वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे; तथापि संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे.
अध्याय पहिला
अहो अर्जुनाचिये पांती । जे परिसणया योग्य होती । तिहीं कृपा करूनि संतीं । अवधान द्यावें ||62|| हें सलगी म्यां म्हणितलें । चरणां लागोनि विनविलें । प्रभु सखोल हृदय आपुलें । म्हणऊनियां ।।63॥ जैसा स्वभावो मायबापांचा । अपत्य बोले जरी बोबडी वाचा । तरी अधिकचि तयाचा । संतोष आथी ।।64।। तैसा तुम्हीं मी अंगीकारिलां । सज्जनीं आपुला म्हणितला । तरी उणें सहजें उपसाहला । प्रार्थूं कायी ।।65।। परी अपराधु तो आणीक आहे । जें मी गीतार्थु कवळूं पाहें । तें अवधारा विनवूं लाहें । म्हणऊनियां ।।66।। हें अनावर न विचारितां । वायांचि धिंवसा उपनला चित्ता । येऱ्हवीं भानुतेजीं काय खद्योता । शोभा आथी ।।67।। कीं टिटिभू चांचुवरी । माप सूये सागरीं । मी नेणतु त्यापरी । प्रवर्तें येथ ||68|| आइका आकाश गिंवसावें । तरी आणीक त्याहूनि थोर होआवें । म्हणऊनि अपाडु हें आघवें । निर्धारितां ।।69।। या गीतार्थाची थोरी । स्वयें शंभू विवरी । जेथ भवानी प्रश्नु करी । चमत्कारोनी ।।70।। तेथ हरु म्हणे नेणिजे । देवी जैसें कां स्वरूप तुझें । तैसें हें नित्य नूतन देखिजे । गीतातत्त्व ।।71।। हा वेदार्थसागरु | जया निद्रिताचा घोरु | तो स्वयें सर्वेश्वरु | प्रत्यक्ष अनुवादला ||72॥ ऐसें जें अगाध । जेथ वेडावती वेद । तेथ अल्प मी मतिमंद । काय होय ॥73॥ हें अपार कैसेनि कवळावें । महातेज कवणें धवळावें । गगन मुठीं सुवावें । मशकें केवीं ॥74॥ परी एथ असे एकु आधारु । तेणेंचि बोलें मी सधरु । जे सानुकूळ श्रीगुरु | ज्ञानदेवो म्हणे ॥75॥ येऱ्हवीं तरी मी मुर्खु । जरी जाहला अविवेकु । तरी संतकृपादीपकु । सोज्वळु असे ।।76।। लोहाचें कनक होये । हें सामर्थ्य परिसींच आहे । कीं मृतही जीवित लाहे । अमृतसिद्धि ॥77॥ जरी प्रकटे सिद्धसरस्वती । तरी मुकया आथी भारती । एथ वस्तुसामर्थ्यशक्ती | नवल कायी ।।78।। जयातें कामधेनु माये । तयासी अप्राप्य कांहीं आहे । म्हणऊनि मी प्रवार्तो लाहें । ग्रंथीं इये ।।79।। तरी न्यून तें पुरतें। अधिक तें सरतें । करूनि घेयावें हें तुमतें । विनवितु असें ॥80॥
हेही वाचा – Dnyaneshwari : …म्हणऊनि महाभारती जें नाहीं । तें नोहेचि लोकीं तिहीं I
अर्थ
अहो, अर्जुनाच्या पंक्तीला बसून ऐकण्याची ज्यांची योग्यता असेल त्या संतांनी कृपा करून इकडे लक्ष द्यावे. 62. अहो महाराज, आपले अंतःकरण सखोल आहे. म्हणून हे (वरील ओवीतील) विधान मी केवळ लडिवाळपणाने केले. ही (वास्तविक) आपल्या पायांजवळ विनंती आहे. 63. लहान मूल जरी बोबड्या शब्दांनी बोलले, तरी त्याचा अधिकच संतोष मानावयाचा, हा ज्याप्रमाणे आईबापांचा स्वभावच असतो; 64. त्याचप्रमाणे तुमच्याकडून माझा अंगीकार झाला आहे आणि सज्जनांनी मला आपला म्हणून म्हटले आहे, तेव्हा अर्थातच (माझे जे काय) उणे असेल ते सहन करून घ्यालच. त्याबद्दल आपली प्रार्थना कशाला? 65. परंतु (खरा) अपराध तो वेगळाच आहे. तो हा की, मी गीतेचा अर्थ आकलन करण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणून ऐका, ही मी तुम्हाला विनंती करीत आहे. 66. हे (गीतार्थाचे काम) न झेपणारे आहे, याचा विचार न करता उगाच हे साहस करण्याचे मनांत आणले. वास्तविक पाहिले तर, सूर्यप्रकाशांत काजव्याची काय शोभा आहे? 67. किंवा, टिटवीने (समुद्र आटविण्यासाठी) ज्याप्रमाणे आपल्या चोचीने समुद्राचे पाणी उपसून टाकण्याचा (अजाणपणाने) प्रयत्न करावा, त्याप्रमाणें अजाण मी गीतार्थ करण्यास प्रवृत्त झालो आहें. 68. हे पाहा, आकाशाला कवळायाचे असल्यास आकाशाहून मोठे व्हावयास पाहिजे; म्हणूनच हे सर्व करणे, विचार केला असता, माझ्या योग्यतेबाहेरचे आहे. 69. या गीतार्थाची महति एवढी आहे की, स्वतः शंकर आपल्या मनाशीच त्याचा विचार करीत असता, देवी पार्वतीने “आपण एकसारखा विचार कशाचा करता?” असा त्यांना मोठ्या आश्चर्याने प्रश्न केला. 70. त्यावर शंकर म्हणाले, “हे देवी, ज्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा थांग लागत नाहीं, त्याचप्रमाणे गीतातत्त्वाचा विचार करावयास जावे, तेव्हा (ते) रोज नवीनच आहे असे दिसते.” 71. समुद्राप्रमाणे अमर्याद असणारा वेदार्थ हा (योग-निद्रेत असलेल्या) ज्या सर्वेश्वराचे झोपेतील घोरणे आहे, त्या परमात्म्याने स्वतः प्रत्यक्ष गीता सांगितली. 72. असे हे (गीतार्थाचे काम) गहन आहे; या कामी वेदांचीहि मति कुंठित होते. मी तर पडलो लहान, मंदमति, तेव्हा तेथे माझा पाड कसा लागणार? 73. या अमर्याद गीतार्थाचे कसे आकलन होणार? सूर्याला कोणी उजळावे? चिलटाने आकाश आपल्या मुठीत कसे ठेवावे? 74. असे आहे तरी, ज्ञानदेव म्हणतात, या कामी (मला) एक श्रीगुरु निवृत्तिराय यांची अनुकूलता आहे, त्यांच्या आधारावर धीर धरून मी बोलतो. 75. एरवी मी तर बोलून चालून मूर्ख आहे आणि माझ्या हातून हा अविचार होत आहे. तरी (पण) संतकृपेचा दिवा (मजपुढे सारखा) लखलखीत जळत आहे. 76, लोखंडाचे सोने होते खरे; परंतु तसे करण्याचे सामर्थ्य केवळ परिसामध्येच आहे; किंवा अमृत प्राप्त झाल्याने मेलेल्यालाहि जीवित लाभते. 77. जर प्रत्यक्ष सरस्वती प्रकट होईल, तर मुक्याला वाचा फुटेल. ही केवळ वस्तुसामर्थ्याची शक्ति आहे, यात आश्चर्य ते काय? 78. कामधेनु ही ज्याची आई आहे त्याला न मिळण्यासारखे काय आहे? आणि म्हणूनच मी हा ग्रंथ करण्यास प्रवृत्त झालो आहे. 79. तरी उणे असेल ते पुरे करून घ्यावे आणि जास्त असेल ते सोडून द्यावे, अशी माझी आपणांस विनंती आहे. 80.
हेही वाचा – Dnyaneshwari : जैसे भ्रमर परागु नेती…