रविंद्र परांजपे
मागील लेखात आपण मानसिक ताणतणावाबद्दल सविस्तर माहिती घेतली. ताणतणाव संज्ञा लक्षात येण्यासाठी आपण उदाहरण घेऊन सारख्याच परिस्थितीतील दोन व्यक्तींच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहिल्या. यावरून आपल्या नक्कीच लक्षात आले असेल की, मानसिक ताणतणाव व्यक्तिसापेक्ष आणि परिस्थितीजन्य असतो. म्हणून मानसिक ताणतणाव ही वैयक्तिक बाब म्हणता येईल.
या लेखात आपण मानसिक ताणतणाव निवारणाची गरज जाणून घेणार आहोत. परंतु हे जाणून घेण्यापूर्वी आपणास मानसिक ताणतणावाचे स्वरूप समजून घ्यायला हवे.
मानसिक ताणतणावाचे स्वरूप
ताणतणावांची व्याप्ती विशाल असून प्रत्येक व्यक्तीला आयुष्यातील विविध घटनांना सामोरे जाताना वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक तसेच व्यावसायिक पातळ्यांवर मानसिक ताणतणाव अनुभवास येतात.
ताण दोन प्रकारचे असतात – 1. लाभदायक ताण, 2. दुःखदायक ताण
लाभदायक ताण (Eustress)
हा ताण चांगल्या प्रकारचा असून याचा शरीर-मनावर सुपरिणाम होतो. उदाहरणार्थ, परीक्षेला जाणे, विविध स्पर्धेत भाग घेणे, नोकरीसाठी मुलाखती देणे इत्यादी. अशा घटनांमधे ताणतणाव जाणवणे स्वाभाविक आहे, परंतु त्यामुळेच व्यक्तीला परिस्थितीला तोंड देण्यासाठी मानसिक प्रेरणा आणि बल मिळते तसेच कालांतराने ताणतणाव निवळतात.
हेही वाचा – Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
दुःखदायक ताण (Distress)
हा वाईट प्रकारचा ताण असून शरीर-मनावर विपरीत परिणाम करतो. उदाहरणार्थ, वाईट बातमी, अशुभ प्रसंग, प्रकृतीबाबत समस्या, कलह आणि भांडणे इत्यादी. यामुळे येणारा ताण शरीर-मनाचे आरोग्य बिघडविण्यास कारणीभूत ठरतो.
आता आपण लेखाच्या विषयाबद्दल जाणून घेऊया.
मानसिक ताणतणाव निवारणाची आवश्यकता आहे काय?
मानसिक ताणतणावाच्या स्वरूपावरून प्रश्नाचे उत्तर सहज लक्षात येईल.
- लाभदायक ताणाचा परिणाम लाभदायी असतो. असा ताण एखादे आव्हानात्मक कार्य यशस्वीरीत्या पूर्ण करण्यास नक्कीच सहाय्य करतो. यामुळे अर्थातच ताणतणाव निवारण अजिबात आवश्यक नाही.
- दुःखदायक ताणाचा परिणाम नेहमीच क्लेशदायी असतो. असे ताणतणाव व्यक्तीच्या शरीर-मनावर दुष्परिणाम करतात.
शारीरिक दुष्परिणाम
अपचन, पोटदुखी, उच्च रक्तदाब, मधुमेह, दमा, हृदयविकार, यकृताचे विकार, मूत्रपिंडाचे विकार, सांध्यांचे विकार, हार्मोन्स असंतुलन इत्यादी.
हेही वाचा – Mental Health : मानसिक ताणतणाव
मानसिक दुष्परिणाम
चिंता, नैराश्य, निरुत्साह, निद्रानाश, उदासीनता, विस्मरण, आक्रमकता, असहाय्यता, मनोदशा विकार, व्यक्तित्व विकार इत्यादी.
दुःखदायक ताणतणावांचे घातक दुष्परिणाम लक्षात घेतल्यास अशा ताणतणावांचे निवारण करणे अत्यावश्यक आहे, हे आपल्या लक्षात आले असेलच.
ताणतणाव हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाचा नैसर्गिक घटक आहे. मानसिक ताणतणावांचे दुष्परिणाम धोकादायक आहेत आणि म्हणूनच मानसिक ताणतणावाची लक्षणे दिसू लागताच त्यांवर यथायोग्य उपाय योजना करायला हव्यात.
क्रमशः
(लेखक योग शिक्षक व अभ्यासक असून त्यांनी मानसिक ताणतणाव निवारणार्थ निवडक उपयुक्त उपाययोजनांबद्दल सविस्तर मार्गदर्शन त्यांच्या निरामय मानसिक आरोग्य या पुस्तकात केले आहे. पुस्तकासाठी त्यांना वैयक्तिक संपर्क करावा.)
मोबाइल – 9850856774