दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 11 ऑगस्ट 2025; वार : सोमवार
भारतीय सौर : 20 श्रावण शके 1947; तिथि : द्वितीया 10:33; नक्षत्र : शततारका 13:00
योग : अतिगंड 21:33; करण : वणिज 21:39
सूर्य : कर्क; चंद्र : कुंभ 30:09; सूर्योदय : 06:18; सूर्यास्त : 19:09
पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127
श्रावणी सोमवार
शिवामूठ : मूग
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – आपल्या कामाबाबत आणि दृष्टीकोनाबाबत प्रामाणिक राहा. आपले दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. सामाजिक आयुष्यापेक्षा आरोग्याला प्राथमिकता द्यावी लागेल. आर्थिक बाबींशी निगडीत एखादी समस्या उद्भवू शकते. त्यातून मार्ग काढण्यासाठी वडील किंवा कुणी ज्येष्ठ व्यक्तीकडून सल्ला घ्या.
वृषभ – ताणतणाव, दडपणाच्या काळावर मात करता येईल, मात्र कुटुंबाचा पाठिंबा सहाय्यभूत ठरेल. परदेशातील व्यापाराने जोडलेल्यांना मनासारखे फळ मिळण्याची शक्यता आहे. तर, नोकरदार जातकांना आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्यक्षेत्रात करतील. तुमची उच्च कोटी ऊर्जा आज चांगल्या कामासाठी वापरा.
मिथुन – सामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली आनंदी आणि रिलॅक्स करतील. नवे तंत्रज्ञान शिकून आपले कौशल्य वाढविल्यास त्याचा फायदा होईल. आखलेल्या योजना पार पाडून उद्दीष्ट गाठू शकाल. घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा यामुळे धन लाभ होऊ शकतो.
कर्क – शारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. आज मित्राच्या मदतीने चांगला धनलाभ होण्याची शक्यता आहे. अज्ञात व्यक्तीसोबत वाद होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मूड खराब होईल. भागीदारांच्या तसेच जोडीदारांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करू नका.
सिंह – व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी कठोर प्रयत्न करा. घरातील एखाद्य कार्यक्रमासाठी खर्चाचा भार वाढेल. रागावर नियंत्रण मिळवा. संबंध चांगले, सौहार्दपूर्ण ठेवण्यासाठी प्रयत्न करा. एकदम निष्कर्ष काढाल आणि अनावश्यक कृती केल्यास दिवस तापदायक ठरू शकेल.
कन्या – योजना आहे तशा राबविण्यासाठी भागीदारांना आधी तसे पटवून द्यावे लागेल, त्यात खूप अडचणी येतील. संयम बाळगा, निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्याच्या वृत्तीमुळे हमखास यशप्राप्ती होणार आहे. मुलांची विशेष काळजी घ्या.
हेही वाचा – Unethical values of journalism : पाकिटातून रोख रक्कम देऊन लाच!
तुळ – आयटी क्षेत्रातील व्यक्तींना त्यांचे कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळेल. विचारांवर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे, अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. शांतता राहावी आणि कौटुंबिक वातावरण दूषित होऊ नये यासाठी रागावर मात करणे अत्यंत गरजेचे आहे.
वृश्चिक – शारीरिक आजारातून बरे होण्याचे शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्ही खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकाल. पैशांची कमतरता आज घरात कलहाचे कारण बनू शकते. अशा स्थितीमध्ये घरातील लोकांसोबत विचारपूर्वक बोला आणि त्यांचा सल्ला घ्या. क्रिएटिव्ह कामामध्ये स्वत:ला गुंतवा. जुन्या ओळखी आणि संबंधाना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस.
धनु – कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय गुंतवणुकीसाठी पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. मित्रांकडून अपेक्षेपेक्षा अधिक आधार मिळू शकेल.
मकर – प्रदीर्घ काळापासून अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे. बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. स्वभावात चंचलता आणू नका.
कुंभ – कलात्मक काम आनंद मिळवून देईल. भाऊ, बहीण आर्थिक मदत मागू शकतात, आर्थिक दबाव वाढू शकतो. तथापि, स्थिती लवकरच सुधारेल. नवीन पुस्तक खरेदी करून त्याचा आनंद घ्याल.
मीन – ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्या स्वीकारण्यास शिका. अज्ञात स्रोताने पैसा प्राप्त होऊ शकतो, ज्यामुळे बऱ्याच आर्थिक समस्या दूर होतील. अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही. काळजी घेणारा आणि समजूतदार मित्र भेटेल.
हेही वाचा – Memories : पत्र आणि पत्रपेटी… राहिल्या त्या आठवणी
दिनविशेष
प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ इरावती कर्वे
टीम अवांतर
प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ आणि लेखिका इरावती कर्वे यांचा जन्म 15 डिसेंबर 1905 रोजी ब्रह्मदेशातील (आताचा म्यानमार) इरावती नदीच्या काठी वसलेल्या मिंगयानमध्ये (म्यिंज्यान) झाला. मानवशास्त्राबरोबरच त्यांनी पुरातत्त्वविद्या आणि इतर सामाजिक शास्त्रांमध्ये उल्लेखनीय संशोधनकार्य केले. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या स्नुषा आणि फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दिनकर धोंडो कर्वे यांच्या पत्नी इरावती कर्वे फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना विख्यात गणिती तसेच तेव्हाचे प्राचार्य रँग्लर परांजपे यांच्यामुळे त्या प्रभावित झाल्या. 1926मध्ये त्यांनी तत्त्वज्ञान विषयात पदवी संपादन केली. जर्मनीतील कैसर विल्यम इन्स्टिट्यूटमध्ये मानवशास्त्रात डॉक्टरेटची पदवी मिळवली. इरावती कर्वे यांनी काही वर्षे मुंबईतील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठात कुलसचिव म्हणून काम पाहिले. नंतर पुणे येथे डेक्कन कॉलेजमध्ये इतिहासविषयाच्या प्रपाठक या पदावर त्या रुजू झाल्या. त्यावेळी इरावती कर्वे आणि ह. धी. सांकलिया यांनी पुरातत्त्वविद्येमधील आजच्या मानवशास्त्रीय संशोधनाचा पाया घातला व प्रारंभापासूनच हे संशोधन जागतिक पातळीच्या दर्जाचे व्हावे म्हणून प्रयत्न केले. इरावती कर्वे यांना अनेक मानसन्मान मिळाले. 1947 साली त्यांनी दिल्ली येथील इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये मानवशास्त्र विभागाचे अध्यक्षपद भूषवले. त्यांच्या महाभारतावरील युगांत या ग्रंथाला 1968मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. 11 ऑगस्ट 1970 रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले.