परिणिता रिसबूड
आवर्त
खरेच का जगतो माणूस
भूत, वर्तमान, भविष्य
एकात एकच मिसळतात
हे काळाचे आवर्त
आठवणींचे भुजंग, मारून जातात डंख
आणि ढवळून काढतात
जीवनाचा डोह
पुन्हा पुन्हा भोगतो
तेच तेच भोग
करत राहतो तेच
कर्म, अकर्म, विकर्म
एकाच भोवऱ्यात सतत
फिरत राहतं आयुष्य
खरेच का जगतो माणूस
भूत, वर्तमान, भविष्य
हेही वाचा – Poetry : हाऊस वाइफ, हुरहूर अन् नातं
काही दिवस
मंत्रमुग्ध सुरातून भिजत जावे तसे
आयुष्यातील काही दिवस असेच येतात भारलेले
मग तर हिरवळच हिरवळ
नेत्रसुखद हवासा गारवा
मनातच गुंजत राहतो धुंद मारवा
पावलांवर पडते पाऊल
स्वतःचीच स्वतःवर भूल
पण…
एक काटा एक बोच
कुठेतरी सलते उरात
बेसूर होतात मधेच सूर
बेचैन करते अजब हुरहूर
निसटलेले काही क्षण
न लागलेले काही स्वर
पुन्हा पुन्हा उमटत राहतात
मधेच ताल बिघडून टाकतात
नाही सापडत तेव्हा सम
विखरून जाते सगळी सरगम
काही दिवस असेही जातात
पण पण
पुन्हा रंगतो धुंद मारवा
सापडतो स्वरांचा ठेवा
हृदयात तारा जुळलेल्या
एक आवाज आतला
निराकार, निर्विकार
गाणे आपले असतो गात
काही दिवस असेही जातात
हेही वाचा – काय फक्त हाऊसवाइफ?
गुंफण
थेंब थेंब आयुष्य ठिबकतंय
मी मन लावून जगतीय
थेंबा थेंबाचे घुंगरू होतायत
मी तालात जगतीये
पान पान आयुष्य तरंगतय
मी धुंदीत जगतीये
टाळ टाळ आयुष्य वाजतंय
मी तल्लीन होऊन जगतीये
पारवा पारवा आयुष्य घुमतेय
मी सुरात जगतीये
थेंब थेंब आयुष्य निखळतंय
गुंफत गुंफत जगतीये
मी
वाऱ्यासंगे भिरभिरी
मी फुलपाखरू
फुलफुलातून
मी सुगंध
बनाबनातून
मी रंग वेडी
क्षितिजावरची रांगोळी
मीच शुभ्रता
ढगामधली चांदणी
मी अवखळ
ओठामधली खळखळ
मी सरिता
पाण्यातली गंभीरता
मीच मीरा
मीच राधा
मीच माती
अन मातीतून मी
तीही माती अन् मीही माती
(कवितासंग्रह – कवयित्री)
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.