रश्मी परांजपे
भाग – 3
मागील दोन लेखात आपण शाळा प्रवेशानंतरची पालकांची जबाबदारी काय असते, या विषयी काही निवडक मुद्दे अभ्यासले. या लेखात आपण सदर विषयावरील आणखीन काही मुद्द्यांवर ऊहापोह करणार आहोत.
नीटनेटकेपणाची सवय
शाळेमधे वर्गात गेल्यावर ताई-मावशी मुलांना बूट ठराविक ठिकाणी ओळीत ठेवायला शिकवतात. तसेच मुलांना आपले दप्तर घेऊन रांगेत बसायला शिकवतात. मुलांना अशा सवयी लागण्यासाठी जवळपास एक महिना लागतो आणि ताई-मावशींना लक्ष देऊन बरीच मेहनत घ्यावी लागते. पण एकदा मुलांना अशा सवयी लागल्यावर मुलं सवयींचे तंतोतंत पालन करतात आणि हा मुलांचा खूप चांगला गुण आहे.
पालकांनी मुलाला अशा सवयी घरी देखील लावाव्यात. त्याला बूट आणि दप्तर ठराविक ठिकाणी ठेवण्यास शिकवावे. तसेच, त्याला शाळेचा गणवेश काढून ठराविक ठिकाणी ठेवण्यास अथवा धुवायला टाकण्यास शिकवावे. शाळा आणि घर दोन्हीकडे एकच पद्धत बघून मुलाचा गोंधळ उडणार नाही आणि नीटनिटकेपणाची सवय लागेल.
आहार सेवनाच्या सवयी
मुलाला जेवणापूर्वी अथवा काही खाण्यापूर्वी हात चोळून चोळून धुवायला तसेच खाणे झाल्यावर खळखळून चूळ भरायला आवर्जून शिकवावे. शाळेत मावशी मुलांना असेच शिकवत असतात. अशा सवयी आरोग्यास नक्कीच हितकारक आहेत.
तसेच मुलाने स्वतःच्या हाताने डबा पूर्ण खाण्याबद्दल देखील पालकांनी आग्रही असावे. यामुळे मुलाला ठराविक वेळेस खाण्याची सवय लागेल तसेच पोट भरल्यावर मुल शांत राहील.
हेही वाचा – शाळा प्रवेशोत्तर पालकांची जबाबदारी
दैनंदिन व्यवसाय वेळापत्रकाचे पालन
शाळेत मुलांना वेगवेगळी व्यवसाय पुस्तके दिली जातात. त्या पुस्तकांवर लगेचच मुलाचे नाव लिहावे. शाळा ठराविक दिवशी ठराविक व्यवसायाचे वेळापत्रक आखून तशा सूचना देत असते. त्यानुसार दक्षता बाळगून मुलाचे शाळेचे दप्तर भरावे. हळूहळू मुलाला देखील व्यवस्थित दप्तर भरायला शिकवावे.
अस्तेय पालन
जे आपले नाही ते न घेणे म्हणजे अस्तेय. मुलं चुकून किंवा कधीकधी आवडलं म्हणून दुसर्याचे पुस्तक, पट्टी, पेन्सिल, रूमाल, डबा दप्तरातून आणण्याची शक्यता असते. पालकांनी मुलाचे दप्तर भरण्यापूर्वी तपासावे. दप्तरात दुसर्याचे काही आढळल्यास दुसरेच दिवशी मुलाकरवीच परत करावे.
महत्त्वाचे म्हणजे, मुलावर रागावू नये, त्याला मारू नये, पण त्याला नीट समजावून सांगावे की, जे आपलं नाही ते घेऊ नये. मुलंही आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवतील. परिणामी, चांगल्या सवयी मुलाला लहानपणापासूनच लागतील.
शालेय स्पर्धेत सहभाग
शाळेत आयोजित केलेल्या नानाविध स्पर्धांमधे मुलाला भाग घेण्यास प्रोत्साहन द्यावे. यामुळे मुलाला विविध फायदे मिळतात. मुलाचे पाठांतर सुधारते, आत्मविश्वास वाढतो, चारचौघात मुल न बावरता ध्वनिक्षेपकावर (माईकवर) व्यवस्थित व्यक्त होते आणि त्यामुळे ते धाडसी होते. या सर्व गोष्टींमुळेच मुलाचा सर्वांगीण विकास साधण्यास साहाय्य लाभते.
हेही वाता – शाळा प्रवेशोत्तर पालकांची जबाबदारी : काही निवडक मुद्दे
इथे एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवावी, ती म्हणजे मुलाला जर स्पर्धेत बक्षीस मिळाले नाही तर, पालकांनी नाराज होऊ नये तसेच, मुलावर रागावू देखील नये आणि महत्त्वाचे म्हणजे शिक्षिकेशी वाद घालू नये. (मुलाला बक्षीस न मिळाल्यास मुलावर रागावणारे तसेच कधी तर शिक्षिकेशी वाद घालणारे पालक मी पाहिलेत. अशा वेळेस पालकांचे यथायोग्य समुपदेशन मला करायला लागले आहे.)
येथे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दुसर्या मुलाला बक्षीस मिळाल्यावर पालकांनी स्वतः टाळ्या वाजवून आपल्या मुलाला देखील अवश्य टाळ्या वाजवून दुसर्याचे कौतुक करायला सांगावे.
शाळेत पालकांसाठी देखील स्पर्धा आयोजित करण्यात येतात. पालकांनी अशा स्पर्धेत सक्रिय सहभाग घ्यावा. यामुळे मुलाच्या मनावर सुपरिणाम होतात, त्याला आनंद वाटतो आणि प्रेरणाही मिळते.
या विषयासंबंधीत उर्वरित मुद्दे आपण पुढील लेखात पाहूया.
क्रमश:
(लेखिका पूर्व-प्राथमिक शाळेतून मुख्याध्यापिका म्हणून 32 वर्षे कार्यरत राहून निवृत्त झाल्या. या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अनमोल योगदान केले. तसेच लेखिका योग अभ्यासक असून त्या नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. शिवाय, निरामय आरोग्य संकल्पना यशस्वीरीत्या राबविण्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. संकल्पनेच्या सविस्तर तपशीलासाठी त्यांना वैयक्तिक संपर्क करावा.)
मोबाइल 9881943593