आराधना जोशी
सध्या पितृ पंधरवडा सुरू आहे. पितरांसाठी करावयाचे विधी कृष्ण पक्षात आणि विशेषत: अमावस्येला करतात. कारण, माणसाचा एक महिना म्हणजे पितरांचा एक दिवस आणि एक रात्र (माणसाचा कृष्ण पक्ष म्हणजे त्यांचा दिवस आणि शुक्लपक्ष म्हणजे रात्र), असे मानले जाते. विशेषत:, भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजे पितृपक्ष आणि भाद्रपद अमावस्या म्हणजे सर्वपित्री अमावास्या, असे म्हटले जाते. यानिमित्ताने अन्नदान केले जाते आणि यासाठी विशिष्ट प्रकारचे खाद्यपदार्थ केले जातात. त्यापैकीच एक आमसुलाची चटणी. त्याची रेसिपी पाहूया.
साहित्य
- आमसुले (कोकम) – 10 ते 12
- जिरं – 1 टीस्पून
- मिरी – 2 ते 3 दाणे
- गूळ – साधारणपणे 1 वाटी
- मीठ – चवीनुसार
- आलं – 1 लहान तुकडा
पुरवठा संख्या : 7 ते 8 जणांसाठी
तयारीस लागणारा वेळ :
- आमसुलं भिजण्यासाठी – दीड तास
- भिजवलेली आमसुलं आणि इतर साहित्य मिक्सरवर बारीक करण्यासाठी- 3 मिनिटे
हेही वाचा – Recipe : खमंग आणि रुचकर मूंगलेट
कृती
- आमसुले (कोकम) दीड तास गरम पाण्यात भिजवून ठेवा.
- दीड तासांनी मिक्सरच्या भांड्यात जिरं, मिरं, मीठ, आलं हे सगळं पाणी न घालता वाटून घ्या.
- वाटून झाल्यावर भिजवलेली आमसुले (कोकम) त्यात घाला. आमसुले भिजवलेले थोडेसे पाणीही घाला.
- परत एकदा मिक्सरमध्ये हे मिश्रण फिरवून घ्या.
- आता त्यात गूळ घाला आणि पुन्हा एकदा मिक्सरमधून छान बारीक वाटून घ्या.
- अशा प्रकारे आमसुलाची चटणी तयार.
विशेष आहार माहिती : शाकाहारी, औषधी
हेही वाचा – Recipe : मिक्स हर्ब राईस आणि चीज स्पिनॅच सॉस
टीप
- गुळाचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी, जास्त करू शकता.
- तिखटपणा अधिक हवा असेल तर, मिरीचे प्रमाण किंचित वाढवावे किंवा थोडेसे लाल तिखट वापरले तरी चालेल.
- काही ठिकाणी या चटणीला हिंग, जिऱ्याची फोडणी देतात. त्यानेही एक वेगळी चव येते
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.