शीला जोशी
साहित्य
पडवळ – अर्धा किलो
फोडणीसाठी तेल, मोहरी, एक छोटा चमचा हिंग
सारणासाठी
ओलं खोबरं – एक मोठी वाटी
बेसन (चण्याचं पीठ) – अर्धी मोठी वाटी
कोथिंबीर – अर्धी मोठी वाटी
हळद – अर्धा टी-स्पून
तिखट – दोन टी-स्पून
गोडा मसाला – एक टेबलस्पून
मीठ – चवीनुसार
साखर – थोडीशी
पुरवठा संख्या (Servings) : 4 जणांसाठी
तयारीस लागणारा वेळ : 15 मिनिटे
शिजवण्याचा वेळ : 10 मिनिटे
एकूण वेळ : 25 मिनीटे
कृती
- पडवळ स्वच्छ धुवून पुसून घ्या. नंतर त्यांची सालं काढून टाका.
- सोललेल्या पडवळाचे जवळपास एक इंच लांबीचे तुकडे करून त्याच्या आतील बिया आणि इतर गर काढून टाका. या तुकड्यांना म्हणतात फुकण्या.
- आता एका भांड्यात ओलं खोबरं, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, बेसन, हळद, तिखट, गोडा मसाला, मीठ, साखर एकत्र करून त्याचं सारण तयार करा.
- आता हे सारण पळवळाच्या तुकड्यांमध्ये व्यवस्थित भरून घ्या. सारण भरून सगळे तुकडे तयार करा. सारण उरलं तर ते बाजूला ठेवा.
- कढईत फोडणी पुरते तेल घ्या. तेल गरम झाले की त्यात मोहरी घाला. मोहरी चांगली तडतडली की, मग हिंग घालून गॅस मंद आचेवर करा.
- आता फोडणीत पडवळाचे सारण भरलेले तुकडे एकेक करून ठेवा. सारण उरले असेल तर तेसुद्धा या तुकड्यांवर घाला. गॅस मंद आचेवरच ठेवा.
- पाच मिनिटांनी कढईवरचे झाकण काढून पडवळाचे तुकडे मोडणार नाहीत अशा बेताने भाजी हलक्या हाताने परतून घ्या. परत एकदा पाच मिनिटांसाठी कढईवर झाकण ठेवा.
- एक चांगली वाफ आली की, पडवळ शिजला आहे का ते बघा. तुकडे शिजले असतील तर गॅस बंद करून परत एकदा झाकण ठेवा.
- आतल्या वाफेवर तुकडे आणखी छान शिजतील. मग एका भांड्यात काढून पोळी (चपाती) बरोबर सर्व्ह करा. अत्यंत रुचकर भाजी तयार.
टीप
- पडवळ निवडताना फार जून घेऊ नये. कोवळे पडवळ चवीलाही छान लागतं आणि लगेच शिजतांतही.
- गोडा मसालाऐवजी घरात इतर दुसरा कोणता मसाला असेल तर तो वापरला तरी चालेल. अनेक घरांमध्ये वेगळे तिखट वापरत नाहीत. मसाल्यातच लाल मिरची टाकतात. अशावेळी मसाल्याचे प्रमाण आणि त्यातील तिखट याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणात मसाला वापरा. ही भाजी चवीला सौम्य असते.
- पडवळाचे एक इंच तुकडे करून त्यात मसाला भरण्याइतका वेळ नसला तर सरळ पडवळ मधे चिरून त्यातल्या बिया काढून इतरवेळी भाजी जशी लहान तुकड्यांमध्ये चिरून घेतो तशी चिरून घ्या. फोडणीला टाका. पडवळ अर्धवट शिजले की मग सारणासाठी वापरलेले साहित्य त्यात घालून छान मिक्स करा. एक चांगली वाफ आली की, गॅस बंद करा.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह त्या प्रसिद्ध केल्या जातील.