ॲड. कृष्णा पाटील
भाग – 1
सगळं सामान घेऊन आशिष रेल्वे फलाटावर आला. अजून गाडी यायला दीड तास लागणार होता. एकवीस नंबरच्या फलाटावर त्याने सामान उतरवले. अवघडलेले खांदे थोडे सैल केले. “आता सोन्या-चांदीच्या दुकानात काही राम उरला नाही. मी आपला सरळ गावी जातो. गावाकडे कालव्याचे पाणी आले आहे. थोडी जमीन विकत घेऊन शेती करायला सुरुवात करतो,” तो त्याला सोडायला आलेल्या नायरला म्हणाला.
हातातल्या दोन पिशव्या खाली ठेवत नायर म्हणाला, “खरं म्हणजे, इथंच दुसरा उद्योग केला असता तरी चाललं असतं. आम्ही काय महिन्याच्या महिन्याला भाडं दे असं बोललो नसतो.”
एवढ्यातच रेल्वे आली. फलाटावर एकच गोंधळ उडाला. आशिषने आणि नायरने सर्व बॅगा उचलल्या. आशिषच्या सीटखाली सामान ठेवले. गेली दहा वर्षे आशिष आणि त्याचे कुटुंब नायरच्या घरीच भाड्याने रहात होते. तेथेच उद्योग चालू होता. आता असा अवेळी निरोप देताना नायरचे डोळे नाही म्हटलं तरी पाणवले. खिडकीतून नायरला निरोप देऊन आशिषने आपली जागा पकडली. गाडीने स्टेशन सोडल्यावर आजूबाजूची झाडी आणि डोंगर मागे पडू लागले. विजेचे खांब आणि माणसांचे पुंजके उलट पळताना दिसू लागले. गावी पोहोचायला उद्या सकाळचे अकरा तरी वाजणार होते.
“आता पुण्याला आपण कायमस्वरूपी स्थायिक होणार नाही. त्यापेक्षा पुण्यातला प्लॉट विकून गावाकडे शेतजमीन घेऊ या. पुण्यातला प्लॉट अत्यंत चांगल्या ठिकाणी आहे. त्यामुळे तो लगेच विकला जाईल. परंतु त्या अगोदर गावाकडे जमीन पाहून ठेवलेली बरी. कारण पुण्यातला प्लॉट विक्री झाला आणि पैसे आले तर त्या पैशाला नको तेवढे पाय फुटतील. त्यापेक्षा अगोदर गावाकडे जमीन पाहूया.” रात्री उशिरापर्यंत तो याच विचारात होता.
“तुमचं ठिकाण आलं पावणं. उठा आता,” शेजाऱ्याने हलवल्यावरच तो जागा झाला. डोळे चोळत खिडकीतून त्यानं बाहेर पाहिले. जुनाट स्टेशनवर गाडी थांबली होती. हरी नाना स्वतः त्याला न्यायला आले होते. त्यांच्याबरोबर कोणतरी दोघे अनोळखी इसम होते. एकाने लाल रंगाचा चिटाचिटाचा मफलर गळ्यात गुंडाळला होता. केसांना कलप करून चारी बोटात अंगठ्या घातल्या होत्या. चपचपीत तेल लावल्यामुळे त्याचे डोके चेपलेल्या काळ्या चकचकीत बिब्यासारखे दिसत होते. दुसरा मध्यम वयाचा इसम निमुळत्या दुमडलेल्या मुठीत धरून सिगारेट ओढत उभा होता. त्यांने पांढरी शुभ्र विजार आणि तसाच सदरा घातला होता. त्याच्या हातात चांदीचे गोल झगझगीत कडे होते.
“तुम्ही निवांत उतरा. आम्ही घेतो सामान. काही काळजी करू नका…” आशिषकडे बघत दोघेही डब्यात चढले. त्यांनी सर्व सामान खाली उतरले. फलाटाच्या बाहेर आल्यानंतर एकाकडे बोट दाखवून हरी नाना म्हणाले, “हे दत्ता भाऊ काळके आणि दुसरे बबन मामा साळवी. दोघेही जमीन खरेदी-विक्रीचा धंदा करतात. आपणाला गावात दोन-तीन एकर जमीन हवी आहे, ही बातमी त्यांना समजली. त्यांनी चांगल्या ठिकाणी आपल्यासाठी जमीन बघून ठेवली आहे. मला ते बघायला चला म्हणत होते. परंतु मी म्हटलं, मुलगा परराज्यातून येऊ दे. मग आपण सर्वजण जाऊया.”
हेही वाचा – Love marriage : जुन्या विचारांना आव्हान देणारं नवं व्हर्जन
गाडीच्या मागच्या डिकीत सर्व सामान भरले. आशिष पुढच्या सीटवर बसला. दत्ता भाऊ आणि बबन मामा मधल्या सीटवर बसले. हरी नाना ड्रायव्हिंग करू लागले. तीन किलोमीटर डांबरी रस्ता सोडल्यानंतर गावाकडे जाणारा सगळा रस्ता मुरमाड आणि कच्चा होता. गाडी अगदी हळूहळू निघाली होती. आशिष खिडकीतून बाहेर पाहत होता. “आता आपणाला गावीच काहीतरी करावं लागणार आहे. वेळ चांगली की निदान अंगावर कर्ज तरी नाही…” तो स्वतःच्या विचारात तल्लीन होता.
खिडकीची काच खाली करून दत्ता भाऊने तंबाखूची पिचकारी बाहेर टाकली आणि काच वर घेत तो म्हणाला, “भटाच्या मळ्यातली देसाईंची जमीन विक्रीस निघालेली आहे. दुसरी पवारांची जमीन सुद्धा विक्रीस निघालेली आहे. तुमच्यासाठी ती जमीन अत्यंत सोयीची आहे. जमिनी म्हणजे काय वांग्याची भाजी नव्हे. पुन्हा पुन्हा त्या मिळत नाहीत. देसाईच्या जमिनीला तर दोन गिऱ्हाईकं येऊन गेलीयत. म्हणून आम्ही नानांना समजून सांगितले आहे.” आशिष बाहेरच पाहत होता. गाडीचा गिअर बदलून हरी नाना म्हणाले, “आपण घरी जाऊ या. मी आमच्या आशिषबरोबर बोलतो. त्याला अजून यातलं काही माहिती नाही. मी तुम्हाला उद्या-परवा निरोप देतो.”
हरी नानांनी गाडीला वळसा मारून गाडी अंगणात उभी केली. दोन बॅगा, चार पिशव्या आणि इतर बरेच साहित्य खोलीत ठेवल्यावर हात झाडून बबन मामा म्हणाला, “हरी नाना, दोन दिवस लावू नका. आज संध्याकाळपर्यंत किंवा जास्तीत जास्त उद्या सकाळपर्यंत निरोप द्या. हातची जमीन एकदा गेली की, पुन्हा आपल्याला लय ताप होईल.”
दोन दिवस प्रवासाने शिणून आलेल्या आशिषला पाण्याचा ग्लास देता देता, घराबाहेर गेलेल्या दत्ता भाऊ आणि बबन मामाकडे पाहत आई म्हणाली, “बरं झालं लवकर गेले ते. यांनी तर दोन-तीन दिवस घराचा उंबरा मोडून काढलाय.”
आशिषने पाण्याचे दोन घोट घेतले आणि ग्लास आईकडे देत म्हणाला, “ते देसाई आणि पवारांच्या जमिनीबद्दल काहीतरी सांगत होते.” एवढ्यात हरी नाना म्हणाले, “तू आता आंघोळ कर. निवांत थोडी विश्रांती घे. संध्याकाळी आपण सविस्तर बोलूया.”
बाहेर टळटळीत दुपार झाली. गावातल्या मारुतीला जाण्यासाठी हरीनाना बाहेर पडले. आज शनिवार होता. परंतु सकाळी आशिषला आणायला गेल्यामुळे मारुतीचे दर्शन झाले नव्हते. जानू तात्याच्या घराच्या पडक्या पाठभिंतीला टेकून चंदरदादा बसला होता. हरी नानाला पाहून त्याने हाक मारली. त्यांना जवळ बोलवून घेतले. बंडीच्या खिशातून तंबाखूची पुडी काढत, चुन्याची डबी द्या, असे हाताने खूणवले.
हेही वाचा – Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
तळहातातल्या तंबाखूला चुना लावता लावता चंदरदादा म्हणाला, “नाना, त्या दत्ताच्या आणि बबनच्या लय नादी लागू नका. तुम्ही आता गावाकडे बऱ्याच वर्षांनी आलाय. कुठं आणि कसा चूना लावतील हे तुम्हाला समजणार पण नाही.” चुन्याची डबी पुन्हा सदऱ्याच्या खिशात ठेवत नाना म्हणाले, “त्यांनी चांगल्या ठिकाणी जमीन बघितल्या म्हणूनच काय बोलता येईना. नाहीतर त्यांचा कशाला नाद करतोय?” नाना मारुतीच्या मंदिराकडे चालू लागले.
सायंकाळचे जेवण करून नॅपकिनला हात पुसत पुसत हरी नाना कोचवर बसले. त्यांनी सर्वांना बोलावून घेतले. आशिष आणि कोमल चटई अंथरून खाली बसले. एवढ्यात कांता काकू बडीशेपचा डबा घेऊन आल्या. सर्वांना बडीशेप देता देता म्हणाल्या, “आपण खूप वर्षांनी गावाकडे आलो आहे. गावातील कुठल्याच माणसांचा आपल्याला अंदाज नाही. पैशाची देवाणघेवाण करताना लय काळजीपूर्वक करायला पाहिजे.”
हरी नाना आशिषकडे पाहून म्हणाले, “पुण्यातला प्लॉट एक कोटीला कसाही जाईल. अगदी लुटून विकला तरी त्याला पैसे येणार आहेत. कारण ते ठिकाण अत्यंत सुंदर आणि मध्यवर्ती आहे. आपण विक्रीला काढल्यानंतर एक महिना म्हणजे लय झाला.”
बडीशेप तोंडात टाकून आशिष म्हणाला, “देसाईंच्या जमिनीचा काय दर सांगितलाय?” “देसाईची जमीन रस्त्यालगत आहे. बारमाही पाण्याची सोय आहे. पन्नास बाय पन्नासची विहीर कायम तोंडाबरोबर असते. आपल्याला चार एकर जमीन साधारण 85 ते 90 लाखांपर्यंत पडेल.”
“मग काही हरकत नाही. आपण पुण्याचा प्लॉट विक्री करण्याच्या मागे लागू या.”
हरी नाना म्हणाले, “पुण्याचा प्लॉट केव्हाही विकता येईल. आता थोडं कर्ज झालं तरी चालंल. आपण गावातल्या जमिनीला ॲडव्हान्स तर देऊन ठेवूया.”
रात्रभर हरी नाना, देसाईंच्या जमिनीचा विचार करीत होते. एकदा जमीन गेली तर तशी जमीन पुन्हा दुसऱ्यांदा मिळणार नाही. अगोदरच एका व्यवसायामध्ये तोटा झाला होता. तो तोटा भरून काढण्यासाठी सगळीच रक्कम खर्च झाली. आता आपल्याकडे पुण्यातल्या प्लॉट शिवाय काही शिल्लक नाही. त्यामुळे काळजीपूर्वक व्यवहार केला पाहिजे. इथली जमीन खरेदी करून दहा-वीस लाख रुपये शिल्लक राहतील. त्यातून त्या जमिनीमध्ये सुधारणा करून आपल्याला उत्पन्न घेता येईल.
गेटवरची बेल वाजल्यावर हरी नाना ताडकन उठले. सकाळचे साडेसात वाजले होते. बाहेर कोवळे ऊन पसरले होते. शेजारच्या हॉटेलच्या टपरीमध्ये मोठ्या आवाजात गाणी चालू होती. चहाच्या कपबशा आणि भांडी विसळल्याचा आवाज येत होता. दारात दत्ता भाऊ आणि बबन मामा येऊन उभे राहिले होते.
हरी नानाला दरवाजात पाहून त्यांनी नमस्कार केला. हरी नाना म्हणाले, “या ना. आत तरी या.”
ते दोघे आत हॉलमध्ये येऊन बसले. दत्ता भाऊने लावलेल्या अत्तराचा भपकारा हॉलभर पसरला. निळसर चौकड्याची लुंगी सावरत, शर्टाची बटणे घालत आशिषपण हॉलमध्ये येऊन बसला. दत्ता भाऊ म्हणाले, “काल आम्ही देसाईची भेट घेतली आहे. आम्ही त्यांना सर्व गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या आहेत. हरी नाना आणि आशिष ही माणसे व्यवहाराला अत्यंत स्वच्छ आहेत. त्यांची समाजात फार मोठी इज्जत आहे. त्यामुळे देसाईंनी जमीन दिली तर, हरी नानालाच द्यायची हे पक्के केले आहे. तुमचा पुण्याचा प्लॉट विकायला दोन-तीन महिने अवधी असला तरी, देसाई सहा महिन्याचा अवधी द्यायला तयार आहेत. आता त्यांना फक्त चाळीस लाख रुपयांची गरज आहे. चाळीस लाख रुपये देऊन ते खरेदीपत्र सुद्धा द्यायला तयार आहेत. इतका त्यांचा तुमच्यावर विश्वास आहे.”
कांता काकू चहाचा ट्रे घेऊन आल्या. त्यांनी एक कप दत्ता भाऊना दिला. दुसरा बबन मामाला दिला. हरी नानाला चहा देता देता त्या म्हणाल्या, “देसाईनी आपल्यावर एवढा विश्वास टाकलाय, तर आपण तसा व्यवहार करायला काय हरकत आहे?”
चहा घेता घेता आशिष म्हणाला, “खरेदीपत्र लिहून दिले तर त्यामध्ये सर्व रक्कम मिळाली असे नमूद करावे लागते.”
त्यावर बबन मामा पटकन म्हणाला, “त्याची तुम्ही काळजी करू नका. तुमच्यावर विश्वास असल्यामुळे ते तुम्ही म्हणाल तसे लिहून द्यायला तयार आहेत. तुम्ही आता फक्त चाळीस लाख रुपयांची जोडणा करा. तेही दोन-तीन दिवसांत.”
परत जाण्यासाठी दत्ता भाऊ उठून उभा राहिले. बाहेर जाताना म्हणाले, “हरी नाना, खरं सांगू का? तुम्ही खूप नशीबवान आहात. तुमच्या नशिबात देसाईंची जमीन होती म्हणूनच देसाई तयार झाले. नाहीतर त्यांच्या पलीकडचा दादू आप्पा रोख पैसे घेऊन बसलाय. तरी देसाईनी त्यांना नकार दिलाय.”
दत्ता भाऊ आणि बबन मामा गेटच्या बाहेर पडताच आशिषने दरवाजा बंद केला. नंतर हरी नानांना म्हणाला, “कोमलच्या वडिलांना फोन केला तर चाळीस लाख रुपये त्यांना जास्त नाहीत. शिवाय आपण दोन-तीन महिन्यांत परत करणारच आहोत. परंतु दर वेळेला त्यांना फोन करणे योग्य वाटत नाही.”
हरी नाना म्हणाले, “आता योग्य, अयोग्य ठरवत बसण्याची वेळ नाही. मी त्यांना फोन करतो. आपल्याला तीन महिन्यांकरताच पैसे आवश्यक आहेत. खरं म्हटलं तर, पुण्यातला प्लॉट जायला पंधरा दिवस सुद्धा लागणार नाहीत.”
दोरीवरची कपडे घेऊन आंघोळीला जाता जाता हरी नाना आशिषला म्हणाले, “तुझंही लवकर आवरून घे. पाहुण्यांना पैशासाठी फोन करण्यापेक्षा आपण प्रत्यक्षात जाऊन येऊया. एवढ्या मोठ्या गोष्टी फोनवरून सांगणे योग्य होणार नाही.”
बरोबर दुपारी दोन वाजता आशिष आणि हरी नाना भीमराव तात्यांच्या घरी पोहोचले. भीमराव तात्यांनी सर्व गोष्टी ऐकून घेतल्या. थोड्या वेळाने ते घरात जाण्यासाठी उठणार एवढ्यातच हरी नाना म्हणाले, “परवा दिवशी कागद करायचा आहे. तुम्ही पण यायला लागतंय. त्यामुळे तुम्ही येताना रक्कम किंवा चेक घेऊन या. आता आम्ही वागवत नेत नाही.”
नोंदणी कार्यालयाच्या पायऱ्या चढता चढता हरी नाना आशिषला म्हणाले, “खरेदीपत्राची कागदपत्रे त्यांनी तयार केली आहेत. संपूर्ण वाचून बघितल्याशिवाय सही करायची नाही. देसाईंबरोबर सुद्धा आपलं काहीच बोलणं झालं नाही.” आशिष म्हणाला, “या दोघांनी देसाईंची जबाबदारी घेतली आहे, म्हटल्यानंतर आपण बोलायची काय आवश्यकता नाही.”
क्रमश: