अनिता बाळकृष्ण वैरागडे
आधीच्या लेखामध्ये काही आसने आणि त्यांचे फायदे बघितले होते. आता या लेखात उभे राहून करावयाची काही आसने आणि त्यांचे फायदे बघूया.
ताडासन
ताडाचे झाड त्याच्या उंचीकरीता प्रसिद्ध आहे. या आसनात शरीराची अंतिम स्थिती ही ताडाच्या झाडाप्रमाणे उंच भासते, म्हणूनच या आसनाला ‘ताडासन’ असे नाव आहे.
दोन्ही पाय एका रेषेमध्ये जवळ घ्या. म्हणजे, दोन्ही पायांचे अंगठे, टाचा, गुडघे एकमेकांजवळ करून सरळ उभे रहावे. दोन्ही हात शरीराजवळ सरळ ठेवावेत. आपली नजर डोळ्यासमोरील कुठल्याही काल्पनिक स्थिर बिंदूवर केंद्रित करावी. श्वास घेत हळूहळू दोन्ही हात शरीरासमोरून सरळ रेषेत डोक्याच्या वर न्यायचे. पायाच्या टाचाही त्याच लयीत जमिनीपासून वर उचलाव्यात, पायाच्या चवड्यावर उभे राहायचे. शरीर पूर्णपणे वरच्या दिशेने ताणून ठेवायचे. सर्व शरीराचा भार चवड्यांवर तोलून धरावा. काही सेकंद थांबून, नंतर हळूहळू श्वास सोडत हात एकत्र हळूहळू एकाच लयीत जमिनीच्या दिशेने घेऊन यावेत आणि दोन्ही हात पुन्हा कमरेच्या बाजूला ठेवायचे.
फायदे – वय कमी असल्यास उंची वाढण्यास मदत होते. मणक्यांमधील रक्ताभिसरण सुधारते आणि कणा मजबूत होतो. पायाचे संतुलन सुधारते आणि मन शांत राहते.
वृक्षासन
ज्याप्रमाणे वृक्ष एकाच खोडावर उभा असतो तसे या आसनात एका पायावर उभे रहावयाचे असते व एकूणच शरीराचा आकार वृक्षासारखा भासतो म्हणून या आसनाला वृक्षासन हे नाव प्राप्त झाले.
हे आसन करताना आधी दोन्ही पाय सरळ रेषेत ठेवावेत. नंतर हळूहळू उजवा पाय वर उचलून, गुडघ्यात वाकवून उजवे पाऊल डाव्या मांडीच्या आतल्या बाजूस, जास्तीत जास्त वर ठेवावे. दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत डोक्याच्या वर उंच ठेवावेत. काही सेकंद थांबून. हळूहळू हात खाली घेत पाय जमिनीवर ठेवायचे. अशीच क्रिया डाव्या पायाने करायची. या आसनात तोल सांभाळणे महत्त्वाचे आहे.
फायदे – मनाची एकाग्रता वाढते. पायाचे स्नायू बळकट होतात. मानसिक संतुलन वाढते.
हेही वाचा – Yoga is lifestyle : मकरासन, शलभासन आणि नौकासन
त्रिकोणासन
हे आसन करताना शरीराचा आकार त्रिकोणासारखा दिसतो म्हणून या आसनाला त्रिकोणासन म्हणतात.
दोन्ही पायांमध्ये साधारण दोन फुटांचे अंतर ठेवावे. उजवे पाऊल 90 अंशामध्ये उजवीकडे फिरवावे. हे करत असताना उजव्या पायाची टाच आणि डाव्या पावलाचा कमानी भाग एका रेषेत असावा. दोन्ही तळहात दोन्ही मांड्यांजवळ ठेवावेत. पाठीचा कणा सरळ ठेवावा. शरीराचे वजन दोन्ही पायांवर समान असेल याकडे लक्ष असावे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ जमिनीला समांतर ठेवत सावकाश उजवा हात उजव्या बाजूला जमिनीकडे तर डावा हात आकाशाच्या दिशेला खांद्याच्या रेषेत सरळ ठेवावा. उजवा हात पायाच्या बोटांवर ठेवावा. आपली नजर वरच्या हाताच्या दिशेने ठेवा. दोन्ही पाय गुडघ्यात ताठच असावेत. त्यानंतर उजवे पाऊल सरळ करून डावे पाऊल 90 अंशामधे डावीकडे वळवावे आणि हीच कृती डाव्या बाजूला करावी.
फायदे – कंबर, माकडहाड, मांडीचे सांधे आणि स्नायू, खांदे, छाती आणि पाठीचा मणका लवचिक बनतात. पचनक्रिया सुधारते. कंबरेवरील चरबी कमी होण्यात मदत होते.
उत्कटासन
हा आसन प्रकार म्हणजेच अदृश्य खुर्चीवर बसणे. ताडासनप्रमाणेच ताठ उभे राहायचे. दोन्ही पायांमध्ये सहा ते नऊ इंच अंतर ठेवावे. दोन्ही हात समोर खांद्याएवढया उंचीवर ठेवावेत आणि दोन्ही टाचा वर उचलून गुडघे अशा प्रकारे वाकवायचे जणू काही आपण खुर्चीवर बसलो आहोत. काही सेकंद स्थिर राहून पंज्यांवरच उठावे. टाचा टेकवाव्यात. नंतर हात खाली आणावेत. या आसनाची दोन-तीन वेळा पुनरावृत्ती केल्यास अधिक फायदा होतो. या कृतीला तोलासन असेही म्हणतात.
फायदे – मांड्यांचे स्नायू आणि गुडघे मजबूत होतात. कंबर आणि पाठीचे स्नायू बळकट होतात. वजन कमी करण्यास मदत होते.
हेही वाचा – Yoga is lifestyle : अर्ध हलासन, पूर्ण हलासन, सर्वांगासन
अशी ही आसने आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहे. सुदृढ आरोग्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे. मी आवर्जून सांगते की, या धावपळीच्या जीवनामध्ये शरीराला थोडा तरी वेळ द्या आणि योगासने करा. याची नितांत गरज आहे.