वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली
अध्याय दुसरा
हे विषय जयाते नाकळिती । तया सुखदुःखें दोन्ही न पवती । आणि गर्भवासुसंगती । नाहीं तया ॥123॥ तो नित्यरूपु पार्था । वोळखावा सर्वथा । जो या इंद्रियार्था । नागवेचि ॥124॥
नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः । उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः ॥16॥
आतां अर्जुना आणिक कांही एक । सांगेन मी आइक । जें विचारें परलोक । वोळखिती ॥125॥ या उपाधिमाजीं गुप्त । चैतन्य असे सर्वगत । तें तत्वज्ञ संत । स्वीकारिती ॥126॥ सलिलीं पय जैसें । एक होऊन मीनलें असे । परी निवडूनि राजहंसें । वेगळें कीजे ॥127॥ कीं अग्निमुखें किडाळ । तोडोनियां चोखाळ । निवडिती केवळ । बुद्धिमंत ॥128॥ ना तरी जाणिवेच्या आयणी । करितां दधिकडसणी । मग नवनीत निर्वाणीं । दिसे जैसें ॥129॥ कीं भूस बीज एकवट । उपणितां राहे घनवट । तेथ उडे तें फलकट । जाणों आलें ॥130॥ तैसें विचारितां निरसलें । तें प्रपंचु सहजें सांडवलें । मग तत्त्वता तत्त्व उरलें । ज्ञानियांसी ॥131॥ म्हणोनि अनित्याचां ठायीं । तयां आस्तिक्यबुद्धि नाहीं । निष्कर्ष दोहींही । देखिला असे ॥132॥
अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् । विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमहंति ॥17॥
देखें सारासार विचारितां । भ्रांति जे पाहीं असारता । तरी सार तें स्वभावता । नित्य जाणें ॥133॥ हा लोकत्रयाकारु । तो जयाचा विस्तारु । तेथ नाम वर्ण आकारु । चिन्ह नाहीं ॥134॥ जो सर्वदा सर्वगतु । जन्मक्षयातीतु । तया केलियाहि घातु । कदाचि नोहे ॥135॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जे हे जन्ममृत्यु तुवां सृजिले…
अर्थ
या विषयांच्या तावडीत जो सापडत नाही, त्याला सुख-दु:ख ही दोन्ही नाहीत आणि गर्भवासाची संगती त्याला कधी घडत नाही. ॥123॥ जो या इंद्रियांचे जे विषय त्यांच्या कह्यात सापडत नाही, तो पार्था, पूर्णपणे ब्रह्मरूप आहे असे जाणावे. ॥124॥
अविद्यमान वस्तूला (कधी) अस्तित्व नसते, विद्यमान वस्तूचा (कधी) अभाव नसतो. (विद्यमान आणि अविद्यमान) या दोहोंचाही निर्णय तत्ववेत्त्यांनी जाणला आहे. ॥16॥
आता अर्जुना, तुला मी आणखी काही एक (गोष्ट) सांगतो, ऐक. ते वस्तुस्वरूप ज्ञानी पुरुष विचाराने जाणतात. ॥125॥ या देहादि प्रपंचामध्ये सर्वत्र चैतन्य गुप्त रूपाने आहे. तत्व जाणणारे संत ते ओळखून त्याचेच ग्रहण करतात. ॥126॥ दूध पाण्याशी एकरूप होऊन त्यात अगदी मिळून गेलेले असते. पण राजहंस ज्याप्रमाणे निवडून ते वेगळे करतो; ॥127॥ अथवा चतुर लोक अग्नीच्या सहाय्याने हिणकस धातू काढून टाकून केवळ शुद्ध सोने ज्याप्रमाणे निवडून काढतात ॥128॥ अथवा बुद्धिचातुर्याने दही घुसळले असता, ज्याप्रमाणे शेवटी लोणी दृष्टीस पडते ॥129॥ किंवा एकत्र झालेले भूस आणि धान्य उफणले असता धान्य जाग्यावर रहाते आणि उडून गेलेले ते फोलकट, असे ज्याप्रमाणे समजून येते; ॥130॥ त्याप्रमाणे विचार केला असता ज्याचा निरास होतो (जो मिथ्या ठरतो) असा प्रपंच (देहादि उपाधी) ज्ञानी पुरुषांकडून सहजच टाकला जातो आणि मग ज्ञानी पुरुषांना खरोखर एक तत्व (ब्रह्म) मात्र उरते. ॥131॥ म्हणून ज्यांनी दोहोंमधील (उपाधी आणि चैतन्य यामधील) सार ओळखले, त्यांचा (शरीरादि) अशाश्वत वस्तूंच्या ठिकाणी, त्या नित्य आहेत, असा निश्चय नसतो. ॥132॥
ज्याने हे सारे जगत् व्यापिले आहे, ते (सत्) अविनाशी आहे, असे समज. या अविनाशी वस्तूचा विनाश करण्यास कोणीही समर्थ नाही. ॥17॥
पाहा सारासाराचा विचार केला असता, त्यातील असारता ही भ्रांती आहे, असे समज आणि सार हे स्वभावत:च नित्य आहे, असे जाण. ॥133॥ हे तिन्ही लोक हा ज्याचा विस्तार आहे, त्याला नाम, वर्ण, आकार अशी काही चिन्हे (लक्षणे) नाहीत. ॥134॥ जो शाश्वत आणि सर्वव्यापी असून जन्ममरणरहित आहे, त्याचा करू गेला तरी केव्हाही घात होत नाही. ॥135॥
क्रमश:
(साभार – शं वा तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)
हेही वाचा – पालकांची जबाबदारी : नीटनिटकेपणा अन् स्पर्धेसाठी प्रोत्साहन