प्रणाली वैद्य
भाग – 2
गूढ अशा या चंदन नगरचा ट्रेक कम कॅम्पला आज निघायचं होतं… श्लोकच्या स्टडीप्रमाणे पौर्णिमेच्याच दिवशी तिथे लोकांना वेगवेगळे अनुभव आले होते. आपल्यालाही एक अभ्यास म्हणून असे अनुभव येतात का, हे पाहण्यासाठी पौर्णिमेचाच दिवस योग्य राहील, असं सगळ्यांचं मत होतं आणि त्यात दुग्धशर्करा योग म्हणजे उद्याच पौर्णिमा होती…
आजचा दिवस प्रवासात जाईल आणि उद्या तेथील ठिकाणांना आपल्याला जाता येईल, असा सर्व कार्यक्रम श्लोकने सर्वांसमोर मांडला होता… श्लोकचा हा अभ्यासपूर्ण कार्यक्रम सगळ्यांनी उचलून धरला होता…
ठरल्याप्रमाणे सर्वच्या सर्व 36 जण अगदी वेळेवर हजर होते… प्रवासाकरिता ठरवलेली बसही वेळेत हजर होती! दोन-तीन दिवसांसाठी जेवणाकरिता लागणारे जिन्नस आणि सर्व साहित्यही ग्रुपने सोबत घेतलं होतं. अशी तयारी त्यांची नेहमीच असे…
असा हा रॉकर्स ग्रुप आपल्या या कॅम्पसाठी निघाला…
प्रवासात 3 ते 4 तासांचा वेळ जाणार होता, म्हणून बसमध्ये सगळे गाण्याच्या भेंड्या काय खेळत होते, नाचत काय होते, नुसता धुडगूस चालला होता… मात्र, यात शाल्मली स्वत:तच हरवली होती… शौनकने एक-दोनदा तिला सगळ्यांमध्ये मिक्स व्हायला विनवलेही, पण तिचा मूडच नव्हता! एक अनामिक अस्तित्वाची मोहिनी तिच्यावर पसरली होती.
इतके ट्रेक, पिकनिक शाल्मलीने केले होते शौनकसोबत, पण आज का कोणास ठाऊक तिला काही वेगळे भासत होते. कशातच मन लागत नव्हते. तिचं मन थाऱ्यावरच नव्हतं… तिची अवस्था पाहून शौनक चिडवतच म्हणाला, “चंदन नगरला पोहचण्याआधीच तुझी घाबरगुंडी उडली आहे का? तिथे पोहचल्यावर काय करशील गं?”
हेही वाचा – शोध अज्ञात रहस्याचा…
शौनकच्या बोलण्याकडे तिने दुर्लक्ष केले… पण तिथे जाऊन काही वेगळेच चित्र समोर उभे राहिल, असे तिचे मन तिला सुचवत होते!
जेवणाकरिता एक ब्रेक त्यांनी एका ढाब्यावर घेतला… या तरुणाईनं जेवणावर यथेच्च ताव मारला होता. सगळ्या मुला-मुलींच्या गोंधळामुळे ढाब्यावर एक चैतन्य पसरलं होतं… आणि याचा ढाब्याच्या मालकाला आनंदच वाटत होता.
जेवण आवरता आवरता त्या मालकाने काही मुलांच्या तोंडून चंदन नगरचे नाव ऐकलं होतं, त्यामुळे तो थोडा अस्वस्थ झाला. निघताना त्याने मुलांना हटकलेच! कुठे आणि कशाला निघालेत म्हणून विचारलं. पण मुलांनी उडवाउडावीची उत्तरं दिली. त्याने मुलांना एकच विनंती केली की, “गावातील लोकांचा शब्द मोडून कुठेही, काहीही विचित्र वागू नका. तिथे नक्की काय आहे, याची माहिती नसली तरी त्याबाबत कानावर आलेलं नक्कीच चांगलं नाही…”
तरुण मुलंच ती, ‘हा उगीच काही सांगून घाबरवतोय…’ म्हणून मस्करी करत बसमध्ये चढली. बसमध्येही ढाबेवाल्यावर उलटसुलट चर्चा मस्करी सुरूच होती… एका क्षणाला शाल्मली चिडून उठली… “अरे, त्यांनी आपाल्याला चांगल्या शब्दांत विनंती केली… ते ऐकायचं सोडून तुम्ही त्यांच्यावर अशी मस्करी आणि चर्चा करताय? उद्या देव ना करो, काही वाईट वेळ आली तर तुम्ही सांगणार कोणाला? त्याला जबाबदार कोण? आजवर इतके ट्रेक केले, पण असं कधीच ऐकवलं गेलं नव्हतं, मग आज कोणी काही सुचवतंय तर, त्याकडे दुर्लक्ष करणं कितपत योग्य राहील?”
शाल्मलीच्या प्रश्नाचं कोणाकडेच उत्तर नव्हतं… संपूर्ण बसमध्ये शांतता पसरली होती… शाल्मलीला जवळून ओळखणाऱ्यांना तर आश्चर्यच वाटत होते… याआधी शाल्मलीला अशा आवाजात इतकं चिडून बोलताना कुणीच ऐकलं नव्हतं.
मात्र, सरते शेवटी सगळ्यांनी तिला प्रॉमिस केलं की, गावातील माणसं जे सांगतील, जे सुचवतील तसंच सर्वजण आपलं वर्तन ठेवतील… कोणीही त्यांचा शब्द मोडणार नाही. याची काळजी ज्याने त्याने प्रत्येकाने आपापली घ्यावी.
हेही वाचा – मला माहेर हवे… स्मिताताई आणि अंजलीचे स्नेहबंध
काही वेळातच बस चंदन नगरमध्ये शिरली… गावाचं वातावरण एकदम प्रसन्न होतं आणि सर्वांची सुबत्ता नजरेत भरतच होती… योग्य जागा पाहून बस पार्क केली आणि बसमधून सगळी मुलं बाहेर पडली. इतकी मुलं आपल्या गावात आलेली पाहून गावचे सरपंच आणि इतर पदाधिकारी मंडळी त्यांच्या चावडीवर जमली. शौनक आणि त्याची टीम पुढे होऊन त्या सर्वांशी बोलायला गेले. त्या सर्व पदाधिकाऱ्यांसमोर रॉकर्सनी आपल्या चंदन नगरला भेट देण्याचा हेतू सांगितला…
गावातल्या लोकांना काही गोष्टी अंगवळणी पडल्या होत्या, त्यामुळे ते बहुत करून सर्व सांभाळून घेत. पण गावात बाहेरून कोणी नवीन आले की, मात्र एक वेगळेच अनुभव येत… म्हणून पदाधिकाऱ्यांनी आपापसात चर्चा करून काही गोष्टी रॉकर्ससमोर मांडल्या.
एकतर उद्या पौर्णिमा आहे… काही अनुचित घडायला नको म्हणून सगळ्या मुलांची राहण्याची व्यवस्था पाटलांच्या वाडयावरच करण्यात आली. कारण वाडा होताच प्रशस्त आणि सर्व मुलं एकाच छता खाली एकत्र असणं गरजेचं होतं…
सर्व मुलांना पाटलांनी वाड्यावर नेलं. संध्याकाळची वेळ होती, त्यामुळे सर्वांना फ्रेश होऊन चहापाणी घेण्याकरता सांगण्यात आलं. पाटलांच्या वाड्यात पाटलांच्या पत्नी सावित्रीबाईंनी त्यांचं स्वागत केलं. सर्वांना फ्रेश होण्याकरिता वॉशरूम दाखवून त्या स्वयंपाकघराकडे वळल्या. सर्व मुलांसाठी त्यांनी चहा-पोहे केले.
मुलांचं चहापाणी आवरतच होतं, तेव्हा पाटील, सरपंच आणि मंडळी तसेच गावातल्या काही वयोवृद्ध व्यक्तीही आल्या… “मघाशी तुमच्यातल्या काही जणांशी आम्ही लोक थोडं बोललो, पण आता तुम्हा सर्वांशी एकत्रितपणे बोलावं म्हणून तुमच्यासमोर आम्ही आणि गावातील काही अनुभवी व्यक्ती इथे उपस्थित आहेत… मी तुम्हा सर्वांना एकच विनंती करतो की, या सर्व व्यक्तींचं बोलणं तुम्ही कान देऊन ऐकावं, जेणेकरून तुमचा या गावात येण्याचा, इथले अनुभव घेण्याचा उद्देश सफल होईल आणि इथून तुम्ही सहीसलामत परतून आपापल्या घरी जाल…,” असं पाटलांनी आपलं मत मुलांसमोर मांडलं.
शौनकनेही मुलांच्यावतीनं हमी दिली की, “तुम्ही सर्व जे आणि जसं सांगाल तसंच्या तसं आमचं वर्तन राहील…”
आता मुलांमध्ये शांतता पसरली होती. कोण काय सांगतंय, याकडे जो-तो कान देऊन होता तर, काहींना हा अनुभव रेकॉर्ड करून ठेवण्याकरिता तशी उपाययोजना केली…
पाटील पुन्हा बोलू लागले, “हे पहा मुलांनो, आम्हा सर्वांचा जन्म इथलाच… लहानपणापासून आम्ही कथा-दंतकथा ऐकतच वाढलो… आमच्या घरातल्या थोरामोठ्यांनी आम्हाला जे सांगितलं, ते आम्ही पाळलं… त्यामुळे आम्हाला ना कोणते त्रास झाला, ना कोणते वाईट अनुभव आले… मुलांनो, इतर दिवसांत वेगळं असं काहीच घडत नाही… आम्हा गावकऱ्यांना तर कधीच काही जाणवत नाही… पण जे लोक इथंल वेगळेपण ऐकून येतात, ज्यांचा गावाशी काहीच संबंध नाही, त्या लोकांना पौर्णिमेच्या दिवशी मात्र काही वेगळ्या अनुभवांना सामोरं जावं लागतं… पौर्णिमेच्या दिवशी वातावरणात एक आल्हाददायक सुगंध भरून राहिल्याचं आम्ही सतत अनुभवत आलोय…”
तेवढ्यात गावातली एक सगळ्यात वयोवृद्ध व्यक्ती पुढे होऊन बोलू लागली… “मुलांनो, तुम्हा कोणाचा या गावाशी काहीच संबंध नाही आणि या गावची थोडीथोडकी विशेषता आहे, ती ऐकून तुम्ही सर्व इथे आला आहात आणि ते ही पौर्णिमेच्या दिवशी! आज काही नाही, पण उद्या कदाचित तुम्हा सर्वांना किंवा तुमच्यातल्या काही जणांना काही वेगळे विचित्र अनुभव येतीलही. पण तुम्हाला एकच सांगेन संध्याकाळी पाचनंतर तुम्ही या इथे वाड्यातच एकत्र राहायचं आहे. कोणीही न सांगता या वाड्याबाहेर पडायचं धारिष्ट्य करू नका… पाटील इथेच असतील काही जाणीव झाली तर, इथेच रहा… त्यांच्या कानावर घाला, पण वाड्याबाहेर पडू नका…”
“आजवर इथे आलेल्या लोकांकडून त्यांना आलेले अनुभव आम्ही ऐकले आहेत… जे इथेच थांबले, घरी परतू शकले आणि त्यांनीच या ठिकाणाबाबत बाह्यजगात वाच्यता केली… जे काही इथल्या शोधात आले आणि कोणाचं काहीही न ऐकता आलेल्या अनुभवासाठी पुढे गेले, ते पुन्हा गावात परतून आलेच नाहीत! त्यांचं काय झालं कोणालाच ठाऊक नाही!!
मुलं शांतपणे सर्व बोलणं ऐकून घेत होती… या आधारावर ते त्यांची उद्याची भटकंती कशी असेल हे ठरवणार होते…
क्रमशः