रश्मी परांजपे
भाग – 1
मागील लेखात आपण पूर्व-प्राथमिक शालेय प्रवेशाची पूर्व-तयारी अभ्यासली. शाळेत प्रवेश जरी आपल्या मुलासाठी घेतला असला, तरी पालक या नात्याने आपली खरी परीक्षा सुरू होते. आता आपण या आणि पुढील लेखांमधे शाळा प्रवेशानंतरची पालकांची जबाबदारी काय असते, या विषयाच्या निवडक मुद्द्यांवर ऊहापोह करणार आहोत.
पालकांची जबाबदारी : काही निवडक मुद्दे
पालकांची मानसिक तयारी
आपलं बाळ आता शाळेत जाणार, इतके दिवस चोवीस तास आपल्याबरोबर असलेलं आपलं बाळ आता दिवसातील दोन-तीन तास आपल्यापासून लांब असणार, या दुराव्याच्या कल्पनेनेच आईचा जीव कासावीस होतो. शाळेच्या सुरुवातीच्या काही दिवसांत तर मुलाला शाळेत सोडल्यावर आईच रडवेली होते. शिवाय मुल रडायला लागलं की, तिला घरी जायला नको वाटतं. मग वर्गाच्या खिडकीतून डोकावून मुल रडतयं का, हे पाहिलं जातं. अशा प्रकारच्या सर्व गोष्टी आईने कटाक्षाने टाळायला हव्यात आणि त्यासाठी स्वतःची मानसिक तयारी करायला हवी.
मुलं शाळेत रमण्यासाठी प्रयत्न
मुलं शाळेत लवकरात लवकर रमावीत यासाठी शाळेतील ताई आणि मावशी (बालशाळेत शिक्षिकेला ताई आणि सेविकेला मावशी म्हणायची पद्धत आहे) मुलांना शाळेकडे आकृष्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. पालकांनी अशा वेळी आपल्या मुलाच्या हिताच्या दृष्टिने त्यांना साथ द्यावी.
पालकांच्या मनातील नानाविध प्रश्न
आपलं मुल वर्गात काय काय करत? रडतं का? ताई, मावशी तसेच वर्गातील इतर मुलांशी नीट वागतं ना, त्रास तर देत नाही ना? असे आणि अशासारखे नानाविध प्रश्न पालकांना पडत असतात. असे प्रश्न पडणे साहाजिकच आहे. परंतु पालकांनी असे प्रश्न वारंवार शिक्षिकेला विचारू नयेत. शिक्षिका प्रत्येक विद्यार्थ्यांची नोंद ठेवत असते आणि शाळेच्या पद्धतीनुसार वेळोवेळी ठराविक कालावधीनंतर पालकांशी संवाद साधत असते. यासाठी सामुहिकरीत्या पालकसभा आयोजित करण्यात येते अथवा गरजेनुसार पालकांशी वैयक्तिक संवाद साधला जातो. अशा प्रकारे पालकांच्या मनातील शंका / प्रश्न यांचे निरसन होत असते.
येथे एक बाब आवर्जून नमूद करावीशी वाटते. पालकांमधे कोणी पेशाने शिक्षक असेल तर त्यांच्या शाळेत पालकांनी शिक्षकांशी कसा संवाद साधावा, अशी त्यांची अपेक्षा असते, तशाच प्रकारचा संवाद आपल्या मुलाच्या शिक्षिकेशी साधावा.
शाळेच्या वेळांचे पालन
शाळा सुरू झाल्यानंतर मुलाला शाळेत वेळेवर घेऊन जाण्याची वेळ आणि शाळा सुटल्यावर मुलाला घरी न्यायची वेळ, या दोनही वेळा खूप महत्त्वाच्या असतात. शाळा सुटल्यावर आई / बाबा वेळेत आले नाहीत तर मुल अस्वस्थ होतं आणि इतर मुलांना न्यायला त्यांचे आई / बाबा आलेत आणि मला न्यायला कोणीच आलं नाही, असं मुलाला वाटतं आणि याचा प्रतिकूल परिणाम मुलावर होऊ शकतो. म्हणूनच पालकांनी या वेळा कटाक्षाने पाळाव्यात. पालकांनी वेळ पाळली तर, मुलांना वेळेची किंमत लहान वयातच कळायला सुरुवात होते.
मुलांना शाळेत नेण्या-आणण्याची जबाबदारी
मुलाला शाळा सुटल्यावर घरी नेण्यासाठी ठराविक व्यक्ती असावी. तसेच आई / वडील यांच्याशिवाय इतर कोणी व्यक्ती येणार असेल तर शिक्षिकेला याची पूर्व-कल्पना द्यावी.
या विषयासंबंधीत आणखीन काही मुद्दे आपण पुढील लेखात पाहुया.
क्रमश:
(लेखिका पूर्व-प्राथमिक शाळेतून मुख्याध्यापिका म्हणून 32 वर्षे कार्यरत राहून निवृत्त झाल्या. या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अनमोल योगदान केले. तसेच लेखिका योग अभ्यासक असून त्या नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. शिवाय निरामय आरोग्य संकल्पना यशस्वीरीत्या राबविण्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. संकल्पनेच्या सविस्तर तपशीलासाठी त्यांना वैयक्तिक संपर्क करावा.)
मोबाइल – 9881943593