वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय पहिला
एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन । अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते॥35॥
हे वरी भलतें करितु । आतांचि एथें मारितु । परि आपण मनें घातु । न चिंतावा ॥225॥ त्रैलोक्यींचें अनकळित । जरी राज्य होईल एथ । तरी हें अनुचित । नाचरें मी ॥226॥ जरी आजि एथ ऐसें कीजे । तरी कवणाचां मनीं उरिजे । सांगे मुख केवीं पाहिजे । तुझें कृष्णा ॥227॥
निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन । पापनेवाश्रयेदस्मान्हत्वैतानाततायिनः ॥36॥
जरी वधु करूनी गोत्रजांचा । तरी वसौटा होऊनि दोषांचा । मज जोडलासि तूं हातींचा । दूरी होसी ॥228॥ कुळहरणीं पातकें । तिये आंगीं जडती अशेखें । तयें वेळी तूं कवणें कें । देखावासी ॥229॥ जैसा उद्यानामाजीं अनळु । संचरला देखोनि प्रबळु । मग क्षणभरी कोकिळु । स्थिर नोहे ॥230॥ सकर्दम सरोवरु । अवलोकूनि चकोरु । न सेवितु अव्हेरु । करूनि निघे ॥231॥ तयापरी तूं देवा । मज झकों न येसी मावा । जरी पुण्याचा वोलावा । नाशिजैल ॥232॥
तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान्स्वबान्धवान् । स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव॥37॥
म्हणोनि मी हें न करी । इये संग्रामीं शस्त्र न धरीं । हे किडाळ बहुतीं परी । दिसतसे ॥233॥
हेही वाचा – Dnyaneshwari : आग लागो या युद्धाला…
अर्थ
हे मधुसुदना ! मला ठार मारणाऱ्यांना देखील त्रैलोक्याचे राज्य मिळाले तरीही, मी त्यांना ठार मारण्याची इच्छा करीत नाही. मग पृथ्वीच्या राज्याची कथा काय? ॥35॥
उलटपक्षी हे वाटेल ते करोत, आताच पाहिजे तर आम्हास येथे मारोत, पण आम्ही यांच्या घाताची गोष्ट मनातही आणणे बरे नाही. ॥225॥ त्रैलोक्याचे समग्र राज्य जरी येथे मिळणार असले तरी, हे अयोग्य काम मी करणार नाही. ॥226॥ जर आज आम्ही येथे असे केले तर, मग आमच्याविषयी कोणाच्या मनात आदर राहील ? आणि मग कृष्णा, सांग तुझे मुख कसचे दिसणार? ॥227॥
हे जनार्दना! धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारून आमचे काय प्रिय होणार? या आततायींना मारले असता आम्हाला (कुलनाशाचे) पाप मात्र लागेल. ॥36॥
जर मी गोत्रजांचा वध केला, तर मी सर्व दोषांचे वसतिस्थान होईन आणि मग ज्या तुझी जोड लाभली आहे, तो तू हातचा जाशील. ॥228॥ कुळाच्या घाताने घडणारी सर्व पातके जेव्हा अंगी जडतील, तेव्हा तुला कोणी कोठे पहावे ? ॥229॥ ज्याप्रमाणे बगीचाला भयंकर आग लागलेली पाहून कोकिळ तेथे क्षणभारही थांबत नाही; ॥230॥ चिखलाने भरलेले सरोवर पाहून चकोर त्यात न रहाता, त्याचा त्याग करून तेथून निघून जातो; ॥231॥ त्याप्रमाणे हे देवा, जर माझ्या ठिकाणचा पुण्याचा ओलावा नाहीसा झाला, तर तू आपल्या मायेने मला चकवून माझ्याकडे येणार नाहीस. ॥232॥
म्हणून आमचे बांधव जे कौरव, त्यांना मारणे आम्हाला योग्य नाही. कारण, हे माधवा स्वजनांना ठार मारून आम्ही कसे बरे सुखी होऊ? ॥37॥
म्हणून मी हे करणार नाही; या लढाईमध्ये हत्यार धरणार नाही. कारण हे युद्ध अनेक प्रकारांनी निंद्य दिसत आहे, ॥233॥
हेही वाचा – Dnyaneshwari : ऐसियांतें कैसेनि मारुं । कवणावरी शस्त्र धरूं…