वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली
अध्याय दुसरा
आश्चर्यवत् पश्चति कश्चिदेनमाश्चर्यवद् वदति तथैव चान्यः । आश्चर्यवत् चैनमन्यः शृणोति । श्रुत्वाऽप्येनं वेद न चैव कश्चित् ॥29॥
एक अंतरीं निश्चळ । जें निहाळितां केवळ । विसरले सकळ । संसारजात ॥ १७२ ॥ एकां गुणानुवादु करितां । उपरती होऊनि चिता । निरवधि तल्लीनता । निरंतर ॥173॥ एक ऐकतांचि निवाले । ते देहभावीं सांडले । एक अनुभवें पातले । तद्रुपता ॥174॥ जैसे सरिता ओघ समस्त । समुद्रामाजिं मिळत । परी माघौते न समात । परतले नाहीं ॥175॥ तैसिया योगीश्वरांचिया मती । मिळणीसवें एकवटती । परी जे विचारूनि पुनरावृत्ति । भजतीचिना ॥176॥
देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत । तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि ॥30॥
जें सर्वत्र सर्वही देहीं । जया करितांही घातु नाहीं । तें विश्वात्मक तूं पाहीं । चैतन्य एक ॥177॥ याचेनिचि स्वभावें । हें होत जात आघवें । तरी सांग काय शोचावें । एथ तुवां ॥178॥ एर्हवीं तरी पार्था । तुज कां नेणों न मनें चित्ता । परी किडाळ हें शोचितां । बहुतीं परीं ॥179॥
स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि । धर्म्याद्धि युद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते ॥31॥
तूं अझुनि कां न विचारिसी । काय हें चिंतितु आहासी । स्वधर्मु तो विसरलासी । तरावें जेणें ॥180॥ या कौरवां भलतें जाहलें । अथवा तुजचि कांही पातलें । कीं युगचि हें बुडालें । जर्हीं एथ ॥181॥ तरी स्वधर्मु एक आहे । तो सर्वथा त्याज्य नोहे । मग तरिजेल काय पाहें । कृपाळूपणें ॥182॥ अर्जुना तुझें चित्त । जर्ही जाहलें द्रवीभूत । तर्ही हें अनुचित । संग्रामसमयीं ॥183॥ अगा गोक्षीर जरी जाहलें । तरी पथ्यासि नाहीं म्हणितलें । ऐसेनिहि विष होय सुदलें । नवज्वरीं देतां ॥184॥ तैसे आनीं आन करितां । नाशु होईल हिता । म्हणऊनि तूं आतां । सावध होई ॥185॥
हेही वाचा – Dnyaneshwari : आदि-स्थिती- अंतु । हा निरंतर असे नित्यु…
अर्थ
कोणी (एखादा) या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पाहतो, तसाच कोणी (दुसरा) आश्चर्याप्रमाणे याविषयी बोलतो. आणखी कोणी याविषयी आश्चर्यासारखे ऐकतो (आणि देहाला विसरतो). पण याप्रमाणे पाहून, वर्णन करून आणि ऐकूनही (यापैकी) कोणी याला जाणत नाहीत. (कारण ते आत्मस्वरुपाचा साक्षात्कार झाला की, तद्रुप होतात आणि मग देहतादात्म्यावर येत नाहीत.) ॥29॥
कित्येक स्थिर अंत:करणाचे लोक त्याला (आत्म्याला) निरखून पहाताच सर्व संसार विसरून जातात ॥172॥ कित्येक त्याच्या गुणांचे वर्णन करता करता चित्तात वैराग्य उत्पन्न होऊन अमर्याद आणि अखंड तन्मयता पावतात. ॥173॥ कित्येक (त्याचे स्वरूपवर्णन) ऐकताच शांत होतात आणि त्यांची देहभावना सुटते. कित्येक (त्याच्या) अनुभवाने तद्रूपता पावतात. ॥174॥ सर्व नद्या समुद्राला मिळतात; पण त्यात त्यांचा समावेश झाला नाही म्हणून त्या परतल्या, असे ज्याप्रमाणे केव्हाही होत नाही. ॥175॥ त्याप्रमाणे थोर थोर योग्यांच्या बुद्धी आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होताच तद्रूप होतात. पण एकदा ते तद्रूप झाले की, विचार करून पुन: देहतादात्म्यावर येत नाहीत. ॥176॥
हे अर्जुना, सर्वांच्या देहामध्ये (असलेला) हा आत्मा सर्वदा अमर आहे; म्हणून कोणत्याही प्राण्याबद्दल शोक करण्यास तू योग्य नाहीस. ॥30॥
जे सर्वत्र सर्व देहात आहे आणि करू लागले तरी, ज्याचा घात होत नाही, ते विश्वव्यापी एक चैतन्य तू लक्षात घे. ॥177॥ हे सर्व जग (आपल्या स्वभावाने) उत्पन्न होत आहे आणि नाश पावत आहे. तर सांग, येथे तुला शोक करण्यासारखे काय आहे? ॥178॥ परंतु, हे अर्जुना, विचार करून पाहिले तर तुझ्या चित्ताला हे का पटू नये, हे मला समजत नाही. पण याचा शोक करणे पुष्कळ प्रकारांनी वाईट आहे. ॥179॥
आणि स्वधर्माचा विचार करताही तू व्याकुळ होणे योग्य नाही. कारण कर्तव्यप्राप्त युद्धापेक्षा क्षत्रियाला दुसरे हितकर काही नाही. ॥31॥
तू अजून (याचा) का विचार करत नाहीस? काय हे मनात घेऊन बसला आहेस? ज्याच्या योगाने तरून जावयाचे, तो आपला धर्म तू विसरला आहेस. ॥180॥ या कौरवांचे वाटेल ते झाले अथवा तुझ्यावरच काही प्रसंग आला, अथवा या वेळी युगांत जरी झाला, ॥181॥ तरी स्वधर्म म्हणून जो एक आहे तो मुळीच टाकता येत नाही. असे असता विचार कर, कृपाळूपणा धरून तुला तरून जाता येईल काय? ॥182॥ अर्जुना, तुझे चित्त जरी दयेने विरघळून गेले तरी, ते तसे होणे या युद्धाच्या प्रसंगी योग्य नाही. ॥183॥ अरे, दूध जरी गाईचे असले, तरी ते पथ्यास घेऊ नये, असे (वैद्यशास्त्राने) सांगितले असताही (आग्रहाने) नवज्वरात दिलेच तर ते विषवत् (मारक) होते. ॥184॥ त्याप्रमाणे भलत्या ठिकाणी भलते केले असता, हिताचा नाश होतो. एवढ्याकरिता तू आता सावध हो. ॥185॥
क्रमश:
(साभार – शं वा तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)
हेही वाचा – Dnyaneshwari : उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे


