अनिता बाळकृष्ण वैरागडे
मागील लेखात आपण काही आसनं आणि त्याचे फायदे बघितले होते. आता या लेखात आणखी काही आसनं आणि त्याचे फायदे पाहुयात.
अर्ध हलासन
अर्ध हलासन करताना पाठीवर सरळ झोपायचे. दोन्ही हात कमरेच्या बाजूला, तळवे जमिनीवर ठेवायचे. दोन्ही पाय हळूहळू वर उचलताना दीर्घ श्वास घ्यायचा आणि काही सेकंद थांबून हळूहळू श्वास सोडत पाय जमिनीवर ठेवायचे.
फायदे – शरीराची लवचिकता वाढते, श्वसनक्षमता वाढते. पोटाची कार्यक्षमता वाढते.
पूर्ण हलासन
हलासन हे प्रचलित आसन असले तरी त्याचा उल्लेख हठयोगाच्या कुठल्याच ग्रंथात नाही. 150 वर्षांपूर्वी जयतराम लिखित ग्रंथात ‘हालीपाव आसन’म्हणून वर्णन मिळते जे थोडेफार सध्याच्या हलासनाशी जुळते. त्यामुळे हलासन हे 150 वर्षांपूर्वी शोधले गेले व वापरात आले असावे.
हेही वाचा – Yoga is lifestyle : पाठदुखी दूर करणारी आसने
पूर्ण हलासन करताना पाठीवर सरळ झोपायचे. दोन्ही हात कंबरेच्या बाजूला ठेवायचे आणि हातांचे पंजे शरीराजवळ पालथे ठेवावे. दोन्ही पाय गुडघ्यात ताठ ठेऊन वर उचलावे. 90 अंशावर पोहचल्यावर हातांनी जमिनीवर दाब देऊन कंबरही वर उचलावी आणि दोन्ही पाय डोक्याच्या पलिकडे नेऊन पायांची बोटे जमिनीवर टेकवावीत. पाय उचलताना श्वासनाची क्रिया गतिशील ठेवायची. काही सेकंद थांबून हळूहळू पाय जमिनीवर ठेवायचे.
फायदे – मणक्याचा आणि पाठीचा कणा मजबूत होतो. पोटाचे स्नायू मजबूत होतात आणि कार्यक्षमता वाढते. मेंदूत रक्तभिसरण वाढतो. हृदय आणि फुफ्फुस यांना बळकटी येते.
सर्वांगासन
सर्वांगासन हे थोडं कठीण आसन आहे. सर्वांनाच करणे जमत नाही. योगसूत्रावरील वल्लभाचार्यांच्या किरणटीकेमध्ये आणि रुद्रयामलम् तंत्रात सर्वांगासनाचा उल्लेख आढळतो. पाठीवर सरळ झोपून, पाय एकमेकांजवळ ठेवावेत. तळहात शरीराच्या जवळच जमिनीवर पालथे ठेवावेत. हळूहळू श्वास घेत दोन्ही पाय गुडघ्यात न वाकविता 90 अंशांच्या कोनात सरळ वर उचलावेत. मग कंबर आणि नितंब वर उचलायचे आणि त्यावेळी हातांनी पाठीला आधार द्यायचा. पाय, कंबर आणि मान सरळ रेषेत असले पाहिजेत. डोळे बंद करून संथ लयीत श्वासोच्छवास सुरू ठेवावा. काही सेकंद थांबून. हळूहळू पाय जमिनीवर ठेवायचे.
फायदे – मेंदूला भरपूर प्रमाणात रक्तपुरवठा होतो. थायरॉईडसाठी अत्यंत उपयुक्त आहे. पाय, खांदे बळकट होतात.
हेही वाचा – Yoga is lifestyle : मकरासन, शलभासन आणि नौकासन
जीवन जगण्यासाठी जशी आपल्याला ऑक्सिजनची गरज असते.. तशीच योग, प्राणायाम आणि आसन हे आपल्याला या धावपळीच्या जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे, म्हणून नित्य नियमाने योग करा.