दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 20 ऑगस्ट 2025; वार : बुधवार
भारतीय सौर : 29 श्रावण शके 1947; तिथि : द्वादशी 13:58; नक्षत्र : पुनर्वसू 24:26
योग : सिद्धी 18:13; करण : गरज 25:18
सूर्य : सिंह; चंद्र : मिथुन 18:35; सूर्योदय : 06:20; सूर्यास्त : 19:03
पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
प्रदोष
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – दिवस संमिश्र असेल. व्यवसायासंदर्भात प्रवास करावा लागेल, त्यातून काही किरकोळ लाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्य असल्यास प्रवासाचा बेत सध्यासाठी पुढे ढकला. कामाच्या ठिकाणी वरिष्ठाशी वाद होऊ शकतो. अशा परिस्थितीत, शांतता आणि संयम राखणे आवश्यक आहे. अचानक पाहुणे येण्याचा योग आहे.
वृषभ – नोकरदार जातकांचे कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. तर व्यवसायाच्या क्षेत्रात एखाद्या व्यावसायिकाशी वाद होऊ शकतो. त्यामुळे कोणताही निर्णय शहाणपणाने आणि संयमाने घ्यावा लागेल. कामातील कौशल्यामुळे नोकरीत यश मिळवू शकता. समाजातही आदर वाढेल. घरासाठी काही आवश्यक वस्तू खरेदी कराल.
मिथुन – राजकारणाशी संबंधित जातकांना काही अडथळे आणि समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. अशा परिस्थितीत दक्षता घ्या. आर्थिक बाबतीतही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस सामान्य राहील. परंतु कुटुंबाशी संबंधित काही बाबींमुळे मन थोडे अस्वस्थ असेल.
कर्क – नशीबाची उत्तम साथ मिळणार आहे. व्यवसायात सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे अनेक महत्त्वाची कामे सहज पूर्ण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. परंतु अतिकामामुळे थकवा जाणवू शकतो. त्याच वेळी जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळाल्याने बराचसा ताण कमी होईल.
सिंह – व्यवसाय आणि नोकरी दोन्ही स्तरांवर दिवस संमिश्र असेल. कामाच्या ठिकाणी अत्यंत दक्षतेने हाती घेतलेले काम पूर्ण करावे लागेल. विचारपूर्वक निर्णय घेतल्यास नोकरदारांना त्याचा फायदा होईल. समाजात आदरही वाढेल. नोकरी करणाऱ्या जातकांना पदोन्नतीची चांगली संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी काही अडथळे येतील, मात्र सर्व काम सहजपणे पूर्ण कराल.
कन्या – दिवस अत्यंत शुभ आहे. एखादी चांगली प्रॉपर्टी मिळण्याची शक्यता आहे. समाजात आदर वाढेल. कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. अंगभूत शहाणपणा आणि हुशारीने या जबाबदाऱ्या सहजपणे पूर्ण कराल. संध्याकाळी जुन्या मित्रांच्या भेटी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – शाळा प्रवेशोत्तर पालकांची जबाबदारी
तुळ – दिवस चांगला जाईल. मान-सन्मानात वाढ होईल. सांसारिक सुखाची साधने वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायात केलेल्या प्रयत्नांमुळे चांगला नफा मिळू शकतो. नोकरदार जातकांसाठी दिवस चांगला असेल. त्यांना जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. प्रवास करताना काळजी घ्या, एखादी मौल्यवान वस्तू हरवण्याची भीती आहे.
वृश्चिक – इतरांना मदत करण्यात जास्त वेळ जाऊ शकतो, मात्र त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. नोकरी करणाऱ्यांचे अधिकार वाढू शकतात. व्यवसायाच्या दृष्टीनेही दिवस चांगला असेल. नफा कमावण्याच्या संधी मिळू शकतात. कुटुंबात शांततापूर्ण वातावरण असेल, ज्यामुळे तणाव देखील कमी होईल.
धनु – दिवस फारसा चांगला जाणार नाही. कामाच्या ठिकाणी प्रतिकूल वातावरण निर्माण होऊ शकते. अशा वेळी शांतता आणि संयम राखणे महत्त्वाचे असेल. गोड बोलण्याने आणि वागण्याने परिस्थिती सामान्य करू शकता. त्याच वेळी, व्यवसायाच्या बाबतीत हुशारीने निर्णय घ्यावे लागतील, अन्यथा नुकसान होऊ शकते. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे.
मकर – व्यवसायात अचानकपणे एखाद्या नवीन करारातून आर्थिक लाभ मिळू शकतात. परंतु काही प्रकरणांमध्ये समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. कुटुंबात, जोडीदार किंवा संततीच्या अचानक आजारपणामुळे ताण वाढू शकतो. परंतु गाडी चालवताना जास्त ताण घेणे टाळावे लागेल.
कुंभ – कामाच्या ठिकाणी मोठे यश मिळू शकते, ज्यामुळे खूप आनंदी असाल. आर्थिक बाबतीतही दिवस चांगला जाणार आहे. त्यामुळे सहलीला जाण्याची योजना देखील आखू शकता. जोडीदारासोबत गेल्या काही दिवसांपासून तणावपूर्ण संबंध असतील, तर तेही आता निवळतील.
मीन – तरुणांसाठी दिवस चांगला असेल. नुकतेच करिअर सुरू झाले असेल, तर कामाच्या ठिकाणी प्रतिभा दाखवण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे आदर आणि सन्मानही वाढेल. कुटुंबात संततीकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. संध्याकाळी मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – शाळा प्रवेशोत्तर पालकांची जबाबदारी : काही निवडक मुद्दे
दिनविशेष
सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोलकर
टीम अवांतर
मराठीतील बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक आणि सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख असणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1940 रोजी झाला. मिरज येथून एम.बी.बी.एस झालेल्या दाभोलकर यांनी सातारा येथील सहयोग हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवेचा आदर्श निर्माण केला. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उत्तम कबड्डीपटू म्हणून देखील ते क्रीडाजगतात प्रसिद्ध होते. कबड्डीवर उपलब्ध असलेले एकमेव शास्त्रशुद्ध पुस्तकही त्यांनी लिहिले. कबड्डीतील योगदानासाठी त्यांना मानाचा ‘शिवछत्रपती’ पुरस्कारही मिळाला होता. 1982 सालापासून मात्र डॉ. दाभोलकरांनी वैद्यकीय व्यवसाय सोडून परिवर्तनवादी चळवळीतील पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केले. आपला वैद्यकीय व्यवसाय त्यांनी पत्नीच्या हवाली केला. त्याआधी बाबा आढाव यांच्या ‘एक गाव – एक पाणवठा’ या चळवळीत दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्यांनी श्याम मानव यांच्या 1982मध्ये स्थापन झालेल्या ‘अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती’मध्ये कार्य सुरू केले. पण नंतर 1989 मध्ये त्यापासून वेगळे होऊन त्यांनी ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ स्थापन केली. तेव्हापासून ते समितीच्या कार्याध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. याशिवाय साने गुरुजींनी स्थापन केलेल्या ‘साधना’ या लोकप्रिय साप्ताहिकाचे डिसेंबर 1998 पासून ते मृत्यूपर्यंत संपादक होते. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विविध पैलूंवर डॉ. दाभोलकरांची बारा पुस्तके प्रकाशित झाली असून प्रत्येक पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. दशकातील सर्वोत्तम कार्यकर्ता म्हणून 2006 मध्ये महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका) यांच्यातर्फे न्यू जर्सी येथे त्यांना 10 लाखांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दाभोलकर यांनी ही सर्व रक्कम अंनिसला प्रदान केली. याखेरीज परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचे कार्य देखील त्यांनी केले. 20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी पुण्यातील घरून निघालेल्या दाभोलकर यांच्यावर दोन अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.