Saturday, August 30, 2025

banner 468x60

Homeललितलक्ष्मीव्रत… जहिराची कहाणी

लक्ष्मीव्रत… जहिराची कहाणी

प्रदीप केळुसकर

उषाताईंचं आत-बाहेर सुरू होतं. आज मार्गशीर्ष चौथा गुरुवार मागील तीन गुरुवारी व्रत पाळले. आज पूजा करून उद्यापन करायचे म्हणून धावपळ. त्यांचा चाळीतला दोन खोल्यांचा संसार, बाहेरची खोली त्या स्वयंपाकासाठी वापरत. आतली खोली बेडरुम. जयवंतराव सकाळी सहा वाजता निघत. सहा वाजून दहा मिनिटांची बस पकडली की, वीस मिनिटांत लालबाग. जयवंतराव दिग्विजय मिलमध्ये नोकरीला होते. सकाळी आठची ड्युटी. सायंकाळी सातला सुटत. वेळ असला तर लालबागला गणेश गल्लीतील बेलवलकर सोनारांच्या दुकानात थांबत. बेलवलकर जयवंतरावांचे खास मित्र. दोघांना वाचनाचा आणि नाटकाचा छंद. वाचलेल्या पुस्तकांची चर्चा करणे, पुस्तकांची अदलाबदल करणे आणि शेजारी मिळणारे थंडगार पियुष पिणे. अधुनमधून चांगल्या नाटकाला जाणे. आज सुद्धा जयवंतराव सहा वाजून दहा मिनिटांच्या बसने निघाले आणि मिलमध्ये आठच्या ड्युटीवर हजर झाले.

उषाताईंनी घर आवरलं आणि पूजेच्या तयारीसाठी फळे, फुले हवीत म्हणून कोपर्‍यापर्यंत जाण्यासाठी खिडकी उघडली. प्रथम खिडकी उघडायची आणि मग त्याच्या बाजूलाच असलेले दार उघडायचे हा त्यांचा नित्यक्रम. आजही चाळीतल्या पहिल्या मजल्यावरील जिन्याला लगटून असलेल्या खिडकीतून त्यांनी बाहेर रस्त्यावर पाहिले. तो काहीतरी विचित्र वातावरण दिसले. लोक पळत होते. नुकतीच उघडलेली दुकाने दुकानदार झटपट खाली घेत होते. भाजीवाले, फळवाले, कांदा-बटाटेवाले आपआपल्या गाड्या जोराजोरात ढकलत लांब चालले होते. उषाताई घाबरून दरवाजातून बाहेर आल्या. चाळीतील सर्व मंडळी आतून कडी लावून चडीचूप झाली होती. काय झाले काय, त्यांना समजेना. काहीतरी गडबड आहे खास. त्यांनी दरवाजा आतून बंद केला आणि टीव्ही सुरू केला. मुंबईत बॉम्बस्फोट झाले होते. दादर, वरळी, नरिमन पॉइंट आणि बर्‍याच ठिकाणी. आपण पुजेच्या तयारीत होतो त्यामुळे बाहेर काय झाले हे कळले नाही. बरीच माणसे मेली होती. अनेकांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवत होते. उषाताईंनी मनात म्हटले, जयवंतराव मिलमध्ये आहेत ते बरे आहे. आतमध्ये असल्याने सुखरुप आहेत. सगळे सुरळीत झाल्याशिवाय मिलमधील लोकं तसे बाहेर सोडणार नाहीत.

टीव्हीवर बातमीदार जोरजोरात सांगत होता, बॉम्बस्फोट घडविणारा मुख्य माणूस पाकिस्तानात होता आणि त्याच्या भारतातील हस्तकांनी हे स्फोट घडवून आणले होते. मुंबईत जाळपोळ सुरू झाली होती. काही धर्माच्या प्रार्थनास्थळांना आगी लावल्या होत्या. उषाताईंच्या मनात आले, आपण लग्न करून आलो त्याला 23-24 वर्षे झाली. या भागात सगळ्या धर्मांचे, अठरापगड जातीचे लोक राहतात. त्यांच्यात बरीच भांडणे, मारामार्‍या होतात. पण आपल्याला किंवा आपल्या नवर्‍याला कधीच त्रास नाही. गल्लीत दारूची भट्टी आहे. पण आपण जाताना-येताना पटकन शिव्या, मारामार्‍या बंद होतात. आपली छकुली लहान होती, तेव्हा खेळायला खाली जाई. तिला कधी कुणी त्रास दिला नाही. उलट…

उषाताईंच्या सर्व भराभर डोळ्यासमोर येत होते. आपली आठ वर्षांची छकुली तिला शाळेतून येताना एका गाडीवाल्याने उडवले. तेव्हा याच गल्लीतील माणसांनी तिला खांद्यावर घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचवले. रक्त लागेल म्हणून रक्तदात्यांची रांग लावली. पण एवढे करूनही छकुली वाचली नाहीच. तेव्हा सारी गल्ली चार दिवस जेवली नाही. एकुलती एक मुलगी छकुली गेली. त्याला झाली चौदा वर्ष. मरता येत नाही म्हणून जगतोय आम्ही दोघं. उषाताईंनी एक आवंढा गिळला आणि त्या बातम्या पाहू लागल्या.

हेही वाचा – केल्याने होत आहे रे!

मुंबईतील लोकल, बसेस, रिक्षा बंद झाल्या होत्या. लोकल बंद म्हणजे जामखेडकर भटजी पूजेला येऊ शकणार नाहीत. फळे, फुले मिळाली नाहीत ठीक आहे. आपण पूजा आटोपून घेऊ, असे स्वत:शीच म्हणत उषाताईंनी आतल्या खोलीत देव्हार्‍यातील लक्ष्मीचा फोटो बाहेर काढला. देव्हार्‍याखाली पाटावर त्यांनी लक्ष्मीचा फोटो ठेवला, निरांजनात तेल ओतले आणि ते पेटवणार एवढ्यात, “मुझे बचाओ, मुझे बचाओ” असा स्त्रीचा आवाज आणि दारावर धडका सुरू झाल्या. उषाताईंनी निरांजन खाली ठेवले आणि बाहेरच्या खोलीतील खिडकीतून बाहेर पाहिले. दरवाजावर एक 21-22 वर्षांची तरुणी रडत होती. दार ठोठावत होती, एका क्षणात उषाताईंना समजले. मुलगी संकटात आहे. त्यांनी पटकन दरवाजा उघडला, त्या सरशी ती तरुणी झटकन आत आली. धावून, पळून तिची छाती धपापत होती. सुटे केस उडत होते. तोंडभर घाम पसरला होता. “मुझे बचाओ माँ जी, वह लोग मेरे पीछे पडे हैं, मेरी इज्जत बचाओ माँ जी…” ती मुलगी काकुळतीला येऊन उषाताईंसमोर हात जोडत होती. उषाताईंनी झटकन दरवाजा आतून बंद केला. खिडकी बंद केली. त्या म्हणाल्या, “घाबरू नकोस, कोण लागलेत तुझ्या मागे?”

“वह गैरेज के मैकेनिक माँ जी, मेरी इज्जत लेंगे वह, आज दंगा फैला हुआ है, इसमें मुझे देखकर वह मेरे पीछे लगे हैं, मुझे छिपाओ माँ जी. मैं अब्बा की दवा लेने आयी थी…” तिने हातातली रिकामी बाटली उषाताईंना दाखविली.

“घाबरू नकोस, आतल्या खोलीत ये,” त्यांनी तिला आतल्या खोलीत नेले. तोपर्यंत दारावर जोराजोराने लाथा, काठ्या मारण्याचे आवाज ऐकू येऊ लागले होते. त्यांनी कानोसा घेतला. बाहेरून शिव्या आणि ओरडणे सुरू होते. “अरे, यह घर में घुस गयी हैं, वह साली, जाएगी कहां?” उषाताई आत आल्या अन् त्या मुलीला कुठे दडवायचे याचा विचार करू लागल्या. लक्ष्मीची पूजा मांडली होती, त्याच्या पाठीमागे पडदा होता त्या पडद्यामागे थोडी जागा होती. त्यांनी पटकन त्या मुलीचा हात पकडून तिला पडद्यामागे दडायला सांगितले.

दारावर लाथा मारणे सुरू होतेच. उषाताईंनी दरवाजा उघडला. बाहेर हातात सुरे, चाकू घेतलेले, दारू पिऊन अचकट-विचकट शिव्या देणारे पाच-सहा गुंड उभे होते. उषाताईंनी काही विचारण्याच्या आत ते आत घुसले, बाहेरची खोली, आतली खोली अगदी बाथरूमसुद्धा त्यांनी शोधली, पण त्यांना ती मुलगी सापडली नाही.

उषाताईंनी त्यांना विचारले, “यह क्या हैं, काय शोधताय तुम्ही?”

“एक लडकी हमारे हाथ लगी थी, यह बिल्डिंग में घुस गयी है…” उषाताईंना सुरा दाखवून एकजण म्हणाला, ‘‘वह लडकी कहां छिपाई हैं बताओ, नहीं तो तुम्हारा खून करूंगा.”  उषाताईंनी शांतपणे सांगितले, “या घरात कोणीही आलेले नाही. इथे मी आणि माझा नवरा राहतो. नवरा कामावर गेलाय त्यामुळे मी एकटी आहे. तुम्ही पाहिजे तर परत शोधा.” त्या गुंडांनी परत एकदा घर शोधलं. पण त्यांना काही सापडलं नाही. तसे ते शिव्या देत निघून गेले.

उषाताईंनी दरवाजा बंद केला आणि त्या मटकन कॉटवर बसल्या. एवढी वर्षे मुंबईच्या या भागात राहून असा प्रसंग कधीही आला नव्हता. पण आज मुंबईत दंगल सुरू आहे. या दंगलीचा फायदा असली श्वापदं घेत असतात. उषाताईंनी त्या मुलीचा हात धरून तिला बाहेर आणलं. भीतीमुळे ती जवळजवळ बेशुद्ध पडण्याच्या बेतात होती. तिचा थरथरणारा हात धरून त्यांनी तिला आपल्या शेजारी बसविले. पटकन उठून माठातल्या पाण्याचा ग्लास तिच्या हातात दिला.

हेही वाचा – Local train : डोंबिवली ते कसारा प्रवासातील ‘ते’ नातं

‘‘पी, हे पाणी आणि त्या बाथरूमध्ये जाऊन हातपाय धुवून ये, काय अवतार झालाय बघ तुझा!” त्या मुलीने त्यांच्या हातातील पाण्याचा ग्लास घेतला आणि पटकन तोंडाला लावला, सगळा ग्लास एका दमात संपवला. ग्लास ठेवून ती बाथरुमकडे गेली. तोपर्यंत उषाताईंनी गॅसवर खिचडी करायला घेतली. चहाचे आंदण ठेवले. ती मुलगी हात-पाय तोंड धुवून बाहेर आली. तसे उषाताईंनी तिच्या हातात चहाचा कप दिला. एक कप आपण घेतला.

“या दंगलीत कशाला बाहेर पडली होतीस?”

“क्या करू माँ जी, अब्बा की खाँसी बढ गयी, यह दवा के बिना उनकी खाँसी कम नहीं होगी, हमारे इलाके में सब दुकानें बंद हो गयी, ये एरियामध्ये दवा दुकान चौबीस घंटा चालू रहते है, इसिलीए यहां आयी. तो यह गुंडे मुझे अकेली को देखकर मेरे पीछे पडे. मैं भागती रही और वह पाँचजन मेरे पीछे. यह गली में मैं घुस गयी और इस चाल में नीचे के सब दरवाजे मैंने ठकठकाएँ मगर एकने भी दरवाजा नहीं खोला. इसिलीए ऊपर आयी और तुम्हारे घर पहुँची. तुमने मुझे बचाया माँ जी, मेरी इज्जत बचायी.” तिने उषाताईंसमोर हात जोडले.

त्या मुलीचं लक्ष त्यांनी मांडलेल्या लक्ष्मीपूजेकडे गेले. तिच्या लक्षात आले. आपण या पूजेच्या मागे असलेल्या पडद्याच्या आड लपलो होतो. मघाशी जिवाची भीती होती त्यामुळे लक्ष गेले नाही पण…

“माँ जी आपकी पूजा शुरू थी, क्षमा चाहती हूँ…” ती रडत रडत उषाताईंसमोर हात जोडून म्हणाली, “माँ जी मैं हिंदू नहीं हूँ, मैंने आपका धरम…”

“पण इन्सान तर आहेस ना? इथे धर्माचा सवाल येतो कुठे? अडचणीतल्या मनुष्याला वाचवणे हा तर खरा धर्म आणि असहाय स्त्रीला वाचविणे हे तर महापुण्य…”

“मगर माँ जी आपकी पूजा और मैने…”

“जाऊ दे गं… पूजा झाली नाही तर परत करता येईल. पण बाईची एकदा गेलेली इज्जत परत मिळेल काय? आणि ही लक्ष्मीपूजा माझी आई करायची म्हणून मी करते. माझ्या आईने आयुष्यभर लक्ष्मीपूजा केली. पण तिचे दारिद्र्य तसूभरही कमी झाले नाही. आयुष्यभर माझे आई-बाबा एकवेळ जेवण घेऊन राहिले. तरी ती लक्ष्मीव्रत करत राहिली. तिने माझ्या लग्नात सांगितले म्हणून हे व्रत करते. बाकी त्याच्यात जास्त काही अर्थ नाही. अगं, या झोपडपट्टीतील, चाळीतील, ब्लॉकमधील सगळ्याच बाया लक्ष्मीव्रत करतात, लक्ष्मी तरी कोणाकोणाकडे लक्ष देणार. पण सारेजण आशेवर असतात म्हणून ही पूजा आणि व्रते. बाकी खरं काही नाही… आणि तू मुस्लिम आहेस हे तू धडपडत घरात आलीस तेव्हाच मी ओळखलं होतं!”

“अग काय तुझं नाव?”

‘‘जहिरा”

“माझी एक मुलगी होती छकुली. आठ वर्षांची. माझी एकुलती एक मुलगी. शाळेतून येताना एका गाडीवाल्याने तिला उडवले आणि तो पळाला. जो पळाला तो हिंदू होता आणि रक्तबंबाळ छकुलीला खांद्यावर घेऊन धावत हॉस्पिटलमध्ये पोहोचविणारा मुस्लिम भाई होता. एवढं करूनही छकुली जगली नाहीच. झाली त्याला चौदा वर्षे. आता तुझ्याएवढी असती माझी छकुली…” उषाताई डोळे टिपत सांगत होत्या.

उषाताईंचा सद्गतीत झालेला स्वर ऐकून जहिरा पण गप्प झाली. विषय बदलावा म्हणून ती म्हणाली, “यह पूजा में आप क्या करती है?” “या पूजेचा उपवास असतो. आठ प्रकारची फळे आणून लक्ष्मीची पूजा करतात. चौथ्या गुरुवारी त्याचे उद्यापन असते. यांचे मित्र आहेत जामखेडकर ते नोकरी करतात. पण यांच्या मैत्रीखातर मुद्दाम पूजा सांगायला येतात. मग एका सवाष्णला मी कुंकू लावते आणि तिची पूजा करते. जामखेडकरांची पत्नी आहे साधना नावाची, माझीपण मैत्रीणच ती. ती येते मी तिला कुंकू लावते आणि तिची पूजा करते. पण आज मुंबईत दंगल सुरू आहे. बस, रेल्वे बंद आहेत. त्यामुळे जामखेडकर येऊ शकणार नाहीत. त्यामुळे कुणाला कुंकू लावण्याचा प्रश्नच नाही. असो…”

जहिरा ऐकत होती आणि पटकन ती बोलून गेली, “माँ जी एक बात बोलू? आज आप मुझे कुंकू लगाएगी?” उषाताई चमकल्या. क्षणात म्हणाल्या, “हो, हो, का नाही? माझ्या छकुलीसारखी गं तू. तुझ्याच वयाची. आज मी तुला कुंकू लावते. पण तुझ्या घरी तुझे आई-वडील त्यांना आवडेल का?” “हाँ, क्यों नहीं? मेरे अब्बाजान भी तुम्हारे सोच के है माँ जी, उन्हे हिंदू-मुस्लिम झगडा पसंद नहीं. वह कहते हैं सबने एक-दुसरे के धर्म का आदर करना चाहिए… लगाओ मुझे कुंकू. पर माँ जी तुम्हारे वह पूजा करने वाले क्या नाम है जाम…”

“जामखेडकर, ते मुळीच रागवणार नाहीत. स्त्रीच्या अब्रूपेक्षा धर्म मोठा नसतो हे ते जाणतात. त्यांचे, आमचे, बेलवलकरांचे विचार सारखे आहेत म्हणून आमचे जमते.” उषाताईंनी पाट ठेवला. म्हणाली – “ये बस इथे. ही तुझी ओढणी तुझ्या डोक्यावरून घे.” उषाताईंनी लक्ष्मीच्या फोटोला कुंकू लावलं. त्यानंतर जहिराला कुंकू लावलं. त्यांना जहिराच्या जागी त्यांची छकुली दिसू लागली. डोळे डबडबले. कुंकू लावता लावता दोन अश्रू जहिराच्या हातावर पडले. जहिराने त्यांना घट्ट मिठी मारली. दोघींच्या डोळ्यातल्या गंगा-यमुना एकमेकांत मिसळून गेल्या.

उषाताईंनी खिचडी दोन बशीत घेतली. तिच्या हातात देऊन त्या म्हणाल्या, “तुझे आईबाबा तुझी काळजी करत असतील. या चाळीत एक फोन आहे. पण त्यांच्याकडे घरी जाऊन फोनवर बोलण्याने ही बातमी सर्वत्र होईल. त्यापेक्षा जरा वातावरण निवळले की, मी तुला तुझ्या घरी सोडेन.” उषाताईंनी परत टीव्ही चालू केला. मुंबईत लष्कराचे जवान उतरले होते. पोलीस प्रत्येक नाक्यावर हजर झाले होते. समाजकंटकांना अटक होत होत्या. हळूहळू दुकाने उघडत होती. रेल्वे, बस सुरू झाली होती. मुंबई पूर्वपदावर येत होती. बस सुरू झाली. म्हणजे जयवंतरावांची काळजी नव्हती. ते आपल्या वेळेवर घरी येणार होते.

उषाताईंनी खिडकीतून बाहेर पाहिले. चाळीच्या खाली पोलीस व्हॅन उभी होती. इन्स्पेक्टर आणि लेडीज पोलीस दिसत होते. आणखी पोलीस व्हॅन्स इकडून तिकडे धावत होत्या. उषाताई जहिराला म्हणाल्या, “आता तुला जायला हरकत नाही. जहिरा त्यांच्या पाया पडली. उषाताईंनी हाताला धरून जहिराला खाली आणले. खाली उभ्या असलेल्या इन्स्पेक्टरला सांगून दोन लेडिज पोलीस व्हॅनसकट दिमतीला दिले. जहिरा निघाली. दोघींचे डोळे भरून आले. उषाताईंना वाटले, छकुलीच सासरी निघाली. जहिराने उषाताईंना घट्ट मिठी मारली. उषाताईंनी तिला थोपटत थोपटत तिला आपल्यापासून दूर केले. जहिराने दोन लेडिज पोलीससह व्हॅनमध्ये बसली. हात दाखवत दाखवत जहिरा उषाताईंपासून दूर जायला लागली. जहिराचा हात लांब लांब होत गेला आणि शेवटी एका वळणावर दिसेनासा झाला.

उषाताई मागे वळल्या. चाळीचा जिना चढताना उषाताईंना छकुलीच्या निधनानंतर चौदा वर्षांनी मोकळं मोकळं वाटत होतं. त्यांच्या लक्षात आलं, आज चौदा वर्षांनी आपल्याला गाढ झोप लागणार आहे. उषाताईंनी दरवाजा, खिडकी बंद केली. आपण या वेळेस कधी झोपत नाही. पण आज झोप अनावर झाली आहे. मन शांत शांत झालं होत. छकुली आणि जहिरा, जहिरा आणि छकुली… दोघींचे चेहरे डोळ्यासमोर येता येता उषाताई गाढ झोपी गेल्या…

क्रमश:

मोबाइल – 9307521152 / 9422381299

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!