अनिता बाळकृष्ण वैरागडे
मागील लेखामध्ये खाली बसून करावयाची काही आसने आणि त्यांचे फायदे बघितले होते. आता या लेखात आणखी काही आसने आणि त्यांचे फायदे जाणून घेऊयात.
दंडासन
दंडासन करताना पाय सरळ पुढे करून बसायचे. दोन्ही पायांची बोटे वाकवून तुमच्याकडे ताणून ठेवा. हात शरीराच्या दोन्ही बाजूंनी समांतर ठेवून पंजे जमिनीवर ठेवायचे. पाठीचा कणा सरळ ठेवायचा. नजर समोर ठेवून आणि आपला श्वासही सामान्य ठेवायचा.
फायदे : तुमचा मेंदूही इतर योगासनांप्रमाणे निरोगी राहतो. या मुद्रेच्या नियमित सरावाने स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोलचे प्रमाण कमी होते. पाठीचे आणि पोटाचे स्नायू मजबूत होतात. सर्व आसनांचा तयारी म्हणून अत्यंत उपयोगी आहे.
भद्रासन
भद्रासन करताना दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून टाचा एकत्र जोडायच्या. गुडघे जमिनीला शक्य तितके लावण्याचा प्रयत्न करायचा. पाठीचा कणा सरळ ठेवायचा. बऱ्याच योगशाळांमध्ये भद्रासन मागे पाय दुमडून पावलांवर बसून केले जाते. भद्रासनास हठप्रदीपिकेमध्ये ‘गोरक्षासन’ असेही संबोधिले आहे.
फायदे : स्त्रियांसाठी अत्यंत उपयुक्त हे आसन आहे. मासिक पाळीबद्दल समस्या असेल तर त्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. पायांचे स्नायू आणि संबंधित नसांमध्ये रक्तप्रवाह सुरळीत होऊन स्नायू मजबूत होतात. पचनशक्ती वाढते.
हेही वाचा – Yoga is lifestyle : ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, उत्कटासन…
तितली आसन
बटरफ्लाय म्हणजे तितली आसन. पाय गुडघ्यात वाकवून दोन्ही पायांच्या टाचा एकत्र जोडायचे आणि हाताने पाय धरून ठेवायचे. आणि जेवढी क्षमता आहे तेवढे गुडघे वर खाली करायचे.
फायदे : तितली आसन पायांना बळ देते. पायांना लवचिकता तसेच मजबूती देणारं आसन म्हणून हे ओळखलं जातं. गर्भधारणेसंदर्भात अत्यंत उपयोगी हे आसन आहे.
हेही वाचा – Yoga is lifestyle : पद्मासन, वज्रासन, बद्ध कोनासन…
शशांकासन
प्रथम जमिनीवर खाली बसायचे. श्वास घेत हात वर न्यायचे. नंतर श्वास सोडत शरीर पुढे वाकून कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न करायचे.. हात सरळ पुढे ठेवायचे काही सेकंद राहून पूर्वस्थितीत यायचे.
फायदे : मानसिक ताण कमी होतो. पाठ आणि कणा मजबूत होतो. पचनक्रिया सुधारते.
आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या शरीरासाठी काही वेळ काढून योग साधना करणे अत्यंत आवश्यक आहे. योग साधना केल्याने मानसिक शांती आणि जगण्यासाठी प्रेरणा मिळते… नकारात्मकता नाहीशी होते. यासाठीच प्राणायाम अत्यंत आवश्यक आहे
क्रमश:


