Sunday, September 21, 2025

banner 468x60

Homeअध्यात्मDnyaneshwari : देवा तुवांचि ऐसें बोलावें, तरी आम्हीं नेणतीं काय करावें…

Dnyaneshwari : देवा तुवांचि ऐसें बोलावें, तरी आम्हीं नेणतीं काय करावें…

 

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.

अध्याय तिसरा

अर्जुन उवाच : ज्यायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन ।
तत् किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ॥1॥

मग आइका अर्जुनें म्हणितलें । देवा तुम्हीं जें वाक्य बोलिलें । तें निकें म्यां परिसलें । कमळापती ॥1॥ तेथ कर्म आणि कर्ता । उरेचिना पाहतां । ऐसें मत तुझें अनंता । निश्चित जरी ॥2॥ तरी मातें केवी हरी । म्हणसी पार्था संग्रामु करीं । इये लाजसीना महाघोरीं । कर्मीं सुता ॥3॥ हां गा कर्म तूंचि अशेष । निराकारासी निःशेष । तरी मजकरवीं हें हिंसक । कां करविसी तूं ॥4॥ तरीं हेंचि विचारीं हृषीकेशा । तूं मानु देसी कर्मलेशा । आणि येसणी हे हिंसा । करवीत अहासी ॥5॥

व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे ।
तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम् ॥2॥

देवा तुवांचि ऐसें बोलावें । तरी आम्हीं नेणतीं काय करावें । आता संपले म्हणे पां आघवें । विवेकाचे ॥6॥ हां गा उपदेशु जरी ऐसा । तरी अपभ्रंशु तो कैसा । आतां पुरला आम्हां धिंवसा । आत्मबोधाचा ॥7॥ वैद्यु पथ्य वारूनि जाये । मग जरी आपणचि विष सुये । तरी रोगिया कैसेनि जिये । सांगे मज ॥8॥ जैसें आंधळे सुईजे आव्हांटा । कां माजवण दीजे मर्कटा । तैसा उपदेशु हा गोमटा । वोढवला आम्हां ॥9॥ मी आधींचि कांही नेणें । वरी कवळिलों मोहें येणें । कृष्णा विवेकु या कारणें । पुसिला तुज ॥10॥ तंव तुझी एकेकी नवाई । एथ उपदेशामाजीं गांवाई । तरी अनुसरलिया काई । ऐसें कीजे ॥11॥ आम्हीं तनुमनुजीवें । तुझिया बोला वोटंगावें । आणि तुवांचि ऐसें करावें । तरी सरलें म्हणे ॥12॥ आतां ऐसियापरी बोधिसी । तरी निकें आम्हां करिसी । एथ ज्ञानाची आस कायसी । अर्जुन म्हणे ॥13॥ तरी ये जाणिवेचें कीर सरलें । परी आणिक एक असें जाहलें । जें थितें हें डहुळलें । मानस माझें ॥14॥ तेवींचि कृष्णा हें तुझें । चरित्र कांहीं नेणिजे । जरी चित्त पाहसी माझें । येणे मिषें ॥15॥

हेही वाचा – Dnyaneshwari :  …परी न्यून नव्हे पार्था, समुद्रु जैसा

अर्थ

अर्जुन म्हणाला, ‘ हे श्रीकृष्णा! कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, असे तुझे मत आहे. तरीही, केशवा, घोर कर्माच्या ठिकाणी तू माझी योजना का करत आहेस?’ ॥1॥

मग अर्जुन म्हणाला, श्रीकृष्णा ऐका. देवा, तुम्ही जे काही बोललात ते, हे कमलापती, मी चांगले ऐकले. ॥1॥ श्रीअनंता, तुमच्या मागील व्याख्यानाचा विचार करून पाहिला असता, त्या ठिकाणी कर्म आणि त्याचा कर्ता हे उरतच नाहीत आणि हेच जर तुझे मत निश्चित असेल ॥2॥ तर मग श्रीकृष्णा ‘अर्जुना, तू युद्ध कर,’ असे मला कसे सांगतोस? या मोठ्या घोर कर्मामध्ये मला घालताना तुला काही लाज वाटत नाही काय? ॥3॥ अरे, तूच जर सर्व कर्मांचा पूर्ण निषेध करतोस तर, मग हे हिंसात्मक कृत्य माझ्याकडून तू का करवितोस? ॥4॥ तर हृषिकेशा, याचा तू विचार करून पहा की, तू कर्माला मान देतोस (आणि) माझ्याकडून ही एवढी मोठी हिंसा करवीत आहेस. (याचा मेळ कसा घालावा?) ॥5॥

घोटाळ्याच्या दिसणाऱ्या (या) भाषणाने तू माझ्या बुद्धीला मोह पाडल्यासारखे करीत आहेस. तर ज्याच्या योगाने मला हित प्राप्त होईल, असे एक निश्चित करून सांग. ॥2॥

श्रीकृष्णा, तूच असे असंबद्ध बोलू लागलास तर मग आमच्यासारख्या अजाण माणसांनी काय करावे? आता सारासार विचार जगातून पार नाहीसा झाला, असे म्हणेनास! ॥6॥ अरे, याला जर उपदेश म्हणावयाचे तर मग भ्रम उत्पन्न करणारे भाषण याहून वेगळे ते काय राहिले? आता आमची आत्मबोधाची इच्छा चांगलीच पुरली म्हणावयाची! ॥7॥ वैद्याने प्रथम रोग्याने काय खावे आणि काय खाऊ नये, हे सांगून गेल्यावर, मग त्यानेच जर रोग्यास विष दिले तर, तो रोगी कसा वाचावा? हे मला सांग बरे. ॥8॥ आंधळ्याला जसे आशामार्गात घालावे किंवा आधीच माकड आणि त्यात त्याला मादक पदार्थ पाजावा, त्याप्रमाणे तुझा हा उपदेश आम्हाला फार चांगला लाभला आहे. ॥9॥  मला अगोदरच काही समजत नाही, त्यात या भ्रमाने मला घेरले आहे. म्हणून कृष्णा, तुला सारासार विचार पुसला. ॥10॥ पण तुझे एकेक पहावे ते सर्वच आश्चर्य! इकडे उपदेश करतोस आणि त्यात घोटाळ्यात घालतोस. तर तुझ्या उपदेशप्रमाणे चालणाऱ्यांशी तू असे वागावेस का? ॥11॥ आम्ही शरीराने, मनाने आणि जीवाने तुझ्या शब्दावर अवलंबून राहावे आणि तूच असे (भलतेच) करावेस तर मग सर्व कारभार आटोपला म्हणावयाचा. ॥12॥ आता याप्रमाणेच जर तू उपदेश करणार असशील, तर मग आमचे चांगलेच कल्याण करतोस म्हणावयाचे! अर्जुन म्हणाला, आता येथे ज्ञान मिळाण्याची आशा कशाची? ॥13॥ ज्ञान मिळाविण्याची गोष्ट तर खरोखरच संपली, पण यात आणखी एक असे झाले की, माझे स्थिर असलेले मन यामुळे गडबडले. ॥14॥ त्याचप्रमाणे श्रीकृष्णा, तुझे हे चरित्र काही समजत नाही; कदाचित या निमित्ताने तू माझे मन पहातोस की काय? (ते न कळे). ॥15॥

क्रमश:

हेही वाचा –  Dnyaneshwari : हे ब्रह्मस्थिती निःसीम, जे अनुभवितां निष्काम…

(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!