सतीश बर्वे
भाग – 2
दोन्ही देवळांत छानपैकी दर्शन झालं. मन प्रसन्न झालं. अजून थोडावेळ मंदिराच्या परिसरात बसायचं होतं मला खरं. मी सौरभला तसं बोलणार इतक्यात सौरभला अचानक फोन आला. तो मला हातानेच थांब म्हणाला. पण पुढे पाच-दहा-पंधरा मिनिटं झाली तरी फोनवरचं बोलणं सुरूच होते. माझी चुळबुळ तिथल्या एका फुलांच्या स्टॉलवाल्याच्या लक्षात आली. त्याने मला खुणेनेच बोलवून तिथल्या एका खुर्चीवर बसायला सांगितले. अगदी देवासारखा धावून आला होता तो. मी त्या सुगंधी जागेजवळ जाऊन बसले ते बरंच झालं, कारण सौरभचा फोन बंद होण्याची चिन्हं दिसत नव्हती.
फुलवाल्याशी गप्पा मारत असताना अचानक सावंतवाडीचा विषय निघाला आणि माझं मन बालपणात जाऊन बसले.
“अरे, मी देखील बारावीपर्यंतचे शिक्षण सावंतवाडीमध्येच घेतलं. पण पुढे वडिलांची बदली कोल्हापुरात झाली आणि तेव्हापासून सावंतवाडीचा विषय मागे पडला. बोलण्याच्या नादात अचानकपणे स्टॉलच्या आतील भागातून कोणीतरी वयस्कर व्यक्ती पडदा उघडून बाहेर आली आणि म्हणाली, ओळखीचा आवाज कानावर पडला म्हणून बाहेर आलो मी बघायला कोण आलंय ते!”.
आमची नजरानजर झाली आणि मी त्यांना ओळखले… आनंदाने ओरडलेच, “तू तर आत्मेश्वर शिव मंदिराजवळ असाच फुलांचा स्टॉल होता, तिथे असायचास ना?”
“हो, माझ्या वडिलांचा स्टॉल होता तो. माझं नाव सुरेश. आमची मोठी फुलबाग होती तिथे. तिथूनच फुले घेऊन वडील बसायचे देवळाच्या बाहेर. पण तुमचं नाव काय?”
“मी तेव्हाची कुसूम सबनीस. वडिलांची फिरतीची नोकरी होती. सावंतवाडीहून आम्ही कोल्हापूरला रहायला गेलो. पण तुम्ही इथे गोव्यात कसे आलात?”
“गावच्या जमिनीवर बऱ्याच सग्यासोयऱ्यांचे हक्क होते. एक दिवस वाटणी झाली. माझे दोन भाऊ मुंबईला कपडा मिलमध्ये होते. त्यांनी त्यांचा हिस्सा माझ्या नावाने करून दिला. तेव्हा तिथे सरकारी प्रकल्प येणार होता. बऱ्याच जणांनी जमिनी दिल्या. पैसे चांगले मिळणार होते म्हणून मग माझ्या नावाचे तीन हिस्से विकून मी गोव्यात आलो. छोटंसं घर विकत घेऊन इथल्या देवळात फुलांचा व्यवसाय सुरू केला. मी थकत चाललोय. म्हणून आता हा माझा मुलगा स्टॉल सांभाळतो.”
“खरंच, दुनिया गोल आहे, असं म्हणतात तेच खरं. माझ्या मुलाचा फोन सुरू होता म्हणून तुमच्या मुलाने मला इथे बसायला बोलावलं आणि तुमची भेट झाली अचानकपणे…”
“आई आय ऍम सॉरी. अगं बॉसचा फोन आला होता. तिथे अचानक मोठा प्रॉब्लेम झालाय. त्या संदर्भात बॉस बराचवेळ माझ्याशी बोलत बसला. बोलण्याच्या नादात तुला मी साफ विसरून गेलो होतो. अचानक तुझी आठवण झाली आणि मी बॉसला तासाभराने फोन करायची विनंती केली आणि मी फोन बंद केला,” सौरभ अपराधीपणाने माझ्याजवळ येऊन म्हणाला.
हेही वाचा – रंग हरवलेलं पेंटिंग
मी सौरभची ओळख करून दिली सुरेशशी. बोलण्याच्या ओघात सौरभने सुरेशला आमच्या हॉटेलचे नाव सांगितलं आणि ते ऐकून सुरेशने मला सावंतवाडीची आणखी एक जुनी आठवण सांगितली…
“कुसूम तुमच्या सेंट्रल इंग्लिश स्कूलचा एक मुलगा पण इथेच गोव्यात चित्रकार म्हणून प्रसिद्ध आहे. त्याची पेंटिंग मोठमोठ्या हॉटेलमध्ये लावलेली आहेत. मध्यंतरी त्याची माहिती मी ऐकली होती टीव्हीवर.”
सुरेशचे हे बोलणं ऐकून, मला सकाळी आमच्या हॉटेलमध्ये लावलेली पेंटिंग्ज बघून जी शंका आली ती बहुतेक खरी ठरते की काय, असं मला वाटू लागले.
सौरभचे लक्ष घड्याळाकडे लागले होते. ते बघून आम्ही दोघांनीही सुरेशचा निरोप घेतला आणि आम्ही परत आमच्या हॉटेलकडे जायला निघालो.
गाडीत बसल्यावर सौरभ मला म्हणाला, “आई तुझ्या आवडीचं जेवण तू इथे रूमवर मागव हवं तर किंवा खाली रेस्टॉरंटमध्ये जाऊन तू खाऊन ये. कारण बॉसचा फोन आला की, आम्ही नेमकं किती वेळ बोलत बसू, ते नाही सांगता येणार मला. फोन संपल्यावर मी मागवीन काहीतरी खायला. पण तू माझ्यासाठी थांबू नकोस.”
मी मनोमन सौरभच्या बॉसचे आभार मानले. कारण, आता मला शांतपणे पेंटिंग्जवर लिहिलेल्या राजेश या नावाचा ठावठिकाणा शोधण्यासाठी आपसूकच वेळ मिळणार होता.
रेस्टॉरंटमधलं जेवण आणि तिथलं वातावरण दोन्हीही मला खूप आवडलं. तिथून बाहेर पडून रिसेप्शनजवळ मी पोहोचले तर, तिथे सकाळी मी बघितलेल्या पेंटिंगच्या जागी नवीन पेंटिंग लावायचं काम मोठ्या कौशल्याने सुरू होते. काम करणाऱ्यांवर लक्ष्य ठेवून उभा असलेल्या माणसाला प्रश्न विचारायचा मोह मला टाळता आला नाही.
“एक्सक्युज मी. ही पेंटिंग का बदलता?”
माझा प्रश्न ऐकून तो माणूस चकित होऊन मला म्हणाला, “मॅडम दर आठवड्याला हॉटेलमधल्या सगळ्या पेंटिंग्जची जागा बदलली जाते. इथे रिसेप्शनमध्ये आता सगळीकडे तुम्हाला नवीन पेंटिंग्ज दिसतील. सकाळी तुम्ही चेक इन केले तेव्हा तुम्ही खूप निरखून बघत होता, इथली काही पेंटिंग्ज. आमचे मालक उत्तमोत्तम पेंटिंग्ज विकत घेतात. इथली बरीच पेंटिंग्ज मालकांच्या लाडक्या चित्रकाराची आहेत.”
“काय नाव त्या चित्रकाराचे?” मी उत्सुकतेने विचारले.
“त्यांचे नाव राजेश लांजेकर. खूप मोठे चित्रकार आहेत. इथेच असतात गोव्यात… पण एका बंदिस्त घरात रहातात. आजूबाजूच्या जगापासून लांब. ते आणि त्यांची चित्रं हेच त्यांचे जग आहे. खूप चित्रं काढून झाल्यावर त्याचे प्रदर्शन भरवतात आणि त्याची विक्री करतात.”
“त्यांचा पत्ता मिळू शकेल का? मला वाटतं आम्ही लहानपणीचे मित्र आहोत सावंतवाडीचे. त्यांना भेटूनच सगळा उलगडा होईल. प्लीज, मला मिळवून द्याल का त्यांचा पत्ता? मी इथे आहे अजून दोन-तीन दिवस. पत्ता मिळाला तर त्यांना भेटायचा प्रयत्न करीन.”
मला वाटलं देखील नाही इतक्या सहजपणे त्या माणसाने मला राजेश लांजेकरचा पत्ता एका कागदावर लिहून आणून दिला. मी त्याचे आभार मानले आणि लिफ्टच्या दिशेने चालायला सुरुवात केली… मनाशी पक्कं करून की, काही करून राजेशच्या बंदिस्त घरात प्रवेश मिळवायचाच मी इथे आहे तोवर!
राजेशभोवतीचं गूढ मात्र वाढत चाललं होतं, एवढं मात्र नक्की. रात्रभर विचार येत होता मनात की, राजेश भेटायला हो म्हणेल का नाही, याचा! त्याच विचारात असताना झोप कधी लागली ते कळलं देखील नाही.
हेही वाचा – विचार, संस्कार अन् जीवनमूल्यांचं कुंपण…
आज सकाळी ब्रेकफास्ट झाल्यावर मी सौरभबरोबर राजेश लांजेकरचा पत्ता शोधत फोंड्यामध्ये फिरत होते. थोडी चौकशी केल्यावर एका बंगल्याजवळ आम्ही थांबलो. आतमध्ये शुकशुकाट जाणवत होता. बाहेर रस्त्यावर देखील चौकशी करायला कोणी दिसत नव्हते. इतक्यात सौरभला बंगल्याच्या गेटच्या एका कोपऱ्यात डोअर बेल दिसली. त्याने ती दाबली. आम्ही आतून कोणी येतंय का, त्याची वाट बघत होतो. अपेक्षेपेक्षा थोडा जास्त वेळ जाऊन एका व्यक्तीने अखेर अर्धवट गेट उघडून त्यातून डोकं बाहेर काढून आम्हाला विचारले, “कोण आपण?”
मी माझं नाव सांगितलं आणि चित्रकाराची ‘लहानपणीची मैत्रीण’ आहे, असा उल्लेख करून माझ्या येण्याचं कारण सांगितले.
“हे बघा ताई, गेली कित्येक वर्षं झाली मालक कोणालाच भेटत नाहीत. फक्त आर्ट गॅलरीच्या माणसांना भेटतात ते.”
“अहो, मला फोनवर तरी बोलून द्या त्यांच्याशी. मी सगळं सांगितलं फोनवर की, मग त्यांना लक्षात येईल मी कोण आहे ते!”
हो, नाही करत त्या माणसाने गेट उघडून आत घेतले. चार पावलं आत चालून गेल्यावर तिथल्या एका छोट्या बैठ्या खोलीत आम्हाला बसायला सांगितलं. माझ्यासमोर एक छोटासा टीव्ही ठेवलेला होता, तो सुरू केला त्या माणसाने आणि तो मला म्हणाला, “ताई, हा कॅमेरा आहे. यातून तुमचा फक्त चेहरा मालकांना दिसेल. या स्पिकरमधून तुम्हाला जे काही बोलायचं आहे, ते तुम्ही बोला. मालक ते ऐकून मग सांगतील मला की, तुम्हाला आत भेटायला न्यायचं का नाही ते…”
मी हळूच सौरभकडे बघितले. त्याने खुणेनेच मला बोलणं सुरू करायला सांगितलं. कॅमेरा सुरू झाल्यावर मी राजेशशी बोलायला सुरुवात केली. वेळ जसजशी पुढे चालली होती तसतशी माझी काळजी वाढत होती. राजेशला नीटसं काही आठवत नाही, हे ऐकून मला धक्काच बसला. असं कसं शक्य आहे, तेच समजत नव्हते मला. शेवटी एक घंटा वाजली आणि कॅमेरा बंद झाला. मी बोलायची थांबले.
“ताई, चहा, कॉफी, ज्यूस काय आणू तुमच्यासाठी ते सांगा. काही झालं तरी, मालकांचे पाहुणे आहात तुम्ही दोघं. एसी रूममध्ये बसून देखील तुमच्या चेहऱ्यावर किती घाम आला आहे.”
“अं…” मी भानावर आले आणि कपाळावर हात लावून बघितला तर तो माणूस म्हणाला तसा केवढा तरी घाम आला होता. मी चटकन पर्स उघडली आणि आतून रुमाल काढून तो पुसत त्या माणसाला म्हणाले की, “मला फक्त साधं पाणी द्या प्यायला.”
“ठीक आहे,” असं म्हणून त्याने तिथल्या टेबलावर असलेला फोन उचलून कोणाला तरी माझ्यासाठी पाणी आणायला सांगितलं. मी पाणी पित असतानाच त्या माणसाचा मोबाइल वाजला. फोनवर मोजके बोलून त्याने फोन बंद केला आणि तो माणूस मला म्हणाला, “माफ करा ताई. मालकांनी तुम्हाला परत जायला सांगितले आहे. तुम्ही आता निघालात तरी चालेल.”
“अहो पण… असं कसं होईल? मी आमच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या तरी देखील असं कसं म्हणाले तुमचे मालक. प्लीज, जरा पुन्हा एकदा विचारून बघा ना तुमच्या मालकांना…” माझ्या आवाजातला फरक सौरभच्या लक्षात आला.
“आई, ते म्हणाले तसं आपण निघू इथून आतातरी. उद्या परत बघू प्रयत्न करून…”
“अरे पण…”
“आई, चल उठ…” असं म्हणून सौरभने मला बळेबळे तिथून उठवलं. त्या माणसाला धन्यवाद देत मी निराश होऊन तिथून निघाले सौरभबरोबर.
“ताई, हे म्हणाले तसं तुम्हाला शक्य असल्यास उद्या परत येवून काहीतरी नवीन गोष्टी सांगा मालकांना. ताई, मालकांना आजकाल थोडं विस्मरण होते, असं मध्यंतरी त्यांना तपासायला आलेले डॉक्टर म्हणाले होते.”
सावकाश पावलं टाकत आम्ही गेटच्या बाहेर पडलो. मी विमनस्क अवस्थेत गाडीत बसले. पण तो ‘विस्मरण’ शब्द उगाचच माझा जीव कासावीस करत होता.
“आई, इथून जवळच महालक्ष्मी मंदिर आहे. तिथे जाऊन दर्शन घेतले की, तुला जरा बरं वाटेल…”
महालक्ष्मीचे देवालय खूपचं आवडलं मला. देवीसमोर हात जोडून मी राजेशची भेट होण्यासाठी विनंती केली. तिथल्याच आवारात दहा मिनिटं बसल्यावर मी आतून जरा शांत झाले तरी, सुद्धा राजेशने मला न ओळखावं, याचं मला राहून राहून आश्चर्य वाटले.
आमची गाडी हॉटेलच्या जवळ पोहोचत असताना सौरभ माझ्या मांडीवर हात ठेवून मला म्हणाला, “आई, सकाळच्या प्रकाराने तू लगेचच निराश नको होऊस. माझं मन मला सांगतंय की, काहीतरी चुकतंय आणि यातून आपण इथे आहोत तोपर्यंत काही तरी मार्ग निघेल.”
“हं…” मी बोलण्याच्या स्थितीत नव्हते.
गाडी हॉटेलच्या आवारात थांबली. आम्ही दोघेही त्यातून उतरून रिसेप्शनच्या पुढून लिफ्टच्या दिशेने चालायला सुरुवात केली. इतक्यात सौरभला कोणीतरी मागून हाक मारली. मागे रिसेप्शनचा एक अधिकारी सौरभला बोलवत होता. आम्ही दोघेही परत वळून रिसेप्शनजवळ गेलो. तो अधिकारी आम्हाला म्हणाला, “चित्रकार लांजेकरांच्या बंगल्यावरून फोन आला होता तुमच्यासाठी काही वेळापूर्वी. तुम्हाला दोघांना संध्याकाळी सहा वाजता तिथे बोलावलं आहे.”
ते बोलणं ऐकून मी मनोमन महालक्ष्मी देवीचे आभार मानले. पण राजेशच्या बंगल्यावरून आम्ही निघून तास-दोन तास नाही झाले तेवढ्यात, असं अचानक काय झालं की, आम्हाला परत तिथून बोलावणं आलं, याचं मला आश्चर्य वाटलं.
“आई, मी म्हणालो होतो ना तुला की, तू लगेच निराश होऊ नकोस. काहीतरी मार्ग निघेल म्हणून!” सौरभ माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला.
त्याच आनंदात आम्ही दोघेही लिफ्टमध्ये शिरलो.
क्रमशः