सुहास गोखले
सर्वसाधारणपणे आकाशातील ताऱ्यांच्या 88 मांडण्यांना आता जागतिक स्तरावर ‘तारकासमूह’ (Constellations) म्हणून ओळखले जाते. याआधी ताऱ्यांच्या विविध गटांना, मांडण्यांना नक्षत्र असे म्हणण्याची रूढी होती. नक्षत्र ही संकल्पना प्राचीन भारतीय ज्योतिषशास्त्रातून आलेली आहे. एकूण 27 नक्षत्रे असून अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती अशी त्यांची नावे आहेत. या विषयीच्या लेखमालेत आतापर्यंत आपण 21 नक्षत्रांची माहिती घेतली. या लेखात आपण श्रवण, धनिष्ठा आणि शततारका या नक्षत्रांबाबत जाणून घेऊ.
श्रवण : हे नक्षत्र देखील ओळखणे तसे कठीण नाही. धनुराशीच्या पुढे जरा पूर्व-उत्तरेस म्हणजे ईशान्य दिशेस पाहिले तर, आपणास तीन सरळ रेषेतील तीन तारका आढळतात. यांच्यात बाजूच्या दोन्ही तारका थोड्या फिकट तर मधली तारका चांगलीच तेजस्वी दिसते. हा समूह म्हणजेच श्रवण नक्षत्र. श्रवणाचा अर्थ ऐकण्याचे इंद्रिय म्हणजे कान.
वेदामध्ये श्रवण नक्षत्राला फार मोठे महत्त्वाचे स्थान दिले आहे. वैदिक कल्पनेनुसार श्रवणाचे तीन तारे यांना श्रोणा (उन्नतीच्या आणि मुक्तीच्या तीन पायर्या) मानले आहे. श्रोणा शब्दावरून बहुदा श्रवण नाव पडले असावे.
हेही वाचा – Nakshatra Gatha : मूळ नक्षत्रासह पूर्वाषाढा अन् उत्तराषाढा
आपल्या येथे श्रवण नक्षत्राचा संबंध रामायणातील श्रावणाशी जोडला जातो. मधला प्रखर तारा म्हणजे श्रावणबाळ बाजूचे दोन तारे म्हणजे त्याचे आई आणि वडील. या नक्षत्राचा जरी या कथेशी संबंध जोडला असला तरी, मृग नक्षत्रातील मृगाच्या शरीरात घुसलेला बाण हा त्याच्या शेजारील व्याध तार्याने मारला आहे. त्याचप्रमाणे या श्रवणबाळाने आपल्या आई-वडिलांना आकाशगंगेच्या काठाशेजारी आणले आहे, असे मानल्यास आसपास दशरथ राजासाठीचा तारा आढळत नाही. जरी शेजारच्या धनुर्धारी (धनु राशीच्या) तारकासमूहास दशरथ राजा मानले तरी, त्याचा बाण रोखलेला दिसतो तो वृश्चिक राशीकडे.
धनिष्ठा : श्रवण नक्षत्राप्रमाणे हे नक्षत्र तसे पटकन ओळखता येत नाही. म्हणून या नक्षत्रास शोधण्यासाठी श्रवण नक्षत्राची मदत घ्यावी लागते. श्रवण नक्षत्राच्या थोडे पुढे आपणास जवळजवळ असलेल्या पाच तारकांचा एक समूह आढळतो. या पाच तारका तेजस्वी नसल्या तरी, साध्या डोळ्यांनी त्या दिसतात. त्यांचा आकार साधारण उडणार्या पतंगाप्रमाणे भासतो. या पाच तारकांना पंचक देखील म्हणतात. आपल्या येथे मात्र धनिष्ठा नक्षत्रावरील मृत्यू हा अशुभ मानला जातो.
भारतीय ज्योतिषविषयक ग्रंथातून धनिष्ठाच्या पाच चांदण्या (धनिष्ठा पंचक) असल्याचा उल्लेख पूर्वीपासून येतो. पण काही वैदिक संदर्भावरून धनिष्ठाच्या चांदण्या पाच नसून चार असल्याचे समजते. प्राचीन लोकांचे निरीक्षण सूक्ष्म असल्याचा प्रत्यय अनेकदा खगोलशास्त्रात येतो. तर मग, या चार चांदण्याच्या ऐवजी नंतर पाच चांदण्याचा उल्लेख होणे, याचा अर्थ असा होतो की, नंतर या नक्षत्रामध्ये एखाद्या नवीन तार्याचा जन्म झाला असावा.
भारतीय वैदिक काळापासून धनिष्ठाचा उल्लेख आहे. पण त्यांना धनिष्ठा न म्हणता ‘श्रविष्ठा’ म्हणत असत. या शब्दाचा अर्थ ‘सुप्रसिद्ध’ असा आहे.
शततारका : शततारका म्हणजे शंभर तारका. परंतु मुळात या नक्षत्रात जेमतेम आठ-दहाच्या आसपास तारका आहेत आणि त्या देखील फार तेजस्वी नाहीत. साहजिकच त्यामुळे या नक्षत्रास शोधणे थोडे अवघडच. धनिष्ठा नक्षत्रापासून थोडे पुढे पूर्वेकडे पाहिल्यास आपणास थोड्याशा अंधुक आठ-दहा तारका आढळतात. शक्यतो अंधार्या रात्रीच त्या दिसतात. आपल्या येथे या नक्षत्राचा समावेश कुंभ राशीमध्ये केला जातो. कुंभ म्हणजे पाण्याचा घडा.
हेही वाचा – आकाशातील चित्रा आणि स्वाती नक्षत्र
वैदिक काळापासून आपल्या येथे या शततारकेचा उल्लेख आढळतो. वैदिक काळात त्यांना शततारका ऐवजी शतभिषक असे म्हणत असत. या नावाचा काहीसा अर्थ शंभर वर्ष आयुष्य देणारा असा होतो. या नक्षत्राचा काळ हा विशिष्ट औषधी वनस्पतीचा असावा किंवा या नक्षत्रावर अनेक वैद्यांचा जन्म झाल्यामुळे आपल्या पूर्वजांचा शततारकेबद्दल तसा समज झाला असावा? खात्रीने सांगता येत नाही.
यजुर्वेदात या शततारका नक्षत्राकडे आपल्याला आयुष्य आणि आरोग्य देणारी औषधे मागितलेली आहे. बहुदा शततारका हे नाव ठेवण्यामागे अशी काहीशी कारणे आढळतात.
क्रमश:
(लेखक निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमलीपदार्थ विरोधी कक्ष)