माधवी जोशी माहुलकर
नागपूर हे रघुजी भोसले यांच्या इतिहासाचा वारसा लाभलेले शहर आहे. या शहराच्या आपल्या काही परंपरा आणि सण-उत्सव, समारंभ आहेत आणि ते उत्साहात साजरे केले जातात. यातीलच एक परंपरागत उत्सव म्हणजे काळी पिवळी मारबत! हा उत्सव समाजातील अनिष्ट प्रथा, चालीरीती, समाजविघातक गोष्टी तसेच रोगराई, इडा-पिडा, संकट टाळण्यासाठी साजरा केला जातो. समाजामध्ये सुखशांती नांदून समाज बांधवांत सलोख्याचे संबंध प्रस्थापित व्हावेत, याकरिता या मारबतला सुरुवात झाली.
जगभरात प्रसिद्ध झालेला बडग्या-मारबत उत्सव आणि मिरवणूक हा प्रकार नागपुराची एक विशेष ओळख बनला आहे. मारबत उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला ऐतिहासिक वारसा आहे. इंग्रजांची राजवट देशात असताना नागरिकांना एकत्र करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी ज्या पद्धतीनं मुंबई-पुण्यात गणेशोत्सव सुरू केला, तशाच प्रकारे नागपुरातदेखील देखील ‘मारबत’ उत्सव सुरू करण्यात आला.
तसं पाहिलं तर, नागपुरात 1881 सालापासून ही पंरपरा कायम आहे. समाजातील अनिष्ट प्रथांचं उच्चाटन करण्याच्या हेतूनं बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबतीची मिरवणूक काढली जाते. काळी आणि पिवळी मारबतीसह बडगे तयार केले जातात. ‘मारबत’ म्हणजे वाईट रुढी-परंपरा, अंधश्रद्धेचं दहन करणं आणि चांगल्या परंपरा, विचारांचं स्वागत करणं हा या मागचा एक उद्देश! मारबतींची ही मूळ परंपरा आदिवासी समाजाची आहे! तल्हारे तेली समाजाच्या बांधवांनी पिवळी मारबत तयार करून तिचं दहन करण्याची प्रथा सुरू केली. पोळ्याच्या पाडव्याला काठ्या, बांबू, तरट यापासून मोठे पुतळे बनवले जातात. त्यावर फाटके कपडे, चिंध्या गुंडाळून त्यांना विविध रंगांनी रंगवलं जातं. मारबतबरोबर जो बडग्या असतो, त्याच्या गळ्यात मोडके झाडू, फाटके कपडे, फुटलेले डबे, टायरचे तुकडे यांच्या माळा घालतात. बडग्याच्या हातात मुसळ आणि कमरेला उखळ बांधलेले असते.
हेही वाचा – मनाचिये गुंती…
मारबतीचा मूळ इतिहास असा आहे की, भोसले घराण्यातील बांकाबाई हिनं इंग्रजांशी हातमिळवणी केली होती. हे त्या काळातील फुटीर आणि अविवेकी कृत्य होतं. त्यामुळे भोसल्यांच्या राज्य कारभाराला सुरूंग लागून बाधा निर्माण झाली होती. बांका बाईच्या या कृत्याचा निषेध म्हणून कागद आणि बांबू वापरून तयार केलेल्या बांकाबाईच्या पुतळ्याची पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी भव्य मिरवणूक काढण्यात येते. त्यानंतर मग तिचं दहन केलं जातं. बांकाबाईच्या नवऱ्यानं देखील तिच्या या कृत्याचा विरोध केला नाही म्हणून त्याचाही पुतळा बनवून सोबतच त्याचीपण मिरवणूक काढतात. बांकाबाईच्या नवऱ्याच्या पुतळ्याला बडग्या असं म्हणतात.
तसंच, अनेकजण या उत्सवाला महाभारताचा देखील संदर्भ जोडतात. कृष्णाचा वध करण्यासाठी आलेल्या पुतना मावशीचं प्रतीक ‘काळी मारबत’, तर लोकांचं रक्षण करणारी ‘पिवळी मारबत’ आहे! यांच्या दोन विशाल मूर्ती तयार केल्या जातात. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी नागपूरातील इतवारी भागात या दोन मारबतींची भव्य मिरवणूक काढली जाते… “इडा-पिडा घेऊन जा गे मारबत!” असं मोठमोठ्याने ओरडत लोक मारबतीला साकडे घालत असतात. या मिरवणुकीत समाजातील सर्व स्तरातील लोक सामील होतात. नेहरू चौकात या दोन मारबती समोरासमोर आणून यांची नाच-गाण्यांच्या तालात भेट घडवून आणली जाते. त्यानंतर काळ्या आणि पिवळ्या मारबतींचे दहन केले जाते.
हेही वाचा – गणपती, महालक्ष्मींच्या सहवासाचे मंतरलेले दिवस!
सध्याच्या धावपळीच्या युगात आपल्याला आपल्याच संस्कृतीचा विसर पडत चालला आहे. असं असताना राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरानं 144 वर्षं जुन्या ऐतिहासिक परंपरेचं जतन करून आदीवासी समाजाचा एक प्रकारे सन्मानच केला आहे, असं म्हणायला हरकत नाही!
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.