Sunday, September 21, 2025

banner 468x60

Homeअध्यात्मDnyaneshwari : जेथ कामु उपजला, तेथ क्रोधु आधींचि आला...

Dnyaneshwari : जेथ कामु उपजला, तेथ क्रोधु आधींचि आला…

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.

अध्याय दुसरा

ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते । सङ्गात्संजायते कामः कामात्क्रोधोभिsजायते ॥62॥

क्रोधाद्भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः । स्मृतिभ्रंशाद्बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥63॥

जरी हृदयीं विषय स्मरती । तरी निसंगाही आपजे संगती । संगीं प्रगटे मूर्ति । अभिलाषाची ॥321॥ जेथ कामु उपजला । तेथ क्रोधु आधींचि आला । क्रोधीं असे ठेविला । संमोह जाणें ॥322॥ संमोहा जालिया व्यक्ति । तरी नाशु पावे स्मृति । चंडवातें ज्योति । आहत जैसी ॥323॥ कां अस्तमानीं निशी । जैसी सूर्यतेजातें ग्रासी । तैसी दशा स्मृतिभ्रंशीं । प्राणियांसी ॥324॥ मग अज्ञानांध केवळ । तेणें आप्लविजे सकळ । तेथ बुद्धि होय व्याकुळ । हृदयामाजीं ॥325॥ जैसें जात्यंधा पळणी पावे । मग ते काकुळती सैरा धांवे । तैसे बुद्धीसि होती भवें । धनुर्धरा ॥326॥ ऐसा स्मृतिभ्रंशु घडे । मग सर्वथा बुद्धि अवघडे । तेथ समूळ हें उपडे । ज्ञानजात ॥327॥ चैतन्याचां भ्रंशी । शरीरा दशा जैशी । पुरुषा बुद्धिनाशीं । होय देखें ॥328॥ म्हणोनि आइकें अर्जुना । जैसा विस्फुल्लिंग लागे इंधना । मग तो प्रौढ जालिया त्रिभुवना । पुरों शके ॥329॥ तैसें विषयांचें ध्यान । जरी विपायें वाहे मन । तरी येसणें हें पतन । गिंवसीत पावे ॥330॥

रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् । आत्मवशैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥64॥

हेही वाचा – Dnyaneshwari : जयाचे आत्मतोषीं मन राहें, तोचि स्थितप्रज्ञु होये…

अर्थ

विषयाचे चिंतन करणाऱ्या पुरुषाला त्यांच्या विषयी आसक्ती निर्माण होते. आसक्तीमुळे काम (इच्छा) उत्पन्न होतो, कामामुळे क्रोध उत्पन्न होतो, क्रोधापासून संमोह, संमोहापासून स्मृतीभ्रंश, होते, स्मृतीभ्रंशापासून बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाशामुळे (तो पुरुष) नाश पावतो. ॥62-63॥

अंत:करणात विषयांची जर नुसती आठवण असेल तर संग टाकलेल्यासही पुन्हा विषयासक्ती येऊन चिकटते आणि त्या विषयासक्तीमुळे विषयप्राप्तीची इच्छा प्रगट होते. ॥321॥ जेथे काम उत्पन्न होतो, तेथे क्रोधाने आपले बिर्‍हाड अगोदरच ठेवलेले असते आणि जेथे क्रोध आला तेथे कार्याकार्याविषयी अविचार ठेवलेला आहेच, असे समज. ॥322॥ ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वार्‍यात दिवा नाहीसा होतो, त्याप्रमाणे संमोहाची स्वारी प्रकट झाल्यावर स्मृती नाश पावते. ॥323॥ किंवा सूर्य मावळायच्या वेळेला रात्र सूर्यतेजाला ज्याप्रमाणे गिळून टाकते, त्याप्रमाणे स्मृती नाहीशी झाली म्हणजे प्राण्यांची दुर्दशा होते. ॥324॥ मग सर्वत्र अज्ञानाचा केवळ अंधार होतो आणि त्याचेच आवरण सर्वांवर पडते. अशा वेळी हृदयात बुद्धी व्याकुळ होते. ॥325॥ जसा जन्मांध पळापळीत सापडला म्हणजे निरुपायाने दीन होऊन सैरावैरा धावू लागतो; तसे अर्जुना, बुद्धीला मग भ्रांती होते. ॥326॥ अशा रीतीने स्मृतीला भ्रंश झाला की, बुद्धीची सर्वप्रकारे कुचंबणा होते. त्याप्रसंगी जेवढे म्हणून ज्ञान आहे, तेवढे समूळ नष्ट होते. ॥327॥ प्राण निघून गेले असता शरीराची जशी दशा होते त्याप्रमाणे बुद्धीचा नाश झाला असता पुरुषाची तशी स्थिती होते, असे समज. ॥328॥ म्हणून अर्जुना ऐक, लाकडाला ठिणगी लागली आणि ती एकदा का भडकली म्हणजे त्रिभुवनाला (जाळण्याला) ज्याप्रमाणे ती समर्थ होते ॥329॥ त्याप्रमाणे विषयांचे चिंतन मनाकडून चुकून (अल्पही) जरी झाले तरी, एवढे हे (मोठे) पतन शोधीत येते. ॥330॥

परंतु प्रीति आणि द्वेष यांनी रहित, आपल्या वश असलेल्या इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेणारा आणि ज्याचे मन स्वाधीन असते, अशा (पुरुषास) मनाची प्रसन्नता लाभते. ॥64॥

क्रमश:

(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

हेही वाचा – Dnyaneshwari : जैसी वरिवरि पालवी खुडिजे, आणि मुळीं उदक घालिजे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!