Saturday, March 14, 2026

banner 468x60

Homeललितबाप्पा... जगण्यासाठी पुरेसा!

बाप्पा… जगण्यासाठी पुरेसा!

सतीश बर्वे

गौरी-गणपती विसर्जनाच्या दिवशी कृत्रिम विसर्जन तलावावर रिमझिम पावसात एक आजी-आजोबा दिसले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांच्या सोबत आणखी कोणी नव्हते! तिथला एक कार्यकर्ता ते बघून चटकन पुढे झाला, आजोबांच्या हातात असलेल्या पाटावरच्या गणपतीला बाजूलाच असलेल्या टेबलावर ठेवण्यासाठी.

आजींनी त्या मुलाला थांबवले आणि त्या म्हणाल्या, “अरे, त्यांना एकट्याला करून दे… सगळं हौसेने करायला आवडत त्यांना.” आजोबांनी हातातल्या बाप्पाला अलगदपणे टेबलावर ठेवले आणि ते आजींना म्हणाले, “आरतीचे ताम्हण तयार कर आणि झांजा काढ.”

आजींनी पिशवीतून ताम्हण आणि थोडंसं तूप घालून आणलेलं निरांजन, उदबत्ती असं सगळं बाहेर काढलं. निरांजन लावून ताम्हण आजोबांच्या हातात दिलं. आजोबांनी आरती म्हणायला सुरुवात केली आणि आजींनी झांज वाजवायला. एव्हाना तिथे आलेले काही भाविक कौतुकाने पुढे येऊन आरतीमध्ये सहभागी झाले. दोन-चार आरत्या म्हणून आजोबा थांबले. बाप्पाच्या पाटावर डोकं टेकवताना आजोबांचे डोळे पाणावले. आजींनी ताम्हण आणि बाकी साहित्य परत पिशवीत ठेवलं. मी शेजारीच उभा होतो.

“तो तेवढा मोबाइल काढ बरं पिशवीतून आणि यांना दे बाप्पासोबत आपला फोटो काढायला…” आजोबा आजीला म्हणाले. आजींनी तो मोबाइल माझ्या हातात दिला. मी फोटो काढून आजोबांना दाखवला. आजोबा खूप खूष झाले आणि माझ्या पाठीवर त्यांनी शाबासकी दिली आणि मला म्हणाले, “तुम्हाला शक्य असेल तर, विसर्जन करतानाचा छोटासा व्हिडीओ काढाल का?”

हेही वाचा – आईवडिलांचे ऋण…

“का नाही आजोबा! जरूर काढतो मी व्हिडीओ,” मी म्हणालो. आजोबांचा चेहरा उजळला. त्यांनी टेबलावरचा बाप्पाचा पाट उचलला आणि हळूहळू पावलं टाकत ते कृत्रिम विसर्जन तलावाच्या दिशेने निघाले… आजी आणि मी त्यांच्या मागोमाग… तलावाजवळ तिथल्या कार्यकर्त्यांच्या हातात तो पाट ठेवत त्याला म्हणाले, “सांभाळून कर बाबा सगळं.” त्यानंतर आम्ही उभे होतो, त्या बाजूला आजोबा आले. मी विसर्जनाचा व्हिडीओ काढला आणि मोबाइल त्यांच्या हातात दिला. मोबाइल घेताना आजोबांचा हात थरथरत होता.

मी आजोबांचा हात धरून म्हणालो, “थोडा चिखल झाला आहे इथे पावसामुळे… मी तुम्हाला मुख्य दरवाजापाशी सोडतो…”

आता मात्र आजोबांनी विरोध केला नाही आणि त्यांनी शांतपणे माझ्यासोबत पावलं टाकायला सुरुवात केली. आमच्या मागून आजी येत होत्या. प्रवेशद्वाराजवळच्या टेबलापाशी आलो आणि आजोबा आजींना म्हणाले, “यांना प्रसाद दे बरं, तू आणलेला…” आजींनी पिशवीतून आणलेला प्रसाद माझ्या हातावर ठेवला.

“आजोबा एक विचारू का?” मी धीर एकवटून म्हणालो.

हेही वाचा – नात्यांची दिवाळी

“मला माहीत आहे तू काय विचारणार ते! ऐक बाळा, आम्ही इथे जवळच रहातो, एकमेकांच्या सोबतीने… आमची दोन्ही मुलं परदेशात असतात… घरोघरी असते तीच कहाणी आमच्या घरी देखील आहे… आमचा हा परंपरागत गणपती आहे आणि मी आहे तोवर ती परंपरा चालू रहाणार… मघाशी झांजेचा आवाज ऐकून आजूबाजूचे चार-पाच जणं चटकन पुढे होऊन आरतीत सामील झाले. पण मी मात्र या परंपरेत माझ्या मुलांना सामील करून घेण्यात अपयशी ठरलो! बाप्पा सगळं जाणतो आणि म्हणूनच आमच्या दोघांच्या हातून आम्हाला जमतेय ती आणि जमतेय तेवढी सेवा तो गोड मानून घेतो… त्याची कसलीच अपेक्षा नसते आणि तक्रार देखील नाही, याचंच कौतुक वाटतं आम्हा दोघांना. आज मी 85 वर्षांचा आहे आणि ही 80 वर्षांची. आम्ही देखील आमच्या मुलांकडून कसलीच अपेक्षा ठेवली नाहीये. जोपर्यंत मनांत जिद्द, हातात ताकद आणि शरीरात श्वास आहे तोपर्यंत बाप्पाची सेवा मनापासून करत रहायचं असं आम्ही दोघांनीही ठरवलं आहे. आमच्या पोटचे आम्हाला केव्हाच परके झाले आहेत. पण आमच्यासोबत बाप्पा आहे, हा विचारच जगण्यासाठी पुरेसा आहे आम्हाला!”

भारावलेल्या अवस्थेत मी आजी, आजोबांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला. दोघेही एकदम म्हणाले, “आरोग्यदायी शतायुषी भव:”

सावकाश पावलं टाकत ते दोघेही घरी जायला निघाले… ते दृष्टीआड होईस्तोवर मी त्यांच्याकडे एकटक नजर लावून बघत होतो… कानी आजोबांचे शब्द होते, “बाप्पाला आमच्याकडून कसलीही अपेक्षा नाही, तशीच अपेक्षा आमच्या मुलांकडून आम्हाला नाही. पण आमच्यासोबत बाप्पा आहे, हा विचारच जगण्यासाठी आम्हाला पुरेसा आहे!”


विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!