वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय दुसरा
आणि जेथ शांतिचा जिव्हाळा नाहीं । तेथ सुख विसरोनि न रिगे कहीं । जैसा पापियाचां ठायीं । मोक्षु न वसे ॥345॥ देखें अग्निमाजी धापती । तियें बीजें जरी विरुढती । तरी अशांता सुखप्राप्ती । घडों शके ॥346॥ म्हणोनि अयुक्तपण मनाचे । तेंचि सर्वस्व दुःखाचें । या कारणें इंद्रियांचें । दमन निकें ॥347॥
इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोऽनुविधीयते । तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि ॥67॥
ये इंद्रियें जें जें म्हणती । तें तेंचि जे पुरुष करिती । ते तरलेचि न तरिती । विषयसिंधु ॥348॥ जैसी नाव थडिये ठाकितां । जरी वरपडी होय दुर्वाता । तरी चुकलाही मागौता । अपावो पावे ॥349॥ तैसीं प्राप्तेंही पुरुषें । इंद्रियें लाळिलीं जरी कौतुकें । तरी आक्रमिला देख दुःखे । सांसारिकें ॥350॥
तस्माद् यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः । इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥68॥
म्हणोनि आपुलीं आपणपेया । जरी ये इंद्रिये येती आया । तरी अधिक कांही धनंजया। सार्थक असे ॥351॥ देखे कूर्म जियापरी । उवाइला अवयव पसरी । ना तरी इच्छावशें आवरी । आपणपेंचि ॥352॥ तैसीं इंद्रिये आपैतीं होती । जयाचें म्हणितलें करिती । तयाची प्रज्ञा जाण स्थिती । पातली असे ॥353॥ आता आणिक एक गहन । पूर्णाचें चिन्ह ।
अर्जुना तुज सांगेन । परिस पां ॥354॥
या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी । यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥69॥
देखे भूतजात निदेलें । तेथेंचि जया पाहलें । आणि जीव जेथ चेइले । तेथ निद्रितु जो ॥355॥ तोचि तो निरुपाधि । अर्जुना तो स्थिरबुद्धि । तोचि जाणे निरवधि । मुनीश्वर ॥356॥
आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् । तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी ॥70॥
पार्था आणिकही परी । तो जाणो येईल अवधारीं । जैसी अक्षोभता सागरीं । अखंडित ॥357॥ जरी सरिताओघ समस्त । परिपूर्ण होऊनि मिळत । तरी अधिक नोहे ईषत् । मर्यादा न संडी ॥358॥ ना तरी ग्रीष्मकाळीं सरिता । शोषूनि जाति समस्ता । परी न्यून नव्हे पार्था । समुद्रु जैसा ॥359॥ तैसा प्राप्तीं ऋद्धिसिद्धी । तयासि क्षोभु नाहीं बुद्धी । आणि न पवतां न बाधी । अधृति तयातें ॥360॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जेथ कामु उपजला, तेथ क्रोधु आधींचि आला…
अर्थ
ज्याप्रमाणे पापी मनुष्याचे ठिकाणी मोक्षाचा वास नसतो, त्याप्रमाणे जेथे शांतीचा ओलावा नाही तेथे सुख चुकून सुद्धा कधी पाय टाकीत नाही. ॥345॥ पाहा, विस्तवात घातलेले (भाजलेले) बी जर उगवेल तर, शांतिहीन पुरुषाला सुखप्राप्ती होऊ शकेल. ॥346॥ म्हणून मनाची चंचलता हेच दु:खाचे सार आहे, याकरिता इंद्रियांचा निग्रह करावा, हे चांगले. ॥347॥
(विषयांच्या ठिकाणी) इंद्रिये (स्वैर) संचार करू लागली असताना जे मन त्यांच्या मागे जाते, ते पाण्यातील नावेला (भलतीकडे) नेणाऱ्या वायूप्रमाणे, त्याच्या बुद्धीला बुद्धीला (भलतीकडे) नेते. ॥67॥
ही इंद्रिये जे जे म्हणतील, तेच जे पुरुष करतात (इंद्रियांच्या नादाने जे वागतात), ते विषयसागराच्या पलीकडे पैलतीरापर्यंत गेले असले तरी, ते खरोखर गेले नाहीत, (असे समजावे). ॥348॥ ज्याप्रमाणे नाव तीरावर लागल्यावरही जर वादळात सापडली तर, ज्या अपायाला ती चुकवून आली, तोच अपाय तिला पुन्हा पोहोचतो. ॥349॥ पाहा, त्याप्रमाणे आत्मप्राप्ती झालेल्या पुरुषाने जर, इंद्रियांचे सहज लाड केले तर, तो देखील पुन्हा संसार-दु:खाने व्यापला जातो. ॥350॥
म्हणून हे महाबाहो, ज्याची इंद्रिये विषयापासून संपूर्णपणे आवरलेली असतात, त्याची बुद्धी (आत्मस्वरूपी) स्थिर झाली (असे समज). ॥68॥
म्हणून आपल्याला आपली ही इंद्रिये जर आकळता येतील तर अर्जुना, दुसरे काही त्याहून मोठे मिळवावयाचे आहे काय ? ॥351॥ पाहा, ज्याप्रमाणे कासव प्रसन्न झाले असता आपले हातपाय इत्यादी अवयव पसरते किंवा मनात आल्यास आत आखडून घेते, ॥352॥ त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये ताब्यात असतात आणि तो म्हणेल तसे करतात, त्याची बुद्धि स्थिर झाली आहे, असे समज. ॥353॥ आता आणखी एक पूर्णावस्थेला पोचलेल्या पुरुषाचे गूढ (सहसा लक्षात न येणारे) लक्षण तुला सांगतो ऐक – ॥354॥
सर्व प्राणी ज्याविषयी निद्रीस्त असतात, त्याविषयी संयमी पुरुष जागरूक असतो आणि ज्याठिकाणी प्राणिमात्र जागृत असतात, त्याठिकाणी ज्ञानवान मुनि निद्रेत असतो. ॥69॥
पाहा, सर्व मनुष्ये ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निजलेली (अज्ञानी) असतात, त्या ठिकाणी ज्याला उजाडलेले असते (म्हणजे ज्याला आत्मज्ञान झालेले असते) आणि जीव ज्या (देहादि प्रपंचाच्या) ठिकाणी जागे (विषयसुख अनुभवणारे) असतात, त्या ठिकाणी जो निजलेला असतो (विषय निवृत्त) असतो, ॥355॥ तोच खरा निरुपाधि होय. अर्जुना, त्याचीच बुद्धि स्थिर झालेली आहे आणि तोच अखंड मुनीश्वर आहे, असे समज. ॥356॥
ज्याप्रमाणे उदक, चोहो बाजूंनी भरत असतानाही जो आपली मर्यादा सोडत नाही, अशा समुद्रामध्ये प्रवेश करते, त्याप्रमाणे ज्या पुरुषामध्ये (विकृती उत्पन्न न करता) सर्व इच्छा प्रवेश करतात, त्याला शांती मिळते. विषयांची इच्छा करणाऱ्यांना मिळत नाही. ॥70॥
अर्जुना, आणखी एका प्रकाराने त्याला ओळखता येईल, तो प्रकार ऐक. पहा, जशी समुद्रात निरंतर शांतता असते ॥357॥ जरी सर्व नद्यांचे प्रवाह तुडुंब भरून (त्या समुद्राला) मिळतात, तरी तो त्यामुळे जराही फुगत नाही आणि आपली मर्यादा थोडीही सोडत नाही. ॥358॥ किंवा उन्हाळ्याच्या वेळी जरी सर्व नद्या आटून गेल्या (जरी त्यास एकही नदी मिळाली नाही) तरी त्यावेळी अर्जुना, समुद्र जसा मुळीच कमी होत नाही. ॥359॥ त्याप्रमाणे ऋद्धिसिद्धि प्राप्त झालेल्या असताही त्याचे मन (हर्षाने) उचंबळत नाही आणि त्या जर प्राप्त झाल्या नाहीत तर, अधैर्याची त्याला बाधा होत नाही. ॥360॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : जैसा सूर्य आकाशगतु, रश्मिकरीं जगातें स्पर्शतु…