कळवू!’ बाबा, यात माझी चूक झाली… अजितची नाही…”
वसंतने फोन बंद केला… आपला नवरा अंगणातून कुणाशी बोलतोय, हे पाहण्यासाठी बाहेर आलेल्या त्याच्या बायकोने त्त्यांचे सर्व बोलणे ऐकलं.
वसंत आणि वसुधा घरात आली. वसुधा चटईवर पहुडली, पण तिच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते… तिच्या डोळयांसमोर तिची सून आणि नातवंड येत होती… नातवंड जोराने रडत होतं आणि त्याला घ्यायला कुणी नव्हतं… तिला वाटतं होतं, यावेळी आपण असायला हवं होतं तिथं… आपण असतो तर बाळाला उचलून घेतलं असतं… झोपेत तिला बाळ दिसत राहिले…
सकाळी सकाळी अजितचा बाबांना फोन आला… “बाबा.. माजी चूक झाली. चूक पोटात घाला… कसाही करूक आईक इकडे पाठवा…”
‘दुसरा कोण तुका मिलना नाय काय? बघ, विचार सासूक.. ती करीत व्यवस्था…”
“नाय हो बाबा… माका आईच येऊक होई, आई इली म्हणजे काळजी नाय… नायतर या देशात मुलाक जन्म देना कठीण!”
“आई होई म्हणतास? मग आई एकटी कशी येतली? तिना कधी एकटो प्रवास केल्लो? कुडाळाक जावचा तर तिका सोबत लागता…”
“होय.. ह्या माज्या लक्षातच नाय इला. बाबा, तुमी पण येवा इकडे… तुमका पण थोडो बदल…”
“तू येऊन आईक घेऊन जा…”
“नायहो बाबा, माका शक्य नाय… मुलं जन्माक इला काय माका रजा घेऊची लागतली… तुमीच येवा दोघा. अमेरिका बघा… उद्याच जाऊन पासपोर्ट काढा पणजीक जाऊन. पंधरा दिवसात मिळतलो. मग मी इकडून तिकिटा पाठवतंय…”
“अजूनही बघ.. तुज्या सासुरवाडीसून कोण येता काय…”
“नाही हो बाबा. परत सांगतंय… माजी चूक झाली… एकवेळ माका क्षमा करा.”
“तुझाच नाय बाबा… हल्ली सगळीच मुला मोठी होतात… नोकरीक लागतात आणि लग्न झाला काय आपल्या जन्मदात्याक विसरतात… मग ते म्हातारे वाट बघित रवतात… पूर्वी एक नाटक इल्ला ‘संध्या छाया’ म्हातारे म्हातारी आपल्या पाखराची वाट बघत रवतात रे… आणि त्याच पाखरांनी दिशा बदलली तर… तुमका आता नाय कळाचा, वय झाला की कळतला…”
“बाबा, माका कळली माझी चूक. आता परत असा व्हायचा नाय…”
दुसऱ्या दिवशी वसंत आणि वसुधाने पासपोर्टसाठी अर्ज दाखल केला. वीस दिवसांत दोघांना पासपोर्ट मिळाले. मग अजितने दोघांची तिकिटे पाठवली. वसंत आणि वसुधा पहिल्यांदाच विमानात बसले… दोघे व्यवस्थित पोहोचले. सुवर्णाला मुलगी झाली. वसंत आणि वसुधाला खूप आनंद झाला. अजितने सुट्टीत आई-बाबांना अमेरिका दाखवली…
मोबाइल – 9307521152 / 9422381299