रविंद्र परांजपे
मनाचे आरोग्य (Mental Health) चांगले असेल तर, शरीराचे आरोग्य चांगले राहते. तथापि, दैनंदिन जीवनात आपण नेहमी शरीराचे आजार, व्याधी-विकार, तक्रारी इत्यादींबद्दल म्हणजेच शारीरिक आरोग्याबाबत बोलत असतो. जसे आपले शरीर आजारी पडते तसे मनही आजारी पडू शकते आणि प्रत्यक्षात मन आजारी पडते देखील, पण शरीराप्रमाणे आपल्याला मन दिसत नसल्याने मनाचे आजारपण आपल्या लक्षातच येत नाही.
यदाकदाचित मनाचे आजारपण लक्षात आले तरी, ते दडपण्यात अथवा लपविण्याकडे अधिक भर असतो. असे केल्यास साहजिकच मानसिक समस्या बळावतात आणि परिणामी मानसिक व्याधी, विकार उद्भवतात. मनाचे आरोग्य बिघडले की, त्याचा थेट दुष्परिणाम म्हणजे शरीराचे आरोग्य देखील बिघडते. ही बाब ध्यानात घेऊन आपण मनाचे आरोग्य चांगले ठेवण्याकडे लक्ष द्यायला हवे.
आता आपण मन या संज्ञेविषयी थोडक्यात जाणून घेऊ या.
मन – आयुर्वेदानुसार मानवी शरीर पंचकोशांनी बनले असून त्यात मनोमय कोश म्हणजे मनाचे आवरण याचा इतर कोशांप्रमाणे सक्रिय सहभाग आहे. शरीरातील प्रत्येक पेशीला मन असून या सचेतन पेशींचे संपूर्ण मिळून तयार होणारे मानसिक शरीर म्हणजे मन होय.
हेही वाचा – Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मन या शब्दातील ‘म’ म्हणजे मरेपर्यंत आणि ‘न’ म्हणजे नष्ट. मरेपर्यंत जे नष्ट होत नाही ते मन. थोडक्यात सांगायचे झाल्यास, मन सतत मनन करत असते, म्हणून त्याला मन म्हणतात. मनाचे स्थान हृदय आहे. मनाचे गुण सत्त्व असून मनाचे दोष रज आणि तम आहेत.
मन या संज्ञेबद्दल थोडक्यात जाणून घेतल्यानंतर मनाचे आरोग्य म्हणजे काय, हे समजणे सुकर होणार आहे.
मनाचे आरोग्य म्हणजे मनाची नैसर्गिकरीत्या झालेली निकोप सुदृढ वाढ आणि विकास होय. मनाचे आरोग्य ही संकल्पना मानसिक विकारांचा अभाव एवढ्यापुरती मर्यादित नाही. या संकल्पनेत एकंदर बरे वाटणे, भावना सुखद असणे, विचारसरणी सुसंगत असून वर्तणूक समाजमान्य असणे, अशा बाबींचा प्रामुख्याने समावेश होतो.
हेही वाचा – Yoga is lifestyle : प्राणायाम हाच योग विद्येचा आत्मा
समारोप – मन ही मानवाला मिळालेली विशेष देणगी आहे. वास्तविक, शरीरापेक्षा मनाची शक्ती मोठी असते. दैनंदिन जीवनातील कार्ये करण्यासाठी तसेच आयुष्यातील कोणतेही ध्येय गाठण्यासाठी शारीरिक स्वाथ्याबरोबर निरामय मानसिक आरोग्यातून प्राप्त होणाऱ्या मनोबलाची साथ सदैव आवश्यक असते. म्हणूनच शारीरिक आरोग्यावर सुपरिणाम करणाऱ्या मनाचे आरोग्य जपणे नितांत आवश्यक आहे.
क्रमश:
(लेखक योग शिक्षक आणि अभ्यासक असून त्यांनी निरामय मानसिक आरोग्य हे सोप्या सहज समजेल अशा पद्धतीने तसेच भाषेत मार्गदर्शनपर दैनंदिन जीवनात उपयोगी पुस्तक लिहिले आहे. पुस्तकासाठी त्यांना वैयक्तिक संपर्क करावा.)
मोबाइल – 9850856774
निरामय मानसिक आरोग्य या पुस्तकाच्या सादरीकरणाच्या व्हिडीओची लिंक –
Khup chan…
धन्यवाद