Saturday, August 30, 2025

banner 468x60

Homeललितलक्ष्मीव्रत... जहिराच माझी ‘छकुली’

लक्ष्मीव्रत… जहिराच माझी ‘छकुली’

प्रदीप केळुसकर

गणपती जवळ आले होते. मुंबईत त्याची तयारी सुरू झाली होती. जयवंतरावांचा गणपती कोकणात. त्यामुळे त्यांना गावी जायची इच्छा होती. कालच त्यांनी सावंतवाडी ट्रेनची दोन तिकिटे मिळविली होती. उषाताई आठवून आठवून गावी न्यायच्या वस्तूंची यादी करत होत्या. त्यांनी गावच्या जावेसाठी साडी, पुतणीसाठी ड्रेस मटेरिअल, दीरासाठी लेंगे… शिवाय मिठाई, अगरबत्ती, कापूर, लवंगा, मिरी, दालचिनी… खरेदी करून ठेवले होते. परवा पहाटे दादर स्टेशनवर पोहोचायचं होत.

जयवंतराव सात वर्षांपूर्वी मिलमधून निवृत्त झाले. त्यामुळे रोज सकाळी बस पकडून लालबागला जाणे थांबले. मिळालेले पैसे व्यवस्थित गुंतवून त्याच्या व्याजातून दोघांचा उदरनिर्वाह सुरु होता. ते सकाळी पार्कमध्ये फिरायला जात. मग घरी येऊन नाश्ता करून बाजारात भाजी, मासे आणत. मग आंघोळ, पूजा… दुपारी थोडी झोप, पेपर वाचणे, पुस्तके वाचणे… संध्याकाळी ते आणि उषाताई बागेत फिरायला जात. कधीमधी दादरला जाऊन नाटक बघत किंवा लालबागला जाऊन मित्र बेलवळकर यांच्या दुकानात बसत.. गप्पा मारत.

आज सकाळी पण जयवंतराव बागेत फिरायला गेले होते आणि इकडे उषाताई गणपतीला गावी जाण्यासाठी बॅग भरत होत्या. उषाताईंच्या लक्षात आले, ‘अजून काही छोटी खरेदी करायला लागेल. त्यासाठी दादर मार्केटमध्ये जायला हवे.’ विचार करत त्या किचनमध्ये गेल्या. तेवढ्यात बाहेर धड धड दार वाजले. ‘कोण आले असेल, यावेळी? कारण, नवरा आला तर दाराची कडी हळू वाजवतो. अशी धडधड करत नाही,’ असं मनात म्हणत त्यांनी दार उघडलं. तर, बाहेर ज्या बागेत जयवंतराव फिरायला जायचे, तिथला वॉचमन होता. तो घाबरून बोलायला लागला…

“साब घुमते घुमते नीचे गिरे..”

“काय?” त्या जोरात किंचाळल्या.

“हां. बेहोष हो गये. हमने तुरंत KEM हॉस्पिटलमध्ये एडमिट किये हैं. आप चलिए…”

उषाताईंना दरदरून घाम फुटला. तरीपण उसने अवसान आणत त्यानी विचारले, “आता कसे आहेत?”

“हॉस्पिटल में एडमिट किया है… आप चलिए…”

उषाताईंनी कुलूप लावले आणि त्या खाली उतरल्या. त्या वॉचमनने टॅक्सी बोलावली, त्यात त्या बसल्या आणि हॉस्पिटलकडे निघाल्या. बाहेरच्या ऑफिसमध्ये चौकशी केल्यानंतर त्यांना कळले, पाचव्या मजल्यावर न्युरो विभागात ॲडमिट केले आहे. त्या पाचव्या मजल्यावर पेशंटजवळ पोहोचल्या… एक सलाइन लावलेले होते. जयवंतराव बेशुद्ध होते. त्यांनी हेडनर्सकडे चौकशी केली. त्यांनी उडवाडवीची उत्तरे दिली… “डॉक्टर दुपारी येतील, तेव्हा पुढची ट्रीटमेंट सुरू करू.”

हेही वाचा – लक्ष्मीव्रत… जहिराची कहाणी

उषाताईंच्या लक्षात आलं, झटपट ट्रीटमेंट सुरू व्हायला हवी, नाहीतर उशीर होईल. पण काय करावे ते त्यांना समजेना.

जयवंतरावांचे लालबागमधील मित्र होते… बेलवलकर. त्यांनी बेलवालकरांना फोन लावला. पण ते सासुरवाडीला कोल्हापुरला गेले होते. उषाताईंना रडू आले. आपण आयुष्यभर पुण्य केले. कधी कुणाला दुखावल नाही. जमेल तशी प्रत्येकाला मदत केली. आणि आज आपल्या नवऱ्याला मदत हवी आहे, त्यावेळी कुणी नाही! त्यांना त्यांच्या मुलीची, छकुलीची आठवण आली… छकुली असती तर जिथे कुठे असेल तेथून धावली असती. पण, छकुलीही नाही… ती पण देवाघरी गेली.

पदर डोळयांना लावून उषाताई पॅसेजमध्ये बसल्या होत्या. हॉस्पिटलमध्ये नेहमीसारखी गडबड होती. नर्स, वार्डबॉय इकडून तिकडून धावत होते. नवीन नवीन पेशंट येत होते, जुने जात होते… एक नर्स त्याच पॅसेजमधून चालली होती… ती उषाताईंच्या जवळून जाताना अचानक थांबली. तिने त्त्यांचे क्षणभर निरीक्षण केले आणि ती जवळजवळ ओरडलीच, “माँ जी आप!”

उषाताईंनी चमकून वर पाहिले. एक नर्स त्यांच्याकडे आनंदाने पहात होती. ओळखीचा चेहेरा वाटत होता. एक क्षण… दोन क्षण… त्यानी ओळखलं… “जाहिरा?”

“हां माँ जी, मैं यह हॉस्पिटल में नर्स हूं… मगर आप?”

उषाताईंना वाटलं, प्रत्यक्ष देवानेच हिला पाठवलं. त्या जाहिराला मिठी मारून रडू लागल्या. त्यांनी तिला जयवंतरावांच्या रूमपाशी नेलं.

“जहिरा.. माझे पती… वाचव त्यांना…”

जहिरा झटकन पेशन्टपाशी गेली. तिने त्यांच्या टेबलावरील पॅड उचलला आणि वाचला… आणि धावत बाहेर गेली. पाच मिनिटांत दोन डॉक्टर्स तिच्यासमवेत आले. त्यांनी जयवंतरावांना तपासले आणि सिटी स्कॅनसाठी पाठवलं. जहिरा स्वतः त्यांना घेऊन गेली. पेशंटची रांग असताना सुद्धा तिने झटक्यात सिटी स्कॅन करून घेतलं आणि MRI साठी घेऊन गेली. एक तासात ते दोन्ही रिपोर्ट्स डॉक्टरच्या समोर ठेवले आणि ट्रीटमेंट सुरू झाली.

डॉक्टर्सनी इंजेक्शन्स, औषधे लिहून दिली. जहिराने दहा मिनिटात आणून दिली. उपचार सुरू झाले. जहिरामुळे आता सर्व स्टाफ पेशंटकडे लक्ष देऊ लागला… संध्याकाळी मोठे डॉक्टर आले. त्यानी सर्व रिपोर्ट्स पाहिले.

“पेशंट थोडक्यात वाचला. वेळेत इंजेक्शन शरीरात गेले म्हणून क्लॉट विरघळला. अर्धा तास उशीर झाला असता तर, पेशन्ट कोमात गेला असता… आता काळजी नाही. डाव्या बाजूला लकवा आला आहे, पण फिजिओथेरपीने बरे करता येईल…”

उषाताई डबडबलेल्या डोळ्यांनी जाहिराकडे पहात होत्या. जहिरा देवीसारखी मागे उभी राहिली. जाहिरा त्यांना म्हणत होती… “माँ जी आप घर जाईये. मैंने नाइट ड्युटी ली है… मैं हूं यहाँ…”

“अगं पण.. तुला किती त्रास?”

“त्रास कसला माँ जी.. मेरे जगह तुम्हारी छकुली होती तो… तुम्ही त्रास म्हटला असता काय? आराम से जाओ घर.. यह मेरा मोबाइल नंबर ले लो… वाटलं तर फोन करा. पण आरामात झोपा. तुमची लडकी आहे इथे अब्बा बरोबर!”

डोळे पुसत उषाताई घरी गेल्या. रात्री त्यांनी जहिराला फोन करून चौकशी केली. जहिराने त्याना आनंदाची बातमी सांगितली…’, अब्बांनी डोंळे उघडले आणि माझ्याकडे पहात होते.

सकाळी जाहिराचा फोन आला, “माँ जी… अब्बू खतरेसे बाहर हैं.. परेशानी की बात टली… आप आराम से आईये… मैं अभी घर जा रही हूं… मैंने स्टाफ को बोल रखा है, मेरे अब्बू एडमिट है कर के.. वह ध्यान देंगे… मैं फिर शाम को आती हूं… मैंने नाइट ड्युटी ली है…”

उषाताईंनी पेज करून घेतली आणि त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. जयवंतराव शुद्धीत होते. सलाइन लावले होते. उषाताईंना पहाताच त्या डिपार्टमेंटमधील सर्व नर्स, वार्डबॉय त्यांच्याकडे प्रेमाने पाहू लागले.. एका नर्सने काल रात्रीपासून पेशंटच्या तब्येतीत कशी सुधारणा आहे, हे सांगू लागली… काल याच वेळेस याच नर्सेस पेशंटकडे आणि आपल्याकडे ढुंकूनही पहात नव्हते, पण तीच मंडळी नम्र झाली आहेत! अर्थात, हे जहिरामुळे… हे त्याना माहीत होते.

दुपारपासून जयवंतराव बोलू लागले होते. त्यांनी पहिलाच प्रश्न केला, “कालपासून एक नर्स सतत धडपडत आहे. डोळयांतील पाणी पुसत पुसत ती माझे अंग पुसत होती. कोण ओळखीची आहे का तुझी?”

“होय.. मागे मी तुम्हाला सांगितलं होतं… मुंबईत दंगल सुरू होती. माझी लक्ष्मीव्रताची पूजा सुरू होती. तेवढ्यात एक मुस्लिम तरुणी घरात घुसली, तिच्यामागे गुंड लागले होते. मी माझ्या लक्ष्मीपूजेची फिकीर न करता त्या मुलीला गुंडापासून वाचवले… माझ्या छकुलीच्या वयाची होती ती. मला तर ती छकुलीच वाटली. ती हीच मुलगी जहिरा! या हॉस्पिटलमध्ये हेडनर्स आहे… आपले नशीब म्हणून ती मला भेटली. ती याच डिपार्टमेंटमध्ये आहे. कालपासून तीच धावते आहे. डॉक्टर्सना तिनेच आणले. तुमचे सिटी स्कॅन, MRI करून घेतले. मला रात्री घरी पाठवले आणि सलग दोन ड्युटी केल्या तिने. घरी गेली आहे, पुन्हा नाइट ड्युटी मागून घेतली आहे, संध्याकाळी येईल ती.”

जयवंतरावांच्या डोळ्यात पाणी आले.. “कोण कुठली ही मुलगी… ना ओळखीची ना धर्माची.”

“मला तर सतत छकुली दिसत असते तिच्यात!”

सतत चार दिवस जहिराने नाइट ड्युटी घेतली. त्यामुळे उषाताईंना उसंत मिळत होती. जयवंतरावांची तब्येत सुधारत होती. पाचव्या दिवशी जयवंतरावांना डिस्चार्ज मिळाला.. पण फिजिओथेरपी उपचार करणे आवश्यक होते. डॉक्टरनी उषाताईंना बोलावून समजावून सांगितले. आता डिस्चार्ज मिळणार, मग फिजिओ ट्रीटमेंट? पण त्यासाठी परत हॉस्पिटलमध्ये यावे लागणार की काय? उषाताईंना टेन्शन आले. त्यांनी जहिराला फोन लावला,

“अगं, आज संध्याकाळी यांना सोडणार हॉस्पिटलमधून. मग पंधरा दिवस फिजिओ ट्रीटमेंट घ्या, असे म्हणतात डॉक्टर. मग रोज यांना हॉस्पिटलमध्ये आणावे लागणार. कोण आहे माझ्याकडे हे करायला?”

‘माँ जी फिक्र मत करो. मेरा हजबंट फिजिओ में एक्स्पर्ट हैं. जुहू के बडे हॉस्पिटल में वह फिजिओ देता हैं. मैं शाम को आती हूं उसके साथ. बाद में अब्बू को डिस्चार्ज लेंगे…”

उषाताईंच्या डोक्यावरील टेन्शन नाहीसे झाले. संध्याकाळी जहिरा आली आपल्या नवऱ्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये. “माँ जी, यह मुराद… मेरा हजबंट…”

उषाताई बघतच राहिल्या… उंच. गोरा हसतमुख मुराद. त्याने खाली वाकून उषाताईंना नमस्कार केला.

“और यह मेरी माँ. दंगों में यह माँ ने मुझे बचाया…”

जहिराने मुरादशी ओळख करून देताना, ‘यह मेरी माँ..’ असं म्हटले… हे उषाताईंना ऐकले, त्यांचे मन जहिराच्या प्रेमाने भरून आले.

जयवंतरावांना जहिराने मुरादच्या मदतीने घरी आणले आणि त्याच दिवसापासून मुरादने ट्रीटमेंट सुरू केली. हसतमुख मुराद विनोद करत, गप्पा मारत जयवंतरावना मालिश करत होता. जयवंतराव पण मुरादवर खूष होते. आता रोज संध्याकाळी मुराद येत होता. मालिश करत होता. वेगवेगळे लाइट्स त्यांच्या डाव्या हातावर सोडत होता, हाताचे व्यायाम करून घेत होता. अधूनमधून जाहिरा येत होती… येताना शाहीकुर्मा, बिर्याणी आणत होती. तिच्या हातची बिर्याणी जयवंतरावना खूप आवडायची. मुराद यायच्यावेळी उषाताई कधी शिरा, कधी पुरणपोळी, कधी घावणे करत होत्या. मुराद आणि जहिरा ते आनंदाने खात होते.

मुरादच्या ट्रीटमेंटने जयवंतरावना खूपच बरे वाटू लागले. आता ते व्यवस्थित चालू लागले. दोन्ही हात हलवू लागले. स्वतः आंघोळ करू लागले. जवळपास पूर्वीचे जयवंतराव झाले.

आता हळूहळू जहिरा आणि मुराद यायची बंद होतील म्हणून उषाताई हळव्या होत होत्या. त्यांना आता त्त्यांची सवय झाली होती. मुराद आला की, त्याचे विनोद.. गप्पा.. मोठ्याने हसणे तर जहिरा आली की, उषाताईना घरात मदत करणे, भांडी घासून देणे, ओटा पुसणे, त्यांच्या हातचे वरणभात खाणे आता थांबणार होतं.

जवळजवळ वीस दिवस मुरादने घरी येऊन ट्रीटमेंट दिली होती. त्याचे बिल दयायचे होते. एकदिवस उषाताईनी जहिराला विचारले, “जहिरा.. मुरादने छानच ट्रीटमेंट दिली ती सुद्धा घरी येऊन. नाहीतर रोज हॉस्पिटलमध्ये न्यायला आणि आणायला माझ्याकडे कोण होतं? आता त्याचे काम संपले बहुतेक. त्याचे बिल किती झाले सांग. बँकेतून पैसे आणायला हवे ना…”

जहिरा रागाने म्हणाली, “माँ जी.. समझीए तुम्हारे छकुली ने या उसके मर्द ने ट्रीटमेंट दी होती तो वह कितने पैसे बोलता?”

“अग पण असं नाही जहिरा… शेवटी तुमचा व्यवसाय आहे ना तो?”

“पैसा पैसा क्या है.. तुमने दंगों में गुंडों से बचाया, तो कितने पैसे लिए थे मुझसे?”

जहिरा किंवा मुराद पैसे घेणार नाहीत, हे लक्षात आल्यावर उषाताईंनी जहिरासाठी सोन्याची चेन आणि मुरादसाठी अंगठी खरेदी केली.

दिवाळी आली. उषाताईंनी जाहिराला आणि मुरादला घरी बोलावले. दिवाळी सण म्हणून जहिरा साडी नेसून आली तर, मुराद सुटात आला. जयवंतराव आज खूश होते. आज जणू त्त्यांची लेक आणि जावई दिवाळी सणासाठी आले. उषाताईंनी जाहिराला खाली पाटावर बसवले आणि कुंकावाची डबी घेऊन आल्या.

“जहिरा.. मागे लक्ष्मीव्रताच्या दिवशी आलेलीस. तेव्हा मला कुंकू लावा असे म्हणालेलीस. आठवतंय ना.. आज मी तुला कुंकू लावतेय, माझी लेक म्हणून…”

“होय, माँ जी. कसे विसरेन तो दिवस? त्या दिवशी तुम्ही दार उघडलात म्हणून. नाहीतर, या जाहिराचं काय झालं असतं?”

“माझी लेक अशी अडचणीत सापडली असती तर, तुझ्या अम्मीने पण तिला घरात घेतलंच असतं ना? मी त्यावेळी तुला घरात घेतलं म्हणून मला तुझ्यासारखी लेक मिळाली आणि मुरादसारखा जावई मिळाला. माझ्या संकटाच्या वेळी जी धावून येते ती खरी माझी मुलगी आणि जावई. धर्म कुठलाही असेना.”

“होय, माँ जी…”

“…आणि हे ‘माँ जी.. माँ जी’ काय लावलंस? ‘आई’ म्हणून हाक मार मला… आणि हे बाबा!”

सद्गदित होत जहिरा उठली आणि तिने उषाताईंना मिठी मारली. “होय आई… बाबा…” “आम्ही म्हातारे या मुंबईत एकटेच राहतो. जाहिरा, तूच माझी छकुली…”

“होय आई.. मी तुझी छकुली..

“मागे इथून गेलीस ती गेलीस… एकदम हॉस्पिटलमध्ये भेटलीस! असं करत का कोणी आपल्या आई बाबांसोबत?”

“चूक झाली आई, बाबा चूक झाली.. आता तुम्हाला दोघांना संभाळायची जबाबदारी आमची… आम्ही येत राहू, तुमची चौकशी करत राहू… तुमची छकुली आहे तुमच्या सोबत..”

रडत रडत जाहिरा उषाताईंचे डोळे पुसत होती…

समाप्त

मोबाइल – 9307521152/9422381299

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!