आराधना जोशी
साहित्य
पिवळी मूगडाळ – 1 वाटी
उडदाची डाळ – 2 टेबलस्पून
मीठ – चवीनुसार
हिंग पावडर – पाव छोटा चमचा
बारीक चिरलेला कांदा – अर्धी वाटी
हिरवी मिरची – 2 नग
उकडून घेतलेले स्वीट कॉर्न – अर्धी वाटी
बारीक चिरलेली हिरवी सिमला मिरची – अर्धी वाटी
किसलेले गाजर – अर्धी वाटी
बारीक चिरलेला टोमॅटो – पाऊण वाटी
जिरं – 1 लहान चमचा
हळद – अर्धा लहान चमचा
बेकिंग सोडा किंवा इनो – 1 टी-स्पून
आलं – 1 टेबलस्पून
बारीक चिरलेली कोथिंबीर – पाव वाटी
बटर किंवा तेल – आवश्यकतेनुसार
पुरवठा संख्या (Servings) : मध्यम आकाराचे 5 मूंगलेट
तयारीस लागणारा वेळ :
डाळ भिजण्यासाठी 4 तास
बाकी तयारीसाठी 20 मिनिटे
शिजवण्याचा कालावधी : 15 मिनिटे
एकूण वेळ : 4 तास 35 मिनिटे
हेही वाचा – Recipe : खमंग कोबी पोहे अन् पास्ता सलाड
कृती
- मूग डाळ आणि उडदाची डाळ एकत्र करून दोन, तीनदा स्वच्छ धुवून घ्या. किमान चार तास किंवा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. नंतर भिजवलेली डाळ उपसून सगळे पाणी निथळून घ्या.
- मिक्सरच्या भांड्यात पाणी निथळून घेतलेली डाळ, हिरवी मिरची आणि आलं घालून छान वाटून घ्या. वाटताना कमीत कमी पाण्याचा वापर करा. वाटलेले मिश्रण हे साधारणपणे पॅनकेकच्या मिश्रणाप्रमाणे किंवा डोश्याच्या मिश्रणापेक्षा थोडे घट्ट असावे.
- मिश्रण एका भांड्यात काढून घ्या. मग त्यात हळद, चवीनुसार मीठ, जिरं, कांदा, सिमला मिरची, गाजर, टोमॅटो, मक्याचे दाणे, हिंग, चिरलेली कोथिंबीर घालून एकजीव करा.
- एक छोटा तवा किंवा फ्राईंग पॅन गॅसवर मध्यम आचेवर गरम करायला ठेवा. त्यात थोडेसे तेल किंवा बटर घाला आणि ते सगळीकडे पसरवून घ्या.
5. पॅन गरम झाल्यावर वाटलेल्या डाळीच्या मिश्रणात इनो घालून सगळे एकत्र करा.
6. आता पळीने वाटलेल्या डाळीचे मिश्रण पॅनमध्ये घाला. ही मूंगलेट धिरड्यासारखी पातळ नसतात तर पॅनकेक प्रमाणे थोडी जाड असतात. अर्थात तुमच्या आवडीनुसार मू़ंगलेटची जाडी कमी जास्त करू शकता.
- मिश्रण पसरवून झाले की कडेने थोडेसे तेल किंवा बटर सोडा.
- एक बाजू खरपूस झाली की, मूंगलेट उलथवून दुसरी बाजूही खरपूस भाजून घ्या. दोन्हीकडून छान खरपूस झाल्यावर मूंगलेट प्लेटमध्ये काढून घ्या
- उरलेल्या मिश्रणाचेही वरील कृतीनुसार मूंगलेट करून घ्या.
- गरमागरम मूंगलेट हिरवी चटणी, टोमॅटो केचप यासह सर्व्ह करा.
विशेष आहार माहिती : शाकाहारी, प्रोटीनयुक्त
हेही वाचा – Recipe : नारळाच्या रसातील अळूवडी
टीप
- उडदाची डाळ पचायला जड वाटत असेल तर वगळली तरी चालेल.
- मिश्रण वाटून झाल्यावर शक्य असेल आणि हातात वेळ असेल तर मिश्रण छानपैकी किमान 5 मिनिटे फेटून घ्या. मिश्रणात जेवढी हवा मिक्स होईल तेवढी मूंगलेट हलकी होतील.
- आवडत असेल तर जाडसर किसलेला बीट मू़ंगलेटचे मिश्रण पॅनमध्ये घातल्यावर टॉपिंग म्हणून वापरू शकता.
- यात वापरलेल्या भाज्या आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता
- टोमॅटो, कांदा सगळ्या मिश्रणात घातला तर काहीवेळा मिश्रण पातळ होऊ शकते. त्यामुळे भाज्या एकदम घालण्यापेक्षा एका मू़ंगलेटचे मिश्रण वेगळ्या बाऊलमध्ये काढून त्यात भाज्या आणि चिमूटभर इनो घालून मग मूंगलेट केलं तरी चालेल. अशावेळी सगळ्या मिश्रणात इनो घालू नका.


