ॲड. कृष्णा पाटील
“आरं, होय म्हणंल, न्हायतर न्हाय म्हणंल, शेवटी किती केलं तरी, तुझी भैनच हाय ना. जाऊन ये जा पटदिशी,” आईच्या या बोलण्यावर त्याने त्याच्या जुनाट मोडकळीस आलेल्या स्प्लेंडर गाडीला किक मारली.
रस्ता अरुंद होता. खाचखळग्यामुळे हादरे बसत होते. पावसाच्या भुरभुरीने चिखल मातला होता. शिरगाव ते मोराळे रस्ता फारच कच्चा होता. मोराळ्यात मीनाक्षीच्या घरी पोहोचेपर्यंत दुपारचा एक तरी वाजणार होता.
एका वळणावर महेशने मोटरसायकल रस्त्याच्या अगदी बाजूला घेऊन थांबवली.
“पाच मिनिटांत आलो. थांब इथंच.”
“काय झालं?”
“झालं काय नाही रे. आबांच्या समाधीचं दर्शन घेऊन येतो.”
महेशने रस्त्याकडेची दोन-चार फुले खूडली. ओंजळीत फुले घेऊन त्याने रस्ता ओलांडला. खाली शेतात थोड्या अंतरावर एक दगडी चबुतरा होता. त्यावर काळ्या अक्षराने लिहिलं होतं, ‘कै. यशवंत खोत. रिटायर्ड मेजर (आबा).’ त्याने चबुतऱ्यावर ओंजळीतील फुले वाहिली. नमस्कार करून दर्शन घेतले आणि तो मागे वळला. गाडीजवळ उभा राहिलेला विश्वनाथ रस्त्याकडेला उभा राहून हे सारे पाहत होता.
“तुमचे आबा काय करीत होते रे?
“चल, तुला वाटेत सांगतो. खूप मोठी कहाणी आहे.”
आमचे आबा, ‘मेजर यशवंत खोत’ मोठा राजा माणूस होता. दिलदार मनाचा… निधड्या छातीचा… मीनाक्षीच्या लग्नामध्ये देण्या-घेण्याचा विषय निघाला, त्यावेळी आबा म्हणाले, “माझी एकुलती एक मुलगी आहे. तिला सख्खी आई नाही. याचा अर्थ ती बेवारस नाही. मला न सांगता तिने स्वतः लग्नाचा निर्णय घेतला. आंतरजातीय असल्यामुळे बऱ्याच जणांनी विरोध केला. अगदी महेशच्या आईने सुद्धा. पण मी बाप म्हणून तिच्या पाठीशी ठाम राहिलोय. लग्नाबाबत आणि खर्चाबाबत तुम्ही सांगायचं, मी ऐकायचं.”
पंधरा वर्षांपूर्वीची ही गोष्ट. लग्न कमी खर्चात केलं. पण गरीब जावायाला मदत खूप मोठी केली. आता मीनाक्षीला मुलं झाली. ती मोठी होऊन शाळेतही जाऊ लागली. चढ लागला. महेशने स्पेलंडरचा गिअर बदलला. तो पुढे सांगू लागला.
“आबा गेल्यावर मीनाक्षीकडे आमचं जाणं येणं तसंच कायम राहिलं. सणासुदीला आमच्याकडून दुरडी, साडी जाणार म्हणजे जाणारच. पण आज मात्र आपण वेगळ्या कारणासाठी तिच्याकडे निघालोय.”
विश्वनाथने आश्चर्याने विचारलं. “कसलं कारण?” “बॅंकेच्या कर्ज प्रकरणाला मीनाक्षीची संमती हवी आहे. आबांच्या माघारी आता आमची सर्वांची नावे सातबारावर लागलीत ना.”
अंगणात हॉर्न वाजला आणि मीनाक्षीने दार उघडलं. दारात महेशला पाहून ती पाणी आणण्यासाठी पुन्हा आत गेली. पाण्याचा तांब्या हातात देताना म्हणाली, “पाऊस जोरात आहे का रे? भिजला काय? टॉवेल देऊ का?”
“नको टॉवेल. पावसाला चुकवत चुकवत आलोय. भैय्याला बोलव. गाडीला पिशव्या आहेत, तेवढ्या आत घे म्हणाव. वांगी, अंडी एका पिशवीत आहेत. लाडू आणि आळवाच्या वड्या तिने करून दिल्या आहेत. त्या भिजतील.”
महेशच्या बहिणीच्या घरी येण्याचा विश्वनाथचा हा पहिलाच प्रसंग. बाहेरच्या दगडावर हात-पाय धुताना त्याने सभोवार नजर टाकली. कोकणी लाल चिऱ्याचे कंपाऊंड. दोन मजली सुंदर इमारत. पोर्चमध्ये पांढरीशुभ्र चारचाकी क्रेटा गाडी. फाटकाच्या बाजूला शोभेची झाडे. समोरच्या बाजूला केसरी आंब्याची दोन-तीन मोठी झाडे. पाठीमागे तीन-चार एकर काळाशार लांब कांड्याचा ऊस. बांधावर नारळाची फळांनी लगडलेली झाडे.
सागवानी कोरीव नक्षीकाम केलेल्या मुख्य दरवाजातून ते आत आले.
“दाजी कुठं गेलेत?” नव्या कोऱ्या कोचवर बसता बसता महेशने विचारलं. “ते गेले की ड्युटीवर. तू अगोदर फोन तरी करायचास.” चहाचे कप टिपॉयवर ठेवताना मीनाक्षी म्हणाली.
“खरं तुझ्याकडेच काम होतं. मग म्हटलं दाजींना कशाला ताप द्यायचा. म्हणून फोन केला नाही.”
“यांची काय ओळख?”
“हा माझा मित्र आहे. विश्वनाथ. हा पण आर्मीत असतो. खूप वर्षांनी गावी आलाय. चल म्हटलं बहिणीकडे जाऊन येऊया.”
“बसा बोलत. मी भैय्याला मटण आणायला पाठवते.”
“नको नको. आता जेवणाचं काही काढू नकोस. नंतर कधीतरी निवांत येईल.”
मुख्य दरवाजा लावून मीनाक्षी बाजूच्या लाकडी आराम खुर्चीत समोरच बसली.
“आईची तब्येत? परवा माझा फोन झाला. बरी आहे म्हणत होती.”
“कशाची बरी गं? त्यासाठीच तुझ्याकडे आलो होतो. तिला मुतखड्याचा त्रास आहे. आता एक किडनीच निकामी झालीय. ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. उसाचं बिल पण आलं नाही. पुढच्या महिन्यात संजूला…”
ती त्याचं बोलणं अर्धवट तोडून पट्कन उठली. हातातल्या मोबाइलकडे पाहात म्हणाली, “यांचा फोन आहे. लगेच परत येते.” मोबाइल कानाला लावून स्वयंपाक घरात गेलेल्या पाठमोऱ्या बहिणीकडे त्याने पाहिले. छपराचं रूपांतर बंगल्यात करून आबांनी मीनाक्षीला खात्यापित्या घरची करून टाकली होती. आता उंची साड्या, भारी मोबाइल तिच्या हातात आला. त्याला आबांचा अभिमान वाटला.
बाजूस बसलेल्या विश्वनाथला तो सांगू लागला. “हे संपूर्ण घर आबांनी बांधून दिलंय. मीनाक्षीची आई वारली आणि दोन-तीन वर्षे तिचा सांभाळ आबांनीच केला. मीनाक्षी तीन वर्षाची असताना तिच्या संगोपनासाठी आबांनी दुसरा विवाह केला. मग माझा जन्म झाला. पण आबा जिवंत होते तोपर्यंत मला मीनाक्षी माझी ‘सावत्र’ बहीण आहे हे माहीत नव्हतं.”
“बहीण थोरली काय? तिला किती मुलं? दाजी काय करतात?”
“हो. मीनाक्षी माझ्यापेक्षा पाच वर्षांनी थोरली. दाजी बलवडीच्या मिलमध्ये नोकरीला आहेत. त्यांना दोन मुलं. भैय्या इंजिनिअरींगच्या दुसऱ्या वर्षाला आहे. वर्षा बीडीएसच्या पहिल्या वर्षाला आहे. या दोन्ही मुलांचा शिक्षणाचा खर्च आतापर्यंत आबाच पाहत होते. एकदा आई आबांना म्हणाली, “एकटीलाच इतका खर्च करून पुन्हा बाकीच्यांनी काय करायचं?”
एकदम मोठ्या आवाजात ताडकन् आबा म्हणाले, “ती मुलगा असती तर तिचा पण हिस्सा या दोघांच्या बरोबरीने पडला असता. आपण तिला खर्च करतो म्हणजे काय उपकार करत नाही.”
“तिच्या वाट्याला येणाऱ्या जमिनीच्या किमतीच्या दुपटीने खर्च झालाय की आतापर्यंत…”
“असू दे. शेवटी एकुलती एक लाडकी पोरगी आहे आपली.”
सफरचंदाच्या फोडींची प्लेट आणि सरबताचे ग्लास घेऊन ती परत आली. समोरच्या काचेच्या टी-पॉयवर ठेवत ती पुन्हा खुर्चीवर बसली.
महेशनं तिच्याकडे निरखून पाहिलं. मघाचा उत्साह पार मावळला होता. निर्जीव हालचालीने तिने प्लेटा ठेवल्या होत्या. तिच्या मनात काय चाललंय हे समजत नव्हतं. खाली मान घालून, साडीच्या पदराचा रंगीत दोरा एका बोटा भोवती गुंडाळत ती म्हणाली, “तुला तर माहितीच आहे महेश, दोन्ही पोरांच्या खर्चाचा किती मोठा डोंगर आहे. ते एकटेच पळतात. एकटेच कमवतात. आमच्या शेतीमधून तरी किती उत्पन्न येतंय?”
महेशने तिला मधेच थांबवलं. तो आतून अस्वस्थ झाला होता. संतापावर ताबा ठेवून तो शांतपणे म्हणाला, “पैसे मागायला नाही आलो मी, मीना. तुझा काहीतरी गैरसमज होतोय.”
चपराक् मारल्यासारखी ती एकदम गप्प झाली. तिला काय बोलावं सुचेना. एक विचित्र शांतता हॉलमध्ये पसरली. थोड्या वेळाने महेशने सफरचंदाची प्लेट उचलली. विश्वनाथ समोर धरली. त्याने स्वतः एक फोड घेतली. तोंडात टाकण्याअगोदर म्हणाला, “कुणापुढे हात पसरायचे नाहीत ही आपणा सर्वांना आबांची शिकवण होती. ती शिकवण मी आजपर्यंत पाळली आहे आणि येथून पुढेही पाळणार आहे. त्यामुळे तुझ्याकडे पैसे मागून दाजींना विनाकारण कसे कोड्यात टाकीन?”
जवळच्या एका वायरच्या पिशवीतून कागदाची भेंडोळी काढली. समोरच्या टेबलवर ठेवत म्हणाला, “मी बँकेचे कर्ज प्रकरण करणार आहे. आबा गेल्यावर तिकडचं सगळंच ढासळून गेलंय. त्यात भरीस भर म्हणून दोन वेळा पूर आला. हुता नव्हता तो ऊस गेला. गेल्यावर्षी बाग काढून टाकली. बागेचं लोखंड, तारा सगळं विकलं. पण खर्चाला काय एक वाट आहे का? दोन पोरांचं शिक्षण, त्यात आईचा आजार. पुढच्या महिन्यात तिचं ऑपरेशन आहे. त्यामुळे आत्ताच कर्ज प्रकरण करून ठेवलेलं बरं. म्हणून शेतावर कर्ज काढायचं आहे. त्या कर्जासाठी तुझी संमती म्हणून सही हवी आहे.
तिने त्या कागदी भेंडोळ्याकडे लांबूनच तिरस्काराने पाहिलं. कागदांना हात न लावताच म्हणाली, “यांना न विचारता अशा कुठे पण सह्या केल्या तर माझं नांदण उठंल की.”
“लाव की फोन दाजींना. त्यांना न विचारता सही कर, असं मी तरी कुठं म्हणतोय?”
ती थोडावेळ काहीच बोलली नाही. फोनकडे नुकतंच बघत राहिली. महेशला गुदमरल्यासारखं झालं. त्याला उठून बाहेर पडावं असं वाटू लागलं. इतक्यात ती म्हणाली, “मी दोन-तीन दिवस विचार करते आणि तुला सांगते.”
महेश आणि विश्वनाथ अवाक् झाले. महेशच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं. शक्य तेवढा संयम ठेवून महेश शांतपणे म्हणाला, “मी जमीन विकायला नाही निघालो मीना. बॅंकेचं कर्ज काढतोय. ते पण आईच्या ऑपरेशनसाठी. थोड्याच दिवसात ते फेडणार आहे. पुन्हा सातबारा कोरा होईल. फार तर तुझा हिस्सा बाजूला ठेवू. पण तरीही नावे समाईकात असल्याने तुझ्या संमतीशिवाय कर्ज मिळू शकत नाही.”
हेही वाचा – Land deal : गावातल्या जमिनीसाठी…
महेश शांत झाला. हॉलच्या समोरच्या भिंतीवर लावलेल्या आबांच्या फोटोकडे तो पाहत राहिला. फोटोतले आबा निर्विकार डोळ्याने हे सर्व पाहत होते. पंख्याच्या वाऱ्याच्या झुळकीने आबांच्या फोटोचा चंदनाचा हार झुलत होता.
ती उठून आत गेली. बऱ्याच वेळाने ती पुन्हा बाहेर आली. येऊन उभ्या उभ्या म्हणाली, “शेतावर कर्ज काढण्यापेक्षा दुसरी काहीतरी सोय बघ जा. तुम्ही आता इतकी वर्षे माझा हिस्सा पिकवत आलाय. आम्ही कधीच काही बोललो नाही. आबा जिवंत असताना पण नाही आणि आबांच्या माघारी पण नाही. आबा गेल्यावर मला वाटलं तू म्हणशील तुझा हिस्सा तुला घे. पण तूही कधी बोलला नाहीस. तरीही मी मन मोठं केलं. खातोय माझा हिस्सा तर खाऊ दे. शेवटी भाऊच आहे आपला.”
महेशच्या कपाळावर घाम साचला. त्याचे डोळे संतापाने लाल झाले. त्याच्या चेहऱ्यावर धग उमटू लागली. पण विश्वनाथने त्याच्या पाठीवर हात ठेवला. त्याला शांत होण्याची खूण केली. मग त्याने पाण्याचे चार घोट घेतले. रिकामा ग्लास टिपायवर ठेवताना म्हणाला, “तुझ्यासाठी आबांनी कितीतरी खर्च केला? त्यांचा आलेला सगळा फंड तुझ्या लग्नासाठी दिला. तुझ्या दोन्ही मुलांची शिक्षणं केली. इतकं चांगलं घर बांधून दिलं. आणखी काय करायचं राहिलंय? आबा गेलं आणि तिकडं माझं हुत्याचं नव्हतं झालं. लोकांची देणी वाढली. तरीही मी कोणाकडे हात पसरले नाहीत. तुझ्याकडे सुद्धा हात पसरून नाही आलो. आबांनी आणि आबांच्या माघारी मी तुझ्यासाठी जे काही केलंय त्याची जाणीव ठेवून संमती दिलीस तर माझी आई वाचेल. नाहीतर..”
महेशला पुढे बोलता आलं नाही. तो आवंढा गिळून गप्प बसला.
तिच्यावर या बोलण्याचा काहीच फरक पडला नाही. ती मख्खपणे तशीच उभी राहिली. एकाएकी तिने काय आणि कसा विचार केला काय माहीत? एकदम भडकून म्हणाली, “महेश, माझ्यासाठी आबांनी आणि तू खर्च केल्याचं पालूपद सारखं सारखं उगळत बसू नका. माझ्यासाठी खर्च केला म्हणजे काय उपकार नाही केला. ते तुमचं कर्तव्य होतं. पण वडिलोपार्जित जमिनीत माझा हिस्सा आहे. तो माझा अधिकार आहे.”
महेशकडे पाहण्याचं टाळून तिने टीपॉयवरची प्लेट आणि ग्लास उचलले. झटक्याने ती स्वयंपाक घरात निघून गेली.
बाहेर पुन्हा पावसाची झड सुरू झाली. कोंडा गळल्यासारखा पाऊस टिपकू लागला. दोन-तीन किका मारल्यावर गाडी सुरू झाली. पाठीमागे वळूनसुद्धा न पाहता त्याने गाडी रस्त्याला लावली. रस्त्यातील दगडांना आणि पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांना चुकवत चुकवत तो शिरगावच्या दिशेने निघाला.
हेही वाचा – Trap of Deception : जमिनीचा सौदा… अन् नोटरी
येथे येताना कोणत्या उद्देशाने आलो होतो आणि झालं काय? इतक्या वर्षांत आपण कधी स्वप्नातही दुजाभाव केला नाही. बापाने मरताना सांगितलं होतं, ‘मीनाला अंतर देऊ नका…’ आत्तापर्यंत ते पाळलं. कुठंच कमी पडलो नाही. पण आज हे काय फळ मिळालं?
पावसाची उघडीप होऊन फटफटीत ऊन पडलं. शेतापर्यंत आल्यावर तर अगदीच कडक ऊन पडलं. त्याने गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली आणि थांबवली. विश्वनाथला थांबायची खूण करून तो पुन्हा रस्ता उतरून आबांच्या समाधीकडे गेला. त्या पांढऱ्या मार्बलच्या चौकोनी चबुतऱ्यासमोर तो उभा राहिला. दोन्ही हात जोडले.
“आबा, तुम्ही जाताना हे काय करून ठेवलंय? वादग्रस्त सहा एकर जमिनीऐवजी निर्वेध अशी तीन एकर जमीन माझ्यासाठी ठेवली असती तरी, चाललं असतं. तुम्ही जिच्यासाठी एवढं केलं ती आज तिचा अधिकार सांगत आहे. आबा, खरं म्हणजे तुम्ही त्याचवेळी तिचा हिस्सा देऊन टाकला असता आणि संबंध तोडला असता तर आज चित्र वेगळं दिसलं असतं. आपण केलं ते आपलं कर्तव्य होतं आणि तिचा जमिनीत असणारा हिस्सा आहे तो तिचा अधिकार आहे असं ती म्हणते. मग तुमची मुलगी म्हणून आणि माझी बहीण म्हणून तिचं काय कर्तव्य आहे की नाही?”
“आता बस् झालं आबा. तुमची शपथ घेऊन सांगतो, तिचा हिस्सा वेगळा काढल्याशिवाय तिच्या घरात पाऊल ठेवणार नाही. तिच्या हिश्यामध्ये तिला सोनं पिकवू दे. माझं काहीच म्हणणं नाही. फक्त तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी शेवटपर्यंत राहू दे.”
रस्त्यावर थांबून कंटाळलेला विश्वनाथ हळूच येऊन महेशच्या पाठीमागे उभा राहिला होता. हयात नसलेल्या कै. आबांना उद्देशून महेशचे बोलणे तो ऐकत होता. त्याच्या हाताची थरथर तो पाहत होता. त्याच्या डोळ्यांच्या कडा ओलावलेल्या त्याने पाहिल्या. विश्वनाथ आणखी थोडा पुढे झाला. महेशच्या पाठीवर त्याने हात ठेवला. आश्वासक आवाजात शांतपणे म्हणाला, “महेश, बापाच्या घरात समाधानाचा दिवा जळतोय, यापेक्षा मला काही नको, असं म्हणणऱ्या कित्येक बहिणी जगात आहेत. पण तुझी बहीण वेगळीच आहे. असो. आईच्या ऑपरेशनसाठी लागणाऱ्या पैशाची काळजी करू नकोस. मी आहे ना…”
थरथरणाऱ्या महेशच्या उष्ण पाठीवर तो थोपटत राहिला…!!!!