सुनील शिरवाडकर
आमच्या गल्लीत एक कुटुंब रहात असे, त्यांची ही कहाणी! कदाचित प्रातिनिधिक…!! अलीकडे बहुतांश ठिकाणी दिसणारी… तर या कुटुंबाचा चांगला भरभक्कम वाडा होता. आईवडील आणि चार मुलं… वडील याज्ञिक होते. त्यांचा वाडा म्हणजे काय? सागवानी लाकडात बांधलेला… ओसरी….चौक… पडवी… पडवीत टांगलेला झोपाळा… त्याच्या पितळी कड्या… याज्ञिकी करणारे ते काका, त्यांना सगळेजण अण्णा म्हणायचे. त्यांचा रुबाब काही औरच! त्यांचाच काय, सगळ्या कुटुंबाचाच रुबाब होता. त्यांचेकडे साजरे होणारे सण, त्यानिमित्ताने बाहेर निघणारी चांदीची भांडी… सोनं-नाणं… सर्वच रुबाब होता.
तीन पिढ्यांच्या कहाणीतली ही पहिली पिढी…
त्यांना चार मुलं. त्यातील एक माझ्याच वयाचा. त्याचं लग्न झालं आणि तीन-चार वर्षांत तो घराबाहेर पडला. त्याची बायको नोकरी करणारी. त्यांनी कर्ज काढून वन-बीएचके फ्लॅट घेतला. त्यांना एकुलता एक मुलगा होता. यथावकाश त्याचं शिक्षण झालं… फ्लॅटचं लोनही फिटलं… आणि तो एकुलता एक मुलगा नोकरीच्या कारणांमुळे मुंबईत गेला. इकडे तो माझा मित्र आणि त्याची बायको त्या वन-बीएचकेमध्ये रहात आहेत.
तीन पिढ्यांच्या कहाणीतली ही दुसरी पिढी..
मुंबईत नोकरी करणारा त्याचा मुलगा… त्याचंही आता लग्न झालंय. दोघं नोकरी करतात आणि रहातात भाड्याच्या घरात.. वन-बीएचकेमध्येच!
हेही वाचा – आयुष्य… अगदी सरळ रेषेत!
ते भाड्याच्या घरात रहातात हे मला माहीत नव्हतं. मी सहजच विचारलं, “मुंबईत फ्लॅट घेतला का?” तर त्याचं उत्तर… “कसं शक्य आहे काका? मुंबईत आणि स्वतःचा फ्लॅट!”
आमच्या आणि आमच्या आधीच्या पिढीचं स्वप्न असायचं ते स्वतःचं घर असण्याचं… त्यावेळी बहुतेक जण भाड्याच्या घरात रहायचे… आपण भाड्याच्या घरात राहतोय यांची खंत वाटायची. आपल्यावर जी वेळ आलीय तशी आपल्या मुलांवर नको यायला म्हणून पै न् पै जमवून, लोन काढून ते जागा घ्यायचे… कुणी प्लॉट घेऊन बंगला बांधायचे तर, कुणी फ्लॅट घ्यायचे…
आणि आज त्यांचीच पुढची पिढी मुंबई-पुण्यात भाड्याने रहात आहे किंवा कोटी कोटी रुपयांचे फ्लॅट घेऊन त्याचे हप्ते भरत आहे!
हेही वाचा – गजू… स्वप्नपूर्तीचा आनंद
सागवानी लाकडातला चौसोपी वाडा ते मुंबईतील भाड्याच्या तीन खोल्या… हा प्रवास आहे अण्णांच्या पुढच्या पिढ्यांचा!
हा झालेला बदल… आणि यालाच म्हणतात, मुलांनी प्रगती केलीय!!!
मोबाइल – 9423968308
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.