दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 12 ऑगस्ट 2025; वार : मंगळवार
भारतीय सौर : 21 श्रावण शके 1947; तिथि : तृतीया 08:40; नक्षत्र : पूर्व भाद्रपदा 11:51
योग : सुकर्मा 18:53; करण : बव 19:39
सूर्य : कर्क; चंद्र : मीन; सूर्योदय : 06:18; सूर्यास्त : 19:08
पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
अंगारक संकष्ट चतुर्थी – चंद्रोदय 09:17
मंगळागौरी पूजन
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – आजचा दिवस उच्च कामगिरीचा आणि उच्च वर्तुळात वावरण्याचा आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काही कष्ट घेत होतात, त्यांचे आज चीज होणार आहे. विविध मार्गाने आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक स्नेह मेळाव्याच्या केंद्रस्थानी व्यग्र राहाल.
वृषभ – नोकरदार जातकांना आज धनाची खूप आवश्यकता असेल परंतु, आधी केलेल्या अनावश्यक खर्चामुळे यावेळी आर्थिक भार जाणवेल. गरजेच्या कामाला वेळ न देणे आणि व्यर्थ कामात वेळ घालवणे घातक ठरू शकते.
मिथुन – कामाच्या दर्जामुळे वरिष्ठ प्रभावित होतील. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. तुमचे जोडीदार किंवा भागीदार पाठिंबा देतील आणि मदतही करतील. तुमच्या विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल.
कर्क – काही ठिकाणी जबरदस्त माघार घ्यावी लागू शकते. पण त्यामुळे कोसळून न जाता, अपेक्षित ध्येयासाठी कठोर परिश्रम घ्या. या कठीण प्रसंगी नातेवाईक देखील मदत करतील. जीवनसाथीच्या आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे खर्च वाढू शकतो.
सिंह – काही नवीन काम करण्याचा विचार कराल, परंतु, या कामात इतके व्यग्र होऊ शकतात की, गरजेचे काम ही सुटून जातील. कष्टाचे पैसे गुंतवताना नीट विचार करा. मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल.
कन्या – आर्थिक जीवनात आज आनंद राहील. यासोबतच कर्जापासून मुक्त होऊ शकता. घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामं पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस. नवी भागीदारी आशाजनक असेल.
हेही वाचा – Appeal : टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी…
तुळ – काही महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्यामुळे आपणास नव्याने अर्थसहाय्य उपलब्ध होईल. संकल्पना अपयशी ठरणार नाहीत, याची खात्री होईपर्यत त्या कोणालाही सांगू नका. दूरस्थ ठिकाणाहून एखादी चांगली बातमी संध्याकाळी उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे.
वृश्चिक – दयाळू स्वभावाचा प्रत्यय अनेकांना येईल. आपला रिझ्यूम पाठविण्यासाठी अथवा मुलाखत देण्यासाठी चांगला दिवस. परगावी प्रवास फारसा आरामदायी नसेल, पण त्यामुळे नवीन महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास मदत होईल.
धनु – नेहमीपेक्षा आज ऊर्जा कमी आहे असे जाणवेल. त्यामुळे अतिरिक्त कामाचा बोजा घेऊ नका. नोकरवर्ग, सहकारी आणि सहयोगी कर्मचाऱ्यांबाबतचे प्रश्न सुटणार नाहीत. चांगला धनलाभ झाल्याने आर्थिक समस्या काही अंशी दूर होऊ शकते.
मकर – भूतकाळात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे आज नैराश्य आणि मानसिक गोंधळ उडू शकतो. निष्काळजीपणामुळे काही तोटा निश्चितपणे होईल. व्यक्तिमत्त्वात सुधारणा घडविण्यासाठी योग्य ते बदल करा.
कुंभ – चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. इतरांना दुखावून नका आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. कामाच्या जागी धोरणीपणाने वागला नाहीत तर, नव्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
मीन – कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका, सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका. क्रिएटिव्ह व्यक्तींना आपल्या कामात जोडून घ्या आणि आपल्या कल्पनादेखील मांडा. आजचा दिवस लाभदायक असल्यामुळे अनेक घटक तुमच्या बाजूने असतील.
हेही वाचा – केल्याने होत आहे रे!
दिनविशेष
अवकाश वैज्ञानिक विक्रम साराभाई
टीम अवांतर
भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे जनक, अवकाश वैज्ञानिक, संशोधक, उद्योजक व द्रष्टे विक्रम साराभाई यांचा जन्म 12 ऑगस्ट 1919 रोजी अहमदाबाद येथे एका सधन कुटुंबात झाला. साराभाई यांचे शिक्षण अहमदाबाद येथील गुजरात कॉलेजमध्ये झाले. नंतर ते इंग्लंडला गेले आणि केंब्रिज विद्यापीठातील सेंट जॉन्स कॉलेजातून 1939 मध्ये रसायनशास्त्र आणि भौतिकी या विषयांतील ट्रायपास परीक्षा उत्तीर्ण झाले. दुसरे महायुद्ध सुरू झाल्याने ते भारतात परतले आणि बंगलोर येथील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये सर चंद्रशेखर व्यंकट रामन यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वकिरणांसंबंधी संशोधन केले. 1945मध्ये ते केंब्रिज येथील कॅव्हेंडिश लॅबोरेटरीत दाखल झाले. तेथे त्यांनी कॉस्मिक रे इन्व्हेस्टिगेशन इन ट्रॉपिकल लॅटिट्यूड्स हा प्रबंध लिहिला. त्याबद्दल त्यांना 1947मध्ये डॉक्टरेट मिळाली. 11 नोव्हेंबर 1947 रोजी अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीची त्यांनी स्थापना केली. येथेच त्यांनी भौतिकीचे प्राध्यापक म्हणून काम केले. 1965मध्ये ते या प्रयोगशाळेचे संचालक झाले. होमी भाभा यांच्या सक्रिय पाठिंब्याने 1963 मध्ये विक्रम साराभाईंनी देशातील पहिले रॉकेट लाँचिंग सेंटर तिरुवनंतपूरम् (त्रिवेंद्रम) जवळ अरबी समुद्रकिनाऱ्यावरील थुंबा या ठिकाणी उभारले, कारण हे ठिकाण विषुववृत्ताच्या बरेच जवळ आहे. इथूनच 21 नोव्हेंबर 1963 रोजी सोडियम बाष्प पेलोड तंत्र वापरून भारतातून पहिले रॉकेट यशस्वी रीतीने अवकाशात पाठविले. 1965 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने आंतरराष्ट्रीय अवकाश सुविधा म्हणून या केंद्राला मान्यता दिली. 1967 मध्ये त्यांनी अहमदाबाद येथे एक्स्परिमेंटल सॅटेलाइट कम्युनिकेशन अर्थ स्टेशन उभारले. आर्वी येथे त्यांनी उभारलेल्या उपग्रह संदेशवहन केंद्राचे त्यांच्या मृत्यूनंतर भारताच्या राष्ट्रपतींनी ‘विक्रम अर्थ स्टेशन’ असे नामकरण केले. होमी भाभा यांच्या निधनानंतर विक्रम साराभाई भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाचे सचिव झाले. साराभाई यांना अनेक मानसन्मान मिळाले. यात प्रामुख्याने उल्लेख करायचा झाल्यास शांतिस्वरूप भटनागर पारितोषिक, भारत सरकारचा पद्मभूषण हा किताब आणि पद्मविभूषण (मरणोत्तर) यांचा करावा लागेल. इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन या संस्थेने चंद्राच्या 21° अक्षांश व 24.7° रेखावृत्त येथील ‘बेसेल-ए’ या विवरास साराभाई हे नाव दिले आहे. 30 डिसेंबर 1971रोजी त्यांचे निधन झाले.