वेद बर्वे
दहा दिवसांच्या गणेशोत्सवाचा जल्लोष, उत्साह सरल्यानंतर लगेचच सुरू होतो ‘पितृपक्ष’ किंवा ‘पितृपंधरवडा’ अर्थात आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यासाठीचा, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा विशिष्ट काळ.
भारतीय संस्कृतीत पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या स्मृतींना श्रद्धांजली अर्पण करण्याचा विशेष काळ मानला जातो. भाद्रपद पौर्णिमेपासून अश्विन अमावास्येपर्यंत सोळा दिवसांचा हा कालावधी ‘श्राद्धपक्ष’ म्हणून ओळखला जातो. धर्मशास्त्रानुसार या काळात आपल्या पितरांचे आत्मे पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या वंशजांकडून केले गेलेले श्राद्ध, तर्पण, पिंडदान स्वीकारून त्यांना आशीर्वाद देतात.
मनुस्मृती (3.203) मध्ये म्हटले आहे – “यत्किंचिदपि दत्तं स्यादननामश्रुतेन च। तत्तत्पितृगणाः प्रीता भवन्त्येव न संशयः॥”
याचा अर्थ असा की, श्रद्धेने केलेले अगदी थोडे दानसुद्धा पितरांना संतुष्ट करते, यात शंका नाही.
त्याचप्रमाणे गरुडपुराण (पूर्वखण्ड, अध्याय 10) मध्ये श्राद्धाचे महत्त्व सांगणारा एक श्लोक आहे, “श्राद्धेन पितरः तुष्टा देवा तुष्टास्ततो भवेत्। तस्मात् सर्वप्रयत्नेन कार्यं श्राद्धं विशेषतः॥”
अर्थात – श्राद्धाने पितरे संतुष्ट होतात आणि ते प्रसन्न झाले की, देवही प्रसन्न होतात. म्हणून मनोभावे आणि प्रामाणिकपणे श्राद्ध केले पाहिजे.
महाभारतातील भीष्म पितामहांची कथा पितृपक्षाचे महत्त्व अधोरेखित करते. कुरुक्षेत्रातील युद्धानंतर भीष्म पितामह शरशय्येवर पडले होते. त्यांना इच्छा-मरणाचा वर होता, पण त्यांनी देह सोडण्याची वेळ पितृपक्ष संपेपर्यंत पुढे ढकलली. कारण, पितरांचे श्राद्ध पूर्ण होईपर्यंत मृत्यू स्वीकारणे योग्य नाही, अशी त्यांची भावना होती. या कथेतून स्पष्ट होते की, पितृस्मरण हे देवकार्यापेक्षाही श्रेष्ठ मानले जाते.
हेही वाचा – Relation : ‘मेल इगो’… नातं बाप आणि मुलाचं
या काळात कोणकोणत्या गोष्टी कराव्यात, याविषयी जाणकार आणि तज्ज्ञ मंडळीने मार्गदर्शन केले आहे. याचे काही आध्यात्मिक संदर्भ देखील आहेत. या काळात पितरांसाठी श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण करणे महत्त्वाचे असते. तसेच गरजू लोक आणि पशू-पक्ष्यांना अन्नदान करणे पुण्यदायी मानले जाते. कावळा, गाय, कुत्रा, मुंग्यांना अन्न देणे, हा पितरांपर्यंत अर्पण पोहोचवण्याचा प्रतिकात्मक मार्ग आहे, असे तज्ज्ञ सांगतात.. याविषयी थोडे सविस्तर जाणून घेऊया.
पितृपक्षात काय करावे?
- श्राद्ध आणि तर्पण – दररोज आंघोळ केल्यानंतर, दक्षिण दिशेला तोंड करून, तिळ मिश्रित पाण्याने पितरांना तर्पण द्यावे. गरुडपुराण सांगते की, “तर्पणेन पितृणां तृप्तिः” – म्हणजे तर्पणामुळे पितरांची तृप्ती होते. यामुळे पूर्वजांना शांती मिळते आणि त्यांच्या आशीर्वादाने कुटुंबात सुख-समृद्धी नांदते.
- पिंडदान – तांदळाचे लाडू (पिंड) तयार करून कुशाच्या पानावर ठेवून पितरांना अर्पण करावे. मनुस्मृतीनुसार, पिंडदानाने पितरांच्या आत्म्यांचा परलोकातील प्रवास सुलभ होतो. वंशाला दीर्घायुष्य, आरोग्य आणि अडचणींपासून मुक्ती मिळते.
- अन्नदान आणि दानधर्म – या काळात गरजवंताला तसेच पशू-पक्ष्यांना अन्नदान करावे. महाभारतात उल्लेख आहे- “अन्नदानात् परं दानं” – म्हणजे अन्नदानापेक्षा श्रेष्ठ दान नाही. अन्नदानामुळे पितरांच्या आत्म्यांना संतोष मिळतो आणि दात्याला पुण्य लाभते.
- कावळा, गाय, कुत्रा व मुंग्यांना अन्न – पितरांचे प्रतीक मानून या प्राण्यांना अन्न देणे महत्त्वाचे आहे. यामुळे संपूर्ण घराला पितरांचे आशीर्वाद लाभतात आणि अडथळे दूर होतात.
- व्रत-उपवास आणि साधना – काहीजण या काळात उपवास करतात तर काहीजण तामसी आणि मांसाहारी पदार्थांचा त्याग करतात. सोबतच देवाचा जप आणि ध्यान करतात. ज्यामुळे मनाची आणि तनाची शुद्धी होते, तसेच अध्यात्मिक प्रगतीही साध्य होते.
धर्मशास्त्रज्ञ सांगते की, पितृपक्ष हा ‘कृतज्ञतेचा काळ’ आहे. आपल्या जीवनातील सुख-समृद्धी ही पूर्वजांच्या श्रम आणि आशीर्वादामुळे आहे, हे मान्य करण्याचा आणि त्याकरिता त्यांचे आभार मानण्याचा हा काळ आहे. आचार्य आणि वेदपाठी यांच्या मते, श्राद्ध हा केवळ विधी नसून भावनेचा विषय आहे. श्रद्धा असेल तर साधे अर्पण केलेले जलही पितरांना पोहोचते.
आधुनिक काळातील जाणकार सांगतात की, हा काळ श्राद्ध कार्यासोबतच, मनोविश्रांती आणि आत्मचिंतनाचाही आहे. पूर्वजांच्या स्मृतींतून आपण प्रेरणा घेऊन, मनन-चिंतन करून, आपल्या जीवनाला एक नवीन दिशा देऊ शकतो.
हेही वाचा – Memories : पत्र आणि पत्रपेटी… राहिल्या त्या आठवणी
पितृपक्षात काय करणे टाळावे?
धार्मिक ग्रंथांमधील उल्लेख आणि जाणकारांच्या सांगण्यानुसार, पितृपक्षाच्या काळात काही विशिष्ट गोष्टी करणे आवर्जून टाळले पाहिजे. त्या गोष्टी कोणत्या आणि त्या न करण्यामागे काय कारणं आहेत, याविषयी जाणून घेऊया –
- मंगलकार्ये (उदा. लग्न, गृहप्रवेश, नामकरण, मुंज इत्यादी) – पितृपक्ष हा श्राद्ध कार्याचा आणि पितरांचे स्मरण करण्याचा काळ आहे. या काळात मृतात्म्यांना प्रसन्न करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे अशावेळी आनंदोत्सव, मंगलकार्ये न करणे उचित मानले जाते.
- नवीन वस्त्र, दागिने, घरगुती सामान खरेदी करणे – हा काळ तर्पणाचा आणि दान-धर्माचा असतो. त्यामुळे यावेळी नवनवीन चिजवस्तू खरेदी करण्याऐवजी, भौतिक सुखांवर खर्च करण्याऐवजी, समर्पण भावनेने पूर्वजांचे ऋण फेडण्यावर भर द्यावा, असे शास्त्र सांगते.
- भोजनात कांदा, लसूण, मांसाहार, मद्य सेवन करणे – श्राद्धकाळात सात्त्विकता आवश्यक आहे. तामसी अन्न पितरांना अर्पण करणे निषिद्ध आहे. तसेच, या काळात मनाची आणि तनाची शुद्धी करण्यालाही शास्त्रांत महत्त्व दिले गेले आहे, त्यामुळे तामसी अन्न शिजवून स्वत: खाणेही टाळावे.
- पिंडदान / तर्पणाशिवाय श्राद्ध टाळणे – महाभारत आणि गरुड पुराणानुसार, पितरांना जल आणि अन्न अर्पण न केल्यास ते असंतुष्ट राहतात, ते आपल्या वंशजांवर नाराज होऊ शकतात. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच, विधीवत श्राद्ध करणे योग्य.
थोडक्यात, पितृपक्षात नवे उपक्रम, ऐहिक सुखांसाठी नवे खर्च, उत्सव अशा गोष्टी टाळून, सात्त्विक आहार, दानधर्म आणि समर्पण भावनेने पितरांसाठी करावयाचे विधी यांनाच केंद्रबिंदू मानले जाते. ज्या पूर्वजांनी (जे आता पितरं आहेत) आपल्याला आशीर्वाद दिले, मार्गदर्शन केले, त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करावा आणि त्यांच्याप्रती असलेली कृतज्ञतेची भावना व्यक्त करावी.
(अस्वीकरण : वरील माहिती, ही केवळ धार्मिक आणि पौराणिक ग्रंथांतील संदर्भ आणि लोकमान्यतांवर आधारित आहे. यामधील कुठल्याही विधींचे, विचारांचे किंवा प्रक्रियांची आम्ही पुष्टी करीत नाही. याचा उद्देश फक्त पितृपक्षाची माहिती आपल्यापर्यंत पोहचवणे हा आहे. वाचकांनी आपल्या श्रद्धा, कुटुंबपरंपरा आणि जाणकार धर्मतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच आपले आचरण ठरवावे.)
अवांतर, कथा, लघुकथा, लेख, स्टोरीज, पितृपक्ष, पितृपंधरवडा, तर्पण, श्राद्ध, पितरे, पिंडदान, Pitrupaksha, Pitrupandharvada, Tarpan, Shraddha, Pitre, Pinddan,