Saturday, August 30, 2025

banner 468x60

Homeललितशोध कळणाच्या भाकरीचा!

शोध कळणाच्या भाकरीचा!

पराग गोडबोले

काल बऱ्याच दिवसांनी भोजनाला कळणाच्या भाकरीचा बेत होता. घरी ही भाकरी झाली की, मी आणि बायको हसतो खळखळून, जुन्या आठवणी आणि आमच्या घोर अज्ञानाची आठवण काढून!

साधारण 1996-97चा काळ असावा, आम्ही नुकतेच डोंबिवलीला राहायला आलो होतो. आम्ही म्हणजे, मी, सौ आणि चार वर्षांचा लेक. स्वतःच्या वेगळ्या संसाराची नव्याची नवलाई आणि तारुण्याचा जोश सोबतीला होताच. हळूहळू स्थिरावत होतो नव्या ठिकाणी, नव्या शहरात आणि नव्या संसारात… आईवडिलांच्या सुरक्षित छत्राखालून बाहेर पडून, नव्या जबाबदारीला खांद्यावर घेऊन.

स्वयंपाकघरात पण नवेनवे प्रयोग होत होते. सौ तशी जात्याच सुगरण त्यामुळे जिभेचे चोचले पुरवले जातच होते निरंतर. व्होल्टासमध्ये नोकरीला होतो. कंपनीत छान जेवण असायचं, त्यामुळे दुपारच्या जेवणाचा डबा वगैरे काही भानगड नव्हती. खाण्यापिण्याचे सगळे प्रयोग संध्याकाळी नाहीतर, सुटीच्या दिवशी.

पोळ्या, फुलके वगैरे अगदी सुबक आणि मऊसूत करायची ही, पण भाकरी म्हणजे पार छत्तीसचा आकडा! जेवढ्या सुंदर पोळ्या असायच्या त्याच्या बरोब्बर उलट भाकरी, थाळीफेक खेळायच्या उपयोगी येतील अशा भरीव आणि दमदार.

हेही वाचा – Mother and son : आईची कहाणी

मग कारणं यायची, आज काय पीठच जुनं होतं… विरी जात होती… थापायला जमतच नव्हतं… भेगाळतच होतं… उद्या काय पीठ जाडच आलं… परवा काय, किती पिठवडा होतो भाकरीचा, कंटाळा येतो आवरायचा मागचं, वगैरे वगैरे.

या सगळ्यात भाकरीच्या आनंदाला मी मुकायचो आणि मग डोंबिवलीतल्या अगणित पोळी-भाजी केंद्रांपैकी कुठूनतरी भाकरी घेऊन यायचो आणि दुधाची तहान ताकावर भागवायचो.

सरावाने मग हळूहळू तिला भाकरी जमायला लागल्या आणि तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी वगैरे भाकरी आमच्या घरात वरचेवर नांदू लागल्या. मस्त वाटायचं खरपूस भाकरी तव्यावरून थेट पानात आली की, वेगवेगळ्या तोंडी लावण्यांसोबत!

अशातच मी ऑफिसमधल्या एका मित्राकडे जेवायला गेलो होतो. त्याच्याकडे भाकरी आणि भरल्या वांग्याचा खास बेत होता. खान्देशी मित्र, त्यामुळे झणझणीत भरली वांगी आणि काहीशी वेगळीच भासणारी भाकरी होती. मस्त हाणल्या भाकरी, वर पेलाभर ताक रिचवलं आणि मित्राच्या बायकोला विचारलं, “वहिनी काय भारी भाकरी आहेत, कसल्या आहेत?”

“कळणाच्या आहेत,” म्हणाली ती. मला काहीच कळलं नाही, पण कुठे आपलं अज्ञान प्रकट करा, असा विचार करून गप्प राहिलो आणि परत एकदा जेवणाचं कौतुक करून निघालो.

घरी येताना वाटेत विचार करत होतो, हे कळण म्हणजे काय असतंय? नवीनच धान्य दिसतंय. आत्तापर्यंत न ऐकलेलं! घरी आल्यावर बायकोला विचारलं, ती पण अनभिज्ञ आणि माझ्यासारखीच अज्ञानी. त्यातून, हे नवं लचांड नको मागे लागायला म्हणून झटकून टाकलंन मला.

हेही वाचा – केल्याने होत आहे रे!

कळण मात्र फिट्ट बसलं होतं माझ्या डोक्यात. लागोलाग निघालो शोधायला. आमचे नेहमीचे वाणी म्हणजे सगळे गुजराती आणि मारवाडी. चार जणांकडे विचारलं. सगळेच याबाबतीत माझ्यापेक्षाही अडाणी! मोठ्या अपेक्षेने निघालो आणि ‘रिकाम्या पिशवीने’ परत आलो. बरं, तेव्हा ‘गूगल बाबा’ नव्हते दिमतीला, मोबाइल फोन पण नव्हते विचारायला, त्यामुळे माहिती मिळत नव्हती आणि हे कळणाचं भूत काही उतरत नव्हतं मानगुटीवरून.

शेवटी डोंबिवलीतलंच घराजवळ राहणारं, छान ओळखीचं खान्देशी कुटुंब गाठलं आणि त्यांच्या दाराची बेल वाजवली. जरा इकडचं तिकडचं बोलून सरळ विषयाला हात घातला आणि त्या वहिनी तर हसायलाच लागल्या पदराआडून. हसता हसता म्हणाल्या, “ते धान्य नसतंय हो!!!” मी आपला बावळट चेहरा करून बघत बसलो आणि त्यांनी उलगडा केला. “ते ज्वारी आणि उडीद यांचं मिश्रण असतंय. एक किलो ज्वारीला मी चारशे ग्रॅम उडीद घालते. हे आणलं दळून की झाला कळणा तयार.”

मी अचंबित. हे एवढं सोप्पं असतंय? और मैं दरदरकी ठोकरे खाते हुए भटक रहा था? मी माझी दर्दभरी कहाणी सांगितली त्यांना आणि त्यांनी उदार हस्ते मला चांगलं अर्धा किलो पीठ बांधून दिलं.

मी आपला मनात भाकरी खात घरी परतलो आणि बायकोने भाकरी थापून, सोबत अंबाडीची, माझ्या आवडीची, लसणाच्या चरचरीत फोडणीची गोळा भाजी रांधून, वर तेलाची धार धरून माझा अंतरात्मा शांत केला. तृप्त मनाने, ‘अन्नदाता सुखी भव’ म्हणत मी आंचवलं. उदर भरण नव्हे, यज्ञ कर्म पूर्ण झालं…

काल बायकोनं बऱ्याच दिवसांनी कळणाच्या भाकरी केल्या आणि हा सगळा जुना कुटाणा नजरेसमोर तरळून गेला. होतात अशा गमतीजमती आयुष्यात. त्या बांधायच्या कनवटीला आणि जगत राहायचं आयुष्य मनमुराद, नवे अनुभव घेत, स्वतःशीच हसत, कधी स्वतःलाच हसत…

मोबाइल – 9323277620

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!